फेसबूक, व्हॉट्सप, मायबोली आणि सारेच सोशलमिडीया बंद झाले तर.. काय कराल?

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 October, 2021 - 18:02

काल संध्याकाळपासून व्हॉटसप सर्वर डाऊन आहे. गूगल केले तर समजतेय बहुधा ग्लोबली सर्वर डाऊन आहे. तुमच्याकडे आहे की नाही कल्पना नाही. पण काल संध्याकाळी टीव्हीवर आयपीएलची मॅच बघता बघता मोबाईलवर व्हॉटसप ग्रूपमधील मित्रांशी क्रिकेटची चर्चा करत असताना अचानक माझे मेसेज जायचे बंद झाले. लोकांचे यायचे बंद झाले. मला वाटले आपला इंटरनेट इश्यू असावा. नेट बंद केला. चालू केला. मोबाईल रिस्टार्ट केला. प्रॉब्लेम जैसे थे च!

धोनी विरुद्ध पंत! मस्त मॅच चालू होती. चेन्नई अडचणीत होती. धोनीने काही विशेष केले नव्हते. पंतचा चाहता म्हणून धोनीभक्तांची मस्त खेचत होतो. आणि अचानक रुकावट के लिये खेद है. मॅच चालूच होती. पण चर्चा थांबली होती. मॅच बघण्यातली मजा झटक्यात १० टक्क्यांवर आली होती. कोणाशी चर्चाच करायची नसेल तर एकटे क्रिकेट बघणे किती बोअरींग असते याचा अनुभव घेत होतो.

लहानपणी असे नव्हते. क्रिकेटची मॅच म्हटले तर आमच्या घरातच स्टेडीयम भरायचे. सर्वांकडे टिव्ही होता. पण आमच्या घरचे वातावरण 'आओ जाओ घर तुम्हारा' असल्याने सर्व पोरं मॅच आपापल्या घरी न बघता आमच्या घरी जमायचे. स्पेशली शेवटच्या काही षटकांत एकत्र मॅच बघून माहौल करण्यात वेगळीच मजा असायची. क्रिकेट बघण्याच्या बालपणीच्या सर्वच आठवणी चाळीतल्या मित्रांसोबतच जोडल्या गेलेल्या आहेत.

आता काळ बदलला. चाळसंस्कृती मागे सरली. फ्लॅटसंस्कृती आली. नाही म्हणायला माझी पोरं सतत बाहेरच पडीक असतात. मी सुद्धा त्यांना फ्लॅटच्या चार भिंतीत अडवत नाही. पण माझा स्वभाव पाहता मी मात्र माझ्या पर्सनल टाईमला घरातच टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप घेऊन ऑनलाईन कट्ट्यावरच खुश असतो. आज व्हॉटसप सर्वर डाऊन होताच तो कट्टाच उखडल्याच्या वेदना झाल्या. आणि बस्स या निमित्ताने मनात विचार आला.....

जर व्हॉटसप फेसबूकच नाही तर ट्विटर मेसेंजर मेल मेसेज झूम मिटींग्ज अगदी आपले मायबोली सुद्धा अचानक ठप्प झाले तर... सोशल मिडीया नावाचा प्रकार नाहीसाच होत पुन्हा नव्वदीच्या दशकासारखी स्थिती झाली तर..

अर्थात तेव्हा आपण त्यात खुशच होतो. जास्तच खुश होतो. हे कबूल. पण आता आपल्या भोवतालचे सारे जग, आपले वैयक्तिक विश्व, आपला मित्रपरीवार, नातेवाईक, ओळखीचे पाळखीचे वा अनोळखीसुद्धा, सारे या सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग झालेले आहेत. आपण रोज काय खातो पितो, कुठे जातो, काय करतो हे रोजच्या रोज कोणाकोणाला सांगत असू, काही ठराविक लोकांशी फोटो शेअर करत असू, आपले वर्तमानच नाही तर भूतकाळातील अनुभवही शेअर करत असू, कित्येक जणांशी फ्रीक्वेंटली गप्पा मारत असू, क्रिकेट-चित्रपट-राजकारण-मालिका-पाककृती अश्या कैक विषयांवर चर्चा करत असू, व्हॉटसप स्टेटस ठेवत असू, लोकांचे बघत असू.. हे सारेच बंद होईल. मग आपले आयुष्य कसे होईल?

