हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
सर्वांना नमस्कार. नुकताच उत्तराखंडमध्ये कुमाऊँ परिसरामध्ये फिरण्याचा योग आला. हा योग असतो आणि तो योग असेल तरच फिरणं होतं. अन्यथा कितीही नियोजन करून फिरणं होत नाही. हिमालयामध्ये फिरण्याची ही दहावी वेळ होती. ह्यावेळी हवामान खूप सुंदर होतं, त्यामुळे दूर दूरचे बर्फ शिखर दिसत होते. अनेक ठिकाणी ट्रेकिंग करता आलं. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे दुर्गम अशा मानस सरोवर- कैलास पर्वत यात्रा मार्गावर गूंजी व काला पानी अशा अतिशय दुर्गम जागी जाता आलं. गेल्या वर्षीच २०२० मध्ये इथे जीपचा रस्ता सुरू झाला आहे. रस्ता नव्हेच, जीपचा ट्रेक तो! तिथे फिरण्याचा रोमांचक अनुभव घेता आला. तिथे फिरणं हे जीपसाठी व जीपच्या ड्रायव्हरसाठी तर काहीसं हॉलीवूडपटासारखं होतं. काही हॉलीवूडपट नाही का, एखाद्या साहसी मोहीमेचे असतात, पण ती मोहीम फसते व मग ते एक सर्व्हायव्हल मिशन होतं! गूंजी व काला पानीचा जीप ट्रेक असं सर्व्हायव्हल मिशन झालं होतं! त्याबद्दल आता सविस्तर लिहीणार आहे.
.
१५ दिवस कुमाऊँ परिसरात मनसोक्त फिरता आलं. २५ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर असा हिमालय सत्संग झाला. कुमाऊँ भागातल्या पिथौरागढ़ जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी फिरणं झालं. काही सुंदर ट्रेक्सही केले. माझी पत्नी आशा मूळची तिथली आहे. तिथल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ही कौटुंबिक भेट होती. परंतु त्यासह ज्या ज्या गावांमध्ये फिरत होतो, तिथे सगळीकडे ट्रेकिंग करत होतो. जाण्यापूर्वी काही दिवस त्या भागामध्ये सलग ५५ तास अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे अनेक रस्ते काही दिवस बंद होते. त्यामुळे आम्ही जाताना किती फिरता येईल, किती रस्ते सुरू आहेत ह्याबद्दल काहीशी शंका होती. आणि दिल्लीवरून जातानाही त्यामुळे नेहमीच्या टनकपूर- पिथौरागढ़ रस्त्याच्या ऐवजी हल्द्वानी- दन्या- घाट- पिथौरागढ़ असं फिरून जावं लागलं. तिकडे सगळीकडे फिरताना ह्या अतिवृष्टीचे रस्त्यावर झालेले परिणाम दिसत होते. नंतर बरेचसे रस्ते सुरू झाले तरी अनेक ठिकाणी लँड स्लाईडस, रस्त्यावर कोसळणारे दगड, चिखलामध्ये गाडी घसरेल असे अरुंद झालेले रस्ते होतेच. आणि हा थरार थेट परतीच्या दिवशी हिमालय उतरून पायथ्याला येईपर्यंत कायम राहिला!
.
आशा, मुलगी अदू, काही नातेवाईक आणि दोन मित्र ह्यांच्यासह ह्या प्रवासाची सुरुवात झाली. २४ ऑक्टोबरला पुण्यावरून ट्रेनने दिल्ली आणि २५ ला सकाळी दिल्लीवरून पिथौरागढ़वरून बोलावलेल्या टॅक्सीने पुढचा प्रवास केला. स्पीतिमध्ये सायकलिंग केल्यानंतर दोन वर्षांनी हिमालय सत्संगाचा योग! हिमालयात जाणं म्हणजे हिमालय बोलावतो तेव्हाच जाणं असतं. कारण किती तरी वेळेस असंही झालंय की, खूप नियोजन केलं, तयारी केली पण जाण्याचा योग ऐन वेळी रद्द झाला! आणि असंही अनेकदा झालंय की, विशेष इच्छा नव्हती, नियोजन तर नव्हतंच, पण तरी हिमालयात जाणं सहजगत्या झालं! हिमालयाने बुलावा दिल्यावर ओ ही दिलीच जाते! आणि मग आपोआप सगळ्या गोष्टी जुळून येतात!
