मानवी / अमानवीय अनुभव (कोलाज)

Submitted by झम्पू दामलू on 18 November, 2021 - 14:37

खालील अनुभव / किस्से हे माझेच वेगवेगळ्या धाग्यांवर दिलेल्या प्रतिसदांचे कोलाज आहे. हा धागा पुढे ही अद्यावत ठेवण्याचा विचार आहे. वाचकांनीही त्यांचे अनुभवरूपी योगदान द्यावे,

किस्सा १ :
तुम्ही कधी मिरज वरून सांगोला- पंढरपुरला गेला आहात का? मग तुम्हाला जुणोनी नावाचे गाव लागले असेल. गाव कसलं एक साधा एसटीचा "श्टॉप" तो. तिथून तुम्ही उजवीकडे वळला की तो रस्ता सोनंद नावाच्या गावाला जातो. जत - सांगोला म्हणजे कमालीचे दुष्काळी आणि दरिद्री तालुके. दिवसा उजेडी पण ह्या भागातल्या कोणत्या गावात गेला तरी तुम्हाला लवकर कोणी माणूस दिसणार नाही. तरणी ताठी माणसे सगळी मुंबईला आणि मनी ऑर्डरिवर जगणारी म्हातारी सगळी घरातल्या खाटल्यावर. दिवसा ढवळ्या पण गावे नुसती भकास. तर ह्या जुणोनी - सोनंद कच्च्या रस्त्यावर डावीकडे कोतोबाचा माळ दिसतो. कोतोबा म्हणजे म्हसोबाचे एक रूप ते ह्या माळाचा रक्षणकर्ता. कोतोबाच्या माळावर कोणी जात नाही. कोतोबाची जत्रा पण भरत नाही. मेंढपाळाचे मेंढरू कधी माळावर गेलेच तर मेंढपाळ ते "कोतोबाने गिळले" असे म्हणून ते सोडून देतो. शिक्षणाच्या अभावाने अंधश्रद्धा फार.
१९९८ साली ह्या भागातल्या गावांमध्ये लेप्टो ( Leptospirosis) ची साथ आली. काही लोक दगावले. इतर वेळी ढिम्म झोपलेले आरोग्य खाते लेप्टोच्या साथीने जागे झाले. एक अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आला. जिल्हा प्रशासनाने मिरज मधल्या GMC ला डॉक्टरची टीम पाठवण्याची विनंती केली. एक तरुण डॉक्टरची टीम सोनंद गावात आली.
डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीम्स करून आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये पाठवण्यात आल्या. त्यातल्यात्यात जास्त प्रादुर्भाव असलेल्या वाड्यांमध्ये टीम्स मुक्कामी राहून तिथे तात्पुरते दवाखाने उभा करतील अशी व्यवस्था केली गेली. शहरातल्या लोकांना माहीत नसेल पण राज्यांच्या सीमेवर असलेल्या गावांची सरकार आणि सरकारी कारभारावर खप्पा मर्जी असते. सरकारी कर्मचार्यांबद्दल ( पोलीस, पोस्ट खाते, सरकारी रुग्णालये) जबरदस्त रुक्षपणा असतो. ह्या गावाच्या आसपास असलेल्या वाड्यांमध्ये तपासणी आणि रुग्ण सेवा करायला आलेल्या डॉक्टर आणि वेटर्नरी टीमला याचा अनुभव आला. बऱ्याच गावातल्या लोकांचे टीमला आजिबात सहकार्य मिळत नव्हते. लेप्टो हा आजार गुरांच्या विष्टेतुन पसरतो म्हणून मग गुरांची पण तपासणी होणे गरजेचे होते. पण स्थानिक गावकऱ्यांचा ह्याला विरोध होता. काही लोक हिंसक पण होत होते.
अशातच एक टीम मुख्य गावापासून थोडी दूर असलेल्या एका वाडीमध्ये पोचली. टीम मध्ये डॉक्टर्स आणि काही वेटर्नरी पण होते. त्यांच्या मध्ये पण गट करून कोणी वस्तीमधल्या रुगणांची तपासणी, कोणी अत्यवस्थ रुगणांची देखभाल वगैरे जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. मुक्कामी आलेल्या एका डॉक्टरला सकाळी ताप भरला. त्याने झोपून रहायचे ठरवले. इतर सारी मंडळी कामे करण्यासाठी बाहेर पडली. साधारण ४ वाजता एक एक टीम मुक्कामाच्या ठिकाणी परत यायला सुरुवात झाली. आजारी असलेल्या डॉक्टरची कॉट रिकामी होती. आजूबाजूला कुठे गेला असेल असे म्हणून प्रथम दुर्लक्ष करण्यात आले. आजारी डॉक्टरचा जवळचा मित्र थोड्या वेळाने त्याचे काम संपून आला आणि आजारी डॉक्टर जाग्यावर नाही हे पाहून अचंबित झाला. त्याने एकट्याने प्रथम आजूबाजूला शोधाशोध सुरू केली. तोपर्यंत कोणी हे