आपण आपल्या वैयक्तिक छंदांना जास्त वेळ देऊ. हे बोलायला ऐकायला छान आहे. पण आज कित्येक वैयक्तिक छंदही आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून जोपासले आहेत, वा आपल्यासारखीच आवड असणारे मित्र जोडले आहेत. त्यांचा सहजसंपर्कही यात तुटून जाईल.

जसे मी स्वतःपुरता हा विचार केला तेव्हा जाणवले की आधीच मी प्रत्यक्ष आयुष्यात जराही सोशल नाही. त्यामुळे कुटुंबाला द्यायला माझ्याकडे प्रचंड वेळ असतो. पण तो देऊन जो शिल्लक वेळ ऊरतो तो सोशल मिडीयावरच घालवतो. कुटुंबासोबत वा स्वतःच्या ईतर छंदांवर घालवलेल्या वेळात जे किस्से घडतात, अनुभव मिळतात ते ईथेच शेअर करतो. कारण सोशल मिडीयाला कितीही आभासी जग म्हटले तरी आपण एखाद्या रोबोटशी नाही तर माणसांशीच बोलतोय, व्यक्तीशीच विचारांची देवाणघेवाण करतोय हे आपल्याला ठाऊक असते. त्यामुळे या माध्यमातूनही आपल्याला गरजेचा असा भावनिक मानवी टच हा मिळतोच. तो अचानक नाहीसा होणे परवडेल तुम्हाला?

जर झालाच सर्व सोशलमिडीयाचा सर्वर यकायक डाऊन तर वेळ घालवायला काय कराल तुम्ही? तुमच्या भावनिक गरजा कश्या पुर्ण होतील? कसे बदलेल तुमचे आयुष्य? एकूणच जग कसे अ‍ॅडजस्ट करेल या बदलाला? किती काळ लागेल यातून निर्माण होणार्‍या नवीन जीवनपद्धतीशी जुळवून घ्यायला? म्हातारपणाच्या प्लानिंगमध्ये कोणी सोबत असो वा नसो, मोबाईल विथ हायस्पीड वायफाय कनेक्शनने जग आपल्याशी जोडले गेलेले असेल असा विचार आपण आता करत असू. तर अचानक तो विचार अश्या पद्धतीने बोंबलल्यास आपण कसा तो धक्का सहन करू?

छे! असे रात्रीचे तीन चार वाजेपर्यंत कॉफीचा एकेक घोट घेत, आणि भेळीचा एकेक बकाणा भरत मायबोलीवर धागे काढायचे जे सुख आहे ते कायमचे नाहीसे होण्याचे अभद्र विचार कल्पनेतही नकोसे वाटतात.. मला तरी नाही जमणार.. तुम्ही बघा विचार करून

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांत माणूस,
सगळे बंद झाले तरी आम्ही मजेत आहोत हे इतरांना कळण्याची सोय करा तेव्हढी.
Happy
हि फार मोठी गरज आहे सध्या सोशल मिडीयाची.

या प्रश्नाला इतरही खूपच गंभीर बाजू आहेत -

अहो, पण तुमच्या तिकडच्या कुटाळक्या बंद झाल्या तर माझ्या टाळक्यावर तुमची अखंड कटकट आदळत राहील, त्याचं काय !!!! 20190731_085518_0_0.jpg

भाऊ Lol

भाऊ Lol

मला वाटते मुळातच सोशल मिडीया आपल्या गरजेपेक्षा जास्त अतिरेक न करता वापरले तर हे मुद्दाम त्यापासून ठरवून दूर जायची गरज भासू नये.
Submitted by ऋन्मेऽऽष on 5 October, 2021 - 12:12

कोण बोलतंय बघा हे Wink
>>>>

म्हणूनच आपल्या गरजेपेक्षा असे मुद्दाम नमूद केले आहे. प्रत्येकाची गरज त्याच्या आवडीनुसार ठरते. मला तर वेळ पुरत नाही ईथे मौजमजा करायला. अतिरेक होतोय आणि या नादात माझे ईतर काही महत्वाचे काम राहतेय असेही आजवर झाले नाही. त्यामुळे आता पुरे म्हणत मुद्दाम ठरवून ब्रेक घ्यायची गरज पडली नाही. सध्याही गणपतीनंतर काही वैयक्तिक अडचणींमुळे ईतका बिजी झालोय तरी ईथे येणे जाणे चालूच आहे. हो, ऑफिसला मात्र तेवढी सुट्टी घेतली Happy
त्यामुळे सोशलमिडीया आणि मायबोली बंदा होण्यापेक्षा ऑफिसेस बंद झाले तर बरे होईल असे वाटते. काही कमवायचे टेंशन नाही. प्रत्येकाने मस्त जनावरांसारखे स्वछंदी जगावे Happy

