माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर !

Submitted by अनिंद्य on 12 May, 2022 - 03:54

माय नेम इज ब्लॉगर, फूड ब्लॉगर

4BD282D1-1FD5-4AA5-8419-0D78BD3E28FC.jpeg

फोर जी फाईव्ह जी ची संपर्क क्रांती करणारी दुनिया आपल्या देशात अवतरली आणि आपल्या जालीय जीवनातही एक मोठा बदल घेऊन आली. आता स्मार्टफोन झालाय आपला नवीन तळहात आणि जालविश्व् बनलंय आपलं दुसरं घर. फेसबुक, इन्स्टा, टिकटॉक वगैरे आता घरचेच झालेत पण गेली काही वर्ष टिकटॉकर्स, स्टॅन्ड अप कॉमेडीयन्स आणि यू ट्युबर्स च्या जोडीला प्रचंड फोफावलेला एक नवा वर्ग म्हणजे फूड ब्लॉगर्स / Vloggers.

जगभरातील एकूण फूड ब्लॉगर्स सुमारे २२ कोटी आहेत अन त्यातले निम्मे एकट्या भारतात आहेत म्हणे. आता एव्हढ्या प्रचंड संख्येने रोज नवीन काही Vlogging साठी तेवढ्याच संख्येत खाण्यापिण्याच्या जागा पण हव्या. होते नव्हते ते सर्व प्रसिद्ध 'स्पॉट्स कव्हर झाले' (हो असेच म्हणायचे) असल्यामुळे आता गाडी वळलीय गाड्यांकडे. भारतभरातील गल्लीबोळातल्या बबड्या - बबलींनी आपल्याला रस्तोरस्ती, गावोगावी, गल्लोगल्ली भरत असलेल्या खाद्यजत्रेची दैनिक वारी घडवून आणण्याचा चंगच बांधलाय. अक्षरशः लाखो फूड ब्लॉगर्स आपले जालीय जीवन व्यापून वर दशांगुळे उरतील असे विक्राळ रूप प्राप्त करते झाले आहेत.

हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती, तेलुगू, तमिळ .... एक भाषा सोडली नाही या बबड्या-बबलींनी. अहिराणी, कच्छी आणि मेवाडी बोलीतही फूड ब्लॉगर्स उदंड आहेत. त्यांची दुबळी दीनवाणी प्रतिभा अखंड ओसंडून वाहत आहे. मठ्ठ रांजणे (माठ म्हटले नाही मिलॉर्ड, प्लीज नोट ! रांजण इज अ बिगर साईज्ड माठ मिलॉर्ड) असे बहुसंख्य फूड ब्लॉग्जर्सचे थोडक्यात वर्णन करता येईल. भाषा गचाळ, गृहपाठ-अभ्यास नाही, शब्दखजिना रिता आणि संवादफेक वगैरे तर दुसऱ्या ग्रहावरच्या गोष्टी. भाषेची गिरणी कोणतीही असू देत यांचं दळण सेम-टू -सेम. बरं स्वतःच्या ब्लॉगचे / चॅनेलचे नाव तरी धडके घ्यायचे ना, तर ते ही नाही. नाव काय तर 'भुक्कड' 'भूखा सांड' 'पोटात किडे' वगैरे. ‘पोटातले जंत’ वगैरे अजून कोणी नाहीये ही देवाची कृपा. हिंदीत 'भुक्कड' ही शिवी आहे हे माहिती असण्याची काही गरज नाहीच. भुकेले म्हणजे भुक्कड समजत असावेत, दोन्ही शब्दात 'भूक' कॉमन आहे ना, झाले मग.

सगळ्यात भयाण असते ती यांची त्रयोदश प्रश्नोत्तरी. म्हंजे तेरा मठ्ठ प्रश्न आणि त्यांची (मिळालीच तर) उत्तरे :

१) टपरीवजा जागा असेल तर - भैय्या तुम्हारा नाम बताओ हमारे दर्शको के लिये (याचं मराठी दादा / काका / वैनी / ताई तुमचं नाव सांगा असे). हे दुकान कधीपासून असे विचारले तर याचं उत्तर उत्तर भारतीय टपरीवाला २५ वर्षाच्या पुढे असेच देणार. जुने दुकान / हॉटेल असेल तर गल्ल्यावरच्या इसमाला डायरेक्ट तुमची कितवी पिढी हे दुकान चालवणारी असे विचारायचे. तसा नियमच आहे.