प्रकरण फार गंभीरपणे घेतले नव्हते. साधारण दिवेलागणीच्या वेळी टीम मधला एक डॉक्टर गायब झाला आहे असे सर्वांच्या लक्षात आले. मग धांदल उडाली. शोधाशोध सुरू होतीच. गावकऱ्यांचे फार सहकार्य नव्हते. ते उडालेली धांदल तटस्थपणे पहात होते. पोलीस पाटील, ग्रामसेवकांना वर्दी देण्यात आली. ते घटना स्थळी पोचले. एकूण स्थानिकांचा सूर - इकडे तिकडे गेला असेल येईल रात्रीतून - असा होता. टीमने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रात्रीतून मिरजला घडल्या घटनेची खबर दिली. सकाळ पर्यंत वाट बघून पोलीस कंपलेंट करू असे मिरज वरून सांगण्यात आले. आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये असलेल्या टीम्सला पण निरोप कळवण्यात आला. एकूणच प्रसंग बाका होता. तो डॉक्टर जाऊ शकेल अशा आसपासच्या सर्व जाग धुंडाळण्यात आल्या. एक तरुण दिवसाढवळ्या गावातून गायब झाला होता.
सकाळ पर्यंत डॉक्टरचा काहीच तपास नाही लागला. मिरज वरून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगून स्थानिक पोलिसांना तात्काळ घटना स्थळी पोचून तपास करण्यास सांगण्यात आले. इकडे गावकऱ्यांमध्ये पोलीस येणार म्हणून प्रचंड अस्वस्थता पसरली. ग्रामसेवका मार्फत पोलीस गावात येण्याबद्दलची नाराजी गावकऱ्यांनी टीमला कळवली. एकंदरीतच गावकरी आणि टीम यांचे एकमेकांबद्दल पहिल्या दिवसापासून मत चांगले नव्हते. ह्या प्रसंगातून एकमेकांबद्दलची दुही अजून तीव्र झाली. टीम मधल्या काही समंजस डॉक्टर्सनी काही वयस्कर गावकऱ्यांना विश्वासात घेऊन परस्थितीचे गांभीर्य पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यावर त्या गावकऱ्यांचा सूर - तुमचा सहकारी संध्याकाळ पर्यंत परत येईल. गावात पोलीस नको - असा दिसला. एकंदरीत त्यांना काही तरी माहीत होते पण ते सांगायला तयार नव्हते असे तिथल्या डॉक्टर्सला वाटले. पोलीस आले आणि त्यांनी गावकऱ्यांना दमात घ्यायला सुरुवात केली. इथे परत पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये असलेले पूर्वग्रहदूषित मते ठळकपणे स्पष्ट झाली. झाल्या प्रकरणाने टीमचे मनोबल खचले होते. एव्हाना त्यांचा सहकारी गायब होऊन २० तास झाले होते. अपहरण , खंडणी, नरबळी अशी वेगवेगळी शक्यता मनात येत होत्या.
तिकडे काही किलोमीटर दूर एका गावात दुसरी एक टीम रुग्णसेवेत व्यग्र होती. घडलेल्या घटनेचा ताण त्यांच्यावरही होताच पण काम पूर्ण करणे सुद्धा गरजेचे होते. असेच एका वृद्ध रुग्णास तपासता वेळी दोन डॉक्टरामध्ये त्याच विषयावर चर्चा चालली होती. वृद्ध रुग्ण शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होता. तपासणी झाल्यावर अगदी जाण्याच्यावेळी रुग्ण थोडा घुटमळला. त्याच्या देहबोलीवरून त्याला काही तरी सांगायचे आहे हे स्पष्ट होते. "झहरीच्या पाण्याजवळ तपास करा" असे काहीसे तो बरळला आणि घाईघाईत निघून गेला. डॉक्टरांना त्याला अजून प्रश्न विचारायचे होते पण तो रुग्ण अक्षरशः तिथून पळून गेला.
झहरीचे पाणी - कोतोबाच्या माळाच्या नैऋत्येस असलेल्या घळीतून येणाऱ्या पाण्यामुळे तयार झालेले छोटेसे तलाव. दुष्काळी भाग असल्याने बहुतांशी कोरडे. पण अगदी घळीच्या तोंडावर दाट झाडीच्या भागात खडकांमध्ये थोडे थोडे पाणी सदासर्वकाळ असते. तर ह्या पाण्याच्या आसपास प्रचंड मोठे खडक आहेत. आणि ह्या खडकांच्या पायथ्याला आहेत असंख्य मृत प्राण्यांची हाडे. ह्या हाडांमुळे आणि प्राण्यांच्या मृत मांस रक्तामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. आणि म्हणूनच त्याला नाव "झहरीचे