दिल्लीत हजरत निजामुद्दीनवरून सकाळी ८ च्या सुमारास निघालो. प्रवासामध्ये तापी, नर्मदा, चंबळ नद्या लागल्या होत्या. दिल्लीमध्ये यमुनाही भेटली. पुढे गढ मुक्तेश्वरला गंगा दर्शन झालं! उत्तर प्रदेश! मुरादाबाद आणि मग रामपूर असं करून रामपूरपासून आतमध्ये वळालो. 'बा अदब, बा मुलाहिजा! होशियार! नगाधिराज महाराज पधार रहे हैं!' असा भाव मनात येतोय. रुद्रपूर सिटी अर्थात सरदार उधमसिंह नगर जिल्ह्यापासून उत्तराखंड सुरू झाला! आणि हल्द्वानीपासून हिमालयाचे चरण कमल सुरू झाले!
.
भीमतालवरून जाताना
काय तो अजस्र अमानुष नगाधिराज! डोळ्यांनी बघताही येत नाही! सुरुवातीला चरण कमल असलेल्या रांगा दिसतात. एका मागोमाग एक डोंगर रांग! जितके डोंगर चढू तितके पुढचे दिसत जातात! हल्द्वानी सोडल्यानंतर लगेचच अरुंद रस्ता, दरी, डोंगर, हिरवागार निसर्ग ही दृश्य सुरू! हल्द्वानीवरून नैनिताल अगदी जवळ आहे, पण इथला मुख्य रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे आम्ही भीमतालवरून जातोय त्या रस्त्यानेच नैनितालची वाहतुक सुरू आहे. दुपारी ३ वाजले आहेत, त्यामुळे नैनितालवरची वाहनं लगबगीने खाली उतरत आहेत. ड्रायव्हर रफिक़ सराईतपणे 'कट' मारत जीप पुढे रेटतोय! एकदम मोठं वाहन समोर आलं तर कुठे कुठे आम्हांला आधी थांबावं लागतंय, किंवा समोरचं वाहन जागा बघून थांबतंय! किंवा कधी रिव्हर्सही घेऊन मागे जावं लागतं! घाट रस्ता, समोर डोंगररांग आणि वनश्री! रस्त्याच्या काठाला माकडं! अशा काही ठिकाणी हिमालयात सह्याद्रीची आठवण होते. पण ती तेवढ्यापुरतीच! नंतरची भूमिती अन् मितीच वेगळी! रस्त्यावरच्या गाड्यांमध्ये मधूनच काही सुसाट सायकलवाले क्रॉस झाले. हे नक्कीच नैनितालमध्ये कामाला जाणारे असावेत. जाताना मोठ्या गाडीतून ते दुधवाला सायकली नेत असावेत. आणि येताना पंचवीस किलोमीटर उतारावर सुसाट उतरत असावेत. वाटेत एका धाब्यावर थांबून पुढचा प्रवास सुरू. प्रवासातील वळणा- वळणाच्या रस्त्यांशी व घाटामधल्या अनुभवाशी पूर्ण परिचित असल्याने जेवण घेतलं नाही आणि चहाही घेतला नाही.
