वाचलास रेsssss वाचलास ! [भाग २ ]

Submitted by 'सिद्धि' on 12 August, 2021 - 02:26

{ भाग १ - https://www.maayboli.com/node/79721 }
{ अपेक्षित लेखनदुरुस्ती तसेच आवश्यक सुधारणा नक्की सुचवा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. }
___________________________________________________________________

'हिरव्या गर्द झाडीतून रातकिड्यांची भयंकर किर-किर ऐकू येत होती, जणू हातचे सावज गमावलेल्या शिकाऱ्याचा आक्रोश सुरु आहे. त्यामध्येच सडकून आदळणारा पाऊस माघार घ्यायच लक्षण दिसेना. रस्ता खड्यातून जातो, कि खड्डा रस्त्यातून त्याचा पत्ता लागेना. त्याच खड्यातून मागचा पुढचा कसलाही विचार न करता गाडी फरपटत होती. टायरची पार चाळण झाली असावी. गाडीचे हेडलाईट्स तर केव्हाचे टाटा-बाय-बाय करून गेले. काहीही असो गाडी थांबवायची नाही. कारण जीव महत्वाचा होता. दोन तास न थांबता गाडी चालत होती. शेवटी शहराचा रस्ता लागला. थोडी रहदारी वाढू लागली. तसे दोघेही एक चहाची टपरी बघून उतरले. घडलेला प्रसंग कोणालाही सांगणे शक्य नाही आणि कोण विश्वास ठेवणार ?'

" भाऊ, दोन कटिंग."

" जी साब." म्हणत चहा वाला तयारीला लागला.

" साल्या, तू तिच्या वाटेतच का गेलास?"

" मित्रा, अरे केव्हापासून तेच सांगतोय, मी काहीही केलं नाही, तिला फक्त विचारलं होत. कुठे जायचं आहे ? आणि... आणि तिने नव्वदच्या कोनात मान फिरवली... आणि...." तो पुन्हा भीतीने थरथरू लागला.

" आणि... काय ? बोल पुढे. आपण आता शहरात आलोय, घाबरू नको."

" ती म्हणाली, 'माझं सोड, तुला बघा कुठं पोहोचवते ती.' हादरलो होतो रे मी तिथेच, गाडी थांबवण्याचा खूप पर्यंत केला पण गाडी थांबेना, आणि तिने माझी मानगुटी पकडली होती. मन... " बोलता बोलता त्याची बोबडी वळली. आणि भीतीने तो बेशुद्ध पडला. त्या चहावाल्या भाऊंच्या मदतीने मी त्याला त्याच टपरीच्या मागे एका लाकडी खुर्चीवर आडवं केलं. थोडे पाणी तोंडावर मारल्यावर त्याने डोळे उघडले. या डोळ्यात खोलवर भीतीचा डोंगर उसळला होता.

" म्या बन्या, हा घ्या गरमागरम चा . " चहाचे कप हातात देत चहावाला बन्या शेजारी येऊन बसला. मी काहीही न बोलता कप तोंडाला लावला. आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकत होते, आणि हा काय नाव-गाव खेळतोय.

" सायेब घाबरल्यात वाटतं, कुठून आलात म्हणायचं? " बन्याच्या तोंडाचा पट्टा पुन्हा चालू झाला.

" हा सलीम, माझा मित्र. इकडून आलो ते... येताना थोडं लागलं गाडीला. अपघात झाला... अपघातच .." 'बर झालं गाडीमध्ये सलीमला त्याच नाव विचारलं होत.' मी काहीतरी सांगून वेळ मारून नेली. सलीम तर बोलण्याच्या मनस्थितीत न्हवता.

" सायेब, गाडीवर भागल तेवढं बरं... नाहीतर त्या रोडन येणारा वाचत नाय हो! "

बन्याच्या त्या वाक्यासरशी मी चांगलाच चपापलो. सालीमही सावध झाला. " त्या रोडने...म्हणजे ? " तो चटकन उद्गारला.
" तुमाला काय माहित नाय व्हय पाव्हणं, हितन दीड-दोन तासावर नदी घाटापासन ते टेशन येईस्तोवर चेटकिणीची वाडी हाय. त्या रस्त्यावरून एवड्या रातीच कोण बी येत नाय, आलाच तर, त्याचा मुडदा बी बागायला मिळत नाय."