पाणी". कोतोबाच्या माळाचा पायथा असल्याने अर्थातच कोणी माणूस, गुराखी ह्या भागात फिरकत नाही. माणसा-जनावरांचं जाऊ द्या, एवढे पाणी असून पण झाडावर एक चिमणी दिसणार नाही. कुठल्या जागा टाळायच्या हे पक्ष्यांना पण बरोबर कळते. तर आता तुम्ही विचाराल की अशा ठिकाणी जनावरांची हाडे आलीच कशी? तर आसपासच्या गावांमध्ये जेंव्हा जेंव्हा पाळीव जनावरांमध्ये साथीचे रोग येत तेंव्हा त्यातले काही रोगग्रस्त जनावरे कळप सोडून इथे येत आणि पाण्याजवळच्या खडकांवर डोक्याने टकऱ्या देऊन देऊन अक्षरशः आत्महत्या करत. कळपातली जनावरे जेंव्हा कमी होऊ लागली म्हणून बऱ्याच वर्षांपूर्वी काही धाडसी तरुणांनी तपास करायचा प्रयत्न केला तेंव्हा हे विदारक दृश्य त्यांनी डोळ्यांनी पाहिले. खडकांवर लाल रंग आणि खाली विखुरलेली हाडे अशा जागेपासून माणूस अर्थातच दूर राहणारच. गावांकडच्या प्रथे प्रमाणे तिथल्या शक्तिशाली भगत देवरूषीला ह्या बाबत विचारण्यात आले. तेंव्हा त्याने सांगितले कोतोबा आजारी जनावरांना खाऊन रोग मारुन टाकतो आहे. त्यामुळे झहरीच्या पाण्याकडे जाणाऱ्या जनावराला कधी थांबवू नये. त्याच्या मागे जाऊ नये. तसे न केल्यास रोग उलटून काळापातल्या जनावरांना मृत्यू येईल. अर्थातच गावकऱ्यांनी देवरूषीचे ऐकले आणि मग हा प्रघातच पडला. पण पुढे काही वर्षांनी लोकांमध्ये घबराट पसरली कारण अतिसाराच्या तापाच्या साथीच्या वेळी काही वस्त्यामधली तरणी लोक गायब झाली होती. कोतोबाचा भवरा जनावरांपर्यंत मर्यादित न राहता आता त्यात मानवी जीव पण अडकायला लागले होते.
इकडे झहरीचे पाण्याजवळ शोध घ्या असा निरोप मुख्य टीम पर्यंत पोचला. शोध झहरीच्या पाण्याकडे जाणार आहे हे गावकऱ्यांना कळताच ते प्रचंड आक्रमक झाले. पण पोलिसांच्या मदतीने टीम झहरीच्या पाण्याकडे निघाली. अंतर साधारण ४-५ किलोमीटर होते. एवढ्या लांब तापाने फणफणलेला रुग्ण चालत येईल ह्यावर विश्वास बसणे अवघड होते. पण काहीतरी लीड मिळाला आहे म्हणून तपास करणे गरजेचे होते. पोलीस आणि टीम जेंव्हा त्या ठिकाणी पोचली तेंव्हा चक्रावून गेली. सर्वात आधी जाणवला तो प्रचंड उग्र वास. थोडे पुढे जाताच त्यांना ते दृश्य दिसले. हाडे ठिकठिकाणी विखुरलेली. खडकांवर असलेले लाल आकार ( टक्कर देऊन निर्माण झालेले) . हिरवट लाल पाणी. आणि अगदी झाडीच्या शेवटी त्यांना तो दिसला. त्यांचा हरवलेला सहकारी. झाडीच्या जाळीमध्ये निपचित पडून होता. सगळे धावत त्याच्या जवळ पोचले. त्याचे कपडे बऱ्याच ठिकाणी फाटले होते, अंगावर बऱ्याच ठिकाणी ओरखडे होते. सुदैवाने त्याच्या नाडीचे ठोके चालू होते. त्याला लागलीच पोलिसांच्या जीपमध्ये बसवून मिराजला पाठवण्यात आले. ३० तासांनी हरवलेला डॉक्टर झहरीच्या पाण्याजवळ सापडला होता.
थोड्या दिवसांनी डॉक्टर बरा झाला. डॉक्टरला अर्थातच ह्या बाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावरून सारांश हा निघाला की त्या दिवशी तापात त्याला खूप तहान लागली होती. तापाच्या ग्लानीतच तो पाण्यासाठी बाहेर पडला. त्याला पाणी कुठेच मिळत नव्हते. मध्येच काही लोकांना त्याने पाणी मागितले तर त्यांनी एका दिशे कडे बोट करून तिकडे मिळेल असे सांगितले. तो किती वेळ चालत होता त्याचे त्यालाच समजले नाही. चालून चालून त्याचे डोके दुखायला लागले. त्याला काही अंतरावर पाणी दिसले पण डोकेदुखी एवढी वाढली होती की डोके कशावर तरी आपटून घ्यावे असे वाटू लागले. समोर काहीतरी दिसत होते. त्यावर डोके अपटल्यास डोकेदुखी थांबेल असे वाटले पण तेवढ्यात कशात तरी पाय अडकला आणि तो खाली पडला.