दिल्ली-मथुरा-आग्रा शहरातले कळकट्ट जुनाट दिसणारे दुकान असेल तर हमखास ‘हमारे परदादाजी ने शुरु किया था और अब मै और मेरा बेटा देखते हैं’ असे लोणकढे उत्तर मिळेल. दुकान १० वर्षे जुने का असेना. नॉनव्हेज पदार्थ विकणारे असतील तर कुठल्याश्या अवधी-लखनवी-रामपुरी नवाबजाद्याच्या खानसाम्याची सातवी-आठवी पिढी असणार याची खात्रीच. त्याकाळी साधारण अर्धी जनता खानसाम्याचे (आणि सोबत अखंड पुनरुत्पादनाचे) काम करत असल्याशिवाय आज गल्लीबोळात त्यांचे वंशज सापडते ना.

२) कितने साल से खडे हो आप यहाँ ? अरे ठोंब्या, तो रोज संध्याकाळी फक्त ३ तासच अमुक पदार्थ विकतो ते तूच नाही का सांगितले व्हिडिओच्या सुरवातीला? तो मनुष्य फक्त तीन तास रोज उभा राहतो तिथे, कितने सालों से नाही ! तो काय वर्ष वर्ष उभ्याने तपश्चर्या करणारा योगी आहे का ?

३) थोडे लाडात येऊन (ब्लॉगर स्त्रीपात्र असेल तर अति लाडात येऊन) - तर मग आज तुम्ही कॉय 'बनवणार' आमच्या साठी? बटाटवड्याच्या स्टॉल वर बटाटेवडे करतात, डोश्याच्या स्टॉल वर डोसे, अजून काय कप्पाळ ? आणि हो, मराठीत सर्व खाद्यपदार्थ 'बनवले' जातात, ठीक वैसे ही जैसे हिंदी में 'बनाये' जाते हैं. अशी ही बनवाबनवी.

४) हे कश्यापासून 'बनते'? किंवा हिंदीत 'ये किस चीज से बनता है भैय्या? अरे वज्रमूर्खांनो, तुमच्या ब्लॉगचे ब्रीदवाक्य 'जायके के जानकार' आहे ना? तुम्ही स्वतःला फूडी, खवैय्ये वगैरे म्हणवता ना? मग साधी जिलबी करण्यासाठी काय पदार्थ लागतात हे सुद्धा तुम्हाला माहित नाही? अरे जिलबी आणि इमरतीतला फरक समजायला तुम्हाला पुढचा जन्म घ्यावा लागेल रे. कदाचित इमरतीसाठी उडीद भिजवून वस्त्रगाळ स्मूथ वाटताना बघून तर तुम्ही दहीवड्याची तयारी चालूये म्हणून मोकळे व्हाल, काही भरोसा नाही.

५) आंटी / भैया ये क्या डाल रहे हो ? वो क्या डाल रहे हो ? आंटी नी मख्ख चेहरा ठेवून 'जीरा' किंवा 'हरा धनिया' असे निष्पाप उत्तर दिले तरी 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो' वगैरे ..

६) यानंतर तो स्टार प्रश्न येतो - समस्त फूड ब्लॉगर जनतेला हवाहवासा वाटणारा. ‘बटर कौन सा यूज करते हो ?’ भैय्याचे उत्तर - अमूल. या पॉइंटला समस्त फूड ब्लॉगर जमात वेडीपिशी होते, त्यांचे चेहरे चमकू लागतात, डोळे मिचकावून 'अमूऊऊऊल बतततत्त्त्तर, आहाहा, ओहोहो, वाह वाह. शानदार, गजब है गजब.. असे चित्कार. या पॉईंटला मराठीत अग्गायी गsss ... अम्मूऊल का ? अशी किंचाळी फोडणे आवश्यक.

७) ये देखिये, ये देखिये, ये देखिये (हे जमेल-सुचेल तसे ३ ते ९ कितीही वेळा) .....और ये हो गयी दोस्तो चीज की बारिश ! कोई कंजूसी नही. भाईसाब गजब है गजब.. कितना सारा चीज है देखो. जनाब, मेरे मुंह में तो पानी आ रहा है, रुका ही नही जा रहा है वगैरे. पुन्हा एकदा 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आ गया' वगैरे वगैरे.. या सगळ्या बैलांना समोर बसवून प्रत्येकी अर्धा किलो अमूल चीज चे आणि बटरचे स्लॅब जबरदस्ती चावून चावून खायला लावायचे माझे एक हिंसक स्वप्न आहे. चव तुला मूळ पदार्थाची कळली नाहीये अजून आणि कौतुक कसले तर अमूल चीजचे ? हाऊ स्टुपिड इज द्याट ! येणि वे.

