चित्रपटांची लाज काढणारा सूर्यवंशी बॉलीवूडमधे रिलीज झाला. तमिळ मधे सुद्धा असे सिनेमे येतात. पण त्याच वेळी ती चित्रपटसृष्टी बॉलीवूडची लाज काढणारे अनेक सिनेमे बनवत असते.
बॉलीवूडने अनेक विषयांवर कातडे ओढून घेतलेले आहे. वास्तववादी म्हणून फार तर वेन्सडे सारखा चित्रपट बनतो. अक्षयकुमारचे चित्रपट सातत्याने गुड मुसलमान आणि बॅड मुसलमान करत राहतात. हेच ते काय वास्तववादी. पण आजूबाजूला जे जातीच्या अत्याचारासारखे रखरखीत वास्तव आहे त्याकडे बॉलीवूडचे चित्रपट दुर्लक्ष करतात. असे मुद्दे अनुल्लेखाने मारत राहतात.
बॉलीवूडी चित्रपटांचा एक चंगळवादी वर्ग आहे. त्यालाही अशा मुद्द्यांना अनुल्लेखाने मारून हिंदू मुसलमान करायला आवडते. यात त्यांचे राजकीय होत आहे. पण जातीचे प्रश्न. बेरोजगारी , गरीब श्रीमंतांमधली वाढती दरी यावर बॉलीवूड बोलत नाही. मात्र उच्च अभिरूचीच्या चित्रपटांबद्दल चर्चा मात्र करत राहतात.
'
नाही म्हणायला मराठीत फँड्री हा चित्रपट आला होता. तो जातवास्तव दर्शवतो. पण त्यात काहीच घडत नाही. कलात्मक चित्रपट असावा असा तो सिनेमा होता. सैराट मधे मात्र मनोरंजन आणि नंतरच्या हाफ मधे उघडे नागडे वास्तव असा मसाला होता. हा फॉर्म्युला चालला. तमिळ मधे एकापाठोपाठ एक अशा सिनेमांची रांग लागली आहे. काला / कबाली अशा चित्रपटात रजनीकांतने काम केले आहे. यात तसे वेगळेपण काहीच नाही. वेगळे असेल तर नायकाची पार्श्वभूमी. आजवर दलित समाजातून आलेला डॉन / नायक रजत चित्रपतसृष्टीत आला नाही. तो या चित्रपटात आला.
पण ख-या अर्थाने भारतातील जातीचे वास्तव मांडले ते असुरन या चित्रपटाने. कुठेही घडू शकणारी सशक्त कथा. कलाकारांचे जबरदस्त अभिनय. आडपडदा न ठेवता थेट विषयाला भिडणारी हाताळणी यामुळे असुरन ने भारतीय चित्रपटसृष्टीला हादरे दिले. याच पाठोपाठ आलेल्या कर्णन या चित्रपटाने तर असहाय्य दलित समाजाचे चित्रण करण्याची चौकट मोडून काढली. त्या समाजावरच्या अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा त्याच समाजातला नायक हे दृश्य दुर्मिळच.
याच रांगेत आला आहे तो नुकताच आलेला जयभीम.
रिलीज झाल्यापासून या चित्रपटाने उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत.
चित्रपट ख-या घटनेवर आधारीत आहे. थोडक्यात कथा अशी.
एका आदिवासी कबिल्यातल्या राजकन्ना तरूणाला गावातल्या सरपंचाकडे साप पकडायचे निमंत्रण येते. सरपंच आणि त्याची बायको महत्वाच्या कामासाठी शहराकडे निघालेले असताना हा तिथे पोहोचतो. साप निघाल्याने दागिन्यांचे डबे वरच असतात. राजकन्ना साप पकडतो. त्याला मारू नये असे सांगत पिशवीत बंद करतो. राजकन्ना मेहनती आहे. विटांच्या भट्टीत कामाला आहे. गावाबाहेरच्या जंगलात ते राहतात. त्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही. ओळखपत्रे नाहीत. सातबारा नसल्याने रेशन कार्ड बनत नाही. मतदान ओळखपत्र नाही. आधार कार्ड नाही. सरपंचाला विनंती केल्यावर तो जे उत्तर देतो ते लक्षात राहते. तो म्हणतो " निवडून यायला नको त्या लोकांकडे मतांची भीक मागावी लागते. तुम्हाला मताचा अधिकार देऊन तुमच्या पाया पडायच्या का आम्ही ?"