किस्सा २
आमचे एक नातेवाईक पूर्व आंध्रप्रदेश मधल्या एका गावात फार मोठे जमीनदार होते. नातेवाईकांचा आज्जा रझाकार होता तिथूनच त्यांची भरभराट सुरू झाली. रझाकारी गेली पण जमीनदारी आणि खाजगी सावकारी मात्र सुरू राहिली. औराद गावाजवळ त्यांची फार मोठी गढी आहे. तो भाग तसा दुष्काळी, जनता प्रचंड गरीब. पैश्याची नड सर्वांनाच सदासर्वकाळ. भरपूर व्याज लावून कर्ज देणं आणि ते परत न मिळाल्यास जमीन, घर, घरातल्या वस्तू वगैरे घेऊन वसूल करणे हे काम सवकारीत चालत. किमान तीन पिढ्या तर हेच करत होत्या. लोकांच्या तळतळाटाला सावकार जुमानत नसत. पैश्याने माजलेले म्हणून कायदा पण खिशात. ८० च्या दशकात कधीतरी असेच कुणाचे तरी सामान उचलून गढी मध्ये आणण्यात आले. त्यात एक तैलचित्र होते. एक साडी मधली घरंदाज बाई हातात दिवा घेऊन एक अरुंद दगडी जिना उतरत आहे असे ते चित्र होते. दिव्याचा प्रकाश बाईच्या चेहऱ्यावर पडला होता. बाई देखणी आणि अलंकारांनी मढलेली होती. डोळे एकदम सजीव आणि ओठांवर हलकेसे खट्याळ हसू होते. चित्रातली बाई सरळ समोर (चित्र बघणाऱ्याकडे)बघत होती. ते तैलचित्र एवढे सुंदर होते की पशूच्या काळजाच्या त्या सावकाराची रसिकता चाळवली आणि त्याने ते दिवाणखान्यात लावले. तिथूनच त्यांची वाताहत सुरू झाली. अक्षरशः ४ वर्षात घरामध्ये अनेक आजारपणं, अकाली मृत्यू, लहान मुलांमध्ये मानसिक आजार असे नाना प्रकार होऊ लागले. घरामधले एक डोक्याने अधू असलेले बुजुर्ग आजोबा रात्रीतून उठून त्या तैलचित्रा समोर उभे रहात आणि रात्रभर अगम्य भाषेत त्याच्याशी बोलत. मध्ये केंव्हातरी गढीला आग लागली पण ते चित्र आगीतून बचावले. लहान मुलांच्या स्वप्नात ती बाई येई आणि पोरं दचकून उठत. मुख्य जमीनदार एका पावसाळी रात्रीत हृदयविकाराच्या झटक्याने दिवणखण्यातच मेला. मरतानी तो चित्राकडेच बघत होता असे म्हणतात. त्या प्रकारातल्या "जाणकार" माणसाने ह्या सगळ्याचा संबंध त्या चित्राशी लावला आणि ते तैलचित्र अडगळीच्या खोलीत फेकून दिले. पुढे वाताहत तशीच सुरू राहिली. ३ पिढ्यांनी कमावलेले एका पिढीत संपले. आज ही ती गढी आणि दुरदूरचे नातेवाईक गढी मध्येच वेगवेगळे भाग करून रहात आहेत. गढी मोठी असली तरी आतमध्ये कमालीचे दारिद्र्य आहे. गढीमधल्या लोकांनी पैशासाठी जुने सामान कावडीमोलाने विकले. काही लांबलांबच्या नातेवाईकांनी चोरून नेले. पण ते तैलचित्र अजून ही बळदात आहे असे म्हणतात.
मी लहानपणी तिथे गेलो होतो पण तेंव्हा हकीकत माहीत नव्हती. पुढच्या वेळेस गेलो आणि तैलचित्र बघायला मिळालेच तर त्याचा फोटो इथे नक्कीच डकवींन.

