माझी दृष्टी (अचानक) जाते तेव्हा...
पंचवीस-एक वर्ष झाली असतील या घटनेला. एकोणीस-वीस वर्षाचा असेन मी तेव्हा.
मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती बदलापूर-उल्हासनगर जवळच्या अंबरनाथला सासरी जाऊन काहीच वर्षे झाली असावीत.
अंबरनाथला जायचे म्हणजे पुण्याहून कर्जत passenger पकडायची. कर्जतला उतरून पुढे लोकलने अंबरनाथ. या प्रवासाची अधून मधून जाऊन मला आता सवय झाली होती.
त्या दिवशी अशीच मी लोकल पकडली. लोकल पूर्ण भरलेली असल्याने दरवाजाजवळच मी उभा होतो. चिकटून चिकटून उभी असलेली माणसे. उन्हाळ्यातली दुपारची प्रचंड तापलेली वेळ. आता काही स्टेशन्सनंतर अंबरनाथ येणार इतक्यात अचानक मला संपूर्णपणे दिसेनासेच झाले. आधीच घामाघूम असलेला मी कमालीचा घाबरलो.
आता अंबरनाथ आले की कळणार कसे? मी लोकलमधून उतरणार कसा? अस्वस्थता इतकी वाढली की मी गळून खालीच बसू लागलो. गर्दीतील एक ग्रामीण बाई, मी तशा प्रचंड गर्दीत एकदम खालीच बसू लागलो म्हटल्यावर माझ्यावर ग्रामीण ढंगात खेकसू लागली.
``अहो... मला अचानक काहीच दिसेनासं झालंय... मला प्लीज अंबरनाथ स्टेशन आले की फक्त खाली उतरवून देता का प्लीज...`` मी अगदी केविलवाण्या स्वरात विचारलं.
``आरं... बरं नसताना आला कशाला गाडीत...`` असं काहीतरी त्या ग्रामीण बाईनं वैतागून म्हटल्याचं मला ऐकू आलं... बाकीच्या आजूबाजूच्या कुणाच्या कानापर्यंत माझं विनवणं पडलं की नाही ते मला काही कळलं नाही, आणि इतक्या गर्दीतल्या कुणीच याबाबत काही म्हटल्याचं मला ऐकू आलं नाही. प्रचंड गर्दी, घामाच्या धारा लागलेल्या इतकी उष्णता आणि आजूबाजूला प्रचंड आवाज अशी सगळीच परिस्थिती असताना माझा प्रॉब्लेम बहुदा कुणाच्या लक्षात येण्यासारखी परिस्थितीच नव्हती.
काहीच दिसत नसताना, अंबरनाथच्या आधीचे स्टेशन आले की बाजूला होण्यासाठी मला आधीचे स्टेशन आले आहे (म्हणजे आलेले स्टेशन अंबरनाथ नाहीये) हे कसे कळणार, आणि बाजूला व्हायचे म्हणजे तरी नक्की कसे आणि कुठे व्हायचे, आणि माझे उतरायचे ठिकाण- अंबरनाथ आले तरी मला कसे कळणार, कुणी मला उतरायला मदत करणार आहे की नाही अशा अनेक विचारांनी माझे डोके भिरभिरायला लागले. शेवटी अंदाजानं; थोडंसं चाचपडतच दाराजवळ जो आतील सीटचा मागील भाग असतो त्याला टेकायला मला संधी मिळाली आणि मी तेथे टेकून देवाची प्रार्थना सुरु केली.
सवयीने अंबरनाथ अजून गेले नाहीये इतके माझ्या लक्षात आले होते. काही मिनिटे अशीच गेली आणि जशी अचानक माझी दृष्टी गेली होती, तशीच आपोआप पण हळूहळू ती परत आली. कमाल म्हणजे माझी दृष्टी आल्यानंतर काही क्षणात आलेले पहिले स्टेशन अंबरनाथ स्टेशनच होते. स्टेशनवर उतरलो. समोरच दिसलेल्या बाकावर बसलो. Bag मधील पाण्याची बाटली काढली आणि काही घोट पाणी प्यायलो आणि बहिणीच्या घरी आलो.
