हेच आपलं नेहमीचंच - ५

Submitted by पाचपाटील on 12 March, 2022 - 11:38

{{ रोज देसाळ 'भिंगरी' पिऊन पिऊन लीवरला सूज
आलीय देठ्या...! पन काय करनार..! दुसरी परवडत नाय
म्हणून ती प्याय लागती.. पन आज तू हैस तर
चांगला फॉरेनचा ब्रॅण्ड मागव...ॲंटीक्वीटी है का
बग..! }}

पुणे मुक्कामी ऋषीकेश देठे यांचे भेटीसाठी
आलेले विजुभाऊ यांनी, दोन पॅग घपाघप मारल्यावर
पयला गिअर टाकला...!!!

{{ म्हंजे साला आधी एंडोसल्फान फवारून फवारून
युरिया घालून घालून सगळ्यान्ला वावरांची
खराबी कराय लावली..
आन् आता ह्या भोसडीच्यान्ला हे जुनं आठवाय
लागलंय.. }}

काय झालं विजुभौ?

{{ आरं सगळीकडं बोर्ड लागलेत.. पार हायवे पास्नं
बगत आलू..!
गुळाचा चहा...! ऑरगॅनिक फूड...! सेंद्रिय शेती..!
ॲंड यू नोs चुलीवरची भाकरीss?? आय जस्
लव् इट..!!

हितं पुन्यात तर मानसं पार डोंगरात
जाऊन राह्या लागलीत लगा..
दनादन स्कीमा उभ्या करून राह्यले...
क्वाऱ्या लावून लावून डोंगरं फोडाय लागले..
सगळं सपाट करून टाका म्हनावं....
काय शिल्लक ठिऊ नगा..
ह्या नदीचा बी आता नुस्ता मुडदाच राह्यलाय...
आता चिमन्या बिमन्या, पारवं, साळुंक्या
सगळ्यांन्ला पळवून लावा म्हनावं..
कुठंच आसरा दिऊ नगा त्येन्ला.. खदेडून लावा
सगळीकडनं..
भकास वाळवंट करून टाका सगळं येकदाच...
आनी मंग सेमिनार भरवा इकोफ्रेंडली कन्स्ट्रक्शन
आणि ससटेनेबल डेव्हलपमेंट वर..!
मागं पुन्यात त्यो रानगवा आल्ता, काय झालं तेचं?
त्येला पार पळवून पळवून मारला लगा...
वाट बिट चुकलं आसंल बिच्यारं..
त्येला काय म्हाईत की मानसं आसली येडझवी
असत्यात ते..
सगळीकडं हे आसंच हाय म्हना..
गावाकडं बी पैल्यासारखं राह्यलं नाय आता..
लय बदललंय सगळं..
मानसं समजा कोरड्या व्याव्हारिक पातळीवर
उतरलेत.. ते सोडून दिऊ समजा..
पन टीचभर गावात बी दोन-दोन कॉन्व्हेंटच्या
शाळा झाल्यात..! पार केरळावरनं मॅडम्या
आनल्यात शिकवायला..!
सगळ्या गावातनं आता इंग्लिश बोलनाऱ्या
बेकार पोरांची फौज उभी राहनाराय बग..!
आनी आपल्याकडच्या पोरींचं बी आवगडंच है रे..
जिन्स न् टॉप घालत्यात आनी शेनाच्या
पाट्या उचलतेत...! }}

पण इंग्लिश पायजेच ना आता..! तिच्याशिवाय
जमनार नाय पुढं..!!

{{ मान्यंय ना..! मान्यंय..! ती जागतिक भाषा है,
नॉलेजची भाषा है, सगळं कबूल है...!
पन तेवढं कामापुरतं इंग्लिश जमतंच असतं
मानसाला... तेवढं शिकावं बी.. पण हे लगा वाढीव चाललंय
सगळीकडं..

