फेसबूक, व्हॉट्सप, मायबोली आणि सारेच सोशलमिडीया बंद झाले तर.. काय कराल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2021 - 18:02

काल संध्याकाळपासून व्हॉटसप सर्वर डाऊन आहे. गूगल केले तर समजतेय बहुधा ग्लोबली सर्वर डाऊन आहे. तुमच्याकडे आहे की नाही कल्पना नाही. पण काल संध्याकाळी टीव्हीवर आयपीएलची मॅच बघता बघता मोबाईलवर व्हॉटसप ग्रूपमधील मित्रांशी क्रिकेटची चर्चा करत असताना अचानक माझे मेसेज जायचे बंद झाले. लोकांचे यायचे बंद झाले. मला वाटले आपला इंटरनेट इश्यू असावा. नेट बंद केला. चालू केला. मोबाईल रिस्टार्ट केला. प्रॉब्लेम जैसे थे च!

धोनी विरुद्ध पंत! मस्त मॅच चालू होती. चेन्नई अडचणीत होती. धोनीने काही विशेष केले नव्हते. पंतचा चाहता म्हणून धोनीभक्तांची मस्त खेचत होतो. आणि अचानक रुकावट के लिये खेद है. मॅच चालूच होती. पण चर्चा थांबली होती. मॅच बघण्यातली मजा झटक्यात १० टक्क्यांवर आली होती. कोणाशी चर्चाच करायची नसेल तर एकटे क्रिकेट बघणे किती बोअरींग असते याचा अनुभव घेत होतो.

लहानपणी असे नव्हते. क्रिकेटची मॅच म्हटले तर आमच्या घरातच स्टेडीयम भरायचे. सर्वांकडे टिव्ही होता. पण आमच्या घरचे वातावरण 'आओ जाओ घर तुम्हारा' असल्याने सर्व पोरं मॅच आपापल्या घरी न बघता आमच्या घरी जमायचे. स्पेशली शेवटच्या काही षटकांत एकत्र मॅच बघून माहौल करण्यात वेगळीच मजा असायची. क्रिकेट बघण्याच्या बालपणीच्या सर्वच आठवणी चाळीतल्या मित्रांसोबतच जोडल्या गेलेल्या आहेत.

आता काळ बदलला. चाळसंस्कृती मागे सरली. फ्लॅटसंस्कृती आली. नाही म्हणायला माझी पोरं सतत बाहेरच पडीक असतात. मी सुद्धा त्यांना फ्लॅटच्या चार भिंतीत अडवत नाही. पण माझा स्वभाव पाहता मी मात्र माझ्या पर्सनल टाईमला घरातच टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप घेऊन ऑनलाईन कट्ट्यावरच खुश असतो. आज व्हॉटसप सर्वर डाऊन होताच तो कट्टाच उखडल्याच्या वेदना झाल्या. आणि बस्स या निमित्ताने मनात विचार आला.....

जर व्हॉटसप फेसबूकच नाही तर ट्विटर मेसेंजर मेल मेसेज झूम मिटींग्ज अगदी आपले मायबोली सुद्धा अचानक ठप्प झाले तर... सोशल मिडीया नावाचा प्रकार नाहीसाच होत पुन्हा नव्वदीच्या दशकासारखी स्थिती झाली तर..

अर्थात तेव्हा आपण त्यात खुशच होतो. जास्तच खुश होतो. हे कबूल. पण आता आपल्या भोवतालचे सारे जग, आपले वैयक्तिक विश्व, आपला मित्रपरीवार, नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे वा अनोळखीसुद्धा, सारे या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेले आहेत. आपण रोज काय खातो पितो, कुठे जातो, काय करतो हे रोजच्या रोज कोणाकोणाला सांगत असू, काही ठराविक लोकांशी फोटो शेअर करत असू, आपले वर्तमानच नाही तर भूतकाळातील अनुभवही शेअर करत असू, कित्येक जणांशी फ्रीक्वेंटली गप्पा मारत असू, क्रिकेट-चित्रपट-राजकारण-मालिका-पाककृती अश्या कैक विषयांवर चर्चा करत असू, व्हॉटसप स्टेटस ठेवत असू, लोकांचे बघत असू.. हे सारेच बंद होईल. मग आपले आयुष्य कसे होईल?

आपण आपल्या वैयक्तिक छंदांना जास्त वेळ देऊ. हे बोलायला ऐकायला छान आहे. पण आज कित्येक वैयक्तिक छंदही आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोपासले आहेत, वा आपल्यासारखीच आवड असणारे मित्र जोडले आहेत. त्यांचा सहजसंपर्कही यात तुटून जाईल.

जसे मी स्वतःपुरता हा विचार केला तेव्हा जाणवले की आधीच मी प्रत्यक्ष आयुष्यात जराही सोशल नाही. त्यामुळे कुटुंबाला द्यायला माझ्याकडे प्रचंड वेळ असतो. पण तो देऊन जो शिल्लक वेळ ऊरतो तो सोशल मिडीयावरच घालवतो. कुटुंबासोबत वा स्वतःच्या ईतर छंदांवर घालवलेल्या वेळात जे किस्से घडतात, अनुभव मिळतात ते ईथेच शेअर करतो. कारण सोशल मिडीयाला कितीही आभासी जग म्हटले तरी आपण एखाद्या रोबोटशी नाही तर माणसांशीच बोलतोय, व्यक्तीशीच विचारांची देवाणघेवाण करतोय हे आपल्याला ठाऊक असते. त्यामुळे या माध्यमातूनही आपल्याला गरजेचा असा भावनिक मानवी टच हा मिळतोच. तो अचानक नाहीसा होणे परवडेल तुम्हाला?

जर झालाच सर्व सोशलमिडीयाचा सर्वर यकायक डाऊन तर वेळ घालवायला काय कराल तुम्ही? तुमच्या भावनिक गरजा कश्या पुर्ण होतील? कसे बदलेल तुमचे आयुष्य? एकूणच जग कसे अ‍ॅडजस्ट करेल या बदलाला? किती काळ लागेल यातून निर्माण होणार्‍या नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घ्यायला? म्हातारपणाच्या प्लानिंगमध्ये कोणी सोबत असो वा नसो, मोबाईल विथ हायस्पीड वायफाय कनेक्शनने जग आपल्याशी जोडले गेलेले असेल असा विचार आपण आता करत असू. तर अचानक तो विचार अश्या पद्धतीने बोंबलल्यास आपण कसा तो धक्का सहन करू?

छे! असे रात्रीचे तीन चार वाजेपर्यंत कॉफीचा एकेक घोट घेत, आणि भेळीचा एकेक बकाणा भरत मायबोलीवर धागे काढायचे जे सुख आहे ते कायमचे नाहीसे होण्याचे अभद्र विचार कल्पनेतही नकोसे वाटतात.. मला तरी नाही जमणार.. तुम्ही बघा विचार करून

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages