पुण्यात फ्लॅट घ्यावा का नाशिकमधेच थांबावे ?

Submitted by रेव्यु on 31 July, 2021 - 04:38

गेल्या 14 वर्षांपासून आम्ही नाशिक मध्ये स्थायिक झालो. येथे प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट आहे. सुंदर सूर्यप्रकाश आणि वारा आहे. सर्व खोल्यांसमोर प्रचंड मोठी बाग, जुनी झाडे, हिरवळ आहे आणि प्रसन्न सकाळ आमचे स्वागत करते. जेव्हा हा फ्लॅट विकत घेतला तेव्हा मी नोकरीत होतो आणि धाकटी कन्या इथेच नोकरीस होती. आम्ही मूळचे बेळगावचे त्यामुळे तिथे स्थायिक होणे स्वाभाविक असते परंतु धाकटी कन्या लग्नानंतर असेल तिथे जाऊन येऊन करायचा विचार होता. परंतु थोरल्या कन्येप्रमाणेच ती देखील विवाहानंतर अमेरिकेत गेली. आता आम्ही 70 व 68 वर्षांचे आहोत . प्रकृती चांगल्या आहेत. नाशकात सांस्कृतिक बाबतीत आम्ही बरेच सक्रिय व सुखात आहोत. येथील अत्यंत निष्णात डॉक्टर्स सदा मदतीला आहेत आणि मुख्य म्हणजे ते अगदी त्याच दिवशी नुसत्या एसएमएस वर उपलब्ध असतात. या झाल्या जमेच्या बाजू.
परंतु इथे आम्हाला कठीण प्रसंगात मदत करतील किंवा आजारपणात आधार काय आहे याचा भरवसा नाही. तसे परगाव आहे असे आम्हाला वाटते. आमचे बरेच नातेवाईक पुण्यात आहेत, मुलीचे सासर तिथेच आहे, माझे मेव्हणे सुध्दा तिथे आहेत म्ह्णून मुली आग्रह करत आहेत की आम्ही तिथे नविन फ्लॅट घेऊन सेटल व्हावे.
आम्हाला भिती वाटते तिथल्या वाहतूकीची, मी इथे अजूनही कारमध्ये आरामात हिंडतो. सर्व अंतरे 20 मिनिटांच्या अंतरात आहेत. दुसरे असे की खरोखरच पुण्यात नातेवाईक मदत करू शकतील का? त्या पेक्षा येथेच सामाजिक आधार व्यवस्था विकसित करावी का? अत्यंत संभ्रमात आहोत.
दुसरे म्हणजे पुण्यात फ्लॅटच्या शोधात संलग्न बाबी म्हणजे कायदेशीर रीत्या आपल्या नावावर होईल का, मी व ही सहजपणे हिंडू शकू का?
काही उमजत नाहीये.... चर्चा करता येईल का.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही जर का पुण्यात कायमचे स्थानिक होणार असाल तर तुमच्या नाते वाईकांच्या जवळपास फ्लॅट घ्यावा लागेल. नाहीतर ते पुण्यात आणि तुम्ही पि. चीं. काही उपयोग नाही. पुण्यात जर का कोथरूड, बावधन, औंध, बाणेर, ई प्राइम लोकेशन ला फ्लॅट घ्यायचा असेल तर कमीत कमी ८० -८५ लाखाच्या पुढून किमती आहेत. मी इथे कमीत कमी लिहिलंय. जास्ती९०-९५ लाखापर्यंत हा आकडा जाऊ शकतो.
हे आर्थिक गणित कसं जमवणार आहात? ह्याचा विचार झाला पाहिजे.
तसंच पुण्यात हॉस्पीटल ई चा खर्च खूप जास्त आहे. दीनानाथ, जहांगीर, ई हॉस्पिटल्स मध्ये नुसते पेशंट चे तोंड बघायला ८००-१००० रुपये घेतात (हा स्वानुभव आहे.) कधी कधी १२०० सुद्धा. टेस्ट वगैरे सांगितल्या तर त्याचे वेगळे.
तसेच बाई वैगेरे ठेवली तर त्याचेही पैसे पुण्यात जास्ती आहेत.
तुमच्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये तुमचे नातेवाईक मदत करू शकतील असं वाटत नाही. त्यांची वयं पाहता पण समवयस्क आणि समविचारी लोकांसोबत वेळ आनंदात घालवण हेही म्हातारपणात उत्तम शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी चांगले असते.
त्यासाठी यायचे असेल तर या. मदतीची अपेक्षा हल्ली कोणी कोणाकडून ठेवू नये.
अथश्री वगैरे चांगल्या कल्पना आहेत. पण भुगांव की भुकूम ला असलेले अथश्री खूप आतमध्ये आहेत. त्या एरियात तुमचे नातेवाईक राहतात का? नाहीतर मग अथश्री मधला ग्रुप तयार करून राहावं लागेल.
अथश्री मध्ये भाडयानेही फ्लॅट मिळतात.तुम्हाला वाटल्यास तुम्ही काही दिवस भाड्याने राहून बघू शकता तिकडे.
पुण्यात या किंवा येऊ नका हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. पण वरील मुदयांचा विचार जरूर करा.
वरील मतं ही माझी व्यक्तीश : माझी मतं आहेत आणि माझ्या अनुभवाव रून ती लिहिली आहेत. धागाकर्त्याला पटल्यास ते ती घेतली इतरांनी विनाकारण वाद घालू नये.