2962BDB9-033A-43E5-821D-FC667A1EDB73.jpeg८) आणि आता कोविडकाळाची नड म्हणून - भैयाने देखो मास्क पेहना है, सफाई का पूरा ध्यान रखा है - हे बोलत असतांना तो भैया कळकट्ट प्लॅस्टिकच्या जुनाट डब्यातून बॅटर घेऊन तितक्याच कळकट्ट कढईत पुनःपुन्हा वापरून काळ्या झालेल्या तेलात 'इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा' च्या निरिच्छ वृत्तीने अग्नी-आहुती टाकत असतो, त्याच हातांनी हजारो हात लागून आलेल्या नोटा-नाणी मोजून घेत-देत असतो... ‘हायजिन का पूरा ध्यान’ कसे ठेवलेय यावर आमचे ब्लॉगर दादा/ ताई कंठरावाने जीव तोडून सांगत असतात ...

९) विक्रेत्या व्यक्तीचे केस पांढरे आणि कपडे थोडे जूनसर असतील तर यांना ताबडतोब 'हार्ड वर्किंग आंटी/अंकल' असा खिताब न मागता देण्यात येतो. खाण्यापिण्याचा स्टॉल चालवणे हे कष्टाचेच काम आहे, कुणीही केले तरी. त्याचा वयाशी किंवा राहाणीमानाशी काहीही संबंध नाही. हे 'हार्ड वर्किंग' तर मग उरलेले काय स्वतःच्या महालातील बागेतल्या गुलाबकळया खुडतात काय रस्त्याच्या कडेला त्यांच्या उन्हातल्या टपरीत ? हार्ड वर्किंग अंकल म्हणे. काहीही.

१०) हे रटाळ प्रश्नोपनिषद ह्या पॉइंटला थोडे मंद्र सप्तकाकडे झुकते, ब्लॉगरचे किंचाळणे थोडे(सेच) कमी होते - पदार्थांची चव घेण्याचा एक १० सेकंदाचा कार्यक्रम उरकला जातो. तो जगात भारी पदार्थ ओठांच्या बाह्यभागाला जेमतेम स्पर्श करताच ही मंडळी माना डोलावून डोळे मिटू लागतात आणि जिभेचा एक फक्त त्यांनाच जमणारा 'टॉककक्क' असा चित्तचमत्कृतिकारक आवाज काढतात. ब्लॉगर मराठी असेल तर 'मस्त मस्त मस्स्स्सस्स्स्त असे चढत्या भाजणीचे मस्तकात जाणारे मस्तकार आणि हिंदी असेल तर तेच परत मझा आ गया. ह्यावेळी तो पदार्थ चीजयुक्त असल्यास त्याला करकचून दाबून वितळलेल्या चीजचे ओंगळवाणे ओघळ क्लोजअप घेऊन दाखवणे हा अनेकांचा छंद असतो.

११) बरं, साधारण सव्वादोन सेकंदात यांना पदार्थातले सर्व बारकावे लग्गेच समजतात. पदार्थात 'लसणीचा मस्स्त फ्लेवर आलाय' वगैरे शेरे देता येतात. अरे दादा, त्या माणसानी किलोभर पदार्थ करतांना पाव किलो लसूण आमच्या डोळ्यादेखत टाकलाय रे, तूच नाही का दाखवला व्हिडीओ आम्हाला? तो तुझा 'फ्लेवर' पदार्थ करतांना, खातांना आणि नंतर खाऊन ढेकर देताना किलोमीटरभर अंतरातही जाणवेल ना रे... फ्लेवर म्हणे ! खातांना कचाकचा लसूण येईल दाताखाली.

१२) यांनतर एक राउंड होतो तो - लय भारी, लय म्हंजे लयच भारी, जगात भारी, जाळ अन धूर संगटच, आजवर खाल्लेल्या मिसळीत सर्वात भारी, ऐसी पानीपुरी / टिक्की / जलेबी आप को पूरी दुनिया में कहीं नहीं मिलेगी, गजब का स्वाद वगैरेचा ... 'जग' आणि 'पूरी दुनिया' म्हणजे यांच्या लेखी त्यांना माहिती असलेल्या त्यांच्या गावातील चारसहा जागा! अरे नतद्रष्ट जीवांनो, दुनिया फार मोठी आहे. तुमच्या मोहल्ल्यात, वस्तीत, गावात जे काही मिळतं ते अनुभवाच्या तोकडेपणामुळे तुला 'लय भारी' वाटत असेल तर तो दोष तुझा आहे, दर्शकांचा नाही. अनुभवाचं वर्तूळ मोठं करा रे, दायरा बढाओ !

१३) आता आपल्या राशीतील शनी साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात येतो. दोन सेकंदात 'तुमचा पत्ता नीट सांगा आंटी / ताई/ दादा/ भैय्या' असे टपरीमालकाला धमकावून आणि पदार्थ मिळण्याचे टायमिंग वगैरे तोंडातल्या तोंडात सांगून झाले की मग .... तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच खूपच फारच अतीच आवडलाच्च असेलच्च, म्हणून पेज लाईक करा, सब्सक्राईब करा, शेयर करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन खाण्याच्या जागा घेऊन पुन्हा येऊ असे धमकीवजा आश्वासन आणि मग हुश्श...... संपले टॉर्चर !

