आमची पोरगी समरकॅम्पला जातेय म्हटले की लोकांना वाटायचे पोरीला सिंगिंग और डान्सिंग का शौक असेल. पण आमचा समरकॅम्प मात्र मार्शल आर्ट ग्रूपचा होता. ज्या दिवशी पोरीला समरकँपला पाठवायचे नक्की केले त्या दिवशी दोन्ही घरात एक टेंशनचे वातावरण निर्माण झाले. कारण पहिल्यांदाच पोरगी तीन दिवस आणि दोन रात्र चक्क एकटी कुठेतरी जाणार होती. खरे तर हे आम्हालाच तीन दिवस दोन रात्र शांततेत व्यतीत करायचे पॅकेज मिळत होते पण जोक्स द अपार्ट, चिंता होतीच. भले आम्ही पोरांची व्यवस्थित काळजी घेऊ असे समोरून कोणी कितीही म्हटले तरी पोरगी एकटी कशी राहणार, ते देखील घरच्यांशी फोन वा मोबाईलवर शून्य संपर्क करून, याची चिंता होतीच.
कोणी म्हणायचे, कमाल है, बच्ची को अकेले भेज रहे हो. तर कोणी म्हणायचे, अरे आपकी परी तो काफी स्मार्ट है, सब संभाल लेगी. तरीही तितके पुरेसे नसते याची आम्हाला कल्पना होती. साधे तिला तिची बॅग स्वतः भरायला सांगितली तर तिने तीन दिवसांसाठी तीन टूथब्रश, दोन टूथपेस्ट आणि आंघोळीचे दोन साबण भरले होते कारण काही गोष्टींचे अनुभव आयुष्यात घेतले जातात तेव्हाच त्यातून शिकले जाते.
त्यामुळे फारसा विचार न करता लेकीला कॅम्पला पाठवायचे हे माझे तरी पक्के झाले होते. कारण मी स्वतः एकुलता एक असल्याने मला याबाबतीत फार जपले गेले होते. असे एकटे राहायची वेळ माझ्या लहानपणी कधीच आली नव्हती. किंबहुना घरच्यांनी ती संधीच मला घेऊ दिली नव्हती.
चौथीत असताना स्कॉलरशिपच्या क्लाससाठी म्हणून माझगाव ते दादर बस वा ट्रेनने मी एकटा जाऊन येऊन प्रवास करायचो. नाईलाजाने म्हणा वा आणखी कश्याने, त्याची परवानगी होती. पण कुठे राहायच्या पिकनिकला जायची परवानगी मागितली, तर मोठ्ठा नकार मिळायचा. शाळेतल्या एकाही मुक्कामाच्या सहलीला मी गेलो नाही. बिल्डींगच्या पोरांचे शिर्डी, नाशिक, वज्रेश्वरी, माळशेज असे ठरलेल्या जागी दरवर्षी एकदोन प्लान बनायचे. त्यांच्यात मला कधीच सामील होऊ दिले नाही. थोडक्यात शालेय जीवनात बाकी कितीही किडे केले तरी घरच्यांच्या अतिकाळजीमुळे बर्याच गोष्टींना मी मुकलो असे मला नेहमी वाटायचे. त्यामुळे असे काही आपल्या मुलांबाबत होऊ नये असेही नेहमी वाटत आलेय.
एक तो दिवस होता, जेव्हा लेकीने पहिल्यांदा आमच्याशिवाय तिच्या आजोळी एकटे राहायचे ठरवले होते. पण रात्र झाली तसे रडून जो गोंधळ घातला होता की रात्री दोन वाजता तिला परत आणावे लागलेले. ईथे तसा कुठलाही पर्याय नव्हता. आपले आपणच रडून शांत व्हायचे होते. कोणी असे खास जीवाभावाचे ओळखीचे नव्हते. पण तरीही तिला पाठवायचेच यावर आम्ही ठाम होतो.
पोरगी भूताचे विडिओ बघून अंधाराला घाबरणारी होती, भाज्या आवडत नाही म्हणून नुसतीच चपाती खाणारी होती, खेळताना झालेला पसारा तसाच सोडून पळून जाणारी होती, दात घासायचा कंटाळा म्हणून ब्रश नुसताच ओला करून ठेऊन देणारी होती, रात्री झोपेत उठून वॉशरूमला जायचा आळस म्हणून उचलून ने म्हणत माझ्याकडे हट्ट करणारी होती.. पण या या कारणांसाठी कॅम्प कॅन्सल केला असता तर ती कायम तशीच राहिली असती.