अशीचबाणेर येथे असलेली एक वसाहत फारच उदास वाटली. एखादी व्हीलचेअर किंवा एकटादुकटा माणूस त्या भव्य आवारात फिरताना दिसतो. कॉमन लॉबी आहे पण लोक दिवसभर आपापल्या फ्लॅट मध्ये राहणेच पसंत करतात. फारच कमी फ्लॅट्स मध्ये वसती आहे. फारसे बोलणेही होत नाही. बहुतेक सगळे सधन अतिसधन वर्गातले असतात आणि तोंडभरून बोलण्यास उत्सुक नसतात. अतिवृद्ध लोक तिथल्या व्यायाम, खेळ आदि सुखसोयींचा उपयोग करून घेऊ शकत नाहीत. सोसायटीने शहरात जाण्यासाठी दिवसातून एकदा बसची व्यवस्था ठेवली आहे. एक डॉक्टर आहेत. पण एकट्याने तुम्ही शहरात किती फिरणार? तुम्ही रिकामटेकडे असता आणि ज्यांना भेटणार त्यांना कदाचित कामे असतात.
शिवाय इथे लोक आपापला भूतकाळ (कटू किंवा कसाही) मागे दडपून आलेले असतात किंवा आणले गेलेले असतात. सांस्कृतिक सामाजिक वातावरण फारसे नाही आणि ते साहजिकपणे असूही शकत नाही. थोडक्यात खळाळतेपणा नाही. फारच थोडे निग्रही लोक आपली मनस्थिती निरोगी ठेवू शकतात.
आणि हे बहुधा अशा सर्वच संस्थांना लागू असावे.
संस्थेचे नाव काढून टाकून प्रतिसादात सुधारणा केली आहे. त्यांच्यावर ठपका ठेवायचा नाहीय. भव्य इमारती, भव्य आवार, सगळ्या सोयी इथे आहेत. काही सांस्कृतिक कार्यक्रम इथे आयोजित केले जातात. पण माणसे खूपच कमी आहेत. काही एका ठराविक समाजगटातली आहेत. तेही साहजिक आहे. वृध्दाश्रमासारख्या संस्थांत जाऊन राहाणे किंवा ठेवले जाणे हे अजूनही सर्व समाजाच्या गळी उतरलेले नाही. थोडेसे लाजिरवाणे वाटते राहाणाऱ्याला आणि ठेवणाऱ्यांनाही. तसेच काही लोक अधून मधून आठ पंधरा दिवस येऊन जाऊन रहातात. पण तेवढ्यासाठी तिथे फ्लॅट घेणे आणि दोन ठिकाणी घर ठेवणे परवडणारे आहे का ह्याचाही विचार करावा लागेल. हिंडत्या फिरत्या माणसास थोडे सुसह्य आहे, पण नंतर नाही.
अशा संस्थांत प्रवेश घेण्यापूर्वी त्यांचे नियम, अटी व्यवस्थित समजून घ्यावेत. कारण पन्नास एक लाखांचा आणि स्वत:च्या समाधानाचा प्रश्न असतो.

