'दीपान्वित अमावस्या'

Submitted by सांज on 8 August, 2021 - 02:53

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नि या पंचतत्वांवर विश्वाचं अधिष्ठाण आहे. त्यातील अग्नि तत्वाचं विशेष हे की ते चराचराला त्याचं रूप प्रदान करतं.. अग्नि तत्वामुळे म्हणजेचं प्रकाशामुळे वस्तू दृश्य होतात.. रंगांना अस्तित्व प्राप्त होतं! आदिदेव सूर्य हे या अग्नि तत्वाशी जोडलेले आहेत. ऋग्वेदातही अग्निला अनन्य साधारण महत्व आहे.
याचं अग्नि तत्वाचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं रुप म्हणजे घरोघरी तेवणारा दिवा.. आणि त्याचे कृतज्ञपणे आभार मानून त्याची पूजा करण्याचा आजचा दिवस म्हणजेच ‘दीपान्वित अमावस्या’.
आता काही आपण पूर्वीसारखे दिवे वापरत नाही, त्याचं प्रारुप तेवढं बदललेलं आहे. पण मूळ संकल्पना तीच.. प्रकाशाची पूजा!
आज घरोघरी सारे दिवे, समया काढून लख्ख केल्या जातात आणि मग ते प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते.
आषाढ महिना संपून उद्या श्रावणाची म्हणजेचं चातुर्मासाची सुरुवात होईल. चातुर्मासात देव निद्रितावस्थेत असतात असं म्हणतात आणि त्यामुळे पसरणाऱ्या अंध:कारापासून धरेचं रक्षण करण्यासाठी आणि सर्वांची मने प्रकाशित ठेवण्यासाठी आज अग्निदेवाची आराधना केली जाते.
हे चार महिने पावसाळ्याचे असल्याने सूर्य प्रखर नसतो आणि त्यामुळे पृथ्वीवर अंधाराची छाया पसरुन रोगराई वाढते असा यामागचा अर्थ असू शकतो!
तर या अशा सुंदर परंपरेला पुढे नेत त्याचे तत्कालिक संदर्भ समजून घेत मीही माझ्या रंगांना अस्तित्व देणार्‍या या प्रकाश रूपी अग्नि तत्वाला रंगांच्या मार्फतच वंदन करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न Happy
तुम्हा सर्वांनाही दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा.. सर्वांच्या आयुष्यात आणि मनांमद्धे कायम प्रकाश नांदू दे!

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे,
माझी आई आणि आजी सुद्धा दिपपूजा करायची आणि ती दिव्यांची कथा पण वाचायची,
गटारी तेव्हा पण असायचीच पण हल्ली whtspp मुळे सगळयाच फॅड जास्तच वाढलं आहे,आता संकष्टी, एकादशी यांच्या पण शुभेच्छा येतात मग गटारी,दिपपूजा म्हणजे यांच्यासाठी पर्वणी च

ज्या देवांच्या नावाने कष्ट न करता पोटं भरणार्‍या लफंग्यांना तडस लागेपर्यंत निवद अन दक्षिणा मिळाली आहे अशांचे देव मग झोपायला जातात अन उरलेल्या भुकेने वखवखलेल्या लफंग्यांना निवद अन दक्षिणा हवी आहे त्यांचे देव झोपेतून जागे होतात Proud

गणपती ही लोकदेवतेतून उन्नयन झालेली देवता आहे. आम लोकांचे देव झोपत नसतात कधी. त्यामुळे विठोबा (खरं तर हाही लोकसंस्कृतीतूनच उन्नयन पावून विष्णुत्वाला पोचलेला) हा देव झोपतो. पार्थिव गणपतीची पूजा वेदोक्त आणि पुराणोक्त अशा दोन प्रकारांनी होते. रुद्रगणात सामील होऊन उन्नयन झाल्यानंतरची वेदोक्त. माणसाने आपल्या स्वतः च्या भावभावनांचे, इच्छा आकांक्षांचे आरोपण आपल्या लाडक्या प्रतिमेवर केले आहे. त्याला माणूसच बनवले आहे. देव झोपतो, सकाळी उठतो, चूळ भरतो, साग्रसंगीत स्नान करतो, उटी चंदन लावतो अत्तर लावतो, वस्त्र नेसतो झोपाळ्यावर बैसतो, भोजन करतो. दुपारची विश्रांती घेतो वगैरे. हे सर्व म्हणजे humanisation of divine आणि divinisation of human असा प्रकार आहे.
माणसाच्या इच्छेमुळे कोल्हापूरची शिवपत्नी अंबाबाई ही विष्णुपत्नी महालक्ष्मी बनली आहे.
नवरात्रात तर नाना स्त्रीरूपांत शक्तिदेवता पूजिली जाते. आणि स्त्रियांना कधी कोणी दिवसाउजेडी पाय ताणून झोपलेले बघितले आहे का?

माणसाच्या इच्छेमुळे कोल्हापूरची शिवपत्नी अंबाबाई ही विष्णुपत्नी महालक्ष्मी बनली आहे.>> क्रूर चेष्टा आहे ही अंबाबाई भक्तांची. आपल्या देवाची पत्नी दुसरा देव पळवतो हे पचवणे किती कष्टप्रद आहे हे कोल्हापुरात मागे एकदा बघितले आहे. केंद्रीय मंत्री असणार्‍या आपल्या गुजराथी जैन मालकाला खुष करण्यासाठी कोथरुडच्या जैन आमदार जावयाने कोल्हापुरच्या अंबाबाईला आपल्या ताटाखालचे मांजर झालेल्या पुजार्‍या करवी जैन पोषाख घातला ते बघून अंबाबाईचे भक्त जाम खवळले अन त्या ठाणेकर नावाच्या पुजार्‍याला लाथा-बुक्क्या-थोबाडीत मार मारून त्याचे धोतर फेडून पूर्ण उघडा केला.. ठेचकाळलेल्या अंगाने विव्हळत ठाणेकर माफी मागत होता.

