चातुर्मासाच्या कथा- चतुरमा'सी'सह (कहाणी आदित्यराणूबाईची भाग-२)

Submitted by Barcelona on 28 August, 2021 - 18:56

भाग १ वाचायचा असल्यास. नाहीतर जसा 'धूम' कुठलाही भाग पाहिला तरी चालतो तशी ही कथा आहे. आधीच्या भागात दोन बहिणी असतात, एक कथा ऐकल्याने श्रीमंत रहाते, तर दुसरी न ऐकल्याने गरीब होते एवढे एकोळीचे कथानक घडले आहे.

कहाणी आदित्यराणूबाईची (भाग-२)
पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटच बसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणीकरूं लागली. ” काय वसा करतेस तो मला सांग.” बहीण म्हणाली, “अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं.”
(बहीणीला इतका थेट फिडबॅक! वसा सांग म्हणलं तर वसा सांगावा उगा पापिणीची पिपाणी वाजवू नये.)

राजाच्या राणीनं विचारलं, बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. “मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले.”
(परवर भाजी असते, ती कशाला पाठवली राजाने??!!)

“मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?” बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली. एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं.
(आहेर काय केले ते पण सांगा म्हणजे #घनघोर नांदणे द्यायचा की नाय ते ठरवायला… )

पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. ” करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे.” असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्यें राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यानं ऐकली. त्याची लांकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, “बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा.” ” तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील,” उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं.” तेव्हां वसा सांगितला.
(सहा मोत्यांची काय पद्धत आहे!! गरीबाला तर हा ‘कॅच-२२’ आहे. #कॅच २२. मोती नाही म्हणून वसा नाही, वसा नाही म्हणून मोती नाही. आणि सोन्याची मोळी कुठून आणली म्हणून पोलिस डांबत कसे नाहीत ह्या मोळीविक्याला??! )

पुढं दुसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं” माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक.” तो आला. राणीनं सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली. चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, ” बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा.” मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(आता मळ्यात एवढं पिकलं, रोपांना फळ आली तरी वसा घेतल्याच काय फळ?! एवढं त्या कहाणीच माहात्म्य सांगतात पण ती कहाणी कोणती. ही आदित्यराणूबाईची कहाणी ती कहाणी नाही कारण ही कहाणी त्या कहाणीमुळे घडते आहे… बाकी तीन मोती कहाणी नंतर परत करावे लागतात का? #कॅच २२)

पुढं तिसर्‍या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. ” करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहिं नाहीं.” एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, “आमच्या बाईची कहाणी ऐकू.” ती म्हणाली, ” कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडतें आहें. बरं येतें” मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली,” बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा.” मग राणीनं तिलाही वसा सांगितला.
(ये कहाणी नाही बालाजी टेलिफिल्म्स हो गई… फॉरेन्सिक सायन्स मधली मंडळी ‘एक पे रेहना...बुडाला या खाल्ला.. कभी बुडला कभी खाल्ला’ अशाने ‘कॉज ऑफ डेथ’ काय लिहायचं सर्टीफिकेटवर… त्या गोंधळापायीच यमराजाने परत पाठवला असावा. बाकी इथे टायटल ९ एज-सेक्स डिस्क्रिमिनेशनची केस होऊ शकते. म्हातारीला तीन मोती नाही दिले… )

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. “करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा.” “उपाशी नाहीं, कांहीं नाहीं.” काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें होतीं. तीन मोत्यें त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्यें आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, “कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.
(तीन मोती परत आले, बिचाऱ्याला आधीच हात-पाय नाही त्याच्यावर पाणी कशाला ओतायचं?!! कहाणी आहे की जीन-एडीटींग थेरपी. असो… मोती कपाळावर किंवा इतर दर्शनीय अवयवावर ठेवावे… उगा नायतर हात-पाय फुटल्यावर ‘मी टू’ केस करायचा)

पांचव्या मुक्कामाला घरीं आलीं. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, “अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे?” राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरलें. “काळं चवाळं, डोईचा केंस; वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे.” राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.
( Sad अरे काय गोष्ट आहे की मस्करी.. पुन्हा दारिद्र्य … इतक्या लोकांच्या दु:खी कथा ऐकून बिचारीला टेंशनने गळाला एखादा केस तर काय एवढं कोपयाचं. व्हिटॅमिन डी कमी पडल असेल तिला तर…. देवा, सूर्यनारायणा 'सूरज तो ला दो जरा' ही ऍड बघा तुम्हीच!! )