अत्यंत संयमी व खरोखरच कळकळीने,वेळ काढून लिहिलेले प्रतिसाद वाचून खूप समाधान वाटले. मी पुण्यात वार्जे ते कात्रज या भागात सदनिका शोधत आहे, आपल्या पैकी काही जणांनी सांगितल्या प्रमाणे त्या भागात 1 ते 2 नातेवाईक (जवळचे) असल्याने तेथून 15 मिनिटाच्या अंतरावर प्रयत्न चालू आहे. किंमत 80 ते 85 लाखात आहे.
अथश्री मध्ये आम्ही 3 दिवस राहून आलो(तशी ते नि:शुल्क वास्तव्याची व्यवस्था करतात, अनुभव घेण्यासाठी). इथे लिहिल्याप्रमाणे तिथे सोयी असूनही भकास वाटते हे खरे वाटते.
या चर्चेत निष्पन्न होत आहे त्या नुसार ... आम्ही येथे आणखी सामाजिक संबंध आणखी वाढवणे/असणारे आणखी वारंवार संपर्कात असणे हे करण्याचा निर्णय घेतला आहे... ते कोणत्याही प्रकारे निर्णय घेतला तर नक्कीच हितकर आहे.
या शिवाय फ्लॅट निवडणे ते आर्थिक व्यवहार पूर्ण करणे हे सुध्दा एक आव्हानच आहे.
या चर्चेतील एक मुद्दा मात्र आमच्या उभयतांपैकी एकाच्या मागे राहण्याच्या परिस्थितीत मुलींची काय इच्छा असेल या प्रश्नाचे मात्र अजून निरसन होत नाहीये.... पाहूया!
पुनश्च सर्वांचे धन्यवाद... आणखी थोडा विचार, चर्चा करता येईल..

मला नाशिक मध्ये निष्णात डॉक्टर ओळखीचे आणि अप्रोचेबल हा नाशिक चा मुख्य मुद्दा वाटतो.

व्यक्तिशः पुणे मुंबई इज द बेस्ट(कॅब/फूड डिलिव्हरी/इतर ऑप्शन्स) असं माझं मत आहे.पण इथे येऊन सेट होणं हे उतारवयाच्या 10-15 वर्षं आधी झालं तर जास्त फायद्याचं.म्हणजे त्याचे रिटर्न्स हवे तेव्हा मिळतात.

आता पुण्यातलं वातावरण थोडं गुंडगिरी कडे जाताना दिसतंय.सध्या वर्क फ्रॉम होम मुळे अत्यंत प्रोटेक्टड वातावरण असले तरी पेपरमध्ये येणारे गाड्यांची तोडफोड, सतत तलवारीने केक कापणारे स्थानिक हिरो, 'डोळे वर करून काय बघतो रे' इतक्या क्षुल्लक कारणांवरून खून इत्यादी इत्यादी वरून वाटले.जर घर/सोसायटी बघत असाल तर थोडी महाग पडली तरी पूर्ण डेव्हलपड एरियातली पाहिलेली चांगली.जवळ बस स्टॉप/रिक्षा स्टँड/सोपेपणी कॅब मिळत असल्यास उत्तम.दुकानं/हॉटेल्स(थोडंफार हॉटेलिंग होईल अशी अपेक्षा)/सर्व लागणाऱ्या सोयी चालत जायच्या अंतरावर.स्वतः ड्राईव्ह करणे कधीकधी हौसेनुसार कमी ट्रॅफिक च्या वेळी करता येईल.

व्यक्तिशः मला पुणे एम एच 12 मधलं ट्रॅफिक रस्ते पुरत नसल्याने जास्त भीतीदायक वाटतं.एम एच 14 मध्ये मिश्र आहे.छोटे गावठाण एरिया बेशिस्त(रस्ते लहान पडल्याने) आणि नव्या डेव्हलपड सोसायटी आणि जवळचे रस्ते त्यातल्या त्यात शिस्तीच्या असे चित्र.शिवाय कितीही शिस्तीचा एरिया आली तरी रॉनग(शब्द लिहिता येत नाही) साईडने जाणारे फूड डिलिव्हरी आणि कुरियर वाले सगळीकडे आहेत.