हो. लाडक्या दैवताच्या बाबतीत पझेसिव असणं हाही मानवी स्वभावच आहे. आणि त्याला आपल्या आवडत्या रूपात बघावंसं वाटणं हाही. पण कित्येकदा अतिरेक होतो.
कोकणातली गौरी ही शिवपत्नी, गणपतीची आई. हिच्या पूजनातही खूप लडिवाळपणा दिसतो. ही गौरी माहेरपणाला आलेली असते. कित्येकांच्या घरातल्या परंपरेनुसार ती गणपतीची आई होणार असते. तिला रानफुलांनी नटवतात, सजवतात. तिचे जेवण अळणी रांधतात. आणखी काही ठिकाणी तर ती दोन जीवांची म्हणून तिच्या पानात प्रत्येक पदार्थ दोन दोन ठिकाणी वाढला जातो. किंवा गणपति लहान असतो म्हणून तो आईच्याच पानात जेवतो. ही गौरी म्हणजे निसर्गकन्याच असते. तिची पूजा म्हणजे तेरडा, हळद अशा रोपांची पूजा. काहींकडे तर खडेच पुजतात.
कोंकणात अनेक घरांत गौरी विसर्जनाच्या दिवशी 'तिखटे ' जेवण असते. नवरात्रात छोट्याशा पेल्यातून दारूही असते.
देशावर गौरीऐवजी दोन दोन महालक्ष्म्या असतात. कधी कुठे त्या ज्येष्ठा कनिष्ठआ असतात. ज्येष्ठा आधीच येऊन बसते. शिवाय एक बाळही असतं. कधी कुठे दोन बाळं असतात.
हे सगळं माणसाच्या समूहमनातून आलेलं असतं. हळूहळू अमूर्त कल्पना स्थिर आणि भक्कम बनून दैवत रूपात अवतरतात. आणि ही प्रक्रिया आदिम संस्कृतीपासून अव्याहत चालत आलेली आहे.

हळूहळू अमूर्त कल्पना स्थिर आणि भक्कम बनून दैवत रूपात अवतरतात. आणि ही प्रक्रिया आदिम संस्कृतीपासून अव्याहत चालत आलेली आहे.>>>>> वा!

काही काही धाग्यांवर मी फक्त हिरा भाऊंनी काही नवीन प्रतिसाद दिला आहे का हे पाहायला येतो. हिरा भाऊ तुमचे लेखन प्रतिसादांपुरते मर्यादित ठेऊ नका काहीतरी लिहा. काहीही चालेल.

हिराभाऊंचा फॅन - झम्पू

पाउस सुरू होउन सुरूवातीचा भर ओसरल्याने (पुण्यात तरी) नुसता अधूनमधून भुरभुरणारा पाउस, सगळीकडे हिरवागार रंग, याच सुमारास येणारी झाडे, फुले, दिव्याची अमावस्या, नागपंचमी, नारळी/राखी पौर्णिमा, गोकुळअष्टमी, दहीहंडी, गणपती, नवरात्र/चतु:शृंगीची जत्रा, दसरा आणि मग दिवाळी अशा क्रमाने रंगत जाणारे सण, शाळेच्या मधूनमधून असलेल्या भरघोस सुट्ट्या, नातेवाईकांचे येणेजाणे या सगळ्याच्या आठवणी या लेखाने आल्या! याची सुरूवात खरे तर पालखीपासून होत असे पण दिव्याची अमावस्या म्हणजे जिवतीचे चित्र लावण्याचा दिवस (नक्की लक्षात नाही) आणि पहिली "कहाणी". मस्त वातावरण असे.

त्याचबरोबर गटारी चे उल्लेख आणि सेलिब्रेशनही कॉलेजच्या काळापासूनच पाहिले आहे. रेस्टॉ मधे होणारी गर्दी सुद्धा अगदी ९० च्या दशकापासूनही पाहिली आहे. अनेकदा घरी सकाळी दिवे तूप वगैरे खाउन संध्याकाळी मित्रांबरोबर रेस्टॉ मधे चिकन वगैरे खायलाही गेल्याचे लक्षात आहे. दिव्याची अमावस्या व गटारी यांच्यात काही पुरानी दुश्मनी नसे. हे सगळे अलीकडेच वाढले आहे Happy

हीरा - तुमच्या पोस्ट्सही आवडल्या.

धन्यवाद, फारएणड. तुमचं नाव मला नीट लिहिता येत नाही. ण अर्धा उमटत नाही.
झम्पू दामलू धन्यवाद. तुम्ही हा आयडी घेतल्याने सपरू, कचरू, किचलू, नेहरू अशा काश्मिरी प्रभावळीत आल्यासारखे वाटते. Bw

सुंदर लेख आणि हीरा यांच्या प्रतिसादातून देखील खूप छान माहिती मिळाली >>+1
मला ही हीरा स्त्री असाव्यात असं वाटलेलं.

सुंदर लेख आणि हीरा यांच्या प्रतिसादातून देखील खूप छान माहिती मिळाली >>+1
मला ही हीरा स्त्री असाव्यात असं वाटलेलं.>>+११ मलाही

Pages