मराठीत फूड ब्लॉगर तुलनेने कमी आहेत. जे आहेत ते 'कानातून धूर आणणारी मिसळ' आणि 'सर्वात मोठी गावरान / कारभारी / सरपंच मटन थाळी' यापलीकडे फार काही जाऊ शकलेले नाहीत. मराठी फूड ब्लॉगर्सपैकी शेकडा ९९ लोक Mutton चा उच्चार 'मटण' आणि Chicken चा उच्चार 'चिकण' असा का करतात हे न सुटणारे कोडे आहे. दोन्ही इंग्रजी शब्दांना सुयोग्य सुटसुटीत पर्याय मराठीत अजूनही न रुजल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करूया.

‘आजच्या धकाधकीच्या जीवनात’ किंवा ‘कधी कधी आपल्याला घरी जेवण बनवायला (स्वयंपाक करायला नाही, प्लीज नोट माय लॉर्ड) कंटाळा येतो’ अशी रटाळ आणि चावून चोथा झालेल्या पाण्याहून पातळ शब्दात फूड व्हिडिओची सुरुवात करणाऱ्या ब्लॉगर्सचे पुढचे निवेदन ऐकण्याची इच्छा होत नाही. ते मात्र नेटाने ४-५ मिनिटे दळण दळतात. टीव्हीच्या मराठी बातमीदारांचे 'जसे की तुम्ही बघू शकता' टाईपचे मराठी आणि 'भन्नाट', 'मस्त', 'चमचमीत' आणि सांगणारी व्यक्ती पुण्या-ठाण्याची असल्यास 'अप्रतिम' अशा चार विशेषणांचा आलटून पालटून वापर करीत कोणत्याही पदार्थाचे, हॉटेलचे किंवा टपरीचे वर्णन पूर्ण करतात. त्या शहरात-गावात शेकडो टपऱ्यांवर सेम पदार्थ मिळत असला तरी त्यांच्या आजच्या एपिसोडमधले ठिकाण 'शहरातल्या खवैयांची पंढरी' वगैरे असल्याचे बिनधास्त सांगतात. ही पंढरी मात्र प्रत्येक एपिसोडला बदलते, गाभाऱ्यात कधी वडापाव तर कधी 'मेंदू' वडा (मेदुवडा नाही) असल्याने भक्तही बदलत असावेत. ह्यांचं काम फक्त 'वॉव वॉव', 'ओ माय गॉड' चे चित्कार काढणे, 'बघा बघा कित्ती बटर सोडलंय' किंवा 'पुरी कशी टम्म फुललीय' अशा त्याच त्या कॉमेंट आणि त्याला जोडून दुसरी-चौथीतली मुलं शालेय नाटकात करतील त्या लेव्हलचा पूरक अभिनय करत राहणे एव्हढेच.

चहाच्या चमच्याने दोन दोन चमचे रंगहीन-चवहीन-वासहीन टाईपचे पदार्थ १०-१२ वाट्यांमधून देणाऱ्या 'अनलिमिटेड थाळी' प्रकाराचे ह्या लोकांना फार कौतुक. 'अनलिमिटेड थाळी' पद्धतीच्या जागांचे विशेष प्रेम हे मराठी आणि गुजराती दोन्ही फूड ब्लॉगरमध्ये दिसते. 'पोटभर खा, अनलिमिटेड... थाळीत ‘हे ही’ मिळते, ‘ते ही’ मिळते, अनलिमिटेड, अनलिमिटेड - तारसप्तकात हे पुन्हा पुन्हा सांगणे आणि वर 'फक्त' अमुक अमुक रुपये असे ठासून सांगत राहणे मराठी-गुजराती दोन्हीकडे असते. ह्या थाळी प्रकाराच्या उपाहारगृहांची नावे हा एक वेगळाच विषय आहे. आता महाराजा, महाराणी, राजधानी, थाटबाट वगैरे नावे जुनी झाल्यामुळे 'सासुरवाडी', 'रजवाडु', 'ससुराल', सासूमाँ की रसोई', 'पाहुणचार', 'जावईबापू' वगैरे नावे चलनात आहेत, थाळीतले पदार्थ मात्र तेच जुनेपुराणे. जून झालेल्या जावयाला कोण विचारतो सासुरवाडीत? वाढलंय ते खा गुमान. आमचे ब्लॉगर मित्र मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच मांडवपरतणीला सासुरवाडीला गेलेल्या जावयासारखे उत्साहात !

