माझी दृष्टी (अचानक) जाते तेव्हा...
पंचवीस-एक वर्ष झाली असतील या घटनेला. एकोणीस-वीस वर्षाचा असेन मी तेव्हा.
मोठ्या बहिणीचे लग्न होऊन ती बदलापूर-उल्हासनगर जवळच्या अंबरनाथला सासरी जाऊन काहीच वर्षे झाली असावीत.
अंबरनाथला जायचे म्हणजे पुण्याहून कर्जत passenger पकडायची. कर्जतला उतरून पुढे लोकलने अंबरनाथ. या प्रवासाची अधून मधून जाऊन मला आता सवय झाली होती.
त्या दिवशी अशीच मी लोकल पकडली. लोकल पूर्ण भरलेली असल्याने दरवाजाजवळच मी उभा होतो. चिकटून चिकटून उभी असलेली माणसे. उन्हाळ्यातली दुपारची प्रचंड तापलेली वेळ. आता काही स्टेशन्सनंतर अंबरनाथ येणार इतक्यात अचानक मला संपूर्णपणे दिसेनासेच झाले. आधीच घामाघूम असलेला मी कमालीचा घाबरलो.
आता अंबरनाथ आले की कळणार कसे? मी लोकलमधून उतरणार कसा? अस्वस्थता इतकी वाढली की मी गळून खालीच बसू लागलो. गर्दीतील एक ग्रामीण बाई, मी तशा प्रचंड गर्दीत एकदम खालीच बसू लागलो म्हटल्यावर माझ्यावर ग्रामीण ढंगात खेकसू लागली.
``अहो... मला अचानक काहीच दिसेनासं झालंय... मला प्लीज अंबरनाथ स्टेशन आले की फक्त खाली उतरवून देता का प्लीज...`` मी अगदी केविलवाण्या स्वरात विचारलं.
``आरं... बरं नसताना आला कशाला गाडीत...`` असं काहीतरी त्या ग्रामीण बाईनं वैतागून म्हटल्याचं मला ऐकू आलं... बाकीच्या आजूबाजूच्या कुणाच्या कानापर्यंत माझं विनवणं पडलं की नाही ते मला काही कळलं नाही, आणि इतक्या गर्दीतल्या कुणीच याबाबत काही म्हटल्याचं मला ऐकू आलं नाही. प्रचंड गर्दी, घामाच्या धारा लागलेल्या इतकी उष्णता आणि आजूबाजूला प्रचंड आवाज अशी सगळीच परिस्थिती असताना माझा प्रॉब्लेम बहुदा कुणाच्या लक्षात येण्यासारखी परिस्थितीच नव्हती.
काहीच दिसत नसताना, अंबरनाथच्या आधीचे स्टेशन आले की बाजूला होण्यासाठी मला आधीचे स्टेशन आले आहे (म्हणजे आलेले स्टेशन अंबरनाथ नाहीये) हे कसे कळणार, आणि बाजूला व्हायचे म्हणजे तरी नक्की कसे आणि कुठे व्हायचे, आणि माझे उतरायचे ठिकाण- अंबरनाथ आले तरी मला कसे कळणार, कुणी मला उतरायला मदत करणार आहे की नाही अशा अनेक विचारांनी माझे डोके भिरभिरायला लागले. शेवटी अंदाजानं; थोडंसं चाचपडतच दाराजवळ जो आतील सीटचा मागील भाग असतो त्याला टेकायला मला संधी मिळाली आणि मी तेथे टेकून देवाची प्रार्थना सुरु केली.
सवयीने अंबरनाथ अजून गेले नाहीये इतके माझ्या लक्षात आले होते. काही मिनिटे अशीच गेली आणि जशी अचानक माझी दृष्टी गेली होती, तशीच आपोआप पण हळूहळू ती परत आली. कमाल म्हणजे माझी दृष्टी आल्यानंतर काही क्षणात आलेले पहिले स्टेशन अंबरनाथ स्टेशनच होते. स्टेशनवर उतरलो. समोरच दिसलेल्या बाकावर बसलो. Bag मधील पाण्याची बाटली काढली आणि काही घोट पाणी प्यायलो आणि बहिणीच्या घरी आलो.