संध्याकाळी पाचनंतर अंधार व्हायला लागला. ह्या रस्त्याने हल्द्वानी ते पिथौरागढ़ १९५ किलोमीटर आहे. पण पहाडी रस्ता म्हणजे ताशी २५ किमी जेमतेम हा वेग. त्यामुळे पिथौरागढ़ला पोहचायला रात्री उशीर होणार हे नक्की आहे. त्यातही आम्हांला पिथौरागढ़च्या पुढे १८ किलोमीटर असलेल्या सत्गड गावी जायचं आहे. पण नजारे काय अद्भुत! ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर मोठं शहरच लागत नाही. अल्मोडा हे जिल्ह्याचं ठिकाण काही किलोमीटर बाजूला ठेवून हा रस्ता जातो. ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयात रात्री वर्दळ असलेला हा रस्ता आहे. आणि नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही हा बंद पडला नाही. त्याउलट टनकपूर ते पिथौरागढ़ हा १५१ किमीचा तुलनेने अधिक सोपा रस्ता ह्या अतिवृष्टीमध्ये ठप्प झाला आहे. एका पॅचला तर दिड किलोमीटर रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे हा काहीसा दूरचा रस्ता घ्यावा लागला.
.
काही डोंगर रांगा चढल्यानंतर हळु हळु रस्ता उंची घेतोय. साधारण १५०० मीटर्स उंचीवर आल्यावर आजूबाजूला देवदारांचं आगमन झालं! सगळीकडे डोंगर- द-या व त्यामध्ये अगदी आतमध्ये असलेली घरं आणि उतारावरची शेती! अंधार पडल्यावर डोंगरामध्ये अधून मधून घरांचे दिवे लुकलुकत आहेत! आणि आकाशात तर चांदण्यांचा पाऊस पडतोय! हुडहुडी आणणारी कडक थंडीही सुरू झाली. रस्ता सतत वळणा वळणाचा. त्यामुळे हा जीपचा प्रवाससुद्धा एक मध्यम दर्जाचा ट्रेक मानला जातो. आणि अनेकांना अगदी सवय असूनही अशा प्रवासाचा त्रास होतो. आता इतका निर्जन भाग आहे की, तासामध्ये दोन- तीनच वाहन क्रॉस होत आहेत. जीपमध्ये नातेवाईक व मित्र असे मिळून सहा जण असल्यामुळे व ड्रायव्हर रफिक़ बोलका व पिथौरागढ़चाच असल्यामुळे गप्पा सुरू राहिल्या. अधून मधून एक एक जण झोप घेत होता. अगदी मंद गतीने प्रवास सुरू राहिला आणि शहर फाटक, दन्या अशी वाड्यांसारखी गावं मागे पडली व घाट नावाच्या जागी हा रस्ता टनकपूर- पिथौरागढ़ महामार्गाला येऊन मिळाला. इथेही थोडा वेळ आधीच लँड स्लाईडमुळे रस्ता बंद केलेला होता. पण आम्ही आलो तेव्हा सुरू झाला आहे. रात्रीचे १० वाजले आहेत! घाट ह्या जागी रस्ता रामगंगा नदी ओलांडतो. पोलिसांनी गाडीची चौकशी करून पुढे जाऊ दिलं! इथून नेपाळ सीमा जवळच आहे! आणि इथून पुढे बॉर्डर रोडस ऑर्गनायजेशनच्या हिरक विभागाची हद्द सुरू होते! पुढे काही ठिकाणी जेमतेम गाडी पास होईल इतका रस्ता उरला होता. किंबहुना तितक्यापुरताच मलबा साफ केला होता. बाकी पावसाने केलेला कहर दिसत होता. डोंगराचे अनेक तुकडे उन्मळून पडले होते, डोंगर खचले होते, दगड आणि राडारोडा सगळीकडे दिसत होता.
.
