गप्पा ब्रम्ह आणि चंद्राच्या!

Submitted by अदिती ९५ on 3 May, 2022 - 03:29

ब्रह्मदेवाला वाटलं एकदा
करावं काहीतरी अफाट!
पृथ्वी बनवण्याचा घेतला मक्ता
नवनिर्मितीचा गिरवत कित्ता,
पृथ्वीभोवती दिला एक पहारेकरी
त्याच्या हाती समतोलाची दोरी,
चंद्र आपला घालत राहिला गस्त
काही वर्षात तिचे हाल बघून झाला त्रस्त!

एके दिवशी म्हणाला ब्रह्माला,
हा असा नग देवा, तुला कसा सुचला?
बाकी सगळी सृष्टी चालते नियमाने,
नियम मोडायच काम हा करी नेमाने!

ब्रह्मा म्हणे चंद्राला,
ह्याला मी मनापासून घडवला,
हाताला पकड, पाठीला मणका,
प्रत्येक गोष्टीसाठी मेंदूत कप्पा
आकलन दिलं, दिली स्मरणशक्ती,
मेधा अन् प्रतिभा दिल्या सोबती!

चंद्र वैतागून म्हणाला,
तू म्हण माणूस त्याला
पण माझ्यालेखी तो प्राणीच शेवटी,
गेलेली नखं अन् झडलेली शेपटी!
बाकी इतरांसारख्याच त्याच्याही जाती,
प्रजाती, उपप्रजाती, उप - उपप्रजाती.

तोही अडकलाच शेवटी प्रजनन
आणि उपजिविकेत इतरांसारखा,
शोध मात्र त्याने भरपूर लावले
कारण दिवसागणिक वाढल्या गरजा.
काहीही म्हण देवा तू जरा
त्याच्या बाबतीत मृदुच राहिलास,
सारं काही सढळ हातांनी देऊन
पृथ्वीचा समतोल गमावून बसलास..

ब्रम्ह खदाखदा हसत सुटला
चंद्राला वेड्यात काढत म्हणाला,
पृथ्वीच्या हातीच सोपवली
मी सूत्र पुनर्निर्मितीची
योग्य वेळी करते ती
उलथापालथ सृष्टीची
हताश अन् हतबल होतो तो मग,
त्याच्याच कर्मांची लागते त्याला धग
रग त्याची जिरते मग पुरती
पुन्हा जन्म घेते सृजनाची सृष्टी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users