'स्ट्रीट फूड' म्हटले की स्वच्छतेचा मुद्दा बहुतेक ठिकाणी ऑपशनलाच टाकावा लागतो. वापरलेला कच्चा माल आणि जागेची स्वच्छता आधीच 'अनहेल्दी' श्रेणीची असेल तर तयार झालेले प्रॉडक्ट अधिकाधिक 'सुपर अनहेल्दी प्रो मॅक्स' कसे करता येईल याची जणू देशव्यापी स्पर्धा आहे. भारतीय स्ट्रीट फूड वेंडर्स आणि फूड ब्लॉगर्सच्या जगात ज्यात त्यात बटर ओतणे आणि भसाभसा मायोनिझ, चीज टाकणे म्हणजे पदार्थ 'भारी' असे एक गृहीतक जोरात आहे. मुंबई- अहमदाबाद पट्ट्यात तर सॅन्डविचमध्ये ब्रेड ऑप्शनल आणि चीज हाच मुख्य घटक पदार्थ झालाय.

कसलीशी गचाळ 'फ्यूजन' रेसिपी असेल एखाद्या जागी तर मग ह्यांचे वासरू वारं पिते जणू. मुळात स्ट्रॉबेरीचा पिझ्झा, अननसाची भजी आणि श्रीखंडाचे स्टफिंग असलेले सॅन्डविच खायला कोणी का तयार होईल हेच कळत नाही. त्यावर अगदी किळस वाटेल एव्हढी 'चीज की बारिश' आहेच. हे असले उद्योग करणाऱ्या जागा सहा-आठ महिन्यात गाशा गुंडाळतात हे बघितले आहे. पण असल्याच जागा फूड ब्लॉगर्सच्या यादीत सर्वात वर असतात, अलग आणि ‘हटके’ म्हणून.

ह्या बटबटीत पार्श्वभूमीवर दर्जेदार फूडब्लॉगिंग करणाऱ्या काही मोजक्याच लोकांचे काम उठून दिसते. विषयातले ज्ञान, केलेला रिसर्च, अन्नाविषयीचे मौलिक चिंतन, जिव्हेचा जागतिक स्वादानुभव, स्वतःच्या अंगी असलेला तोलामोलाचा सुगरणपणा, सुंदर भाषा असे सर्व एकत्र असल्यामुळे विनोद दुआंचा 'जायका इंडिया का' सारखा दर्जेदार कार्यक्रम कोण विसरू शकेल? अनेक वर्षांआधी देशातील वेगवेगळ्या शहरातल्या खाद्यजत्रेला घरोघरी पोहचवणारे आद्य फूड ब्लॉगरच म्हणावे त्यांना. (प्रस्तुत हौशी लेखकूला दुआंच्या दर्जेदार प्रकाशनासाठी खाद्यभ्रमंतीबद्दलच लिहायला मिळाले हा बहुमान इथे आत्मस्तुतीचा दोष पत्करूनसुद्धा सांगावा वाटतो मिलॉर्ड Happy )

आता उदंड झालेल्या कोट्यावधी फूड ब्लॉगर्समधील काहींना लाखो प्रेक्षक आहेत. त्यांना मोठमोठ्या तारांकित हॉटेल्समध्ये मानाची आमंत्रणं असतात, चकटफू. काहींना भरपूर द्रव्यप्राप्ती सुद्धा होते म्हणे. उर्वरित लाखो-हजारोंना काही लाईक्स आणि एक दोन कॉमेंटवर समाधान मानावे लागत असणार. आणि आपल्या सारख्या दर्शकासाठी आहेच 'आहाहा, ओहोहो, वाह वाह, मजा आनेवाला है दोस्तो आणि मस्त मस्तत्त्त्त मस्तत्त्त्त चीज आणि अमूल बत्तर ! ..