चार दिन जिंदगानी, उससे भी कम ये जवानी, ती सुद्धा अर्धी जगून झाली, उरलेल्यात दोन दिवस चुकल्यासारखे वाटले की संपलेच जणू Happy

महाभारतातल्या संजया सारखी दिव्यदृष्टी, कान वगैरे येतील.
किंवा एकमेकाच्या स्वप्नात जाऊन बोलतील.
किंवा रेकी शिकतील.
आत्मिक शक्ती विकास पावेल.
परग्रहावर माणूस शोधण्यासाठी या शक्तिचा उपयोग होईल.
माणसाच्या मनात काय चाललय हे कृतीच्या आधी कळेल....
Proud

मी फक्त शांमा यांच्या कमेण्ट्स वाचायला माबोवर येते >>> असे प्रतिसाद कुठे वाचणार मग ? चौकाचौकात बॅनर लावावे लागतील.

कुजबूज (प्रा) लिमिटेड कंपनी या नावाने व्यवसाय सुरू करीत आहे. सोशल मीडीया बंद पडल्यामुळे होणा-या गैरसोयी टाळण्यासाठी खालील सोयी दिल्या जातील.

- आमच्या कंपनीत रजिस्ट्रेशन केल्यास खालील प्लान मिळतील.
बेसिक प्लान मधे रोज एक धागा सांगितला जाईल. ज्यांना एक धागा काढायचा आहे त्यांना तसे करता येईल. आजची पोस्ट ही तुम्हाला पोस्टाने येईल.

प्रीमियम प्लान मधे तुम्हाला दिवसाला दोन पोस्टी मिळतील व दोन धागेही काढता येतील. ते कुरीयर ने मिळतील.

प्लॅटिनम प्लान मधे तुम्हाला हव्या तेव्हड्या पोस्टी मिळतील व हवे तेव्हढे धागे काढता येतील. त्यासाठी कंपनी तुम्हाला पेजर देईल. पेजर वर तुमची पोस्ट एका वेळी किती जणांना पाठवायची याची मर्यादा असेल. जास्तीच्या पाठवणीसाठी जास्त आकार पडेल. वन टू वन पाठवणीसाठी वेगळा आकार पडणार नाही.

डायमंड प्लान मधे कंपनीच्या एफ एम रेडीओ मधे प्रवेश दिला जाईल. इथे धागे काढणा-यांना धागा जॉकी असे म्हटले जाईल व ते फोनद्वारे आपल्या प्रतिक्रिया घेऊ शकतील.

गरीबांसाठी डबेवाल्यांकडून डब्यात चिट्ठ्या येतील. तसेच नवा धागा एका वहीत लिहीलेला असेल. त्यावर धाग्याखाली आपला प्रतिसाद पेनाने लिहायचा आहे. डबेवाला पुढचे डबे देऊन पुन्हा येईपर्यंतच प्रतिसाद लिहीता येईल. डबेवाल्याने हसून दाखवणे , रागावणे, आश्चर्यचकित होणे, दु:खी होणे, गडाबडा लोळणे व काळा चष्मा लावणे यासाठी वेगळा आकार पडेल.

- हुकूमावरून

फेसबुकने प्रत्येक मिनिटाला गमावले १.६ कोटी रुपये Uhoh
फेसबुकचे को फाउंडर आणि सीईओ झुकरबर्ग यांच्या नेटवर्थमध्ये ७ अब्ज डॉलर जवळपास ५२,१८३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अब्जावधीच्या लीस्टमधून (World’s Richest People) ते एक पायरी खाली घसरले आहे. Sad
अब्बबबब..!!
मिनिटा मिनिटाला एवढे नुकसान होत असेल आणि काही तासात हा फटका बसत असेल तर विचार करा की कायमचे बंद झाले तर या पृथ्वीतलावरून किती संपत्ती नष्ट होईल. आणि आपण आपलीच चिंता करत आहोत..