बन्या शक्य तेवढ्या हळू आवाजात माझ्या कानात कुजबुजला, त्यासरशी माझ्या हातातला कप खाली गाळून पडला. सर्रकन अंगावर काटा उभा राहिला. सलीमची अवस्था माझ्यापेक्षा वाईट होती. मगापासून मला ओरडून ओरडून सांगत होता. की, ' मी तिला काही केलं नाही.' आता मला याची खात्री पटली.

" मला घरी सोडशील का मित्रा ? आज माझी वाईट वेळ आहे असं वाटतंय. अल्ल्हा कसम, पुन्हा त्या रोडने गाडी आणणार नाही. " एवढं बोलून तो उठला.

" म्हनजी, या सायेबांना पकडलं होत ? "

" हो. निघायला हवं. उशीर झालाय. किती पॆसे ? " पैश्याच पाकीट काढत मी सरळ विषय बदलला. बन्याच त्याकडे लक्ष न्हवत. मला स्पष्ट दिसत होते, त्याने टपरीच्या मध्यभागी ठेवलेल्या गणपतीच्या फोटोपुढचा दिवा घाईघाईने पुढे ओढला. चहाच्या स्टोव्हच्या जाळावर एक सुका कागद धरून तो त्या दिव्यावर ठेवला. दिव्याची ज्योत क्षणात पेटली. हात जोडून त्याने बाजूच्या पितळेच्या डब्यातून दोन कागदाच्या पुड्या काढून माझ्या आणि सलीम च्या हातावर ठेवल्या. " नेमकं काय घडलं सांगितलं असत तर नक्की मदत केली असती. सायेब आत्ता वाचलात, पण ती तशी कुणालाबी सोडत न्हाय, काळजी घ्या. आणि ह्या अंगारा सोबत ठेवत जा. "
'मी गप-गुमान पन्नासची एक नोट त्याच्या हातावर टेकली. त्या अंगार्याच्या पुड्या खिशात टाकत, आभार मानत आम्ही तिथून काढता पाय घेतला. तरीही निघता-निघत बन्या म्हणालात, " काय मदत लागली तर सांगा."'

------

'लीमला त्याच्या गाडीसकट थेट घरी सोडून मी रिक्षा पकडून घराचा रास्ता धरला, तोपर्यंत चांगलीच सकाळ उजाडली होती. माझी गाडी त्या घाटातच सोडून आलो होतो. तिची आठवण तर येत होतीच पण, पण घरी जायची घाई लागली होती. कारण ही तसच होत.'

' निघताना सालिमने नाव विचारलं आणि मी क्षणात सांगून मोकळा झालो. नको सांगायला हवं होत.... की मीच, ज्याच्या कथा सत्यात उतरतात असा आरोप लावून अर्धी मीडिया माझ्या मागे हात धुवून लागली आहे तो, आणि या सगळ्यांपासून लपण्यासाठी वेषांतर करून दारूच्या बाटल्या संपवत गल्लोगल्ली फिरणारा, तो एक प्रसिद्ध पण अभागी भयकथा लेखक, मी 'अभिमन्यू कारखानीस.'

---------------------------------------------------------------------------------------
क्रमशः
©सर्व हक्क लेखिकेस्वाधिन
https://siddhic.blogspot.com

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहीला भाग दिसत नाहिये
तुम्हाला या पानावरती जायची मुभा नाही. हे पान सार्वजनिक वाचनासाठी नाही.
असा मेसेज येतोय

जबरदस्त. मला इथे एक आवर्जून सांगावसं वाटतंय ते म्हणजे वाचलास रे वाचलास हा डायलॉग मारायच्या काही काळ आधी भूत अजून एक डायलॉग मारतं तो म्हणजे 'तू माझ्या हद्दीत हाईस. पळून पळून किती पळशील?