समाप्त

* * *

(लेखातील चित्रे जालावरून साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sarang and Paula - ते भाडीपा वाले का ? बघवत नाहीत >> +११ ती गोरी बाई आहे तर व्ह्युवर्स अक्षरशः लाळ घोटेपणा करत कॉमेंट करत असतात. प्रत्यक्षात अगदीच सुमार असलेले शो पण भारी असल्याचे दर्शवले जाते.
भाडीपा चे अनी, आई वाले एपिसोड्स आवडायचे मला.
अनिंद्य, माझी मुलगी बघत असते कधीतरी म्हणुन कळते, १ मुलगी आहे ती ८ वर्ष असल्यापासून तिचे व्हिडीओ काढून तिचा बाबा त्यावरच गुजराण करतो. फूल टाईम जॉब, लेकीच्या जिवावर. काहीतरी गेम ओर्गनाईज करून व्हिडिओ बनवतात, किंवा असच वडीलांसाठी कूक केले वगैरे. आता तिचे डेटींग वर व्हीडीओ आलेत, म्हणजे ती डेट ला ही कॅमेरामॅन नेते. बाबा म्हणतो आय अ‍ॅम एक्साईटेड Uhoh
काही म्हणता काहीही वैयक्तिक नाही ह्यांचं Sad किती वाईट लाईफ..
मुलीला सांगावे लागते.. ही मुलं शिकत नाहीत, शाळेला वेळ नसतो. हे शॉर्ट लिव्ड लाईफ आहे. असो..
काही लोक कुत्री मांजरी च्या जिवावर ईंफ्लुएंसर बनलेत, त्यांचे रील्स हे त्यांचे पुर्ण वेळ कमाई साधन असते. ते मेले की नवे आणतात. रील्स कंटीन्यु.

बरकत अरोराचे रिल्स पाहिले की वाटते ही इतका वेळ व एनेर्जी यात घालतेय, शाळा मित्रमंडळ ह्या गोष्टी मनात असल्या तरी जमणार आहेत का?

अजुन एक वाईट प्रकार म्हणजे अभिजात नृत्यवाले रिल्स. कथक हा नजाकतीचा नाच आहे. लाजणे, मुरडणे, लाडिक खोटा रुसवा हे सगळे आरामात नवाबी स्पिडमध्ये दाझवायचे. आता नाच जितका वेगात तितका तो चांगला हेच समिकरण झालेय. ह्या वेगात नर्तक काय हस्त व पदमुद्रा करतोय ते दिसतच नाही. टिवी वरच्ग्या शोजनी हा वेग आणला. वेगात नाचले म्हणजे काय एनर्जी म्हणुन कौतुक करायचे. अरे असली एनर्जी सतत दाखवायची तर कोकेनला पर्याय नाही.. सामान्य माणुस नाही दाखवु शकत अशी एनर्जी..

जुन्या जमान्यात खुप सुंदर नृत्य करणार्‍या तमासगीर होत्या. आताच्या फक्त ठराविक हातवारे करतात की झाली लावणी. तसे कथक वल्यांचे झालेय. खुप वेगाने हात हलवायचे आणि त्याहीपेक्ढा जास्त वेगाने गिरक्या घ्यायच्या. की ‘सर तुम ग्रेट महान और पता नही क्या क्या हो‘ च्या कमेंटींचा पाऊस पडतो.

@ नृत्य

५-७ वर्षाच्या कोवळ्या मुलींनी कथक, लावणी सारख्या श्रृंगाररसप्रधान नृत्यप्रकारावर किंवा जलती जवानी टाईप बॉलीवुडी आयटम सॉंग्ज वर ‘परफ़ॉर्मेंस” देणे हेच खूप चुकीचे आहे Sad त्यांना काही कळत नाही पण त्यांच्या आईबापांना ? त्यांना हे योग्य वाटते ?

पण प्रेक्षक आहेत, आपल्या मुलांच्या “god’s gift to universe” गुणांवर विश्वास असणारे पालक आहेत आणि पदोपदी standing ovation देणारे जज आहेत तोवर all is well with (their) world !

(स्वत:च्या किंवा कुणाच्याही धाग्यावर अवांतर करत नाही पण लहान मुलांबद्दल मन सेंसिटिव आहे, म्हणून काही मोठाले प्रतिसाद दिले गेले, त्याबद्दल माफी)

मी कंझ्युमर सारखं सगळं वापरतो. जे आवडतं पटतं रुचतं ते बघतो. बाकी स्वाईप अप करतो. ती माझी मुलं नाहीत, त्यांचं काय करायचं इ. चा समाज म्हणून विचार बिचार करणे सोडले. मला गोड गोड बोबडं बोललेले क्युट लहान मुलांचे व्हिड्यू पण कधीतरी एखादा ठीक पण बाकी बघायला अजिबात आवडत नाहीत. रादर लहान मुलांचे काहीच बघायला नको वाटते. कंसेट, ओव्हर एक्सपोजर इ. कारणे. अर्थात हा काय नियम नाही, काही मजेचं दिसलं तर बघतो पण. मला मजा येईल ते बघतो.
यडxx लोक आहेत तर आहेत. ते बदलो वा न बदलो मी बदलतो. मायोपिक म्हणा, पण तेच बरं वाटतं.

सगळ्याचाच अतिरेक झालेला आहे. युट्युबवर लाईफस्टाईलच्या नावाखाली आपलं रोजचं रुटीन दाखवणार्‍या बायकाही प्रचंड बोअर मारतात. मला तरी कोणत्याच टाईपचा कंटेंट जास्त बघायला आवडत नाहीत. एखाद दोन पाहिले की बास आता असं वाटतं.