पुण्यात कोथरूड/सिंहगड रोड साईड ला राहिल्यास ट्राफिक चा वात येईल पण कच्च्या अळूवड्या,फ्रोझन लाटलेल्या घरगुती पोळ्या यापासून खण टेबल रनर पर्यंत आपल्याला माहीत पण नसलेलं सगळं होम डिलिव्हरी मिळेल.मेडिकल केअर महाग पडेल. पण ऍडव्हान्स ऑप्शन मिळतील.एम एच 14 मधल्या मेडिकल केअर चे विशेष अनुभव नाहीत.(म्हणजे तितके अनुभव घेतलेले नाहीत.)

ज्या नातेवाईकांशी त्यातल्या त्यात चांगलं जुळतं त्यांच्या जवळ राहिल्यास फायदे होतील.(कधीकधी सौम्य तोटे पण होतात).
एकंदर तुम्हाला जिथे कम्फर्ट झोन आहे तिथे राहा, पुणे काय नाशिक काय.थोडे फायदे तोटे दोन्हीकडे.

जे वातावरण अथश्री मध्ये आहे ते पुण्यात सर्वत्र झाले आहे.
फ्लॅट संस्कृतीमध्ये कोणीही कोणाला विचारत नाही.
कोणी गेलं तर त्यांच्या घरी भेटायला न जाता फक्त व्हाट्स ऍप ग्रुप वर भावपूर्ण श्रद्धांजली वगैरे लिहून मोकळे होतात.
आम्ही संध्या जिथे राहतो तिकडे आम्ही फ्लॅट घेतल्यानंतर ५ वर्षांनी राहायलो आलो. आम्ही राहायला आल्यानंतर शेजाऱपाजारी कोण आहेत त्यांच्याशी ओळख वावी ह्या उद्देशाने आम्ही त्यांच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला पण लक्षात असं आलं की त्यांची आमच्याशी संबंध वाढवण्याची इच्छा नाही. मग काय नाद सोडून दिला. त्या सगळ्यांचे ऑलरेडी ग्रुप फॉर्म झाले होते आणि त्यात आम्हाला सामावून घायची त्यांची इच्छा दिसली नाही.
तसंच सोसायटीच्या व्हाट्स ऍप ग्रुप मध्ये नुसते ऍड करून घ्यायला आम्हाला एक महिना लावला का तर तो ग्रुप फ्लॅट ओनर्ससाठीच आहे. आणि मी हे अनंत वेळेस सांगितलं की आम्हीच ह्या फ्लॅट चे मालक आहोत आणि आम्हाला ऍड करा तरी त्या बाईंचा विश्वास बसेना..! हे अनाकलनीय आणि आतार्क्य आहे. फक्त अग्रीमेंट कॉपीच त्यांना द्यायची बाकी राहिली होती.
थोडक्यात काय तर फ्लॅट संस्कृती मध्ये शेजाऱ पाजर हे अडी अडचणीला येतात वागैरे ह्या फार जुन्या गोष्टी झाल्या.
फक्त आणि फक्त जवळचे नातेवाईकच काय ते उपयोगाचे.
तळटीप/strong> वरील सर्व हे स्वनु भवातून आलेले आहेत. ह्यातला एकही शब्द खोटा किंवा अतिशयोक्ती नाही. आम्हाला असे अनुभव आले. इतरांना चांगले आले / येत असतील.

*( फक्त शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. नवं काही जोडलेलं नाही)

म्हातारपणी कुठे कसं राहायचं याबद्दल मनात बॅकग्राउंडला विचार चालू असतो. या धाग्याच्या निमित्ताने प्रकट चिंतन.
१ शक्य तितका काळ इंडिपेंडंट राहायचा प्रयत्न करा. पुढच्या पिढीला याबद्दल काळजी वाटेल. तुम्ही जसे तुमच्या मुलांबद्दल प्रोटेक्टिव्ह होत होता, तशी तीही तुमच्याबद्दल प्रोटेक्टिव्ह होणारच. पण त्यांना समजून घ्या आणि समजावून सांगा. होता होईतो स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वावलंबित्व टिकवा.

