#आरसा #shilpasart
माझ्या आरश्यात मला सगळे अगदी स्पष्ट दिसते,
ती हुबेहुब माझ्यासारखी असते.
मला ती जशी दिसायला हवी असते अगदी तशीच ती दिसते.
तिला बघुन मी खुश होते.
पण माझी डावी तिची उजवी असते याचे मला कुठे भान असते...
मी बघते.. मला वाटेल तसे .....माझ्या चष्म्यातून...
•••••
मी मलाही पुरते न ओळखता,
भिंग घेऊन मी भोवतालच्या जगाचे निरीक्षण करायचा मक्ता घेते.
बघते, चाचपते,
काही उलट सुलट बेरजा वजाबाक्या , गुणाकार भागाकार करते,
आडाखे - ठोकताळे बांधते , अनुमान - निष्कर्ष काढते...
मी बघते..मला वाटेल तसे .....माझ्या चष्म्यातून...
•••••
त्यांचे भरून आलेले आभाळ माझ्या निळाईत रंगवुन
पाऊस न कोसळायची हमी देते.
त्यांच्या रुक्ष कोरड्या जमिनीवर
माझ्या स्वप्नात हिरवेगार गालिचे खेळवते.
त्यांच्या दिशा त्यांचा वेग..
मी त्यांचे गणित सहज सोडवते.
माझ्या हस्तरेषांकडे बघुन त्यांचे भविष्य वर्तवते...
मी बघते.. मला वाटेल तसे .....माझ्या चष्म्यातून.....
•••••
त्यांना अज्ञात ते सगळे मला मात्र ज्ञात असते.
किमान माहिती कमाल वक्तव्य करीतच राहते.
माझ्या फुटक्या आरशात मी त्यांचा चेहरा शोधत असते.
माझे कुंपणच माझे आकाश असते कि माझे आकाशच माझे कुंपण असते ?!
मला तरी ते कुठे माहिती असते...
मी बघतच राहते, मला वाटेल तसे..... मला वाट्टेल तसे........ माझ्याच चष्म्यातून !
शिल्पा