अतिरेक तुम्ही बघितला तर होतो ना? स्वाईप अप केलं की तसे कंटेट दिसत नाहीत. इतका माल आहे की बोअर बिअर व्हायला जागाच नाही. जरा कंटाळा आला की पुढे!

आज इन्स्टावर tanfrance हे हँडल सापडले. माणुस पाकिस्तानी ओरिजिन आहेपण तिथे राहात नसावा. मस्त वेल ग्रुम्ड पुरुष, टकाटक कपडे घालुन, जणु आता बोर्ड मिटिंगला निघणार आहे, साइड टेबल सारख्या दिसणार्‍या ओट्यावर सैपाक करतो. करतो इथलेच पदार्थ पण करायची पद्धत युरोपियन आहे. म्हणजे उदा. करतो भेंडी मसाला पण कढईत आधी कांदा घालतो व त्यावर ऑलिव ऑईल सढळ हस्ते शिवरतो. शिवरतो शब्द चुकीचा आहे पण जे करतो त्याला दुसरा शब्द सुचला नाही.. इतका सैपाक केल्यावरही त्याच्या त्या वेल सेट केसांतला एकही केस इकडचा तिकडे होत नाही…

बघा व आनंद घ्या. त्याचे घरही अफाट आहे.

अतिरेक तुम्ही बघितला तर होतो>>>

मी चुकुन एका जागी थांबले तर पुढचे सगळे तसलेच कंटेंट याचा अ तिरेक झालाय. हे अल्गो बदला कोणीतरी….

@ साधना, हो, फार flamboyant dressing पण काम टापटीप आहे. Jeremi नावाचा त्याचा मित्र / बॉयफ़्रेंड आहे interior designer. तो फूड डेकोर, टेबल डेकोर, वाईन बार्स, कॉफी बार्स असा फोकस करतो, ते झकास वाटते बघायला.

यांची चकाचक दुनिया आवडते पण चार-दोन दिवस स्टीलच्या ताटवाटीत नाही जेवलो तर ते भयंकर मिस होते Lol

तो बहुतेक फॅशन डिझायनर असावा. कधीकधी बाहेर जातानाचे ड्रेसिन्ग दाखवतो, तेही छान असते. एक रिल किचन अप्लायन्सेस वर आहे, स्टोरेज, डिश वॉशर व व.. माझा पडलेला जबडा मी नंतर उचलला…

अनिंद्य Happy

मी काशाचे मोठे ताट वाटी आणलीय. कधीकधी साठी. रोजच्यासाठी स्टिलच हवे.

तो बहुतेक फॅशन डिझायनर असावा. >>> हो हा तसा फेमस आहे. तनवीर/टॅन त्याचे खरे नाव , मूळचा पाकिस्तानी असला तरी ब्रिटनमध्ये जन्म, वाढलेला. मग अमेरिकेत ह्याचा एक रिऍलिटी शो queer eye म्हणून नेटफ्लिक्स वर येत असे . ४ ,५ जण (सर्व queer ) एखाद्याचे पूर्ण स्टायलिंग करत , घर , फॅशन वगैरे . हा फॅशन स्टायलिंग करत असे . पाहत होते हा शो. मग विसरले . आता इंस्टावर पाहते त्याला.

>>अतिरेक तुम्ही बघितला तर होतो ना? >> हो पण तो झाला आहे हे कळायला आपण एक दोन व्हिडीओ तरी बघतोच ना. बघणं बंद केलं की तशा प्रकारचा कंटेंट दिसणं बंद होऊन दुसरं काहीतरी चालू. पण युट्युब आता पार्ट ऑफ लाईफ झाल्यावर बघतच नाही असं होत नाही.

Generalisation करु नये पण एकंदरीत queer community चा सौंदर्यबोध उच्च असतो असे निरीक्षण आहे माझे.

अवांतर संपले Happy

विषयानुरूप :

काही व्लॉगर्स forgotten foods, lost recipes, food of rural India, countryside food over the world असा फोकस ठेवतात, उच्च रील्स आणि कंटेंट. फार आवडते बघायला !

काही ब्लॉगर्स खरेच छान दाखवतात. एक शिवानी म्हणुन आहे तिचे बघुन मी भाजी भात खायला लागले. नाहीतर भात केला की डाल हवीच असे व्हायचे.

Agree anindya.

One very sad fact I discovered accidentally is some vlogs are porn and prostitution channels. The put sexy split second visuals of the girl then normal vlog of food buffets of small town five star hotels. She must be also poor. But busty and wears suggestive clothing. Like revealing innerwear. Or absolutely bridal clothes.