२. या काळात असिस्टेड लिव्हिंगची वेळ येईल तेव्हाच्या पर्यायांची चाचपणी करत रहा
अ - वृद्धाश्रम
ब अथश्री किंवा वर मानव पृ थ्वीकर यांनी वर्णन केलेल्या इमारती , वसाहती. ही मृत्यूच्या ट्रेनची सुखसोयींनी युक्त वेटिंग रूम.
क माझ्यावर वेळ येईल तोपर्यंत भारतात वृद्धांची संख्या वाढती असेल आणि त्यांची काळजी घेणं हा एक व्यवसाय झालेला असेल. त्याचं कॉर्पोरेटायझेशन झालेलं असेल. अर्थात त्यासाठी तसेच पैसेही मोजावे लागतील. आपल्या राहत्या घरीच स र्व प्रकारचं असिस्टन्स मिळू लागेल.
आताच याची सुरुवात होताना दिसते आहे.

ड. तुम्हाला असिस्टेड लिव्हिंगची गरज पडेल तोपर्यंत तुमची पुढची पिढी उतारवयाला लागली असेल. तुमची काळजी घेणं हे त्यांच्यासाठी शारीरिक, मानसिक, आर्थिक , भावनिक दृष्ट्या प्रचंड थकवणारं असेल. त्यांच्या पुढच्या पिढीला आजी आजोबा पणजोबांचं काही करणं अशक्यच असेल. इच्छा असेल का हा भाग वेगळा. त्यामुळे होता होई तो या पर्यायाचा (तो उपलब्ध असेल तर) विचार नको. यात त्यांना अपराधी वाटणार नाही हे समजावून सांगणे.

३ आजारपणात इतरांची मदत - यात पैसे देऊन मदत मिळू लागली आहे. तरीही देखरेखीसाठी कोणाची तरी गरज भासू शकेल.

४ अतिवृद्धत्वात शारीरिक व्याधींसोबत मानसिक व्याधीही उद्भ वू शकतात. डिमेन्शियासारख्या व्याधींनी ग्रस्त लोकांसाठी त्यांचं राहतं घर हा एक भावनिक आणि मानसिक आधार असतो. त्यात कोणताही बदल करू नका, अगदी राहती खोलीही बदलू नका असं डॉक्टर आणि कौन्सेलर्स सांगतात.

५ भारतात इच्छामरणाचा कायदा यावा यासाठी प्रयत्न करायचे.

या मुद्द्यांवर माझी माझ्या काही कझिन्स सोबत चर्चा चालू असते. भेटलो की हा विषय निघतोच. त्यामुळे सगळ्यांना मिळून एकसारखा निर्णंय घेणं कदाचित शक्य होईल. आपलं स्वातंत्र्य टिकवायचंय, कोणाच्या अधेमध्ये यायचं नाही तरीही गोतावळ्यात राहायचं अशी योजना.

ह्या बाबतीत अनेक अनुभव गाठी आहेत म्हणून सविस्तर (लांबलचक) लिहावेसे वाटते आहे.
आपले राहाते घर विकून दुसऱ्या शहरात नवीन घर विकत घ्यायचे ही फारच कटकटीची गोष्ट आहे. उत्पन्न कर, G S T, stamp ड्यूटी वगैरेंना तोंड देताना आणि त्यामध्ये सचोटीने कमावलेला पैसा खर्च होत असताना पाहून मनाचे समाधान हरपते. आणि हे अटळ आहे. पुन्हा नवीन फ्लॅटमध्ये आपल्याला साजेशा सोयी करून घ्याव्या लागतात. कमी उंचीची कपाटे, हलक्या तरीही मजबूत खुर्च्या टेबले वगैरे. नवीन नोकर, सेवादाते, शेजारी ह्यांच्याशी समजून सांभाळून राहून त्यांना आपलेसे करावे लागते. इस्त्रीवाले, पेपरवाले, रद्दीवाले, electrician, इत्यादींशी पुनश्च हरि ओम म्हणून नात्यांना सुरुवात करावी लागते. इतक्या वर्षांपासून बनलेल्या स्वभावाला उतार वयात मुरड घालावी लागते. समोरच्याची अपेक्षा आणि आपली अपेक्षा ह्यांचा मेळ बसत नाही. असं खूप काही आहे. दोन तीन मोठे लेख होतील ह्यावर.
शिवाय, रेव्यु यांनी स्वतः:च लिहिल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दूरस्थ मुलांना आपल्याविषयी सुरक्षित वाटावे यासाठीच स्थलांतर करावे लागते बहुतेकदा. त्यात आपल्या निर्णयाचा भाग फार थोडा असतो. आई वडिलांनी आपले ऐकले म्हणजे ते सुरक्षित झाले, किंवा आम्ही आमचे कर्तव्य केले अशी काहीशी भावना मुलांची असते. बाबा आमचे ऐकतच नाहीत, उगाच आमच्या जीवाला घोर लागतो असेही ऐकू येते. दोन हजार मैल दूर असलेल्यांची कोणतीही तातडीची मदत होणार नाही हे आपण जाणून असतो.
अपूर्ण. आणखी लिहायला वेळ नाही म्हणून.