बहिणीच्या घरी सगळ्यांना घडलेली घटना सांगितली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण आता मला अगदी चांगलं, पूर्वीसारखं दिसू लागल्यानं तिथे पुढे फारसा विचार केला नाही किंवा झाला असल्यास आत्ता आठवत नाही.
दोन-तीन दिवसांनी पुण्यास पोहोचलो. पुण्यातही हे सर्व घरच्यांना सांगितलं. याबाबत डॉक्टरकडे जाण्याबाबत आम्ही विचारच करत होतो तितक्यात टी.व्ही.वरील एका मालिकेत एका व्यक्तीची दृष्टी अशीच अचानक गेल्याचा (आणि बहुतेक काही क्षणांनंतर परत आल्याचा) प्रसंग दाखवला गेला. माझ्या बाबतीत अगदी असंच झालं होतं. मालिकेच्या त्याच भागात ती व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यावर तपासण्या झाल्यानंतर त्या व्यक्तीस कोणतीतरी मोठी शारीरिक समस्या उघड झाल्याचे, आणि त्यामुळे त्याची दृष्टी काही क्षण गेल्याचे दाखवलेले पाहून आम्ही सर्वच घाबरलो. (ज्याविषयी आम्ही बोलत होतो, अगदी तसेच अचानक दिसणे बंद होणे, त्याच दिवशी टी.व्ही. मालिकेत दाखवले जाणे हा खरं तर कमालीचा योगायोग होता.) घाबरलेल्या आम्ही लगेच- दुसऱ्याच दिवशी डॉक्टरकडे धाव घेतली. माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आणि मालिकेत दाखवल्याप्रमाणे काहीतरी झाले असण्याची आम्हाला वाटलेली भीती डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी काही टेस्ट सांगितल्या. त्या सांगितलेल्या टेस्ट केल्या, ज्यात सुदैवाने काही गंभीर निघाले नाही.
माझ्या अशा- काही मिनिटांसाठी- अचानक संपूर्णपणे गेलेल्या दृष्टीचे कारणाबाबत डॉक्टरांनी त्यावेळी काय निष्कर्ष काढला होता ते आत्ता आठवत नाहीये.
त्यावेळी अंबरनाथ स्टेशन येण्यापूर्वी माझी दृष्टी परत आली नसती, तर मी काय केलं असतं, माझं काय झालं असतं, दुसरंच एखादं स्टेशन आल्यावर गर्दीच्या लोंढ्यामुळे मी बाहेर आलो असतो, तर पुढे मी बहिणीच्या घरापर्यंत- अंबरनाथला कसा पोचू शकलो असतो, मला कुणी, कशी मदत केली असती, वगैरे प्रश्न माझ्या समोर येण्याची वेळ सुदैवानं आली नाही....
त्यानंतर असं कधी काही घडलं नाही, पण तो त्या दिवशीचा लोकल प्रवास मी कधीही विसरू शकत नाही....
**
सत्यघटना आहे का ही?
सत्यघटना आहे का ही?
मालिकेत तसेच दाखवणे हा योगायोग सुद्धा?
मी कथा समजून वाचत होतो..
होय! सगळे खरेच घडलेले आहे.
होय! सगळे खरेच घडलेले आहे. अगदी मालिकेतील योगायोग सुद्धा!
बापरे!
बापरे!
डोळ्यांपुढे अंधारी येणे म्हणतात, तो हा प्रकार का?
बापरे! हे खरं आहे हे वाचून तर
बापरे! हे खरं आहे हे वाचून तर आणखीनच भीती वाटली.
मला पण असंच होतं काही वर्षांत
मला पण असंच होतं काही वर्षांत. पण दृष्टी जात नाही. फक्त डोळ्यांसमोर फुलबाजा चमकावा तसं असह्य प्रकाश चमकत रहातो अन त्यानंतर डोळ्यांवर अंधारी आल्यासारखी वाटून अस्वस्थ झाल्यासारखं वाटत रहातं. होत काहीच नाही. अर्धा-एक तासात सगळं नॉर्मल होतं. साधारण तीन वर्षांपुर्वी असा अनुभव आला अन त्यावर केल्या महिन्यात्ग एकदा.