Dm pe negotiation. So easy. Hotel hai hi.

Also attractive clippinga of old soaps which idiots like me watch. But once you follow you get hot clipping s and photos. These vlogs have warning that under 25 don't follow. Can we complain somewhere

आता माझे अवांतर --

एकंदरीत queer community चा सौंदर्यबोध उच्च असतो असे निरीक्षण आहे माझे
>>> काही उच्चवर्गीयांचा असेल. पण इन जनरल queer community बद्दल मला असे काही वाटत नाही. उलट त्यांच्या प्राईड परेडमध्ये काही काही व्यक्ती फार हिडीस पोशाख, मेकअप वगैरे केलेल्या वाटतात. ते त्यांच्या मुद्द्यांकडे/अस्तित्वाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी करतात हे माहितेय. पण सौन्दर्यदृष्टी असलेली व्यक्ती तसली वेशभूषा जन्मात करणार नाही (किमान पब्लिक प्लेसमध्ये तरी). आणि प्रिव्हिलेज्ड वर्गातील व्यक्ती प्राईड परेडमध्ये सामील होतात का याबद्दल मला काहीच माहिती नाही.

porn and prostitution ?

Too bad ! Unsuspecting ppl suddenly getting this stuff instead of food or drama.

@ माझेमन,

प्राइड परेड बद्दल नाही म्हणत. Make up, clothing, Fashion design, interior design, jewellery, home decor, grooming, food decor, photography, hairstyles वगैरे बाबीत. अगदी साध्या वॉलपेपर किंवा कटलरीच्या डिज़ाइनमधे पण बघतच रहावे असे काम. अर्थात माझा sample set फारच लिमिटेड आहे. पण समहौ disproportionately high number from queer community I met had great sense of beauty and taste.

Esp western queer community is dressed especially well. High fashion. Indian have a unique sence of beauty

यूट्यूबवर 'मराठी भावनाप्रधान कथा' टाईप नावाने चक्क अश्लील कथांचे व्हिडिओ असतात! दृश्यं नसतात काही, सरळ पुस्तकात असावी तशी कथा स्क्रोल होते वर वर. मला आपोआप सजेशनमधे असा व्हिडीओ आला. (मी पॉर्न बघत नाही.) सुरुवातीला निरुपद्रवी कथा वाटली म्हणून वाचत गेले तर पुढे धक्क्यावर धक्के! Lol ऑडिओ बंद होता, त्यामुळे ऑडिओ पण असतो का ते कळलं नाही आणि तेवढ्यासाठी ऑडिओ चालू करावासा वाटला नाही. असे तीन चार आपोआप आलेले व्हिडिओ अर्धवट वाचल्यावर लक्षात आलं की हे कॉमन दिसतंय. व्हिडिओचं नाव मात्र शुद्ध सात्त्विक! Happy

इन्स्टावर १६-१७ सारख्या वाटणार्‍या मुलीण्चे असे रिल्स असतात. फेबुवर असे रिल आले, ते चुकुन क्लिक केले की भडीमार होतो. करुदे काय ते, आपल्याला काय… मेनस्ट्रीम सिनेम्यातली गाणी या रिल्सपेक्षा जास्त प्रोवोकेटिव असतात.

अश्लिल हिंदी जोक्स पण असेच फेबुवर स्क्रोल होतात. फेबु हल्ली प्रचंड बदललेय. मी कित्येक पेजेस मला दाखवु नका कॅटेगरीत टाकलीत पण ही अहिरावण महिरावणासारखी आहेत. एक ब्लॉक केले की दहा उगवतात…

हे सेक्षी मुलीण्चे विडिओ मला माबोवर पण जाहिरात म्हणुन दिसतात. मी क्लिक करत नाही, नैतर वाड्यावर गप्पा मारायच्या राहुन जातील…

>>>>>>queer community चा सौंदर्यबोध उच्च असतो
गे पुरुष कमालीचे गुड लिसनर व एंपॅथेटिक असतात. मला कोणी पुरुष एंपॅथेटिक व कोमल वाटला, आवडला की हमखास गे निघतो. २-३ वेळेचा अनुभव.

फेबु हल्ली प्रचंड बदललेय. मी कित्येक पेजेस मला दाखवु नका कॅटेगरीत टाकलीत पण ही अहिरावण महिरावणासारखी आहेत. एक ब्लॉक केले की दहा उगवतात
>>> टोटली! मला रोज ३-४ वेगवेगळ्या पेजेसवरून जान्हवीचे फोटो दाखवत होते फेबुवाले. मी रोज ब्लॉक करायची ही पेजेस, की दुसर्‍या दिवशी नवीन पेजेस हजर. ऑल्मोस्ट महिनाभर छळ सहन केलाय हा Angry

Pages