राजकन्ना घरी येऊन झोपडीत आराम करत असतो. त्याची बायको सिंगिनी त्याला गरोदर असल्याची बातमी देते. त्या बातमीने सुखावलेला राजकन्ना आपल्या मुलांनी साप नाही पकडायचा. त्याने शिकले पाहीजे असे म्हणतो. तुला मी पक्के घर बांधून देईल असे वचन देतो. इतक्यात पावसाने त्याच्या घराची भिंत पडते. दोघांचेही चेहरे पडतात. पाण्याचे ओढे घरासमोरून वाहत असताना झाडावर घुबड बसलेले असते.
राजकन्ना दूरच्या गावाला वीटभट्टीवर काम मिळवण्यासाठी निघून जातो. पत्ता त्यालाही नीट माहिती नसतो. इकडे पोलीस त्याला शोधत घरी येतात. सरपंचाच्या बायकोचे दागिने चोरीला गेलेले असतात आणि तिने राजकन्नाचे नाव घेतलेले असते. इथून पुढे सिंगिनीचा, राजकन्नाच्या मित्रांचा अनन्वित छळ सुरू होतो. राजकन्नाचा पत्ता यांना माहीत नसल्याने पोलीस कस्टडीत गरोदर असलेल्या सिंगिनीला मारहाण होते. तिला खरंच गरोदर आहेस की दारूच्या बाटल्या लपवून स्मगलिंग करतेस असे विचारले जाते.
तिघांनाही माहिती नसल्याने राजकन्नाच्या बहीणीच्या गावी जाऊन तिला उचलून आणले जाते. तिच्यावरही अनन्वित अत्याचार होतात. तिचे कपडे फेडले जातात. एक आदिवासी मग आम्हा पुरूषांवर काय अत्याचार करायचे ते करा पण हिला जाऊ द्या असे म्हणतो. इथे पोलिसांचा इगो दुखावतो. आम्हाला मर्दानगी सांगतोस का ? असे म्हणत ते नाही नाही ते आव्हान त्यांच्यापुढे ठेवतात. हे असे कधी न ऐकलेले आदिवासी लोक पोलीसांच्या त्या पवित्र्याने भयभीत होतात. तिकडे राजकन्नाला एक दिवसाची सुटी मिळाली म्हणून तो परत येतो. त्याला सगळी हकीकत कळते. तो पोलीस स्टेशनला खरं सांगायला जातो.
मात्र पोलीस त्याला चोरीचा गुन्हा कबूल करायला सांगतात. त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. थर्ड डिग्रीचे एका पेक्षा एक भयंकर टॉर्चर केले जाते. जखमांवर मिर्च्यांची पावडर टाकून उलटे टांगून दंडुक्यांनी मारहाण होते. जोपर्यंत तो कबूल करणार नाही तोपर्यंत मारायचे आदेश असतात. या अमानुष मारहाणीत राजकन्ना गलीत गात्र होऊन " जो गुन्हा मी केलाच नाही तो कबूल कसा करायचा " असे विचारत राहतो.
एके रात्री पोलीस सिंगिनीच्या झोपडीत शिरतात. तिघेही चौकीतून फरार झाले आहेत. ब-या बोलाने त्यांचा पत्ता सांग नाहीतर तुला मारू असा दम देतात. ती पोलीस चौकीला जाऊन पाहते. राजकन्नाला जी अमानुष मारहाण होत असते ते तिने पाहीलेले असते. तिला संशय येतो.
ती सरपंचा पासून सगळीकडे न्याया साठी फिरते. पण कुणीच तिला मदत करत नाही.
