आमच्या बिल्डिंगला छानशी गच्ची आहे आणि दोन विंग्ज गच्चीने एकमेकींना जोडलेल्या असल्यामुळे ती एकूण मिळून बरीच मोठी आहे. कोविडमुळे माझं बागेत किंवा तळ्यावर फिरायला जाणं बंद झालं आणि गच्चीवर जाणं वाढलं. सकाळ-संध्याकाळ गच्चीवर फिरायला गेल्यावर आजूबाजूच्या झाडांवर, झुडपांवर, विजेच्या तारांवर अनेक पक्षी दिसतात. आकाशातून उडत जाणारे बगळे, पाणकावळे, चित्रबलाक, शराटी अशा पक्ष्यांचे भलेमोठे थवेही दिसतात. गच्चीवरून बघितल्याचा फायदा म्हणजे झाडाच्या शेंड्यावर बसलेले पक्षीही दिसतात, ( जे एरवी आपण झाडासमोर उभं असताना सहज दिसत नाहीत. ) शिवाय एकाच वेळी मोठ्या भागावर नजर ठेवता येते. तर आमच्या गच्चीवरून सध्या दिसणारे हे काही पक्षी. हे अर्थात अनेक ठिकाणी सहज दिसणारेच पक्षी आहेत.
(हे सगळे फोटो मी माझ्या निकॉन कूलपिक्स पी ९०० या कॅमेऱ्याने काढले आहेत.)
1. तांबट ( White-cheeked barbet): कधी कुटुर्र..कुटुर्र..तर कधी कूक..कूक असा आवाज काढत बसणारा तांबट. जर जागचा हलला नाही, तर त्याला शोधून काढणं कठीण. अगदी समोरून आवाज येत असतो, पण पक्षी दिसत नाही. त्याच्या पंखांचा हिरवागार रंग झाडाच्या पानांमध्ये बेमालूम मिसळून जातो. उडून दुसरीकडे जाताना तेवढा तो प्रकट होतो.
आमच्या गच्चीवरून समोरच गुलाबी फुलांच्या टॅबेबुइयाची दोन झाडं दिसतात. तिथे मात्र सकाळी तांबटबुवा नक्की बसलेले दिसतात.
सध्या त्यांच्या प्रियाराधनाचा काळ चालू असावा. कारण बर्याच वेळा ते जोडीने दिसतात आणि एकदा तर घास भरवण्याचा कार्यक्रमही मी
पाहिला!
आमच्या आवारात एक सिंगापूर चेरीचं झाड आहे, त्याचं फळ त्याने काढून नेलं आणि जोडीदाराला भरवलं.
याला कोर्टशिप फीडिंग असं म्हणतात.
2. शिंपी (Common tailorbird): सतत टिवी..टिवी..टिवी अशी टिवटिव करत राहणारा हा एक छोटासा पक्षी. अतिशय चंचल. सतत या झुडपावरून त्या झुडपावर, कधी तारेवर, कधी नारळाच्या झाडावर, असा उडत असतो. टिवटिव अखंड चालू.
सध्या त्याचाही विणीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे नर पक्ष्याच्या शेपटीतून दोन लांब पिसं फुटलेली दिसत आहेत. पानं शिवून बांधलेलं शिंप्याचं घरटं मात्र मला अजून प्रत्यक्षात बघायला मिळालेलं नाही.
3. फुलटोचा (Pale-billed flowerpecker): अक्षरशः आपल्या मुठीत मावेल एवढास्साच हा पक्षी असतो. अत्यंत चंचल. सतत एका फांदीवरून दुसर्या फांदीवर उड्या मारत असतो.
मला जेव्हा पहिल्यांदा त्याचा फोटो मिळाला, तेव्हा मला खूप आनंद झाला होता, कारण तोपर्यंत नेहमीच असं व्हायचं की कॅमेरा त्याच्यावर फोकस करेपर्यंत त्याने जागा बदललेली असायची. नंतर मात्र त्याच्या सवयी लक्षात आल्या. तो सिंगापूर चेरीच्या झाडावर हमखास दिसतो किंवा मग तारेवर निवांत बसून चोच, पिसं साफ करताना दिसतो. चक-चक-चक असा त्याचा आवाज असतो.
