'दीपान्वित अमावस्या'

Submitted by सांज on 8 August, 2021 - 02:53

दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥

पृथ्वी, जल, आकाश, वायू आणि अग्नि या पंचतत्वांवर विश्वाचं अधिष्ठाण आहे. त्यातील अग्नि तत्वाचं विशेष हे की ते चराचराला त्याचं रूप प्रदान करतं.. अग्नि तत्वामुळे म्हणजेचं प्रकाशामुळे वस्तू दृश्य होतात.. रंगांना अस्तित्व प्राप्त होतं! आदिदेव सूर्य हे या अग्नि तत्वाशी जोडलेले आहेत. ऋग्वेदातही अग्निला अनन्य साधारण महत्व आहे.
याचं अग्नि तत्वाचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं रुप म्हणजे घरोघरी तेवणारा दिवा.. आणि त्याचे कृतज्ञपणे आभार मानून त्याची पूजा करण्याचा आजचा दिवस म्हणजेच ‘दीपान्वित अमावस्या’.
आता काही आपण पूर्वीसारखे दिवे वापरत नाही, त्याचं प्रारुप तेवढं बदललेलं आहे. पण मूळ संकल्पना तीच.. प्रकाशाची पूजा!
आज घरोघरी सारे दिवे, समया काढून लख्ख केल्या जातात आणि मग ते प्रज्वलित करून त्यांची यथासांग पूजा केली जाते.
आषाढ महिना संपून उद्या श्रावणाची म्हणजेचं चातुर्मासाची सुरुवात होईल. चातुर्मासात देव निद्रितावस्थेत असतात असं म्हणतात आणि त्यामुळे पसरणाऱ्या अंध:कारापासून धरेचं रक्षण करण्यासाठी आणि सर्वांची मने प्रकाशित ठेवण्यासाठी आज अग्निदेवाची आराधना केली जाते.
हे चार महिने पावसाळ्याचे असल्याने सूर्य प्रखर नसतो आणि त्यामुळे पृथ्वीवर अंधाराची छाया पसरुन रोगराई वाढते असा यामागचा अर्थ असू शकतो!
तर या अशा सुंदर परंपरेला पुढे नेत त्याचे तत्कालिक संदर्भ समजून घेत मीही माझ्या रंगांना अस्तित्व देणार्‍या या प्रकाश रूपी अग्नि तत्वाला रंगांच्या मार्फतच वंदन करण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न Happy
तुम्हा सर्वांनाही दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा.. सर्वांच्या आयुष्यात आणि मनांमद्धे कायम प्रकाश नांदू दे!

सांज
www.chaafa.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
अवांतर - तिथीनुसार माझा या दिवशी वाढदिवस असतो पण प्रचलित अर्थाने हा दिवस वेगळ्या प्रकारे साजरा केला जातो हल्ली त्यामुळे हे सांगायला संकोच वाटत असे. आईही मला सांगायची की या तिथीवरून चेष्टा करणाऱ्या लोकांना तू ठणकावून सांगत जा की आपल्या संस्कृतीनुसार ही दीपपूजनाची तिथी आहे. पण कधी फारसे जमले नाही. आता हा लेख लक्षात ठेवून थोडे तरी तिथी माहात्म्य सांगता येईल बहुतेक.

धनवन्ती, लावण्या.. धन्यवाद!

प्राचीन, तुम्हाला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!
इतक्या छान तिथीला तुमचा वाढदिवस आहे.. या दिवशी माझ्याही भावाचा, मिथिलेशचा वाढदिवस असतो. आम्ही तो दरवर्षी तिथीनुसारच साजरा करतो Happy
प्रतिसादासाठी खूप आभार..

गटारी अमावस्या काल सगळीकडे उत्साहात साजरी झाली अन आज हा लेख वाचला. गटारी अमावस्येचं हे आज दुसरं रुप दिसलं.

छान लेख. आम्ही नेहमी गटारी म्हणून साजरी करायचो.
साबा दीपपूजन करतात , म्हणून आता मी मांसाहरी स्वयंपाक टाळते. आता गटारी आदल्या दिवशी.