फेसबुकचा शेअर काल घसरला त्याला सर्विस डाऊन हे (फक्त) कारण नसुन व्हिसल ब्लोअरने फेसबुकला कशी फक्त नफ्याची काळजी आहे आणि त्यांनी कॅपिटल अ‍ॅटॅकच्या वेळी ही नफेखोरी कशी दाखवली याची वाच्यता रविवारी केली होती. सर्विस मला वाटतं ईस्टर्न ११ नंतर डाऊन झाली शेअर सकाळीच गडगडलेला.
ॠन्मेशने सार्क्यास्टिकली लिहिलं आहे, पण मी खरंच सांगतोय. Proud

मिनिटा मिनिटाला एवढे नुकसान होत असेल आणि काही तासात हा फटका बसत असेल तर विचार करा की कायमचे बंद झाले तर या पृथ्वीतलावरून किती संपत्ती नष्ट होईल. आणि आपण आपलीच चिंता करत आहोत..>>> हा...हा....हा......

सोमी बंद पडले तर माझ्या काही खूप खूप बालपणीच्या मैत्रिणी दुरावतील>>>

त्यांचे फोन नंबर, पत्ते वगैरे काहीच घेतले नाहीत का अजुन? सोमि नव्हते तेव्हाही लोक फोन, पत्रे वगैरेच्या मार्फत संपर्कात राहात होतेच की. सोमि मुळे व्यक्तिगत संपर्क कमी झाला हे फार मोठे नुकसान झाले.

सोमि बंद झाला तर माझी व्यसनमुक्ती होइल व मी काहीतरी धड कामे करायला लागेन अशी आशा वाटते. कधी बंद होणार काही कळले का? की उगीच स्वप्नरंजन ??

न्यूज अशी आहे कि ट्विटर पुढच्या आठवड्यात बंद होईल.
आज 15 तारीख आहे पण इकडे अजून 14 का दाखवतेय?

ट्विटर आणि फेसबुकचे चार दिवस संपत आले आहेत. तसं झालं तर मस्क तोंडावर पडल्याचा मला फार्फार आनंद होईल. Wink #सिंकइन नो #सिंकआऊट Wink

असे पण fb आणि व्हॉट्सॲप चे युग पण संपत आले आहे.
Meta आणि ट्विटर ह्यांचे आता घेतलेले निर्णय च हे सांगतात ह्या कंपन्या आता जास्त दिवस टिकणार नाहीत.
काहीच मोजकीच सुविधा ही फायद्याची आहे.
फोटो,व्हिडिओ sharing आणी call.
काहीच दिवसात अनेक सेवा सशुल्क होतील.
आमचे बालपण ,तरुणपण गेले तेव्हा है काहीच अस्तित्वात नव्हते.
शाळेत असताना दहा ते साडेपाच सेवा.शाळा व्यतिरिक्त शेतातील काम, गाई ,बैल सांभाळणे.
संध्याकाळी तालीम, मित्रांशी गप्पा असा वेळ जात असे
अगदी मजेत.
रात्री एकत्र मित्र मित्र झोपणे.
हेच जीवन .
आणि कधीच एकटे पना नव्हता.
कॉलेज मध्ये.
कॉलेज , क्लासेस आणि मोकळ्या वेळी कट्ट्यावर गप्पा. उशिरा पर्यंत.
Fb freinds पेक्षा ते मित्र खूप जवळचे होते.
काही अडचण आली की सर्व हजर हीत असतं.

लोकांचे जॉब जातील ह्या व्यतिरिक्त काही घडणार नाही.
कोरोना काळात पूर्ण वाहतूक बंद होती,फिरणे बंद होते .
कोणी कोणापासून दुरावले नाही.
आणि काही फरक पण पडला नाही.

असा प्रश्न एखाद्याला कसा काय पडू शकतो म्हणून हा धागा फाट्यावर मारता आला असता. पण शाखाचे सगळेच भक्त सोमीच्या इतके आहारी गेलेले आहेत कि त्यांना ही भीती सतावते यात नवल नाही. ही एक मानसशास्त्रीय अवस्था आहे. दारूचे व्यसन लागलेल्या मनुष्याला ज्याप्रमाणे दारू नाही मिळाली तर ही भीती वाटते, अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन मनुष्याला उद्या आपला डोस मिळेल का ? काय दराने मिळेल, पैसे शिल्लक आहेत का ? पोलीसांचे काय ? जर नाही मिळाला डॉस तर अशी भीती वाटते तशीच ही भीती आहे त्यामुळे सहानुभूतीनेच पाहीले पाहीजे. जरी यानंतर काही ड्युआयडी मागे लागले , शिवीगाळ करू लागले तरी परोपकाराचा घेतला वसा सोडणार नाही याच भावाने इथे लिहीले पाहीजे.
संत एकनाथांच्या तोंडावर एक मनुष्य १२१ वेळा थुंकला , त्यांनी १२१ वेळा पुन्हा घाटावर जाऊन पाण्यात डुबकी मारली , महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या अंगावर समाजकंटकांनी शेण आणि दगडांचा मारा केला त्याच प्रमाणे इथे परोपकाराची परतफेड ड्युआयडींद्वारे शिवीगाळीत होण्याची शक्यता आहे. पण त्याकडे दुर्लक्ष करून फुले दांपत्याप्रमाणे उपयोगी पडण्याचे काम चालूच ठेवायला पाहीजे.