हीरा, मी लिहिताना माझ्याही डोक्यात तुमच्या आताच्या प्रतिसादातला दुसरा परिच्छेद होता. तुम्ही नेमकं लिहिलं आहे.

मेडिकल अन हॉस्पिटलची लोक काय चिंता करतात समजत नाही , आजकाल अगदी तालुका पातळीवरही मोठे खाजगी व सरकारी दवाखाने आहेत, सगळीकडे एकाच मेडिकल कौन्सिलवर रजिस्टर्ड लोक असतात , जो जिथे उपलब्ध आहे , तिथून सेवा घ्यावी

Blackcat: unfortunately most of the medical services in India are and in my opinion, based on personal bond with the doctor, at least in smaller towns and access to almost same city level services are available easily , through developed relationships and at a far lesser expense.

पर्सनल बॉण्ड त्याच्याकडे जाऊन जाऊनच निर्माण होणार ना ?

आणि पर्सनल बॉण्ड हा मुख्यत्वे फयामिली डॉकटर , गायनेक , पेडयात्रीक अशा कॉमन इलमेसेसबद्दलच्या डॉकटरबरोबर असणार ना ?

कोविड वोर्डातल्या डॉकटरचे तर तोंडच दिसत नाही

अमुक एका ऑर्थोपेडिक , कँसर स्पेशालिस्टबरोबर बॉण्ड कुणी असा जन्मजात घेऊन आला असे तर होणार नाही ना ? शिवाय मोठ्या हॉस्पिटलातले डॉकटर रोटेशनप्रमाणे असतात , ते तिथल्या नोकर्या सोडून दुसरीकडेही जाऊ शकतात. मग काय करणार ?

मी गेल्याच महिन्यात आमचे हेल्थ इन्शुरन्स सध्याच्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्याचा विचार करत होतो.
नंतर तसे न करण्याचा निर्णय घेतला तुलना करून.
पण या दरम्यान लक्षात आलेली गोष्ट:
बहुतेक सर्व इन्शुरन्स कम्पन्यामध्ये दिल्ली आणि एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि बडोदामध्ये ट्रीटमेंट घ्यायची आहे की नाही हे नमूद करावं लागतं. घ्यायची असल्यास तुम्हाला जास्तीचा हफ्ता भरावा लागतो. (आमचा मुंबई व पुणे दोन्ही निवडल्यास साडेचार हजार जास्तीचा हफ्ता येत होता.)
जर तुम्ही नाही हा पर्याय निवडला तर तुम्हाला अशा ठिकाणी ट्रीटमेंट घेता येते पण आपल्या मर्यादे मध्ये बिल आले तरीही बिलाच्या बहुतेक 20% खर्च स्वत:ला उचलावा लागतो. हेच इतर ठिकाणी केल्यास जेवढे बिल वसूल करता आले असते त्याच्या तुलनेत. (इन्शुरन्स कंपनी त्यांच्या ठरलेल्या रेटनेच, आणि पॉलिसीत नमूद केलेल्या नियमाप्रमाणेच खर्चास मान्यता देते, इतर खर्च आपल्याला करावा लागतो ती गोष्ट वेगळी.)

