अगं अगं म्हशी......

Submitted by Dr. Satilal Patil on 8 June, 2021 - 23:46

अगं अगं म्हशी...

एके दिवशी मित्राचा फोन आला. तो जरा टेन्शन मध्ये होता. म्हटला 'अरे म्हशीला रासायनिक कीटकनाशकाची विषबाधा झालीये, तु काही करू शकतोस का?' काय झालंय विचारल्यावर 'म्हशीवर रासायनिक कीटकनाशक, रोगार फवारलंय' असं उत्तर मिळालं. काय? मी उडालोच! अशी काय आणीबाणीची परिस्थिती आली होती की त्याला हे जहाल विष, म्हशीवर फवारावं लागलं होतं? असं विचारल्यावर, 'काय करू साहेब, या गोचिडांपासून सुटण्यासाठी सगळे उपाय करून पहिले, पण काहीही फायदा नाही, शेवटी कंटाळून रोगार फवारलं'. त्याने लगोलग व्हाटसप वर विडिओ पाठवले. म्हशीच्या तोंडातून फेस येत होता, तीची तळमळ पाहवली जात नव्हती. तिला विष देणाराच तिच्या अंगावर पाण्याचे सपकारे मारून अंगाची लाही कमी करण्याचा प्रयत्न करत होता.

गोचीड, उवा, पिसवा, गोमाश्या यां परोपजीवी किड्यांचा मोठा उपद्रव जनावरांना होतो. हे रक्तपिपासू किडे प्राण्याचं रक्त पितात. त्यामुळे जनावर खंगतं, त्यांची तब्बेत ढासळते, वजन आणि पर्यायाने दुध कमी होतं. गोचीडामुळे होणाऱ्या गोचिडतापामुळे प्राणी दगावतोसुद्धा. यावर उपाय काय? तर डॉक्टरांकडून इंजेक्शन मारून घेणे किंवा कीटकनाशकाचा फवारा मारणे. शेतकरी दुकानात जातो आणि गोचीडाच औषध द्या असं म्हणतं रसायनांची बाटली घेऊन येतो. किडे नियंत्रणात येत नाहीत म्हणून दोन मिलीलिटरचा डोस मारुतीच्या शेपटासारखा वाढत जाऊन पाच दहा मिलीपर्यंत पोहोचतो. मग या रासायनिक पाण्याने गाईम्हशींना दर आठवड्याला हे विषारी अभ्यंग स्नान घातलं जातं.

डेल्ट्रामेथ्रीन अमीट्राज, साईपरमेथ्रीन, अव्हरमेक्टीन यासारखे रासायनिक कीटकनाशके सध्या मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पण हे गोचीड इतके चिकट असतात की जा म्हणता जात नाहीत. कितीही फवारलं तरी पुढच्या आठवड्यात मतं मागायला येणाऱ्या पुढाऱ्यासारखे ते परत हजर होतात. अतिवापरामुळे त्यांच्यात कीटकनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती आलीय. म्हणून त्यांच्या नियंत्रणासाठी अगदी गोठ्यात आग लावण्यापर्यंत बात पोहोचते. पूर्वी बीएचसी, डीडीटी या सारखे ऑरगॅनोक्लोरीन प्रकारातले कीटकनाशके वापरले जायचे,त्यांचे दुष्परिणाम समोर आल्यावर ऑरगॅनोफॉस्पेट या पर्यायाने कमी घातक कीटकनाशकांचा वापर सुरु झाला. त्यामुळे दगडापेक्षा वीट मऊ झाली खरी, पण शेवटी विष ते विषच.

मी या विषयात अजून खोल जायचं ठरवलं. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्राण्यांवरील कीटकनाशकांचा एमएसडीएस, म्हणजे मटेरियल सेफ्टी डेटा शीट तपासलं. एमएसडीएस म्हणजे ते औषध किती सुरक्षित आहे? फवारणाऱ्या माणसाने काय काळजी घ्यावी? यासाठीची माहितीपत्रिका. कोणतेही रसायन हाताळण्या आगोदर हे माहितीपत्रक वाचणं आवश्यक असतं. काही शोधनिबंध वाचल्यावर समजलं की हे कीटकनाशकं गाईम्हंशींच्या त्वचेत शोषले जातात, लिव्हर मध्ये साठतात, त्वचा, डोळ्याची आग, ऍलर्जी होते, असं त्यात स्पष्टपणे लिहिलंय. कीटकनाशक फवारल्यार दोन दिवस दूध काढू नये, मटणासाठी तो प्राणी असल्यास वीस दिवस तो प्राणी मटणासाठी मारू नये असंही नमूद केलंय. पण गुटख्याच्या पुडीवर किंवा सिगारेटच्या पाकिटावर कॅन्सर होतोय हे स्पष्ट लिहलेले असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून टपरीकडे पावलं वळतात तशीच डोळेझाक या प्राण्यांच्या कीटकनाशकांकडे केली जातेय. बरं फवारून झाल्यावर 'उरलेलं कीटकनाशकाचं पाणी गोठ्यात फवारा म्हणजे तिथं लपलेला गोचीड सुद्धा मरेल' असं सांगितलं जातं. मग हे विषारी तीर्थ आजूबाजूला गोमुत्रासारखं शिंपडलं जात. चाऱ्यावर, गव्हाणीवर ते उडतं आणि गाईम्हशींच्या पोटामार्गे दुधात जाऊन बसतं.