आणि आपल्या ह्या पोरांमधली शेकडा ९० पोरं कधी
म्हाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर पाऊल सुदा टाकनार
नाईत.. तो चान्सच मिळनार नाय दोन पिढ्यात
तरी..
हितंच आसपास आयुष्यं जानारेत ह्येंची..
लै लै तर पुन्या मुंबैत जाऊन माय पासली
घालतेल...! महिना वीस हजार रूपै पगारात
घराचे हप्ते फेडत आयुष्यभर..!
नंतर मग उगाच गावाच्या आठवनीनं
घैवर घालनारंच ना ते..!
आनी गावाकडं आले सुट्टीला, तर दोन दिवसाच्या
वर टिकत न्हाईत..!
तसं त्येंचं बी काय चूक नाय म्हना..!
काय उरलंय तिथं तरी..! नुस्ता फुफाटा
सगळीकडं..!
म्हाताऱ्या मानसाला गाडीत बसवून न्हायचं
म्हनलं तरी टेन्शन येतं..! गाडीतच गचकंल अशा
लायकीचे रस्ते..! सासूरवाडीला गेल्तो परवा..!
त्या धैवडीच्या रस्त्यावर तर म्हागच्या वीस वर्षांत
साधा एक डांबराचा हात पन मारला
नाय आजून..! अशी परिस्थिती हे..!

आणि चौकात माव्याच्या पिचकाऱ्या मारत
बसलेली, भकास फिरनारी तरनीबांड
बेरोजगार पोरं..!
त्यातली निम्मी आर्दी यूपीयस्सी एम्पीएससी च्या
डबऱ्यात गटांगळ्या खाल्ल्याली..!
म्हागं त्या कर्माधिकारींचं आणि झांगरे पाटलांचं वारं
आलतं..! त्येंचं बोलबच्चन ऐकून ऐकून हे बी
फाफलले...! हिकडं पुन्यातले सगळे क्लासवाले
ताजे झाले..!

झांगरे-पाटील म्हाईतच आसतेल ना तुला?
स्वतःच्या कदीकाळच्या संघर्षाच्या आठवनी
उगळंत, स्वतःच्या कर्तबगारीचे ढोल स्वतःच
वाजवत, भाषणं ठोकायची म्हणजे
कायच्या काय झालं...!
आता त्ये झांगरे-पाटील रेबॅनचे गॉगल आन् ब्रॅण्डेड
टी शर्ट्स घालून फिल्म स्टार्स बरोबर फिरताना
दिसतेत..!
यूथ आयकॉन वगैरे..!
भ्रष्ट सिस्टीमचा कायापालट करनारा
मॅचो मॅन, हॅंडसम अधिकारी वगैरे...!
पिच्चर मधीच जायाला पायजे आता तेंनी.!!

तर तेंच्यामुळंच भाषणबाज तरन्या
अधिकाऱ्यांचा सुळसुळाट झाला आपल्याकडं..!

येकादी पोस्ट काढली की दणकावून ठोकून
देत्यात, की बाबा आमी आसे आसे ग्रामीण भागात
राहून यश-बिश मिळवलं...!
आणि आमच्या आई बाबांच्या पुण्याईमुळेच
आम्ही आयएएस, तहसीलदार, डीवायएसपी वगैरे झालो...!

कशाला असल्या थापा मारत असतेल हे लोकं?
हे पाच दहा वर्षं तिकडं दिल्ली पुण्यात असतात..
कारण तिथं ते सगळं वातावरन असतं..!
मग चुकून कधीतरी येकाद्याला निघते पोस्ट..!
आणि समजा आई बापांच्या पुण्याईनं जर यश
मिळत असतं, तर मग आमच्या ह्या पोरांना का
मिळत नाय वर्षानुवर्षं घासून ??
ह्यांचे आई बाप काय दरोडेखोर हैत काय?? }}

हम्म.. खरंय खरंय..आणि कर्माधिकारींचं काय
चाल्लंय सध्या??

{{ त्यांची तीच तीच प्रवचनं ऐकून ऐकून कटाळली
आता पोरं..!
'स्वस्थ दशकाची डायरी' नावाचं तडफदार
पुस्तक लिहिणारे कर्माधिकारी सर कुठे गेले काय
माहित..!
'किस रास्ते जाना है?' असा थरारक प्रश्न
विचारून,अंगावर काटा फुलवणारे कर्माधिकारी,
आता पार येगळेच दिसाय लागलेत लगा..!
भौतेक ते तेंच्या तेंच्या वळणानं चाल्लेत...!
की तसं काय नव्हतंच मुळात, कुणास ठाऊक..!
आमचंच बगायचं चुकलं आसंल कायतरी..!