शेवटी तिला चंद्रू वकीलाचा पत्ता मिळतो.
इथून सुरू होते एका ऐतिहासिक खटल्याला. चंद्रू वकील राजकन्नाला न्यायालयात हजर करण्यासाठी हेबिअस कॉर्प्स दाखल करतो. भारताच्या इतिहासात ही दीर्घकाळ चाललेली रिट पिटीशन आहे. इथून पुढे साक्षीदारांच्या जबाबातल्या विसंगती, पोलिसांच्या स्टेशन डायरीतल्या नोंदी, त्यांचे फोन रेकॉर्डस आणि साक्ष यातून चंद्रू वकील विसंगती समोर आणत राहतो. न्यायालय राजकन्ना आणि त्याच्या सोबत जेल मधे असणा-या दोघांना शोधण्याचा आदेश देते.
चंद्रूला एक प्रामाणिक पोलीस अधिकारी न्यायालयाच्या देशावरून मदत करतो. त्याच्या मदतीने चंद्रू तपास अधिका-याप्रमाणे शोध मोहीम राबवतो. यात जे सत्य समोर येते त्यामुळे न्यायव्यवस्था, तमिळनाडू सरकार आणि जनता हादरते.
या घटनेवर हा चित्रपट आहे. चंद्रू वकीलांनी थोडेफार माध्यमस्वातंत्र्य सोडले तर केसमधे काहीही बदल केलेले नाहीत असे सांगितले आहे. चंद्रू वकीलांनी न्यायाधीश झाल्यावर अशा प्रकारची ९६००० प्रकरणे केवळ आठ वर्षात निकाली काढली आहेत. वकील असताना अशा केसमधे ते एक पैसाही फीस घेत नसत.
या चित्रपटात जातीचे वास्तव संवादातून जसे व्यक्त झाले आहे. तसेच अनेक प्रसंग चीड आणणारे आहेत. हे एक असे वास्तव आहे जे अनुल्लेखाने दाबून सगळे जण जणू काही आपण युरोप अमेरिकेत नांदतोय अशा अविर्भावात राहतात. अनेक लोकांकडे, समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची ही सवय इतकी अंगवळणी पडली आहे की जयभीम सारख्या चित्रपटाने आरसा दाखवल्यावरच भ्रमातून लोक बाहेर पडताहेत.
कॅमे-याने उत्तम काम केले आहे. भिंत पडतानाचे वातावरण. घुबडाचा क्लोज अप.
दिग्दर्शकाने अनेक बारकावे टिपले आहेत, जसे सरपंचाकडे जाताना राजकन्नाला सायलेन्सर वर पाय ठेवावा लागतो. त्याच्या पायात वहाणा नसतात. त्यामुळे तो आधाराला गाडी चालवणा-याला धरण्यासाठी स्पर्श करतो तेव्हांची त्याची नजर.
साप पकडल्यावर सरपंचाच्या गाडीला धक्का मारल्यावर सरपंच बक्षीस देतो तेव्हां ती विनम्रपणे नाकारताना तो " ही मदत होती. त्यातच मालकीण बाई आमच्या गावाच्या आहेत" असे म्हटल्यावर ती उसळून माझी बरोबरी करतोस ? उद्या तुझ्या जातीची म्हणशील... असे म्हणते.
जात ही अशी रूजलेली असते. कायदा सुव्यवस्था क्षीण असणा-या ग्रामीण भागात, दुर्गम भागात आजही बळी तो कान पिळी हाच कायदा आहे. बळी जात दुर्बल घटकांचे शोषण करते. त्यांना पोलीसांपासून न्यायव्यवस्थेपर्यंत परिस्थिती कशी अनुकूल असते हे जयभीम नेमकेपणे मांडतो.