4. ठिपकेवाली मुनिया (Scaly-breasted munia) : या नेहमी घोळक्यात दिसतात. कमीत कमी तीनचार तरी एका वेळी एकत्र दिसतातच. आता पाऊस पडून गवत उगवलं, की त्यांचा घरटं बांधायचा काळ सुरू होईल.
आत्ता जोड्या जुळवणं चालू असावं.
कधी तारेवर दिसतात, तर कधी झुडपांमध्ये. तारेवर बसलेल्या असल्या, तरी सतत त्यांची हालचाल सुरू असते. सरकत सरकत एकजण दुसरीच्या (किंवा दुसर्याच्या) जवळ जाते, दुसरी उठून तिसरीकडे जाऊन बसते, मग तिसरी पहिलीच्या जवळ येते. एक उडाली की बाकीच्याही भुर्रकन उडतात.
5. शिंजीर (Purple-rumped sunbird):
डोक्यावर जांभळ्या रंगाची झगझगीत टोपी घातलेला शिंजीर नर गुलमोहराच्या आणि टॅबेबुइयाच्या झाडावर दिसतो, तेव्हा त्या लाल-गुलाबी फुलांवर त्याचा रंग फारच उठून दिसतो.
मादीचा रंग एवढा चमकदार नसतो. फुलांमधला मकरंद हे त्यांचं आवडतं अन्न.
6. जांभळा शिंजीर (Purple sunbird) : विणीच्या हंगामातला जांभळा शिंजीर नर हा पूर्ण झगझगीत, लखलखीत जांभळ्या रंगाचा असतो.
उंच झाडाच्या शेंड्यावर बसून तो लांबलचक साद घालतो.
पूर्ण वाढ न झालेला, अर्धवट वयातला नर मात्र चिवटेबावटे कपडे घातल्यासारखा रंगीबेरंगी दिसतो.
मादी दिसायला साधीशीच असते.
लांब, टोकदार, बाकदार चोच हे शिंजिराचं वैशिष्ट्य. ही चोच त्यांना फुलांमधला मकरंद पिण्यासाठी उपयोगी ठरते.
7. कोतवाल (Black drongo) : हा आपल्या परिसराचं रक्षण करून आपलं नाव सार्थ करण्यासाठी तत्पर असतो.
खालच्या बाजूला दुभंगलेली लांब शेपूट हे याचं वैशिष्ट्य. पिल्लांमध्ये ही शेपटातली खाच लहान असते.
आमच्या सोसायटीपासून दोनतीन गल्ल्या सोडून पलीकडे असलेल्या मोठ्या झाडांपैकी एका झाडावर कोतवालाचं घरटं असावं. कारण घारी, कावळे त्या बाजूला गेले की कोतवाल तीव्र आवाजात आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावताना दिसतो. एकदा भल्या सकाळी मी कोतवालाला शिक्र्याचा पाठलाग करतानाही पाहिलं.
8. कवडा(Spotted dove) : अंगावर ठिपके ठिपके मिरवणारा अटकर बांध्याचा हा कबुतराचा भाऊबंद.
कुर्र..कुर्र असा त्याचा आवाज आपल्या ओळखीचा असतो. बर्याचवेळा जोडीने दिसतो. कबुतरांएवढ्या संख्येने अर्थातच नाही, पण वर्षभर सर्रास दिसतो.
9. खंड्या (White-throated kingfisher) : सोसायटीच्या मागे एक नाला आहे, तिथल्या एका झुडपावर बसलेला हा खंड्या एकदा मला सकाळी सकाळी दिसला.
राजेशाही निळ्या रंगामुळे खंड्या लगेच लक्ष वेधून घेतो.
बारीकसारीक किडे, अळ्या, मासे खातो. शांतपणे बसून राहणं आणि भक्ष्य दिसताच सूर मारून ते पकडणं ही याची सवय. उंच आवाजात ललकारी देतो.