आमच्याकडे दोन्ही दिवशी मांसाहार. हे दीप पूजन वगैरे कोणी करत नाही.
मला तर हे गटारी अमावस्येला दीवे लाऊन पुजणे वगैरे गेल्या ४-५ वर्षात व्हॉटस अप मुळे फोफावलेली नवसंस्कृती वाटते. बहुतेक शाकाहारी लोकांनी मांसाहारींना मांसाहारापासून परावृत्त करण्यासाठी आखलेली नियोजनबद्ध योजना वाटते. ४-५ वर्षांपुर्वी जेव्हा व्हॉट्सअप जास्त वापरलं जात नव्हतं त्या आधी सगळे मांसाहारी एकत्र आणि आनंदाने यथेच्छ मांसाहार करायचे. अर्थात अजुनही करतात परंतू त्यातल्या काहींच्या डोक्यात व्हॉटसप गंगेमुळे दिवे पेटल्याने त्यांनी आदल्या दिवशी मांसाहार सुरु केला आहे.

नाही . आषाढ अमावास्येला दीपपूजनाची परंपरा खूप जुनी आहे. माझ्या लहानपणापासून पाहिली आहे.
घरातले सगळे दिवे घासून पुसून एकत्र मांडून तेलवात लावून पेटवायचे आणि त्यांची पूजा करायची.
व्रतांच्या कहाण्यांच्या पुस्तकात दिव्यांच्या अवसेचीही कहाणी होती बहुतेक

भरतजी, सहमत!
माझी आजीच काय पणजीसुद्धा ही पूजा करायची. हो, पुस्तकात कहाणी आहे. माझ्या सासुबाईंनी वाचली काल

पण मग मटण खाण्याची प्रथा कधी पासून सुरू झाली..? दणक्यात मटण पार्ट्या असतात. आमच्या गावी तर आषाढात रोज एकाकडे मटणाच्या जेवणाचं आवतण असतं. यावर्षी संपुर्ण आषाढ महिना गावी रहाण्याचा योग आल्यामुळे भयंकर जास्त प्रमाणात मटण खायला मिळालं.

आमच्याकडे दिव्यांसोबत देवीची सुद्धा पुजा असते.
जिवती म्हणतात तिला.. आजी रेखाटते भिंतीवर देवीसोबत तिची मुले ही असतात चित्रात आणी त्यावर रंगीत कागदाच्या जिवत्या चिकटवते. नंतर आम्हाला सगळ्यांना लहांनांणा ओवाळते.

पण मग मटण खाण्याची प्रथा कधी पासून सुरू झाली..? >> थर्टी फस्ट आणि गटारी सख्ख्या बहिणी आहेत. मागच्या शतकाच्या शेवटी जनमल्या आणि आता वयात आल्या. Wink

पण अलीकडे गटारी नव्हे, गताहारी वगैरे ओढून ताणून मांगल्याचे प्रकरण सुरू झाले आहे त्याचा वीट येतो. ज्यांना दीप पूजन करायचे त्यांना करू दे. तसेही संध्याकाळी घासून चकचकीत केलेल्या पितळ, तांबे चांदीच्या दिव्यातून प्रकाश पाझरताना पाहाणे खूप आनंददायक असते. दुपारी किंवा रात्री गटारी करावी. हाय काय नि नाय काय. किंवा गटारी साजरी करताना सर्वत्र असे मंगल दीप लावावेत. विजेचे दिवे काही काळ बंद ठेवून त्याऐवजी एक झगझगती बत्ती ठेवावी.

पण अलीकडे गटारी नव्हे, गताहारी वगैरे ओढून ताणून मांगल्याचे प्रकरण सुरू झाले आहे त्याचा वीट येतो.>> पुढील वर्षी गताहारचा संबंध कंदाहारशी लाऊन तिथं हा सण कसा दिमाखात साजरा केला जायचा अन मग मुस्लिमांनी दिवे, पणत्या फुंकून टाकल्या अन गायी कापून मांसाहाराची प्रथा निर्माण झाली असं काहीतरी नक्की वाचायला मिळेल... दर वर्षी गटारी अमावस्येला ठराविक धर्मांधांचं पित्त खवळून उठतं अन मग असं काहीबाही जोडून गटारीला इतिहासाची नवनवीन पुटं चढवत बसतात.

