मध्यंतरी सा या मानसोपचार या क्षेत्रात काम करणार्या संस्थेच्या मिटिंगला हितचिंतक या नात्याने गेलो होतो. डॉ अनिल वर्तकांशी फोन व ईमेलवर भेटलो होतो पण प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. मिटिंग मधे stigma towards mental illness हा विषय होता. आंतरजालावर वर मानसिक आरोग्य या विषयावर असलेल्या चर्चांची माहिती मी तिथे दिली. खर्या नावाने तिथे वावरत नसल्याने लोक तिथे मोकळे होतात. अनेकांना व्यक्त व्हायचे असते पण लोक काय म्हणतील? या भीतीपोटी ते व्यक्त होत नाहीत व मनात गोष्टी तशाच राहतात. वर्षानुवर्षे त्या तशाच राहतात. आपण मनातल्या त्रासदायक गोष्टी जर मोकळेपणा बोललो तर समोरची व्यक्ती आपल्याला कमकुवत समजेल का? विकृत समजेल का? अरे तुम्ही पण असा विचार करता? वाटले नव्हते तुम्ही असे असाल हा विचार तर समोरचा करणार नाही ना? गैरफायदा तर घेणार नाही ना? ज्या व्यक्तिजवळ तुमचे मन मोकळे करायचे आहे ती व्यक्ति तुम्हाला जवळची वाट्ली पाहिजे. म्हणजे तुम्हाला संकोच वाटणार नाही. तुमची हितचिंतक आहे असा विश्वास तुम्हाला वाटला तर तुम्ही मोकळेपणाने बोलाल. तुमच्यावर झालेले संस्कार, तुमचे विचार हेच तुमच्या व्यक्त होण्यात अडथळा निर्माण करतात. सुख हे वाटल्याने वाढते व दु:ख हे वाटल्याने कमी होते. तरी लोक आपली दु:ख आपल्यापाशी इतरांना काय त्याचे? असा विचार करुन फक्त सुखात सहभागी होतात वा इतरांना सहभागी करुन घेतात.आपला त्रास इतरांना कशाला हा त्यामागे विचार असतो. भूतकाळातील घटनांचे पडसाद त्याच्या मनात उमटत असतात. झालेले अपमान, चुका, अपयश त्याला डाचत असतात. कधी इगो आड येतात तर कधी भीती. आत्मसन्मान जपताना त्याची कसरत होते. भूतकाळातील गोष्टी भुतकाळात जाउन दुरुस्त करता येत नाहीत हे त्यालाही कळत असत पण त्या त्रासदायक स्मृती स्वरुपात रहातात. जालीय जगतात जेव्हा तुम्ही आयडेंटीटी लपवून लिहिता त्या वेळी आता आपल्याला कुणी ओळखत नाही या भावनेने तुम्हाला सुरक्षित वाटत व तुम्ही बिनधास्त पणे लिहिता. मोकळे होता. खर्या नावाने वापरताना ज्या अडचणी येतात त्या टोपण नावाने वा डुप्लिकेट आयडीने लिहिताना येत नाही. मी मिटिंग मधे आंतरजालावरील अशी अनेक उदाहरणे दिली. जालीय वर्तुळात माणसे खरीच असतात पण प्रतिष्ठा, प्रतिमा या मोकळेपणात आड येत असल्याने त्यांना पुराणातल्या किंदम ऋषी सारखे मृगरुप घेउन कामक्रीडा करावी लागते. आंतरजालावरच्या या विषयी असलेल्या लिंक्स ही त्यांना मी नंतर पाठवल्या. त्यामुळे प्रतिक्रियांचाही अभ्यास होतो. कधी कधी तर प्रतिक्रिया याच मूळ विषयापेक्षा रंजक व प्रभावी असतात. या चर्चांमधून वाचकांनाही आपल्या मनात असालेल्या प्रश्नांची उत्तरे कधी कधी मिळून जातात तर कधी कधी व्यक्त होण्याची प्रेरणा मिळते. पुर्वी मोकळे व्हा, ताईचा सल्ला अशी सदरे नियतकालिकांमधे असायची. त्यात अनामिक असे नाव धारण करुन प्रश्न विचारले जात. जे प्रश्न सामाजिक अवरोधामुळे विचारण्यास संकोच वाटत असे अ्शा मनोलैंगिक विषयावर प्रश्न विचारले जात. त्याची उत्तरेही तिथे दिली जात. अशी सदरे चवीने वाचली जात. नियतकालिकाच्या खपावर पण त्याचा सुपरिणाम होत असे. मानवीनातेसंबंधात प्रायव्हसी वा गोपनीयता या मुळे अनेक व्यक्तिंच्या भावजीवनात प्रवेश करण्यास सामाजिक संकेत आड यायचे. संवेदनशील अवस्थेत कधी कधी अशा बाबी दु:खावर मीठ चोळल्यासारख्या व्हायच्या. हितचिंतक हळुवारपणे त्याच्या भावजीवनात प्रवेश करुन त्याची द्खल घेत असे. त्यावर फुंकर मारत असे. त्यातूनच लोकसाहित्य तयार झाले. आता या हितचिंतकांच्या जागा समुपदेशक व मानसतज्ञ घेउ लागले आहेत. शारिरिक स्वास्थ्यासाठी व फिटनेससाठी आपण डॉक्टर कडे जातो, जिम मधे जातो. योगा करतो डाएट करतो. प्रसंगी सेकंड ओपिनियन घेतो. पण मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही असे काही केले तर ते अजून आपल्या पचनी पडत नाही.
मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जर या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली तर तुम्ही मानसिक दृष्ट्या दुर्बल आहात व अशी मदत घेउन तुम्ही स्वत:चे परावलंबित्व वाढवत आहात असा समज देखील काही लोकांमधे आहे.सुसंस्कृत वर्तुळात सुद्धा मूर्खासारखा खर्च अशी संभावना होते. करोना काळात मानसिक आरोग्याच महत्व अधोरेखित झाल आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्या संस्था या काळात बर्याच समाजाभिमुख व कार्यान्वित झाल्या आहेत. मानसमैत्र अशा हेल्पलाईन चालू झाल्या आहेत.लोक आता व्यक्त होउ लागले आहेत. हळू हळू समाजात सकारात्मक बदल दिसू लागला आहे.
मानसिक आरोग्यातील स्टिग्मा
Submitted by प्रकाश घाटपांडे on 21 June, 2021 - 08:02
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हळू हळू समाजात सकारात्मक बदल
हळू हळू समाजात सकारात्मक बदल दिसू लागला आहे.
>> +११ .
चांगला लेख.
चांगला लेख.
>>>कधी कधी तर प्रतिक्रिया याच
>>>कधी कधी तर प्रतिक्रिया याच मूळ विषयापेक्षा रंजक व प्रभावी असतात.
सत्य!!
उत्तम इनिशिएटिव्ह.
मला ऑक्टोबरमधे Religion and
मला ऑक्टोबरमधे Religion and mental health या सेमिनारमद्धे बोलायचे आहे. काही रेफरंसेस कोणी देईल तर उत्तम कारण माझे या विषयावरील ज्ञान जवळजवळ शून्य आहे. धन्यवाद.