विषय कठीण आहे. अशा मानसिक अवस्थेत एकच आधार आहे. उदय चोप्रा.
या मनुष्याकडून शिकण्यासारखे प्रचंड आहे. परोपकार या एकाच भावनेतून या कुटुंबाने शाखाला सुपरस्टार बनवले. अन्नाला लावले. अमिताभला सुपरस्टार बनवण्यात चोप्रांच्या दीवार, त्रिशूल आणि कभी कभी या चित्रपटांचाही हात आहे. हे सर्व चित्रपट एकाच वेळी चोप्रांनी सुरू केले होते. त्याच प्रमाणे शाखासाठी त्यांनी डीडीएलजे सुरू केला तेव्हांच त्यांचे परममित्र आण नातेवाईक यश जोहर यांना त्याच्यासाठी के२एच२ बनवायची गळ घातली.

या वेळी त्यांच्यापुढे घरातलाच सुप्परस्टार उदय चोप्रा होताच. पण त्याला संधी देण्याचा मोह बाजूला सारून त्यांनी शाखाला अन्नाला लावले. हाच डीएनए उदय चोप्रामधे ही आहे.

परोपकाराच्या या भावनेमुळेच धूम सिरीजमधून एकट्याला फायदा करून घेणे शक्य असतानाही अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, ऐश्वर्या राय, ऋत्विक रोशन, आमीर खान यांचे ढासळते करीअर मार्गी लावले. या सिरीजचे प्रचंड यश एखाद्याच्या डोक्यात गेले असते. पण उचो नेहमीच कार्यरत राहण्यावर विश्वास ठेवतो. त्याने टायगर सिरीज मधे दिग्दर्शनात भावाला मदत केली. सलमानला अन्नाला लावले. याच दरम्यान शाखाचे सिनेमे पडल्याने त्याच्यासाठी पुन्हा वीरझारा काढून पुन्हा त्याला अन्नाला लावले.

उदय चोप्राकडे कुणावर तरी उपकार करण्याचे जे व्यसन आहे त्यामुळे प्रसिद्धी, नंबर वन आदींची नशा त्याच्या डोक्यात जात नाही. त्याचे व्यसन त्याला लागत नाही. तो सोशल मीडीयात मार्मिक पोस्ट्स करण्यात प्रसिद्ध आहे. शाखा त्याच्या पोस्टला आवर्जून उत्तर देतो. शेवटी करीअरचा प्रश्न आहे. पण उचो कधीही सोमिच्या आहारी जात नाही.

काम, काम आणि काम व त्यातून परोपकार या गुणामुळे त्याला असे प्रश्न पडत नाहीत. हा गुण जर त्याच्याकडून घेतला तर वरील समस्येवर निश्चितच मात करता येईल. जे चांगले आहे त्याला चांगले म्हणावे हे सुद्धा उदय चोप्राकडूनच शिकता येते. एकदा चांगले म्हणायला शिकले की ते घेता येते. बाकी ज्याची त्याची मर्जी.

डोळे बंद असतील तरी फक्त स्पर्श करून आपण कशाला स्पर्श केला आहे हे ओळखतो.
मला वाटतं पुढचे तंत्र ज्ञान तेच असेल.
फुलांच्या फोटोला स्पर्श केला की तुम्हाला खऱ्या फुलाला स्पर्श केल्याची जाणीव होईल.
अगदी ओलसर पना,गरम पना ह्याची पण जाणीव होईल .
खाद्य पदार्थ च्या फोटो लं स्पर्श केला की.
त्या मध्ये 3D इमेज आणि sound ह्याची जोड मिळाली तर .
खरा,खुरा अनुभव घेतल्याची जाणीव होईल.
त्या मुळे आताचे सर्व प्रकार बंद होणार च आहेत.

Metaverae हा तसाच काही तरी प्रकार आहे

Pages