राम आत्माराम
उपवास पूर्ण । असो साधे अन्न ।
राम नामाविण । निरर्थक ।।
राहो गिरी, धामी । महाली आश्रमी ।
राम ते सप्रेमी । तरी सौख्य ।।
असो उपकारी । नेमस्त संसारी ।
रामाविण फेरी । चुकेचिना ।।
थोर नित्य कर्म । बहु दान धर्म ।
रामचि सुवर्म । तयामाजि ।।
रामनाम मुखी । जगी दोष देखी ।
रोगी सर्वार्थेसी । पथ्यहीन ।।
चित्ती राम जाण । तेणे समाधान ।
व्यर्थचि साधन । तयाविण ।।
राम आत्माराम । निश्चये स्वधर्म ।
प्रचिती सप्रेम । सद्गुरु योगे ।।
श्रीराम जय राम जय जय राम
.......................................................................
निर्जळा उपवासांसारखे व्रत असो वा साधे, सात्विक अन्न असो - श्रीरामाच्या आठवाशिवाय केलेली कुठलेही व्रत वैकल्ये व्यर्थ आहेत.
कोणी कोणी गिरी कंदरात जाऊन रहातात. तर कोणी साध्या घरात रहातात. कोणी उत्तम सुखसोयी असलेल्या घरात (महाल सदृष) रहातात तर कोणी आश्रमात रहातात. पण अंतरात श्रीरामांविषयी प्रेम नसेल तर या अशा विशिष्ट राहणीमानाने काय फरक पडणार आहे ? (ह्रदयात श्रीरामप्रेम असेल तर कुठेही रहात असला तरी सुखच लाभेल.)
एखादा खूप मोठा उपकारी वृत्तीचा असतो (समाजसेवी कामांमधे गढलेला) तर कोणी नीट संसार करणारा असतो. श्रीराम स्वरुपाचे नेमके आकलन झाले नाही तर जन्म मरणाच्या फेर्यातून सुटका केवळ अशक्य आहे.
एखादा अतिशय उत्तम तर्हेने नित्य कर्मे पार पाडीत असतो, तर एखादा विपुल दानधर्म करीत असतो. पण श्रीरामाचे नेमके वर्म जाणलेले नसेल तर या बाह्य सात्विक, दानशूर, इ. गोष्टींचा काहीही उपयोग होत नाही.
एखादा सतत रामनाम घेत असतो, पण समोरच्या प्रत्येक व्यक्तीमधे सतत दोषच शोधत असतो. म्हणजे जो रोगी औषध व्यवस्थित घेत आहे पण पथ्य अजिबात सांभाळत नाही, त्याचा रोग बरा होणे कदापि शक्य नाही. तसे रामनामाबरोबर इतर पथ्ये सांभाळणे हे साधकाला फार गरजेचे आहे. (वागणे, बोलणे, आचरण, इ. चे योग्य पथ्य सांभाळले तरच ती रामनामाची मात्रा नेमकी काम करेल)
ज्याच्या चित्तामधे श्रीरामच ठसलेले आहेत त्याच्याठिकाणी अखंड समाधान दिसून येते. कारण श्रीरामांशिवाय केलेले कोणतेही साधन केवळ व्यर्थ आहे हे त्या साधकाच्या लक्षात आलेले असते.
आणि हे मर्म त्याला सद्गुरुकृपेमुळे लक्षात आलेले असते- की श्रीरामांचे स्मरण म्हणजेच आत्मारामाचे स्मरण. व हे निश्चयपूर्वक, प्रेमाने व स्वधर्म समजून केले तरच श्रीरामाची प्राप्ति होते. (बाह्य दिखावू गोष्टीने जग भुलेल, श्रीराम अजिबात भुलणार नाहीत)
श्रीराम जय राम जय जय राम ।।
सुन्दर कविता.
सुन्दर कविता.
रामनाम का घ्यावे? त्याजागी दुसरा कुठला देव का नको?