ठरलेल्या दिवशी जिथून बस सुटणार तिथे मुलीला सोडायला गेलो. पाहिले तर वेगवेगळ्या वयोगटातील मुले होती. आमची लहान म्हणून आम्हाला टेंशन, तर वयवर्षे पंधरासोळा मुलींच्या आईबापांना वेगळेच टेंशन. ते न वाढवता सगळी व्यवस्था चोख दिसत आहे याची खात्री पटल्यावर बस सुटायच्या अर्धा तास आधीच तिला टाटा बायबाय करत आम्ही घरी परतलो. त्यानंतर पुढचे तीन दिवस ना तिचा फोन, ना तिची काही खबर. फक्त तीन दिवसाला तीन ग्रूपफोटो व्हॉटसपवर आले ज्यात सर्व मुले व्यवस्थित आहेत हे दिसत होते. सोबत दोन मेसेज. एक पहिल्या दिवशी सुखरूप पोहोचल्याचा आणि दुसरा शेवटच्या दिवशी निघतानाचा.
पण पोरगी या तीन दिवसात बरेच काही शिकली. सर्वात पहिले म्हणजे स्वावलंबन शिकली. तिथे स्वतःचे अंथरूण पांघरूणपासून सर्व तयारी स्वतःच करायची होती. तिथे चार वाजता उठायचे होते. सहा वाजता जॉगिंगला जायचे होते. दमूनभागून आल्यावर जो ताटात असेल तो नाश्ता / जेवण आवडीने करायचे होते. पावभाजी, मिसळ, रसगुल्ले वगैरे पदार्थ तर तिने आवडीने रिचवलेच. पण त्या नादात ती चक्क भेंडीची भाजी खायला शिकली. रात्री जागते त्यामुळे झोप अर्धवट राहिल्याने योगा सेशनला झोपली अशी तक्रारही आली. पण तिथले एकदोन खेळ जिंकूनही आली. हाताचे कोपर टेकवून सरपटण्यात पहिली आली, काठी चालवायच्या कसल्याश्या ट्रेनिंगला तिची काठी तोडून झाली.
शहरापासून दूर असल्याने जंगलातले किडे अध्येमध्ये रूमवर दिसायचे. त्यांना न घाबरता त्यांच्यासोबत राहायला शिकली. चक्क पालीचीही भिती गेली. एकदा वॉशरूममध्ये कमोडवर एक किडा दिसला त्याला स्प्रे मारून फ्लश करून पाण्यात जलसमाधी देऊन झाली. एके दिवशी लाईट गेली होती. टोर्च आणि कँडलवर काम चालवावे लागत होते. सोबत पाण्याचीही टंचाई झाली होती. त्यामुळे पाणी पुरवून पुरवून वापरावे लागत होते. असेही दिवस आयुष्यात येतात हे बघून आणि अनुभवून झाले.
अर्थात मजाही होतीच. भूक लागता हादडायला मिळाले. रात्रीचे डीजे गाण्यांवरती झिंगाट नाचायला मिळाले. संध्याकाळचे स्विमिंगपूलमध्ये मनसोक्त डुंबायला मिळाले. नवे मित्र नव्या मैत्रीणी मिळाल्या. घरी आल्याआल्या अश्या कैक किश्यांची उधळण तासभर तरी होत होती. पण एवढे काही सगळे चांगले वाईट, तिच्या मनासारखे, मनाविरुद्ध होऊनही पुढच्या वर्षी पुन्हा तिला आवडीने जायचे आहे यातच आम्हाला समाधान लाभले.
म्हटले तर एक छोटीशी आणि साधीशी ट्रिप..
म्हटले आयुष्यात थोडेफार तावून सुलाखून निघण्यासाठी गरजेची असलेली एक गोष्ट..
प्रत्येक मुलाने जरूर घ्यावा असा एक अनुभव..
तिथे पोरांनी नेमके काय गोंधळ घातला हे दाखवायला मुलांचे ग्रूप फोटो तर ईथे परवानगीशिवाय टाकू शकत नाही.
पण तेवढेच माहौल बनवायला एक तिचा निघतानाचा फोटो.
तर दुसरा कालचा योगायोगाने फेसबूक मेमरीत आलेला, गेल्यावर्षीचा ऑनलाईन मार्शल आर्ट क्लासचा फोटो.
.
छान
छान
धन्यवाद, सामी, शर्मिला.
धन्यवाद, सामी, शर्मिला. चैत्राली, वर्णिता, सस्मित आणि जागूताई
Pages