म्हागं तेंनी 'कार्यकर्ता अधिकारी' असा एक फंडा
काढला होता..!
म्हणजे काय असतं, ते नंतर कळाय लागलं..!
पगार शासनाचा खायचा आणि दुसऱ्याच
कुणाचातरी कार्यकर्ता म्हणून काम करायचं..!!
आसं कसं चालंल..??

बाकी सरांनी आता पुढं बसलेल्या कवळ्या
कवळ्या पोरांपुढं चावट जोक मारायचं बंद
कराय पायजे.!
तसल्या गोष्टींचं बी एक वय असतं..!
वयाच्या साठीत गेल्यावर पुन्हा तरणं ताठं होता
येत नाय, हे लक्षात घ्यायला पायजे त्येंनी आता..!
आता मस्त विश्रांती बिश्रांती घ्यावी..! मस्त चांगली
चांगली पुस्तकं वाचत बसावं निवांत...!
कारण शेवटी किती काळ देशसेवा किंवा
मातृभूमीसाठी दगदग वगैरे करनार ना मानूस..!!

जाऊ दी.. सोड भौ.. तो काय लौकर आटपनारा
इशय नाय..!
पुना म्हनचील मला इंग्लिश दारू झेपली नाय
म्हनून..! बाकी ह्यात तसं चडन्यासारखं काय
नाईचाय म्हना..? नुसतं फुळ्ळक पानीच है..! }}

नाय नाय.. बोला तुमी विजुभौ..

{{ आनी ही आपली पोरं..!
मिन्टामिन्टाला ओ माय गॉss.. होली शिट्
ओ शिट् मॅssन... योss मॅssन...कूssल गाssइज्..!
आसलं बोलतेत..!
ही ह्यांची भाषिक अभिव्यक्ती..!
तेंची बी काय चूकी नाय म्हना..
इंग्रजीमधी मुळात शब्दच कमी हैत..!
लय लिमिटेड..!
मानसाच्या सगळ्या भावना त्यातच कोंबून
बसवाय लागतेत.!

आनी ह्येंन्ला समजा नेमाडे बिमाडे म्हाईत
नाईत तर सोडून दिऊ समजा..!
सगळ्यान्लाच नसतंय नेमाड्यांचं कौतुक..!
आरं पन त्या बाळू चव्हानाच्या पोराला तुकाराम
बी म्हाईत नाईत लगा..!
म्हंजे तुकाराम म्हाईती नसलेला मराठी पोरगा
तयार केला बग बाळ्यानं..! चमत्कारच केला
बोंगाड्यानं..!
ग्लोबल झालं बाळ्याचं पोरगं..!

ग्लोबल हुन्याबद्दल बी काय म्हननं नाय बरं गा..
पण ह्येंन्ला धड मार्केझ आणि कोएत्झीपण
म्हाईत नसतूय...
तो नाकपुश्या चेतन भगतच लागतो
ह्येन्ला टाईम्पासला..!
नायतर तो शेंबडा अमिश त्रिपाठी न् देवदत्त
पटनायक...!
महाभारत रामायणावर कसलातरी थ्रिलर
व्यापक पट मांडायला जातेत, आनी चार
पानांतच धापा टाकाय लागतेत...!
भाषा सुद्धा सगळी लिबलिबीत..!
अंदाधुंद शब्दांचा लेखी गोळीबार नुसता..!

ह्येंन्ला फेफरं आनायला आमचे नरहर
कुरुंदकर गुरूजीच पायजे होते लगा आज...!
तेंनी समजा हे आसलं चिमटीत बी धरलं नसतं
म्हना..!
पन तरी बी पायजेच हुतं ते आज..!
चांगलं फटकावलं आसतं त्येंनी सगळ्यांन्लाच.!
त्या मानसाची तेवढी बुलंद छातीच होती ..!