मीही राम नाम घेते, मनात/तोन्डात तेच येते. तरी तेच का घ्यावे हे वाचायला आवडेल.
रामनामाचं महत्व सांगणारी
रामनामाचं महत्व सांगणारी सार्थ सुंदर रचना.
एक विचार आहे..
अंत्य यात्रेत.. 'राम नाम सत्य' म्हटलं जातं.. यामागे काही खास कारण आहे का?
साधनाताई,
साधनाताई,
तरी तो हरी आहे कैसा । विचार पाहावा ऐसा ।
संधेपूर्वीं जगदीशा । चोविसां नामीं स्मरवें ॥ ३ ॥
चोवीसनामी सहस्त्रनामी । अनंतनामी तो अनामी ।
तो कैसा आहे अंतर्यामीं । विवेकें वोळखावा ॥ ४ ॥दासबोध दशक ११, समास ९
या समर्थवचनाप्रमाणे राम नाम घ्या, हरीनाम घ्या, दत्त दत्त म्हणा वा शिव शिव म्हणा....कुठलेही देवाचे/देवीचे नाम घ्या - जे आपल्याला आवडते.
त्या सत् तत्वाला ओळखण्याची खूण म्हणून संतांनी नाम सांगितले. त्यामुळे अमुकच नाम घ्यावे असा काही कोणा संतांचा आग्रह नाही.
त्या सत् तत्वाचा विसर आपल्याला पडला आहे असे वाटत असेल तर आपल्याला जे आवडेल ते नाम घ्यायचे. जर एखाद्या सद्गुरुंनी ठराविक नाम दिले असेल तर मग मात्र तेच नाम घ्यायचे.
आणि हे नाम घेता घेता तो "अनामी" आपल्याच अंतर्यामीदेखील आहे हे विवेकाने ओळखायचे असे समर्थ म्हणतात.
याचाच अर्थ सगुणाचेनी आधारे । निर्गुण पाविजे निर्धारे । सारासार विचारे । संतसंगे ।।
नामस्मरण ही सगुण उपासना असूनही तेच नाम स्थूळातून सूक्ष्मात घेऊन जाते. वैखरीने/वाणीने नाम घेता घेता हळुहळु डोळे मिटून मनातल्या मनात नाम घ्यायचा प्रयत्न करायचा. असे निश्चयाने, प्रेमपूर्वक व श्रद्धेने करता करता ते नाम मध्यमा, पश्यंती व त्याही पलिकडे असलेल्या परा स्थानाच्याही पलिकडे असलेल्या सत् तत्वाशी आपली गाठ घालून देते. असे नामस्मरण ही सगुण उपासना आहे तशीच निर्गुण उपासनाही आहे. संतांनी याचा अनुभव घेतलेला आहे म्हणून ते अतिशय ठामपणे, आत्मविश्वासाने सांगतात - राम राम म्हणता । रामचि होईजे ।। स्थूळ राम राम म्हणता म्हणता त्या आत्मारामाचीही ओळख होईल. कारण ते सत् तत्व आत्मरुपाने आपल्या अंतरात स्थित आहेच आहे.
आपण नाम घेता घेता त्या आत्मरुपाकडेच जाणार आहोत असा आपलाही ठाम निश्चय पाहिजे. नाम घेत राहिले तर निश्चितपणे त्या सत् तत्वाशी साधक एकरुप होतो व अखंड समाधान ही त्याची बाह्य व अंतर्खूणही आहे. बाह्य परिस्थिती कितीही विपरित असली तरी अशा साधकाचे समाधान अजिबात ढळत नाही. एक परमेश्वरी सत्ताच सर्व काही करुन राहिलेली आहे या स्थिर जाणिवेने तो साधक नेहमीच शांत असतो.
श्रीहरी, श्रीहरी.. __/\___
खूप छान
खूप छान
आवडले.
आवडले.
सुंदर...
सुंदर...