कलाकारांमधे निर्माता - अभिनेता सूर्याने अंडरप्ले करत चंद्रू वकील अचूक उभा केला आहे. सिंगिनीने मात्र जो अभिनय केला आहे ती केवळ मेथड अॅक्टींग आहे असे म्हणवत नाही. ती सिंगिनीच आहे असे वाटत राहते. ज्या ज्या सीनमधे ती रडली आहे, आक्रोश केला आहे, त्याने हृदय पिळवटून टाकले आहे. राजकन्ना चा अभिनय सुद्धा उत्तम आहे. सर्वांनीच अभिनय चांगला केला आहे. प्रामाणिक पोलीस अधिका-याच्या भूमिकेत प्रकाश राज यांचे दर्शन सुखावह आहे.
चित्रपटावर टीकाही होतेय. तशी ती होणारच होती.
काही टीकेत तथ्य नाही. तर काही टीकाकार बाल का खाल काढताहेत.
नायिका गोरी असताना तिला काळे फासणे हा वर्णवाद नाही का ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काळ्या रंगाच्या अभिनेत्रीला गोरे दाखवले जाते तेव्हां अजून काय असते ?
हिंदी तमिळ वादही उपस्थित केला गेला होता. धर्माची बदनामी होते असा अजब युक्तीवाद सुद्धा झाला आहे.
काहीही असो. प्रत्येक भारतीयाने एकदा तरी पाहिला पाहीजे असा हा चित्रपट आहे. कोषात राहून वास्तवाकडे दुर्लक्ष करून समस्या सुटत नाहीत. समस्या समोर आल्यावर व्हिक्टीमवरच आगपाखड करून तर अजिबातच सुटत नाहीत.
या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चंगळवादी दुनियेत रममाण झालेल्या तथाकथित मेन स्ट्रीमला खणखणीत इशारा दिला गेला आहे.
बोलीवूडशी स्पर्धा अनावश्यक
बोलीवूडशी स्पर्धा अनावश्यक वाटली
बॉलिवूडने गेल्याच वर्षात मोदी , मनमोहन , शास्त्री डायरी , इंदू सरकार इ चित्रपट दिले , पण सगळे पडले.
बॉलिवूडने चित्रपट काढलाच असता तरी पैसे भरायला काढला , हिंदू धर्माविरुद्ध काढला इ इ आरोप झालेच असते.
बॉलिवूडच्या तिकिटावर मनोरंजनकर छापलेला असतो , गुरुदक्षिणा किंवा शिक्षणकर नव्हे , शिक्षण हे बॉलिवूडचे काम नव्हे
युट्युबवर शर्मा वगैरे लोक अभिमानाने पिक्चरबद्दल बोलत आहेत , आता जर आरक्षणाविरोधात बडबडायचे कार्य हे शरमे बंद करतील तर ते ह्या चित्रपटाचे खरे यश ठरेल
"शहीद" सारखे सिनेमेही बॉलीवूड
"शहीद" सारखे सिनेमेही बॉलीवूड ने बनवले आहेत.
मेनस्ट्रीम बॉलीवूड मात्र अशा विषयाच्या वाटेला जात नाही असे दिसते. सैराट चा रिमेक केला तेव्हाही सैराट मधले जातीभेदाचे भयानक वास्तव काढून टाकून तो निर्जंतुक, गिळगिळीत, असा केला गेला, मॅगी सारखा.
कडक सिनेमा आहे. कालच पाहिला.
कडक सिनेमा आहे. कालच पाहिला. बायको बघताना रडत होती. मला रडायला नाही आले पण सतत वाईट वाटत होते. त्यामुळे न्याय मिळतानाही तितकेच छान वाटत होते. पण न्याय न मिळणाऱ्याच घटना समाजात ९९ टक्के असाव्यात असे वाटते.
सिनेमा ९५ सालच्या सत्यघटनेवर आहे हे नंतर समजले. पण बघताना ते जाणवले नाही. कारण दुर्दैवाने आजही समाजातील परीस्थिती फार काही बदलली नाही.
या चित्रपटावर काही वाद झाले असे कानावर आलेले. काय ते अजूनही माहीत नाहीत. चित्रपट पाहिल्यावरही ते काय असावे याचा अंदाज आला नाही.