बाकी ती सुधा मूर्ती नावाची आजून येक फेमस
म्हातारी है..!
आणि तिज्या त्या दमलेल्या आजीच्या
दमवणाऱ्या गोष्टी..!
म्हागं येकदा बार्शीच्या स्टॅण्डवर येष्टीची वाट बघत
वाचाय लागलो होतो, तर ढास लागली मला..!
घाबरून मिटवूनच टाकलं ते..!
आणि मग तिथंच विसरून आलो..!
मुद्दामच ठेवून दिलं तिथं साईडच्या बाकड्यावर..!
आजून बी तिथंच पडलं आसंल..!
कोण न्हेणार ते ?
शेंगदाण्याच्या पुड्या बांदायला बी काय उपेग
झाला नस्ता तेचा..!
नवऱ्याकडं दाबजोर पैसा है..!
आणि हिच्याकडं बक्कळ वेळ..!
त्यामुळं दणादण पुस्तकं पाडत आसते.
मिडलक्लास लोकांना नीतीमत्तेची गुटी वगैरे
पाजते..!
संस्कार बिंस्कार करते..! हळवं बिळवं करते..!
पण लय हळवं नाय बरं गा..!
उगंच आपलं चिमुटभर..! तोंडी लावन्यापुरतं..!
कारण मिडलक्लास लोकांन्ला दुसऱ्या
दिवशी कामावर बी जायाचं असतं ना..?
लय भावुक होऊन कसं चालेल?

तेंची बी काय चूकी नाय तशी म्हना..!
चंपक चांदोबा वगैरे बंद पडलं, त्याच दिवशी
भौतेक हे सगळे जन्माला आले..!
चंपक ची सगळी कसर भरून काढली ह्येंनी..!
आणि आता 'लेखक लेखक' म्हणून नाचाय
लागले..! ऊरावरच बसलेत तवापास्नं..!
कदी खाली उतरतेत काय म्हाईत...! }}

हम्म आणि ती देशपांडे म्हणून येक होती ना?
तुमी बोलला होता तुम्ही मागं.‌.

{{ ती भारीचाय रे..! गौरी देशपांडेची पोरगी है ती..!
उर्मिला म्हणून है..! 'खोटं सांगेन' म्हणते पन अगदी खरंखरं लिहिते..! आईवरच गेलीय..!
आणि गौरी देशपांडे म्हंजे आपलं जुनं लव्ह है बरं गा..!
त्या बाईचं असलं खतरनाक इंग्लिश आसूनसुद्धा तिनं
मराठीमधी लिहिलं त्या टायमाला..!
आणि चांगलंच लिहिलंय, त्या वेळच्या मानानं..!
तर ती आवडायचीच..!
आता तिची पोरगीपन आवडती..!
हा माझ्या वयाचा दोष है बरं गा..!
आता माझं वयच आसं आडनिडं झालंय,
की येकाच वेळी पोरगीपन आवडती आणि
तिची आईपण आवडती...!

तू पॅग भर की..! साला दारू पन चडत नाय आज..!
डुप्लीकेट माल इकतेत का काय हितं?
आपला बिच्या आसं करत नाय..!
इमानदारीनं धंदा करतू...!
येवडी उदारी झालीय माजी, पन येका शब्दानं
बोलत नाय कदी..!
आता एवढं डाळींब गेलं की फेडून टाकतो
म्हागचं सगळं..! सगळं निल करून टाकतो..! }}

आणि ते बाळ्याच्या पोराचं काय म्हणत हुता मगाशी?
गावातनं दरसाल पालखी जाती पंडरपूरला
तरी बी आसं कसं काय.?? आवगडंच है..!

{{ काय नाय रे..!
पालखीत बी आता सगळा चकचकाट झालाय..!
मला तर वाटाय लागलंय की, आता ही पालखी
अन् वारी बिरी सुद्धा अंबानी-अडानीलाच चालवाय दितील...! मंग काय टेन्शनंच नाय..! सगळं येकदम कार्पोरेट स्टाईल हुईल..! }}

नाय नाय.. आसं काय होनार नाय विजुभौ..!
तुमी आज लैच वाकड्यात बोलाय लागलाय..!
हितं मी ऑफिसातल्या दोस्ताला घिऊन
आलोय..! हे बघा, हे पाचपाटील म्हणून हैत..!
आपल्यापैकीच हैत..!
'तुमी चांगलं हसवता' असं सांगून धरून
आणलंय त्येंन्ला..!
आणि तुमचा आज असा उदास बोचा का झालाय
कळंत नाय..!
पन आसू द्या.. होतं आसं कधीकधी..!
काय आडचन नाय..!
आता आपन एक काम करू..!
आता बार बंद व्हायची वेळ झालीय..!
एक हाफ खंबा पार्सल घिऊन जाऊ फ्लॅटवर
आणि तिथं कंटीन्यू करू..! रात्र आपलीच है..!
काय टेन्शन नाय..!
फक्त आता गाडी कुठं पार्कींगला लावली हुती ते
आठवाय पायजे..!

