पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धागा बंद कसा करायचा ? कारण आता हा धागा पुण्यात कोणता भाग चांगला आहे या साठी वापरला जात आहे.
मला काही आक्षेप नाही पण धाग्याचा हेतू नव्हता एवढेच!

धानोरी नवीन डेवलपमेंटच्या दृष्टीने महत्वाचं असं म्हणता येईल. पूर्वेला लोहगाव, दक्षिणेला विमानगर-येरवडा, पश्चिमेला दिघी कँप आणि उत्तरेला चर्होली (पुढे आळंदी वगैरे). नकाशात ठेऊन बघितलं तर नगर महामार्ग, नाशिक महामार्ग आणि मुंबई महामार्ग इ.च्या मध्ये. त्यामुळे भविष्यात इन्फ्रास्ट्र्क्चर (म्पोठे रस्ते, मोठी मार्केट्स, भरपूर पाणी, बागा, मैदाने, पार्किंग इ.) येणारच की. सुरुवात झालीच आहे. पुण्याचं सुजलेलं आकारमान बघता रस्ते, पाणी आणि ड्रेनेज नव्या ठिकाणी पुरवता पुरवता महापालिकेची दमछाक होते, तशी इथेही होणार. पण ते नेहेमीचंच आहे. कात्रजसारख्या ठिकाणी १०-१५ वर्षांपुर्वीपर्यंत पाण्याचे प्रश्न होते. आता तर त्याहीपुढे ८-१० किमीवरची गावं मनपात आली. तिथं साराच आनंदीआनंद आहे सध्या.

प्रत्येकाचं बजेट, प्राधान्यक्रम, सध्याचं रुटीन आणि पुढले प्लॅन्स निराळे असल्याने धानोरीसारखी ठिकाणं राहण्यासाठी चांगली की नाही हा फारच पर्सनल विषय झाला. पण इन्व्हेस्टमेंट केल्यावर म्हणून अशी ठिकाणं बक्कळ रिटर्न्स देतात- असा अनुभव आहे..

Pages