आत्ता मागील महिन्यात पण असंच घडलं. एसटीने गावी जात असताना भर दुपारी स्टँड वर उतरलो. पुढील एसटी मिळेपर्यंत कडक उन्हात १०-१५ मिनिटं थांबावं लागलं. दुसरी एसटी मिळाल्यावर मी सीटवर बसलो. बाहेर उन्हाचा नुसता रखरखाट. एसटी धाऊ लागली अन मी सोबत आणालेलं सफरचंद खाऊन २-४ घोट पाणी पिलं अन चार-पाच मिनिटांतच माझ्या डोळ्यांपुढं फुलबाजा चमकू लागला. त्याचा आकार वाढत वाढत जाऊ लागला. मी डोळे घट्ट झाकून ठेवले. साधारण अर्ध्या तासानंतर फुलबाजा दिसायचा बंद झाला अन डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखी भावना झाली पण ती काही मिनिटच टिकली. नंतर पुढील १०-१५ मिनिटांत सगळं व्यवस्थित झालं तेवढ्यात माझा स्टॉप आला.
हे असं मला गेल्या ८-१० वर्षांत ३-४ वेळा झालंय.. पित्त वाढलं की असं होत असावं का..? कारण जेव्हा जेव्हा असं झालं तेव्हा तेव्हा मला पित्ताच्या उलट्या झालेल्या स्मरतात.
अनुभवलाय हे
अनुभवलय हे. मी एकटीच सहकारनगर मधे मावशीच्या flat var राहायचे. नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेले.
Scary होता अनुभव
Dj - migrain आहे ... मलाही
Dj - migrain आहे ... मलाही पित्ताबरोबर ट्रिगर होतो/व्हायचा migrain.
अरे देवा... पण हे असं कधीतरीच
अरे देवा... पण हे असं कधीतरीच होतं.. गेल्य १० वर्षांत ४-५ वेळा अनुभवलं असेल.. पण ठराविक असा पॅटर्न नाही. आता काय करायचं...??
बापरे ! पराग लकी आहात तुम्ही.
बापरे ! पराग लकी आहात तुम्ही. नशिबाने पटकन सुचुन जागीच खाली बसलात ते बरे केले, नाहीतर गर्दीने लोटले गेले असता तर? आईग ! कल्पना करवत नाही कारण रेल्वे स्टेशनवर संध्याकाळी ६ वाजता कामावरुन परत येणारा लोकांचा महासागर मी पाहिल्याने मुंबईचा धसकाच घेतला होता.
बापरे!
डोळ्यांपुढे अंधारी येणे म्हणतात, तो हा प्रकार का?>>>>> हाच असावा.
हे असं मला गेल्या ८-१० वर्षांत ३-४ वेळा झालंय.. पित्त वाढलं की असं होत असावं का..? कारण जेव्हा जेव्हा असं झालं तेव्हा तेव्हा मला पित्ताच्या उलट्या झालेल्या स्मरतात.>>>>> डिजे, प्रत्यक्ष उन्हापेक्षा उन्हाच्या झळा ( गरम तप्त वारे) फार भयानक असतात. हो उन्हामुळे पित्त लगेच वाढते. काळजी घेत चला. आणी प्रत्येकाने हे जरुर लक्षात ठेवावे की एकदम थंड एसी मधून झळाळत्या उन्हात लगेच जाऊ नये. विशेषत रेल्वे किंवा बस प्रवासात असे होते. आणी दोन्ही फरकाने शरीराच्या तापमानात गडबड होऊन त्रास होतो. उन्हात जायच्या आधी भरपूर पाणी प्यावे म्हणजे हे असे अंधारी येण्याचे प्रकार होत नाहीत. कानशीलावर ( कानाजवळ ) पण ऊन लागु देऊ नये.