किस्सा ३
माझा एक सहकारी कुर्डुवाडीचा आहे. त्याचं बालपण रेल्वे क्वार्टर मध्ये गेलं आहे. सध्या त्याच्या सोबत प्रचंड प्रवास घडत आहे. प्रवासामध्ये अर्थातच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतेच. त्याच्या कडून ऐकलेला हा अनुभव.
सहकाऱ्याचे वडील मालगाडीवर मोटरमन होते. त्यांचे कुटुंब रेल्वे क्वार्टर मध्ये रहायचे. कॉलनी इंग्रज कालीन असल्या कारणाने क्वार्टर म्हणजे छोटा 3 खोल्यांचा ब्लॉक. त्यांच्या कॉलनी मध्ये अशे १५-२० ब्लॉक होते. माझा सहकारी तेंव्हा ९वीत होता. ३ ब्लॉक सोडून जे क्वार्टर होते तिथल्या कुटुंबा मध्ये सतत वाद होत असत. सासू आणि मुलाचे सुने सोबत पटत नसत आणि सतत जोरजोरात भांडणांचे आवाज येत असत. असेच एक दिवशी दुपारच्या वेळी खूप जोरजोरात आवाज येऊ लागला म्हणून माझा सहकारी आणि त्याचे वडील बाहेर जाऊन पाहतात तर त्या ब्लॉक मध्ये आग लागलेली दिसली. ब्लॉक मधील लोक बाहेर होतें पण ती सून मात्र एकटीच आता होती. तो जाळ त्या सुनेने पेट घेतलेल्या शरीराचा होता. पोलीस केस वगैरे झाली. स्वयंपाकघरात काम करत असतानी अचानक स्टोचा भडका उडाला म्हणून आग लागली असे सगळीकडे सांगण्यात आले. कुटुंबावर कोणतीही केस नाही झाली. थोड्या दिवसांनी ते कुटुंब क्वार्टर सोडून दुसरीकडे रहायला गेलं. ते क्वार्टर नंतर बंदच राहिलं. कॉलनी मध्ये दबक्या आवाजात मुलानी आणि सासुनी मिळून सुनेला जाळले अशी चर्चा होती. अशी घटना त्या क्वार्टर मध्ये घडली म्हणून कॉलनी मधले लोक तिथून ४ हात दूर रहात. काही वर्षे अशीच गेली आणि मग माझ्या सहकाऱ्याला आणि त्याच्या मित्रांना फार विचित्र अनुभव आला.
माझा सहकारी आणि त्या वेळचे त्याचे समवयस्क ४ मित्र कॉलनी मध्ये गणपती बसवत असत. एक वर्षी असेच सगळे रात्री उशिरा पर्यंत गणपतीचे डेकोरेशन करत बसले होते. रात्री २ वाजता त्यांचे डेकोरेशन संपले आणि सगळे घरी निघाले. ५ मधल्या एकाचे घर "त्या" घराच्या पलीकडच्या बाजूला होते आणि तो एकटा त्या बाजूला जायला घाबरत होता. हो नाही करत असे ठरले की पाचही जणांनी आधी त्या एका मित्राला त्याच्या घरी सोडायचे आणि मग उलटे फिरून आपापल्या घरी जायचे. ५ जणांचा चमू त्याला घरी सोडायला निघाला. वाटेत चेष्टा मसकरी चालली होती. त्या मित्राचे घर आले, मित्राने घराचे दार उघडले आणि निरोप घेण्यासाठी मागे वळाला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या मित्राचे डोळे त्या बंद घराकडे पहात होते. सगळ्यांनी वळून तो ज्या दिशेने पहात होता तिकडे पाहिले. बंद घराच्या उघड्या खिडकीत एकदम कमी प्रकाशात ती सून उभी होती आणि त्यांच्या कडेच पहात होती. प्रकाश अंधुक असला तरी ती बाई स्पष्ट दिसत होती. हे दृष्य सगळ्यांनीच पाहिले आणि घाबरून जोरात किंचाळायला लागले. ज्याला सोडायला आले होते तो चक्कर येऊन खाली पडला. ह्यांचे किंचाळण्याचे आवाज ऐकून कॉलनीतले लोक जमले, त्या मित्रांना जसे जमेल तसे जे दिसलं ते सांगायचा प्रयत्न केला. त्या खिडकीत अर्थातच आता कोणच नव्हते. सहकारी शपथेवर सांगतो की त्याला आणि त्याच्या मित्रांना त्या खिडकीत खरच ती सून दिसली होती.