बहिणीच्या घरी सगळ्यांना घडलेली घटना सांगितली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण आता मला अगदी चांगलं, पूर्वीसारखं दिसू लागल्यानं तिथे पुढे फारसा विचार केला नाही किंवा झाला असल्यास आत्ता आठवत नाही.
दोन-तीन दिवसांनी पुण्यास पोहोचलो. पुण्यातही हे सर्व घरच्यांना सांगितलं. याबाबत डॉक्टरकडे जाण्याबाबत आम्ही विचारच करत होतो तितक्यात टी.व्ही.वरील एका मालिकेत एका व्यक्तीची दृष्टी अशीच अचानक गेल्याचा (आणि बहुतेक काही क्षणांनंतर परत आल्याचा) प्रसंग दाखवला गेला. माझ्या बाबतीत अगदी असंच झालं होतं. मालिकेच्या त्याच भागात ती व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यावर तपासण्या झाल्यानंतर त्या व्यक्तीस कोणतीतरी मोठी शारीरिक समस्या उघड झाल्याचे, आणि त्यामुळे त्याची दृष्टी काही क्षण गेल्याचे दाखवलेले पाहून आम्ही सर्वच घाबरलो. (ज्याविषयी आम्ही बोलत होतो, अगदी तसेच अचानक दिसणे बंद होणे, त्याच दिवशी टी.व्ही. मालिकेत दाखवले जाणे हा खरं तर कमालीचा योगायोग होता.) घाबरलेल्या आम्ही लगेच- दुसऱ्याच दिवशी डॉक्टरकडे धाव घेतली. माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आणि मालिकेत दाखवल्याप्रमाणे काहीतरी झाले असण्याची आम्हाला वाटलेली भीती डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी काही टेस्ट सांगितल्या. त्या सांगितलेल्या टेस्ट केल्या, ज्यात सुदैवाने काही गंभीर निघाले नाही.
माझ्या अशा- काही मिनिटांसाठी- अचानक संपूर्णपणे गेलेल्या दृष्टीचे कारणाबाबत डॉक्टरांनी त्यावेळी काय निष्कर्ष काढला होता ते आत्ता आठवत नाहीये.
त्यावेळी अंबरनाथ स्टेशन येण्यापूर्वी माझी दृष्टी परत आली नसती, तर मी काय केलं असतं, माझं काय झालं असतं, दुसरंच एखादं स्टेशन आल्यावर गर्दीच्या लोंढ्यामुळे मी बाहेर आलो असतो, तर पुढे मी बहिणीच्या घरापर्यंत- अंबरनाथला कसा पोचू शकलो असतो, मला कुणी, कशी मदत केली असती, वगैरे प्रश्न माझ्या समोर येण्याची वेळ सुदैवानं आली नाही....
त्यानंतर असं कधी काही घडलं नाही, पण तो त्या दिवशीचा लोकल प्रवास मी कधीही विसरू शकत नाही....
**
ब्लॅक आउट असेल तर हा
ब्लॅक आउट असेल तर हा न्युरॉलॉजिकल प्रोब्लेम आहे, भारतातील डोक्टर लगेच मेडिसिनस सुरु करतात वयस्कर लोकांना. अमेरिकेत मात्र गोड हसुन परत पाठविले.
दसा बाप रे!!! यु आर अ स्ट्रोक
दसा बाप रे!!! यु आर अ स्ट्रोक सर्व्हायव्हर? देवाची कॄपा आहे.
सामो
सामो
मला सांगायला आवडत नाही असल्या गोष्टी पण इतरांना माहीत असावे म्हणून लिहिले. आपलं दुःख आपल्या जवळ ठेवावं . इतरांना का त्याचा त्रास असं वाटतं. आनंद जरूर द्यावा.
देवाची खरंच कृपा आहे.
सामो
दोनदा पोष्ट झालं.
>>>>मला सांगायला आवडत नाही
>>>>मला सांगायला आवडत नाही असल्या गोष्टी पण इतरांना माहीत असावे म्हणून लिहिले. आपलं दुःख आपल्या जवळ ठेवावं .
समजू शकते. _/\_
बाप रे झालं अनुभव वाचून.
बाप रे झालं अनुभव वाचून.
Pages