वैनी, धन्यवाद. हेच झालं
वैनी, धन्यवाद. हेच झालं माझ्या बाबतीत आत्ता... पहिली एसटी बस एसी शिवशाही होती अन त्यानंतर भर उन्हात १० मिनिटं थांबल्यावर दुसर्या एसटी ने प्रवास सुरू केला ती बस सर्वसाधारण बस होती.. त्यामुळे हे असं झालं असावं का..??
पण या आधीचे २ अनुभव रात्री आले होते... नानबा म्हणतात तसं मायग्रेन असावं असं वाटू लागलंय.
बापरे!
बापरे!
Dehydration ne PaN मायग्रेन
Dehydration ne PaN मायग्रेन ट्रिगर हो ऊ शकते.
मिग्रेनील गोळी आणि मे डी टे शन चां उपयोग व्हायचा.
सध्या उन्हात बाहेर पडणं होत नसल्याने त्रास थांबलाय.
भीतीदायक अनुभव.
भीतीदायक अनुभव.
>>>>>Dehydration ne PaN
>>>>>Dehydration ne PaN मायग्रेन ट्रिगर हो ऊ शकते.
डिहायड्रेशन मध्ये मेंदूतून पाणी शोषले जाते. शेवटचा पर्याय असतो शरीराकडे मग डोके दुखू लागते.
अनुभव विचित्र आहे.
बापरे! किती भयंकर. विचारपण
बापरे! किती भयंकर. विचारपण करु शकत नाही.
मी एकदा बसमधे बेशुद्ध पडले होते अचानक. दहा मिनिट बेशुद्धावस्थेत होते. आई मला हाका मारत होती उठवत होती. मग अचानक डोळए उघडले आणि अगदी नॉरमल होते मी. मला काही आठवत पण नव्हतं.
अहो सस्मित गाढ झोप लागली
अहो सस्मित, गाढ झोप लागली असावी... गार वार्याच्या झुळुकीमुळे चालत्या बस मधे अशी झोप लागू शकते.
नाही ओ. बसलो नव्हतो आम्ही.
नाही ओ. बसलो नव्हतो आम्ही. उभे होतो. आईशी बोलताना खाली पडले. बसमधेच.
खरा अनुभव असेल तर भीतीदायक
खरा अनुभव असेल तर भीतीदायक आहे.
कर्जतहून अंबरनाथला थेट लोकल गाडी जाते का? कल्याणला येऊन गाडी बदलावी लागली असेल ना?
नाही कर्जतवरून CSTला जाणारी
कर्जतवरून CSTला जाणारी लोकल अंबरनाथला थांबते.
कर्जत, अंबरनाथ एकाच लाईनवर
कर्जत, अंबरनाथ एकाच लाईनवर आहे. पुणे - मुंबई लाईन.
बसलो नव्हतो आम्ही. उभे होतो.
बसलो नव्हतो आम्ही. उभे होतो. आईशी बोलताना खाली पडले. बसमधेच.>> बघा.. मी म्हणालो नव्हतो का... गार वार्याची झुळुक आली की बस मधे काळ झोप लागल्यासारखी गाढ झोप लागते. हे नॉर्मल आहे. होतं असं. बस मधे बोलता बोलता झोपणारी, उभ्या-उभ्या झोपणारी कैक जणं असतात. ड्रायव्हरने ब्रेक मारला की ती खाली पडतात अन मग इतरांना वाटतं ती व्यक्ती बेशुद्ध पडली की काय..!!
आणि त्या झोपणार्याला जाग आल्यावर खरं कारण सांगायची देखील पंचाईत होते..
कर्जतवरून CSTला जाणारी लोकल
कर्जतवरून CSTला जाणारी लोकल अंबरनाथला थांबते.>> हो.. हो... अगदी अगदी... हंबरणाथला कोणतीही ट्रेन जाते. ती ष्वीटू नाही का अशीच मालाड मधून निघाल्यावर कुठल्याही ट्रेन मधे बसली तरी हंबरणाथला उतरून बरोब्बर साळव्यांचं घर गाठते..!!