एक मात्र आहे. प्रत्येकाने जरूर बघावा हा सिनेमा. वास्तव कळावे म्हणून देखील तसेच कलाकृती म्हणूनही छान आहे.
छान वाटतोय चित्रपट.. उत्सुकता
छान वाटतोय चित्रपट.. उत्सुकता वाढली या परीक्षणामुळे...
शेवटी काय होते ते सांगा कोणीतरी म्हणजे चित्रपट बघण्याचा त्रास वाचेल...
छान माहिती व लेख! बघायचा आहेच
छान माहिती व लेख! बघायचा आहेच.
हिंदीतही "आर्टिकल-१५" हा एक चांगला आला होता नुकताच.
युट्युबवर मुवि नेम explained
युट्युबवर मुवि नेम explained in hindi सर्च करा
रिलीज झाला की चार पाच तासात असे व्हिडीओ येतात , हे काय सिनेमा बघता बघताच व्हिडीओ करतात की काय
हिंदीत पण येतात चांगले सिनेमे
हिंदीत पण येतात चांगले सिनेमे.
पोलीस कारवाई वर टिप्पणी असणारा तलवार छानच आहे, आर्टिकल १५ आहे, इव्हन सुपर ३० सुद्धा वेगळ्या विषयावर असून समांतर आहे.
बाकी लेखातले फक्त जय भीम आणि
बाकी लेखातले फक्त जय भीम आणि कर्णन दोनच पाहिलेत. कर्णन सुद्धा असाच भयाण दुःखी आहे, पण जय भीम जास्त आशादायक आहे..
IMDB rating madhe *Jai Bhim*
IMDB rating madhe *Jai Bhim* ne The Godfather la takale mage ...
Tabbal 9.8 rating..
Kharach mast aahe movie..
असे आज वाचले एका ग्रूपवर
कर्णन सुद्धा असाच भयाण दुःखी
कर्णन सुद्धा असाच भयाण दुःखी आहे,
>>>>
जयभीम भयाण दुखी वगैरे मला वाटला नाही. आशावादी येस्स! तो वाटला. कारण सुरुवातीलाच हिरोचा रुबाब बघून प्रेक्षकाच्या मनात एक विश्वास होतो की हा जे काही अन्याय अत्याचार घडलाय त्याला न्याय मिळवून देणार. याच आशावादाने आपण ईतर चित्रपटांच्या काल्पनिक कथातले कैक अत्याचार बघतोच ना..
हे मी ईतक्यासाठीच लिहिलेय की भयाण दुखी आहे तर नको रे बाबा या चित्रपटाच्या वाटेला जायला - असे बोलणारा एक प्रेक्षकवर्ग असतो तो या चित्रपटाला मुकू नये..
वर लिस्टलेले सगळे सिनेमे
वर लिस्टलेले सगळे सिनेमे पाहिलेत.
त्यातील असूरन आणि जय भीम जास्त आवडले.
धनुषची जबरदस्त एक्टींग आहे. असुरनचा एज इट इज तेलुगु रिमेक पण पाहिलाय नारप्पा- व्यंकटेश आणि प्रियामणीचा. पण धनुषचा अभिनय जास्त भावला.
न्युज लाँड्री साइट वर ऑफुल अँ
न्युज लाँड्री साइट वर ऑफुल अँ ड ऑसम नावाचा पॉड्कास्ट असतो त्यात ह्याचा चांगला रिव्यु घेतला आहे. ट्विटर वर पण चर्चा आहे.
हा बघण्याच्या लिस्टवर आहे. पण
हा बघण्याच्या लिस्टवर आहे. पण नेमका ' not available इन युअर region' दाखवत आहे. prime अतिशय वाईट प्लॅटफॉर्म आहे !
ऑस्करच्या युट्यूब चॅनेलवर
ऑस्करच्या युट्यूब चॅनेलवर क्लिप असणे ते चीन मधे या चित्रपटाची चर्चा होणे असे नवनवे रेकॉर्डस जयभीम करतोय.
तमिळ सिनेमाने जे जे प्रयोग गेल्या काही वर्षात केले त्याबद्दल लवकरच.