भाग-१
https://www.maayboli.com/node/81253

भाग-२
https://www.maayboli.com/node/81259

भाग -३
https://www.maayboli.com/node/81262

भाग - ४
https://www.maayboli.com/node/81273

(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रंपा प्यायले विजूभाऊ की veritaserum!!
छान चालू आहे सिरीज! नागराज मंजुळ्यांप्रमाणे स्वतःच्या सिरीज मधे कॅमिओ.. चांगलं आहे!

जिज्ञासा आणि फारएण्ड,
तुमच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल धन्यवाद..! Happy

वावे,
एकापाठोपाठ एक बऱ्याच जणांच्या टोप्या उडवल्यात आज! ही पाईपलाईन होती होय? >>>

आजून बी काई जण हैत तसे.. पण ते बाहेर यायला नको म्हनतेत.. पाईपलाईन choke करून टाकलीय त्येंनी..
आता चांगली ५-६ HP ची मोटर लावूनच पाईपलाईन मोकळी करायला लागेल, असं दिसतंय.. Happy

मीही नरहर कुरुंदकरांची फॅन आहे >>>

तो माणूस म्हणजे तळ न सापडणारा, अथांग डोह आहे..!
Happy _/\_

आणि प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद..!

पाचपाटील, हे लई भारी आहे..
आधीचे चारही चांगले होते. पण भाषा बरीबिरी असणारा, मुख्य म्हणजे बिनधास्त लिहू शकणारा आणि तसला आण्भविक इसम जातो तसं लिहून.. किंवा बोलून.. (अर्थात गुरुत्वाकर्षण शून्य होणं, खांडेकर, वगैरे अस्सल अतरंगी गोष्टी होत्याच त्यात)
पण हे एकदमच मस्त आहे. आवडलंच.. (वस्तुस्थिती विदारक असून)

दोन क्वार्टर पोटात गेल्या की समदा तळ ढवळला जातोय पाटीलबा

झ्याक लिवलं आहे, या एकदा तुमच्या संगट एखांदी रात्र जागवू म्हतो, चांगला खंबाच आणतो तुमी म्हणाल तो अन तुमची गाडी जाऊंद्या मंग तर्राट स्पीडमदी

मला अवधूत गुप्तेचं गाण्याला चाबूक म्हणणं कधीच आवडलं नव्हतं. पण आज नेमका तोच शब्द आठवला. हे चाबूक लिहिलंय.
तुम्ही टोप्या उडवलेल्यांची पुस्तकं सतत समोर येतात. पण कधी उचलूनही पहावंसं वाटलं नाही.

पाच पाटील, खरच जबरी लिहिलंय आणि आशुचांप (स्वारी) ना अनुमोदन.
शिवाय ते नांगरे पाटील आन धर्माधिकारी यांनी खरच दोन पिढ्या बरबाद केल्या.

काल रात्री पहिले 4 भाग हसत हसत वाचले आणि आता सकाळी 5व्या भागाने अचानक गंभीर वळणावर आणलं. आधीचे भाग वाचुन मजा आली तरी मला हा भाग जास्त आवडला.

लिहिताना, पोस्ट करताना काही वाटलं नाही, पण नंतर वाटलं की त्यातली भाषा जरा जास्तच घसरली होती... म्हणून म्हटलं की, इथे लोक सहन करतात, फार निगेटिव्ह कमेंट्स करत नाहीत, म्हणून आपण उगाच स्वस्त मनोरंजनासाठी काहीच्या काही चावट मजकूर टाकणं, हे काही बरं नाही.. म्हणून डिलीट करावंसं वाटलं ते.. मलाच ते जरा खटकायला लागलेलं वाचताना.. असो.
नव्याने दिलेल्या प्रतिसादांबद्दल सर्वांचे मनापासून आभार..
_/\_

पाचपाटील , एकदम जबरी लिहिलत. अगोदरचा एक भाग वाचलेली तो मजेशीर होता. तो का काढलात ?
हे खर आहे कि ९०% मुल भारताबाहेर पडणार नाहीत तर इंग्रजी कशाला ? पण अपेक्षा असत असेल बाहेर पडु म्हणुन ,म्हणुन घालत असतील इंग्रजी शाळेत.
upsc/mpsc साठी खरच मुलं खुप ट्राय करतात. पण ते करु पर्यंत बरेच पर्याय बघता येतील अस बर्‍याच जणांना विचारच करायचा नसतो कि काय अस वाटत.