गटारी साजरी करताना सर्वत्र असे मंगल दीप लावावेत. विजेचे दिवे काही काळ बंद ठेवून त्याऐवजी एक झगझगती बत्ती ठेवावी.>> ++++१११११

लेख दिव्याच्या अवसेवर आहे, पण गटारीचा विषय निघणे अटळ आहे कारण दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी साजरे होतात. कुठल्याही मोठ्या कार्यापूर्वी, मध्ये आणि नंतर एकत्र येऊन खाणे पिणे होणे, आधी सह ना ववतु, सह नौ भुनक्तु नंतर सह वीर्यम करवावहै हे असतंच. तोच यज्ञ असतो. उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञ कर्म. म्हणून ते तब्बेतीत, व्यवस्थेशीर व्हावे. जश्न मनवावा, उत्सव करावा. जश्न हे 'यज्ञ 'चे cognate आहे. ती आदि प्रवृत्ती आहे. त्यात लपवालपवी किंवा अपराधी भावना नसावी. एक शेकोटी पेटलेली आहे, त्यात कोणी रताळी, बटाटे, कणसं भाजतंय तर कोणी कबाब. एकच पावक त्या सगळ्याला पावन करतोय आणि पुन्हा जठराग्नी त्याला डबलदा शिजवतोय! वाह काय कल्पना आहे!

>>>>>पण अलीकडे गटारी नव्हे, गताहारी वगैरे ओढून ताणून मांगल्याचे प्रकरण सुरू झाले आहे त्याचा वीट येतो.
+१०,००१, १०१,११,१

हीरा on 12 August, 2021 - 15:09>> वाचुन एकदम वॉव झालं. तुमच्या हल्लीच्या प्रतिक्रिया वाचून वाटते की तुम्ही एखादा आध्यात्मिक कल्ट चालू करावा. सद्गुरू वगैरे टिनपाट पण पाणी भरायला राबतील.

>>Submitted by हीरा on 12 August, 2021 - 15:09
मस्त प्रतिसाद.

70च्या दशकापासून आम्हाला फक्त गटारी माहिती आहे. व्हॉटसअप ने दीप पूजनाच्या उच्च संस्कृतीची माहिती करून दिली

नवीन Submitted by हीरा on 12 August, 2021 - 14:10>>>> सुरेख प्रतिसाद!
ऑफिसमधे जायला लागले त्यावेळी गटारी अमावस्या शब्द कळला.तसाही आमच्याकडे श्रावण पाळत नसल्यानेही असू शकेल.
पण आजकाल व्हॉटसअप युनिव्हर्सितीने जाम वात आणला आहे.कित्येक हजार वर्षांपुर्वीचे दाखले देऊन आपले पूर्वज कित्ती कित्ती थोर्,हे आम्हाला आधीच माहीत होते.इ.इ. प्रकारांनी वैताग आणला आहे.

सॉरी, लेख भाषाशैलीमुळे आवडला हे लिहायला विसरले.

चातुर्मासात देव निद्रितावस्थेत असतात असं म्हणतात>>>>>> आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतत ना? तेव्हापासून देव पुढी ४ की६ महिने निद्रिस्त असतात ना.जाणून घ्यायला आवडेल.
कृषीप्रधान देश असल्याने पावसाळ्यात शेतीच्या कामापुढे देव्देव करणे जमणार नाही म्हणून ही व्यवस्था असावी.
तसेच हा कालावधी माशांच्या पुनरुत्पादनाचा असल्याने या कालावधीत मासे खाऊ नये असे म्हटले आहे.

कृषीप्रधान देश असल्याने पावसाळ्यात शेतीच्या कामापुढे देव्देव करणे जमणार नाही म्हणून ही व्यवस्था असावी.>> कसली भन्नाट व्यवस्था बनवली ना बनवणार्‍याने. म्हणजे बघा शेतीच्या कामामुळॅ देवदेव करणे जमणार नाही म्हणुन देव झोपायला गेले असं सांगायचं. शेतीची कष्टाची कामे संपली... शेतात आलेलं विकून ४ तुटपुंजे पैसे गाठीला आले की लगेच देव उठून बसणार... मग शेतकर्‍याने बसायचं देवाच्या नावाखाली लफंग्यांचे खिसे भरत. Proud

आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी. पुढे चार महिन्यांनंतर येणारी कार्तिकी एकादशी ही प्रबोधिनी म्हणजे जागे करणारी एकादशी. या काळात संन्यासी, जैन मुनी, इतर काही भिक्षु वर्ग यांना वर्षावास (वस्सावास) सांगितला आहे. म्हणजे चार महिन्यांच्या वर्षाकालात एकाच ठिकाणी राहाणे. एरवी साधू हा फिरता बरा. त्याने एका जागी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये असा नियम होता.

Pages