बापरे,, अनुभव डेंजर आहे खरा.
बापरे,, अनुभव डेंजर आहे खरा. बरं झालं पण तुम्ही लवकर सावरलात.
हा अनुभव वाचून मला लहानपणीचा अनुभव आठवला आज एवढ्या वर्षांनी. चौथी किंवा पाचवीत असेन मी. मी आणि माझी मैत्रीण आमच्या घरासमोरील वाड्यात खेळायला जायचो, तिथे बगीचा आणि झोके असायचे म्हणून. एकदा खेळताना अचानक तिथल्या ओल्या फरशीवरून माझी चप्पल जोरात सटकली आणि त्यानंतर मी पूर्णपणे ब्लॅंक. जवळ जवळ अर्धा तास हे चाललं होतं की मला काही दिसतही नाहीये आणि कळतही नाहीये की मी कुठेय. डायरेक्ट जाग आली तर मी घरी झोपलेले होते, भाऊ मला कड्यावर उचलून घरी घेऊन आला होता. बरं बेशुद्ध पडले होते म्हणावं तर ते पण नाही. मी बसलेले होते आणि समोर दादा असून त्याला ओळखत नव्हते त्या अर्ध्या तासात, असं तो स्वत: मला म्हणाला नंतर. आणि यातलं मला काहीही आठवत नव्हतं. तो हाका मारत होता, माझी मैत्रीण रडत मला हलवत होती आणि मी शुन्यात होते.
नंतर झोप लागली असेल आणि मग जाग आल्यावर नॉर्मल होते.
थोडक्यात मी जोरदार डोक्यावर पडले होते आणि खरंच सिनेमात दाखवतात तसे थोडावेळ याददाश्त गेली होती माझी. आणि विशेष म्हणजे मी आता पडणार आहे हे strong instinct मला ती पाणी मारलेली फरशी पाहून तेव्हाच आले होते.
बापरे. बरं झालं काही गंभीर
बापरे. बरं झालं काही गंभीर नाही.
बापरे भयानक अनुभव!
बापरे भयानक अनुभव!
मला बस मधे असताना चक्कर आली होती पुर्ण अंधारी, सकाळपासून काहिही न खाता कॉलेज ला गेले होते, आणि दुपारी उन्हातून घरी येताना असे झाले. डीहायड्रेशन मुळे.
बापरे, भाग्यश्री, भयंकर अनुभव
बापरे, भाग्यश्री, भयंकर अनुभव आहे. तुमच्या भावाला आणि मैत्रिणीला किती भीती वाटली असेल तेव्हा!
सगळेच अनुभव चित्तथरारक आहेत.
सगळेच अनुभव चित्तथरारक आहेत.
थोडक्यात बचावण्याचे हे असे अनुभव म्हणजे कोणत्यातरी अज्ञात शक्तीची कृपाच म्हटली पाहिजे. शरीरशास्त्र आणि वैद्यक शास्त्र ह्या मध्ये ह्याची गुंतागुंतीची उत्तरे असणारच. कार्यकारणभावही असणार. पण तो क्षण जीवनमरणाचा होता आणि नशीब म्हणून त्यातून बचावलो हीच भावना मनात कायम रहाते.
मला २०१३ ला स्ट्रोकचा अटॅक
मला २०१३ ला स्ट्रोकचा अटॅक आला त्या आधी
साधारण १ महिना समोर असलेल्या वस्तू, माणसं यांच्या अधूनमधून अल्पकाळ दोन प्रतिमा दिसत. डोळ्यांची समस्या असेल तपासू डोळे असं ठरवलं पण जाणं झालं नाही. स्ट्रोक आल्यावर समजलं मला ती पूर्वसूचना होती. सुदैवाने जास्त काही झालं नाही...
अनुभव मुद्दाम शेअर केला इतरांसाठी...
ओह्ह... दत्तात्रय साळुंके
ओह्ह... दत्तात्रय साळुंके तुम्ही खरेच इतरांना सावध केलं आहे.
हे बहुतेक TIA असेल
हे बहुतेक TIA असेल
Pages