हो , हेल्द इन्शुरन्सवाल्यानी शहरांचे 3 प्रकारात वर्गीकरण केले आहे , त्याचे हप्ते व फायदे भिन्न भिन्न आहेत

पण पॉलिसी तीच ठेवून तुम्ही को पे जास्तीचा घेऊ शकाल , आजारी कुणी सारखे सारखे पडत नाही

ब्लॅककॅट सर! >>आणि पर्सनल बॉण्ड हा मुख्यत्वे फयामिली डॉकटर , गायनेक , पेडयात्रीक अशा कॉमन इलमेसेसबद्दलच्या डॉकटरबरोबर असणार ना ?>> मी यांच्या बद्दल बोलत होतो, कारण या वारंवार लागणार्‍या बाबी आहेत,,
हॉस्पिटलायझेशन झाल्यावर मग बॉंड वगैरे अर्थ रहात नाही

हे माझे विचार,
१) तुम्हाला ह्या वयात, नवीन जागेशी जुळवता येइल का?
२) नुसते , नातेवाइक मदत करतील वा जवळ आहेत म्हणून मूवींग हा पर्याय उत्तम नाही असू शकत. ह्यात गोची हिच कि, अपेक्षाभंग होउ शकतो. प्रत्येकाचे व्याप असतात आणि ह्या कारणासाठी मूव होवून, त्यात मग जागेशी जमले नाही ( आवाज, गोंधळ, टॅफिक तर काय करणार?
३) मुख्य म्हणजे, कॉस्ट ऑफ लिवींग पुण्यात ज्यास्तच असणार.
तेव्हा ह्या बाबींचा विचार करावा.
_____
तळटीपः आम्ही उभयतांनी अलीकडेच मूव केले कारण तसा प्लॅनच होता की मुलं बाहेरगावी गेली की आपण आवडीच्या ठिकाणी रहायला जायचे.
आणि ह्या मूव नंतर, आमच्या वयाची व त्याने आलेल्या मर्यादेची जाणीव झाली. त्यात कोरोनाने सर्व काम आम्हालाच करावे लागले साफ्सफाईचे, सामान लावा वगैरे.
आमची वयं ७० वगैरे तर नाहीतच. पण तरुणही नाही. त्यामुळे पण अगदी नकोशी वाटली सगळी दग्दग. तीन महिने इतका त्रास... आवराअवर, मग नवीन नोकरदाराशी जुळवंणं.. डॉक शोधंणं, घरात एकदा काही एलेक्ट्रीसीटी प्रॉबलेम झाला तर नाचानाच झाली. मग प्लंबर इस्शू झाला तेव्हा शोधाशोध. हे छोटे इस्शू असले तरी जिकरीचे वाटले. होतोय अजुन.. रुळतोय..

जर-तर, हा सिनारीओ झाला असता तर, ते झालं नसतं तर चा इतका विचार करतो आपण.
(अति दवणीय डायरी वाक्य डिस्क्लेमर)
आयुष्य हा अनेक रस्त्यारस्त्याने बनलेला बिझी बाजार आहे.हा रस्ता चुकला, ती गल्ली चुकली हरकत नाही.दुसऱ्या गल्लीतही वेगवेगळी दुकाने आहेत.शेवटी माघारी जाताना शॉपिंग बॅग भरलेल्या आणि मनात चालून थकवायुक्त आनंद असला म्हणजे झालं!!!

छान चर्चा चालू आहे. उतारवयात रहायला शहर निवडायचे असेल तर पुण्यापेक्षा नाशिक अधिक चांगले असे वाटते. वैद्यकीय सोयींमध्ये प्राथमिक मदत मिळणे सगळ्यात कळीचे - भले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल 10 मिनिटांवर आहे पण पाय घसरून पडल्यास प्रथम कोणीतरी हाकेला ओ देणारे नसले तर त्या हॉस्पिटलचा काहीच उपयोग होत नाही. शिवाय गरज भासल्यास मुंबई किंवा पुण्यातील हॉस्पिटलमधे पेशंटला हलवता येऊच शकते. आता कोरोनामुळे टेली कन्सल्टन्सीला सुरूवात झाली आहे. एकदा भेटून तपासणी झाल्यानंतर पुढची भेट online होऊ शकेल येत्या काही वर्षांत.
आजारपण किंवा आरोग्य हा कितीही महत्त्वाचा मुद्दा असला तरी तो रोजचा प्रश्न नाही. रोज तुम्हाला लागणारा किराणा भाजीपाला, घरातल्या छोट्या मोठ्या दुरूस्त्या, रोजचे फिरायला जाणे, छंद, मित्र मैत्रिणी यांच्याशी गप्पा या साऱ्या गोष्टी तुम्हाला जिथे सहज शक्य होत आहेत त्या जागी रहाणे केव्हाही चांगले. या दृष्टीने जर नाशिकमध्ये सेटल झाला असाल किंवा होऊ शकत असाल तर मग उगीच दुसरीकडे शिफ्ट होऊ नका असे वाटते.

i agree with most of d.folks.
i will stay where i m comfortable - where i have friends - if i were u..