किस्सा ४
अनुभव अमानवीय नाही पण भयानक नक्कीच आहे.
मराठी नाट्यक्षेत्र, मालिका आणि चित्रपटात काम केलेला एक प्रसिद्ध अभिनेता माझा चांगला मित्र आहे. त्याने मला सांगितलेला अनुभव इथे देत आहे.
हे महाशय मूळचे पुण्यातले. तेंव्हा ते पुणे विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत होते तसेच नाट्यक्षेत्रातही धडपड करत होते. त्यांच्याकडे त्याकाळी एक स्कूटर होती. नाटकाच्या तालमी झाल्या की मित्रांसोबत पुणे आणि आसपासच्या परिसरात रात्री-बेरात्री भटकणे हा त्यांचा फिरस्ता. असेच एकदा बऱ्याच उशिरा हे महाशय आणि ३-४ मित्र पाषाण तलावा जवळ बऱ्याच उशिरा सिगारेट फुकण्यासाठी गेले. पुण्यात रहाणाऱ्या आणि पाषाण तलाव पाहिलेल्या लोकांना माहीत असेल की मुंबई - बेंगलोर हायवे तलावाच्या अगदी शेजारून जातो. तलावा लागत हायवे एक वळण घेतो आणि पुढे कात्रज दिशेने जातो. ह्या हायवेवर रात्रीही ट्रक्सची बरीच वर्दळ असते. असेच हायवे कडे तोंड ( तलावा कडे पाठ) करून हे मित्र गप्पा मारत बसले होते. येणाऱ्या रहदारीच्या दिव्यांचा उजेड त्यांच्यावर पडत आणि गाड्या पुढे निघून जात. मित्रांमधल्या एकाच्या लक्षात आले की त्यांच्यावर दिव्यांचा उजेड पडला की त्या त्या मोटारीचा वेग बराच कमी होत होता आणि मग त्या निघून जात होत्या. काही काही ट्रक तर चक्क त्यांच्यावर उजेड पडल्यावर थांबले आणि ५-१० सेकंदानी निघून गेले. आधी ह्या मित्रांना वाटले की एवढ्या रात्री हे सगळे मित्र अश्या ठिकाणी गप्पा मारत बसले होते ह्याचं गाडीवाल्यांना आश्चर्य वाटत असेल म्हणून थांबत असतील. पण मग प्रत्येक गाडी बाबतीत असे घडायला लागले आणि त्यांना वाटले की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यातल्या एकाचं लक्ष मागे गेले. आधी त्याला मागे काहीच दिसलं नाही पण मग त्याचवेळेस पाठीमागून एक गाडी आली आणि तिचा उजेड समोरच्या झाडावर पडला. त्यांच्या मागे काही अंतरावर असलेल्या त्या झाडावर एका माणसाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ते प्रेत हवेत लोंबकळत होते. येणाऱ्या गाड्यांना मागे हे प्रेत आणि पुढे हसत खिदळत बसलेले हे ३-४ लोक दिसत होते आणि म्हणून ते वेग कमी करत होते. ह्यानंतर त्या मित्रांची उडालेली घाबरगुंडी विचारायलाच नको.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल Lol