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.
(उन्हात बसा, केस गळत असतील तर काळजी घ्या. श्रीमंताला अधिक श्रीमंत होणे सोपे असावे म्हणून तीन मोत्या इतके पैसे तरी जवळ सेव्हींग मध्ये बाळगा. #मॉडर्न चातुर्मास.)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीमांत पूजन = गावच्या सीमेवर वरपक्षाच्या मंडळींचं स्वागत करणे. इथून पुढे दोन कुटुंबे कायमसाठी एकत्र येतात, त्यामुळे त्यांच्यातल्या परकेपणाच्या सीमा नाहीशा व्हाव्यात हा भाव असावा (असं माझी आई म्हणते)

९ , अर्थ बरोबर वाटतोय. ह्याच्या बरोबरच पी२पी नातेवाईकांची ओळख करुन देतात ना?

सीमांत पूजनाचा मी ऐकलेला अर्थ म्हणजे, ब्रह्मचर्येच्या सीमेचा अंत म्हणून गावाबाहेरच्या(सीमेजवळच्या) मारूतीच्या देवळात जातात वराला घेऊन व वधू पोचम्मा (?) देवीचे आशीर्वाद घेते.
सीमलेस Lol
धन्यवाद वर्णिता व अमा Happy

सीमांत पूजनाला गावाकडे बरेच लोक शेवंती चा कार्यक्रम म्हणतात, विचारा अस्मिताला तिला माहिती असेल.
.
पूर्ण धागा कमाल आहे, आवडलं हे प्रकरण Happy

>>>>>साक्षात पार्वती!!!!!! _/\_
लोल

तर पुन्हा एकदा सीमंतिनी:

सीमेत(मर्यादेत) असलेली थोडक्यात शालीन अशी ती, म्हणजे सीमंतिनी!
आईच्या मैत्रिणीने,आपटे संस्कृत शब्दकोश चाळून आईला ही माहिती दिली.आईला 'आशुतोष'मधील आशु म्हणजे 'अल्प'खटकत होते.आईच्या मैत्रिणीने त्याचे कारण सांगितले.पण आई विसरली.
पण अस्मिताने सांगितलेला अर्थ बरोबर आहे.

देवकी, तुम्ही सांगितलेल्या अर्थानुसार ह्या शब्दाची व्युत्पत्ती कृपया कळू शकेल का? म्हणजे मधलं अंतिन् कुठून आलं हे स्पष्ट होत नाहीये.

आणि सीमा ला सीम सुद्धा म्हणतात का?
----
म्हणत असावेत. असीम शब्द आहेच.
पण अ पुढे अ आल्यास आ होतो.
तेव्हा सीम् शब्द असून त्यापुढे अंतिन् असायला हवे.

मी आत्ता आपटे (संस्कृत-हिंदी) शब्दकोश पाहिला. त्यात सीमन्त+इनि+ ङीप् (शेवटच्या प्रत्ययातला ई लागतो) अशी फोड करून महिला/स्त्री असाच अर्थ (मी आधी सांगितल्याप्रमाणेच) दिलेला आहे. त्याचप्रमाणे, सीमन्त ह्याचा अर्थ 'सिर के बालों की विभाजक रेषा' असाच दिला आहे.

मानव, सीमा ह्या शब्दाचं मूळ रूप सीमन् असं दिलं आहे तिथे. शब्दाची रूपे होताना न् चा लोप होतो व स्त्रीलिंगी करताना टाप् (आ) प्रत्यय लागतो.

Screenshot_20210905-173626_Chrome.jpg

सीमा ह्या शब्दाचं मूळ रूप सीमन् असं दिलं आहे >> अच्छा.

वर मोल्सवर्थ मध्ये सीमेचा शेवट असा अर्थ दिलाय. म्हणजे जिथे सीमा संपते? काय अर्थ असेल याचा?

मलाही सीमेचा शेवट हा अर्थ खटकतो आहे. अगदीच काव्यात्मक दर्जा द्यायचा झाल्यास, जिथे सीमा नाहीश्या/लुप्त होतात - अश्या अर्थाने अंत/शेवट, असा अर्थ लावता येईल.

Pages