दिल्लीवरून निघून कधीच बारा तास झाले आहेत. अजूनही वेळ लागणार. अनेकांना उलटीचा व मळमळीचा त्रास झाला. जीप जेव्हा वेगाने वळणं- वळणं घेत जाते तेव्हा पोट सतत हलतं. मी पोट रिकामं ठेवल्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही. छोटी अदू तर झोपून गेली, तिलाही त्रास झाला नाही. अखेर मध्यरात्री १२ वाजता सत्गडला पोहचलो. पण प्रवास अजून पूर्ण झाला नाहीय! सत्गड हे डोंगरावरचं गाव आहे. त्यामुळे इथे पायवाटेने- मुख्यत: पाय-यांनी वर चढून जावं लागतं. हासुद्धा एक १० मिनिटांचा छोटा ट्रेक आहे! पंधरा तास जीपच्या प्रवासाने थकल्यानंतर मोठ्या बॅगा खाली रोडवर एका दुकानात ठेवल्या. इथे सगळे जण एकमेकांच्या ओळखीचे व एकमेकांना जोडून राहणारे! त्यामुळे जड बॅगा दुकानात ठेवल्या. सत्गडचे नवीनजी व अदूचा मावसभाऊ आयुष रस्त्यावर आले आहेत. जीपमधून उतरल्यानंतर इतकी कडक थंडी! रात्रीचे सव्वाबारा वाजलेले आहेत! अक्षरश: दात वाजवणारी थंडी! छोट्या बॅगा घेऊन सगळे निघालो. मी २०१७ मध्ये इथे राहिल्यामुळे मला परिसर ओळखीचा आहे. आणि हिमालयाच्य पुनर्भेटीचा अतीव आनंद आहे! सामान घेऊन चढताना हळु हळु शरीरात ऊब येत गेली. चढताना नवीनजी सहज सांगत आहेत की, परवाच इथे रात्री वाघ येऊन गेलाय. त्यामुळे रात्री कोणीच एकटे बाहेर थांबत नाहीत, अगदी कुत्रे व गुरांनाही घरातच ठेवतात! झोपलेलं पहाड़ी गांव, जवळच असलेलं देवदारांचं घनदाट जंगल आणि दूरवरून दिसणारा ध्वज मंदिरातला दिवा! त्यासह आकाशामध्ये जणू 'प्यार के हजार दीप हैं जले हुए' असे चमचम करणारे तारे! थांबत थांबत, श्वास घेत घेत पंधरा मिनिटांनी नातेवाईकांच्या घरी पोहचलो! ७ वर्षांची अदूही तिची छोटी बॅग घेत बरचसं अंतर चालली व मग मौसाजींनी तिला कडेवर घेतलं. घरी पोहचल्यावर अगदी अगत्यने स्वागत आणि आपुलकी! १८५० मीटर उंचीवरचं सत्गड गांव! अगदी हिमालय की गोद में! आणि गावात अगदी वरच्या बाजूला त्यांचं घर! प्रवासाचा शीण इतका जबरदस्त की, आंघोळ लांबच (इथे थंडीमुळे आंघोळ ऑप्शनला टाकण्याचा विषय), कपडेही बदलण्याची इच्छा होत नाही! पण कसे बसे कपडे बदलले. रात्री ६ वाजता जेवण्याचा माझा नियम बाजूला ठेवला आणि मस्त रोटी- सब्ज़ी व चावल खाऊन घेतलं. नातेवाईकांच्या गच्चीतून ध्वज मंदीराचा दिवा अगदी ठळक ता-यासारखा दिसतोय व त्याच्याच पुढे आकाशात व्याधाचा तारा! आणि किती तरी तारकागुच्छ नुसत्या डोळ्यांनी दिसत आहेत! एका रोमांचक प्रवासाची सुरुवात झाली आहे! खरंच नशीबच लागतं हे अनुभवायला. योग नसेल, नशीबात नसेल तर कितीही इच्छा करून हे मिळत नाही! हा जीवनाचा प्रसादच असतो. पुढचे काही दिवस ह्या हिमालयाच्या सत्संगामध्ये अक्षरश: ऐश्वर्य उपभोगण्याचा योग आहे!
.
पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
माझे हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com
झकास सुरुवात!
झकास सुरुवात!
सुंदर लेख.
सुंदर लेख.
खुपच सुंदर लेख. फोटो टाका
खुपच सुंदर लेख. फोटो टाका भरपुर.
मस्त झालीये सुरुवात!
मस्त झालीये सुरुवात!
सर्वांना धन्यवाद!
सर्वांना धन्यवाद!
ओहो, किती सुंदर लिहिलंय. फोटो
ओहो, किती सुंदर लिहिलंय. फोटो तर अतिशय नेत्रसुखद.