गुणधर्मानुसार रसायनं दोन धर्मात विभागले गेलेत. पाण्यात विरघळणारे आणि तेलात विरघळणारे. रसायनं माणसासारखे दलबदलू नसतात त्यामुळे ते आपला धर्म स्वतःहून बदलत नाहीत. बहुनांश रासायनिक कीटकनाशके, तेलात विरघळणाऱ्या धर्माचे असतात. दुधातील फॅट म्हणजे तेलच. त्यामुळे हे कीटकनाशके आणि त्याचे तुकडे सरळ दुधात उतरतात.

जगभरात प्राण्यावर वापरलेले कीटकनाशक दुधात किती प्रमाणात उतरतं यावर बरंच संशोधन झालंय. ऑस्ट्रेलियात केल्या गेलेल्या संशोधनानुसार प्राण्याच्या शरीरावर फवारलेल्या कीटकनाशकांचे अंश दुधात सापडले, एवढंच काय पण ते लोण्यामार्गे पार तुपापर्यंत पोहोचलेत. या कीटकनाशकांचे माणसाच्या तब्बेतीवर दूरगामी परिणाम होतात. यामुळे उलटी, डायरिया, पोटाचे, किडनीचे आजार, मज्जासंस्था आणि मानसिक स्वास्थावर विपरीत परिणाम होतात. लिव्हर खराब होणे, रोगप्रतिकार क्षमता कमी होणे यासारखी दुखणी मागे लागू शकतात.

हे कीटकनाशकं विघटित होऊन त्यांचे तुकडे होतात. बऱ्याचदा हे कीटकनाशकांचे तुकडे, मूळ कीटकनाशकापेक्षा जास्त घातक असतात. या तुकड्यांचेही तुकडे होतात आणि तेही विषारी असतात. जगभर कंपन्या आणि प्रयोगशाळा दुधात कीटकनाशकाचे अंश शोधातात, पण या रासायनिक सापाने आपल्या तुकड्यांच्या रूपाने विषारी पिलावळ जन्माला घातलेली असते तिच्याकडे कोणी लक्ष देत नाहीये.

रोज लाखो गाईम्हशींसारख्या प्राण्यांवर हा विषप्रयोग होतोय. अगदी गाईच्या पोटातील तेहतीस कोटी देवांनाही हा जहरी नैवद्य दिला जातोय. सर्वजण फळे, भाजीपाला आणि धान्यातून येणाऱ्या कीटकनाशकांबाबत चिंतीत आहेत. त्यांवर उपाय म्हणून सेंद्रिय शेतीच्या मार्गावर तारेवरची कसरत करतोय. पण रोज सकाळी ओठाला लावला जाणारा हा विषाचा प्याला मात्र दुर्लक्षित राहिलाय. जागोजागी जैविक आणि सेंद्रीय चा नारा देणारे आपण, प्राण्यांच्या आणि पर्यायाने आपल्या सुरक्षिततेसाठी सेंद्रिय कीटकनाशक आणि रसायनविरहित दुधाचा आग्रह धरायला हवा. भाजीपाल्यावर औषध फवारायचे असल्यास सेंद्रिय कीटकनाशक आहे का? असा प्रश्न विचारतो, मग गाईम्हशींसाठी औषध घेतांना औषधाच्या दुकानात 'साहेब, गोचीडासाठी काही जैविक पर्याय आहे का?' असा एक प्रश्न विचारायला हवा.

माणसाच्या पोषणासाठी दूध देणारी म्हैस, रसायनांचे हलाहल पचवायचा प्रयत्न करतेय. तिचा अन्नदाताच, दर आठवड्याच्या विषाच्या माऱ्याने तीचं रूपांतर विषकन्येत करतोय. आणि हा विषारी आहेर आपल्या दुधातून साभार परत करणाऱ्या म्हशीला म्हणावसं वाटतंय ... अगं अगं म्हशी... मला कुठं नेशी?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन कमी होतं हे संपूर्ण सत्त्य नाहीये. शेंद्रीय शेतीचे, पारंपरिक शेती, नैसर्गिक शेती, रसायनविरहित शेती, झिरो बजेट शेती असे अनेक पदर आहेत. मी लवकरच याच्यावर सविस्तर लिहिल.

डॉ. लेखाबद्दल धन्यवाद. या विषयावर आणखी आणि भरपूर लिहा.

औद्योगिकीकरणाने सारे काही पालटून टाकले आहे, त्याचे परिणाम भोगण्यावाचून पर्याय नाही. पूर्वी रोज गुरे खुल्या रानात चरायला सोडली जात. (हो, त्यांना चरण्यासाठी चक्क मोकळी कुरणे असत!) एका गुराख्याचे ते पूर्णवेळाचे काम असे (यात गुरांना नियमित धुणेही आले). तिथे गुरे दिवसभर पर्यावरणसंस्थेतली आपली कडी जोडून सायंकाळी घरी येत. आणि अर्थात तेवढा वेळ त्यांचा स्वच्छ केलेला गोठा रिकामा असे. म्हणजेच तेवढा वेळ गोठ्यालाही मलमूत्रापासून सुटका मिळे. या दोन्हीं गोष्टींमुळे कीटकांचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्याच आटोक्यात राही. हल्ली दुभत्या म्हशीला किंवा गायीला एकदा दावणीला बांधले की कोण जाणे त्याच गोठ्यात त्याच कुबट चार फुटात किती दिवस, किती आठवडे, किती महिने त्यांना काढावे लागतात.

Pages