हाकामारी गोड आवाजात हाका मारते. कुठलीतरी हडळ एखाद्या स्वर्गीय सुंदरीचे रूप घेऊन एकट्या दुकट्या बांडाच्या पुढ्यात येते. (तरण्या हा शब्द पैसे कमी पडल्याने राहिला). मला तर धोके पत्करून सुद्धा अशा मागे लागणार्‍या सुंदर्‍या ही कल्पना जामच रोमँटीक वाटते.
नाहीतर लाटणं घेऊन मागे लागलेली कजाग सुंदरी आणि चट्ट्यापट्ट्याच्या विजारीत जीव खाऊन पुढे पळणारा (आपल्यासारखाच दिसणारा) नवरा हे चित्र नेहमीच (स्वप्नात कि सत्यात) पाहिलेले आहे.

तात्पर्य " चुहा बनके जीनेसे एक पल शेर बनके जिओ. अगदी तसंच अशा कजाग स्त्री बरोबर शंभर वर्षे जगण्यापेक्षा एक क्षण रूप घेतलेल्या हडळीबरोबर जगा.

प्रतेक व्यक्तीला असे अनुभव येतात त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही.
पुढे घडणाऱ्या घटनेचे अगोदर च माहिती मिळणे.स्वप्नात किंवा अंतर मनात,खूप संकट येतात काहीच मार्ग शिल्लक नसतो आणि अचानक असा व्यक्ती मदत करतो तो ओळखीचा नसतो किंवा आपला कट्टर वैरी असतो .
तो व्यक्ती त्या वेळेस का मदत करतो हे सांगता येत नाही

मला एक स्वप्न नेहमी पडते,म्हणजे वर्ष दोन वर्षांतून एकदा पडतेच.
त्या मध्ये एक घर दिसते ते मी माझ्या रिअल लाईफ मध्ये कधीच बघितले नाही.त्या घरातील माणसं पण तीच असतात,बाजूचा परिसर पण same तसाच असतो.
तेथील माणसांशी गप्पा होतात ती घरातील च माणसं (स्वप्नात येणाऱ्या घरातील खऱ्या आयुष्यात तशा व्यक्ती संपर्कात पण नाहीत)असल्या मुळे एक नात असल्या सारखे आहे.
जेव्हा स्वप्न चालू होते तेव्हा पहिले पण इथे येवून गेलोय ह्याची जाणीव होते.
ते घर,त्या घरातील माणसं,तो परिसर सर्व ओळखीचे वाटतात

कुंडली शास्त्रानुसार केतू आणि चंद्राचा संयोग कोणत्याही घरात होत असेल तर अतिइंद्रिय अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. तसेच केतू १,४, ८ किंवा ९ व्या घरात असेल तरीही असे अनुभव येतात. जर केतू आणि चंद्रावर गुरुची दृष्टी पडली तर ह्या अनुभवांमागे लपलेले छुपे अर्थही समजतील. म्हणजेच ध्यान वगैरे करून तुम्ही तुमची मनाची कार्यकता वाढवून ह्या स्वप्नांकडे अजून डोळसपणे (मनाच्या) बघू शकता.

ते घर,त्या घरातील माणसं,तो परिसर सर्व ओळखीचे वाटतात >>>
इक हसिना थी, इक दिवाना था
क्या उमर, क्या समा, क्या जमाना थाSSS
Wink

तसे घर कुठे असेल आणि मी तिथे गेलो तर नक्की ओळखीन
हेच ते स्वप्नातील घर आहे म्हणून.
एकदा घडणारा प्रसंग अगोदर पण आपल्याला जाणवतो आणि same तशी घटना नंतर घडते.

Pages