मस्त सुरुवात आणि सुंदर फोटो.
मस्त सुरुवात आणि सुंदर फोटो.
मस्त सुरवात..पुढील लेखमालेची
मस्त सुरवात..पुढील लेखमालेची उत्सुकता आहे. फोटोज आणि प्रवासवर्णन एकदम सही..
सियोना शी सहमत. छान सुरुवात.
सियोना शी सहमत. छान सुरुवात.
वा..वा.. सुंदर सुरुवात!
वा..वा.. सुंदर सुरुवात!
वाह! सुंदर सुरुवात झाली आहे..
वाह! सुंदर सुरुवात झाली आहे.. आता पुढचे दोन्ही भाग वाचते.
सुंदर लेख. तुमच्या
सुंदर लेख. तुमच्या निसर्गप्रेमी आणि अनुभवी नजरेतून हिमालय पाहायला मिळतो आहे.
वाह मस्त झालाय पहिलाच भाग
वाह मस्त झालाय पहिलाच भाग
सविस्तरपणे वाचून मग प्रतिसाद द्यायचाहोता
काय सुंदर फोटो आहेत . मस्तच !
काय सुंदर फोटो आहेत . मस्तच !
Pithoraagadh चा एक जण आमच्या टीम मध्ये होता
मस्त फोटो.
मस्त फोटो.
मी कधी गेलो नाही पण विचारतो
मी कधी गेलो नाही पण विचारतो की -
१) हिमालययात किती उंचीपर्यंत दाट वस्ती झाली आहे?
२) पक्षीदर्शनासाठी ( तिथले खास मोनाल, फैझंट, बुलबुल वगैरे) खूप आत किंवा खूप उंचीवर जावे लागते का? गावात/शहरात कोणते पक्षी सामान्यपणे दिसतात आणि जे इथे मुंबई पुण्यात नसतात.
३) तिथल्या शहरांतही रस्त्यावरचे दिवे वाढल्याने आकाशदर्शनासाठी आणखी दूर जावे लागते का?
ट्रेकिंगसाठी हे मुख्य उद्देश असतात.
४) सह्याद्रीत जसे एकटी भटकंती सहज शक्य असते तशी हिमालयात जमेल का?
@ एसआरडीजी, तुमच्या
@ एसआरडीजी, तुमच्या प्रश्नांना एकच असं उत्तर देता येणार नाही. कारण हिमालय खूप व्यापक आहे. सगळीकडे खूप मोठी विविधता आहे. मी जितका फिरलो आहे, त्या मर्यादेमध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
१. राज्या राज्यानुसार फरक आहे. हिमाचल प्रदेश- लदाख़- अरुणाचलमध्ये अगदी ४००० मीटर्सवरही गावं आहेत. पण सामान्यत: दाट वस्ती ही जास्त पायथ्यालगत असते. १५००- २००० मीटर्स उंचीपर्यंत, ढोबळ मानाने.
२. तिथला निसर्ग अजूनही इतका सुंदर आहे व टिकून आहे व नैसर्गिक विविधता आहे की, पक्षी तर सगळ्या हिमालयात दिसतील. पक्ष्यांबद्दल अधिक सांगू शकत नाही, कारण 'कभी उस नजर से नही देखा!'
३. अगदीच शिमलासारखं शहर म्हणाल तर प्रकाश प्रदूषण आहे. पण बाकी छोटी गावं व आणखी विरळ वस्तीच्या भागांमध्ये आकाश "अहा हा" असंच दिसतं. बोर्टल १ स्केलचं आकाश असतं तिथे! अफलातून! नुसत्या डोळ्यांनी अनेक तारकागुच्छ दिसतात.
४. हो. एकट्याने येतं की फिरता. राहण्याची सोय व प्रवासाची साधनं असतात. फक्त आधी आपल्या जागेचा व रूट- फिरण्याच्या स्वरूपाचा होमवर्क करावा लागेल.
सविस्तर उत्तर आवडले. धन्यवाद
सविस्तर उत्तर आवडले. धन्यवाद मार्गी.