सुरळीत जागा सोडून फक्त मुलींना वाटते म्हणुन दुसरीकडे राहायला जाण्यात अर्थ नाही हे पटते.
पण एक दुसरा विचार. तुम्ही अजून हिंडते फिरते आहात फिट आहात तर एखाद दोन वर्षे पुण्याला जाऊन राहून या. अर्थात तुम्हाला रूटीन मधून बाहेर पडून नवी घडी बसवण्याची आवड असेल तर. मनाच्या एका कोपऱ्यात पुण्याला जाऊन राहू अशी सुप्त इच्छा असेल तर ती पूर्ण करून टाका. एकतर हे करायला हवं होतं हा सल नंतर राहणार नाही (तुमचा आणि तुमच्या पार्टनर चा तसा विचार होणार असेल तर), आणि वेगळा अनुभव गाठीला लागेल, आणि भविष्याच्या दृष्टीने ते सस्टेनेबल आहे का हा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. आणि ते आत्ता केलेत तर होईल, अजून काही वर्षानी तो पर्याय ( स्वतंत्र एकस्पलोर करायला रहाणे) बाद झालेला असेल.
दुसरं, अमेरिकेला जाणे ( हा तुमचा विचारलेला प्रश्न नाही, आणि त्यात अमेरिकेतील स्टेटस आणि असंख्य कटकटी असतील याची जाणीव आहे,) हा पर्यायही असू शकतो. तो ही असाच एखाद दोन वर्षे आजमावून पाहता येईल.
वरचे सगळे आर्थिक गणित जुळेल हे गृहीत धरून लिहिले आहे. त्याच्याशी ही फार तडजोड उतारवयात चालणार नाही. रहाते घर विकून दुसरीकडे अचानक जाऊ नये असं वाटतं. नवी जागा आजमावून आवडली तर कायमची आपली म्हणावी. अर्थात हे ही गणितात बसलं पाहिजेच.
शुभेच्छा.

आयुष्याला कलाटणी देणारा निर्णय असणार आहे. विचारपद्धती सुलभ करण्याकरता एक करता येईल -
२ समास करुन, दोन्ही बाजूंचे फायदे-तोटे लिहून काढा. फायद्यांना धन वेटेज (गुण) द्या. तोट्यांना ऋण. बेरीज करुन आपला कल तसेच निर्णय जाणुन घ्या. पण मग हे निपक्षपातीपणे करायचे. शक्यतो जो निकाल येइल त्यावरती ठाम रहायचे. मात्र पूर्ण पूर्ण साग्रसंगीत विचार करुन ही अ‍ॅक्टिव्हिटी तडीस न्या. खूप ऑब्जेक्टिव्ह इनसाईट मिळते. अनुभव आहे.

तुम्ही जर काहीच निर्णय नाही घेतलात, तरी तोही इन इटसेल्फ नाशिकात रहाण्याचा निर्णयच आहे ना शेवटी. म्हणजे एका निर्णयावरती तुम्ही ऑलरेडी अंमल करत आहात. तो चांगल्याकरता बदलणे आपल्याच हाती आहे.

@देवकी - तुमच्या आईचे खरच कौतुक आहे. लोकसंग्रह करता येणे, हा गुण आहे.

>>>>>>>>नातेवाईक बोलवतात म्हणजे खरेच असेल असेही नाही. कुणी दारात भेटला तर आपणही विचारतो , चहा घेणार का ? पण ते आपण formality म्हणून विचारतो
@ब्लॅककॅट अतिशय प्रॅक्टिकल आणि सेन्सिबल मुद्दा मांडलात

>>>डिमेन्शियासारख्या व्याधींनी ग्रस्त लोकांसाठी त्यांचं राहतं घर हा एक भावनिक आणि मानसिक आधार असतो. त्यात कोणताही बदल करू नका, अगदी राहती खोलीही बदलू नका असं डॉक्टर आणि कौन्सेलर्स सांगतात.
@भरत - बाप रे!! हा मुद्दा माहीतच नव्हता.

Pages