अजूनही काही पक्षी शिल्लक आहेत. पण ते अजून थोड्या दिवसांनी!
फारच भारी आहेत सगळे फोटो!
फारच भारी आहेत सगळे फोटो!
सर्वांना खूप खूप धन्यवाद. ही
सर्वांना खूप खूप धन्यवाद. ही सगळे फोटो मुंबईतले आहेत.
(No subject)
(No subject)
वा. सुंदर.
वा. सुंदर.
वाह! खूपच माहितीपूर्ण' लेख.
वाह! खूपच माहितीपूर्ण' लेख. आणि काय मस्त फोटो एकेक. कित्ती दुर्मिळ पक्षी दिसत आहेत. खूप थोर नशीब तुमचे. विशेषतः खंड्या दिसला म्हणजे हायस्कूलच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी वाटर कलर मध्ये काढलेले खंड्याचे चित्र आठवले. मला वाटते किंगफिशर एअरलाईनच्या लोगो मध्ये हाच पक्षी होता (?)
>> ठिपकेवाली मुनिया (Scaly-breasted munia) : या नेहमी घोळक्यात दिसतात.सरकत सरकत एकजण दुसरीच्या (किंवा दुसर्याच्या) जवळ जाते, दुसरी उठून तिसरीकडे जाऊन बसते, मग तिसरी पहिलीच्या जवळ येते. एक उडाली की बाकीच्याही भुर्रकन उडतात.
हे बघितले आहेत अनेकदा असे वाटते. विशेषतः ग्रामीण भागात विजेच्या तारांवर ओळीने बसून प्रचंड कलकलाट सुरु असतो ते हेच का? भोरड्या म्हणतात का यांना गावाकडे?
खूप खूप छान लेख व फोटो. प्रतिसादांतले विद्याधर काकतकर यांनी दिलेले फोटो सुद्धा सुरेख.
धन्यवाद!!
धन्यवाद!!
अतुल, भोरड्या वेगळ्या. माझ्या मते पाईड स्टार्लिंग या पक्ष्याला भोरडी म्हणतात. साळुंकी/मैनेसारख्या असतात.
दुर्मिळ असे फारसे नाहीत हे कुठले पक्षी. दिसतात शहरांमध्ये. एकदा आपल्याला सवय झाली ना, की आपण आपोआप जाऊ तिथे पक्षी शोधायला लागतो
खर आहे. ईस्टर्न फ्री वे वरुन
खर आहे. ईस्टर्न फ्री वे वरुन मुंबई बाहेर जाताना साधारण मध्यावर बहुतेक सेवरी एक्जिट जवळ एक पाणथळ जागा दिसते. एक दिवस सकाळी मुद्दाम जाऊन पहिले तेव्हा काही पक्षी आढळले. पान सादर जागेचा वापर आजूबाजूचे रहिवासी प्रातर्विधी साठी करीत असल्याने पुन्हा जाण्यासारखी जागा नाही.
१. ढोकरी २. पाणकावळा ३.
१. ढोकरी २. पाणकावळा ३. पांढऱ्या छातीचा धीवर ४. सामान्य धीवर
छान फोटो आहेत हेपण विद्याधर
छान फोटो आहेत हेपण विद्याधर काकतकर!
लेख सुंदर आणि फोटोतली क्षणही
लेख सुंदर आणि फोटोतली क्षणही छान टिपलेत विशाखा.
कॅमेरा/मोबाईल कोणता आहे?फोटो स्पष्ट आलेत.
काकतकर, तुमच्या फोटो चा एक सुंदर वेगळा लेख पण बनवा.
धन्यवाद अनु! कॅमेऱ्याचं नाव
धन्यवाद अनु! कॅमेऱ्याचं नाव निकॉन कूलपिक्स पी ९००. भरपूर झूम आणि वापरायला सोपा. चक्राता ट्रिपसाठी खास विकत घेतला होता.
ओके, हां बरोबर, तो चांगला आहे
ओके, हां बरोबर, तो चांगला आहे.
आमच्याकडे कॅमेराखरेदिभ्यास झाला होता त्यात नाव ऐकले आहे
Pages