भाषा घसरली होती हे बरोबर. वाटल्यास भाषा बदलून परत लिहून पहा. मीही वाचले होते पण भाषा खटकल्यामुळेच प्रतिसाद दिला नव्हता.

छान लिहिलं आहे. आणि मागचे भागही काढलेत ते बरं च केलं...भाषा फारच घसरली होती. मायबोली ची लेव्हल आपणच मेंटेन करायला हवी..ते तुम्हाला स्वतः हून कळलं आणि तुम्ही तशी action घेतली हे विशेष आनंदाचे.
फारेंड सारखे लेखक तुमची तारीफ करताहेत म्हटल्यावर..काही तर कसब असेलच ना लेखणीत!!!
बाकी यातून तुमची बहुश्रुतता, वाचन, व्यासंग..कळून येतोच आहे...
सुंदर लिखाण. Keep it up.

आपण आधीचे भाग काढायला नको होते. ती त्या पात्रांची स्वाभाविक भाषा होती. ज्यांना आपल्या परिघाबाहेरील भाषेची कल्पनाच नाही असे लोक असणारच पण लेखकाने अशा minority कडे जास्त लक्ष देऊ नये असे वाटते. इतके वर्ष अशीच लोक dominate करताहेत आणि तयामुळे साहित्य एकसुरी होत चालले आहे

आधीचे भाग वाचले होते . ती कदाचित त्या त्या वयातल्या लोकांची विचार व्यक्त करायची भाषा असू शकते असे वाटले होते . पण आधीचे लेख लिहिणारे पाचपाटील ते हेच का ? असाही विचार मनात येऊन गेला . त्यामुळे स्वखुशीने तुम्ही आधीचे भाग काढले त्याबद्दल अभिनंदन !! हाही भाग छान झाला आहे .

अभिनेता, लेखक कोणीही त्याच्या प्रतिमेच्या चौकटीत अडकून पडू नये आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला तसं अडकवू नये.
मुक्तपणे व्यक्त होऊ द्यावं. यापुढे असं वेगळं काही लिहायचं असेल तर वाटल्यास दुसरा आयडी घ्या, पण लिहा.

पाटील, तुमची लेखन शैली जबराट आहे. काही वेळेस डोक्यावरुन गेली. पण खर्‍या अर्थाने आतुन आलेले लिखाण म्हणजे हेच.

भरत, रश्मी +११

भाषा घसरली होती हे बरोबर. वाटल्यास भाषा बदलून परत लिहून पहा. मीही वाचले होते पण भाषा खटकल्यामुळेच प्रतिसाद दिला नव्हता.>>> +११

लिहीत रहा ,, पुलेशु.

लेखकाने प्रतिमेत अडकून पडू नये, वाचकांनी अडकवून ठेवू नये याला +१
वाचकांच्या दृष्टीने-
प्रतिसाद न देणे हाही एक प्रतिसाद आहे. यात 'आवडलं नाही' एवढंच म्हणायचं असतं. तुम्ही असं लिहू नका असं सांगायचं नसतं. तसं सांगावं असं तीव्रतेने वाटत असेल तर तसा प्रतिसाद लिहिला जाईल.

पहिला भाग भन्नाट होता. तो सुद्धा काढला का?
नंतरचे मला तितके रुचले नव्हते.. म्हणून वाचायचे सोडलेले.. ईथले प्रतिसाद बघून हा वाचला. हा भारी जमलाय Happy

अभिनेता, लेखक कोणीही त्याच्या प्रतिमेच्या चौकटीत अडकून पडू नये आणि त्याच्या चाहत्यांनी त्याला तसं अडकवू नये.
मुक्तपणे व्यक्त होऊ द्यावं. यापुढे असं वेगळं काही लिहायचं असेल तर वाटल्यास दुसरा आयडी घ्या, पण लिहा.

>>>>
याला माझा दणदणीत +७८६ Happy

बाकी ईथे लेखकाने स्वतःच भाग काढलेत, कोणी फोर्स केलाय म्हणजे असे लेखन मायबोलीवर चालणार नाही वगैरे आढळले नाही. तर लेखकावरच सोडून देऊया हे.. आपली ईमेज कशी राखावी हे ठरवायचा अधिकारही लेखकाचाच Happy

Pages