मागच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया खालील दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78819
(कथेचा फॉर्मॆट प्रथमपुरूषी आहे म्हणजे ती लेखिकाच आहे असे नाही. नायिके मधे आणि लेखिकेमधे साम्य असू शकतात पण कथानायिका हे स्वतंत्र पात्रं समजावं.)
आशीच्या बोलण्याने मी हादरले होते.
आता कधी एकदा ऋतूला हे सांगते असं झालेलं होतं.
सकाळी फिरून आल्यानंतर मी बोलावल्याप्रमाणे ऋतू मुखर्जींच्या घरी दाखल झाला.
आमच्या मामाच्या घरी माझे ऋतूशी संबंध पसंत नव्हते. चंदनने अर्धेन्दुला भडकावले.
त्याने मग घरी सांगितले होते.
त्यानंतर मग मला सर्वांनी दटावले होते.
तरीही आमच्या भेटीगाठी चालू होत्या.
पण एव्हढी रिस्क मी घेत असताना दोन चार वेळा त्याच्याकडून मला गृहीत धरले गेले.
या परिस्थितीत मी भेटायला येते या गोष्टीचा त्याने कधी आदर केला नाही.
कधी कधी त्याला त्याची फिकीरच नाही असे वाटले होते.
मी आतून घुसमटत होते. पण त्याला बोलू शकत नव्हते.
अशाच एका क्षणी स्फोट झाला होता.
आणि मग मी बंगाललाच टाटा करून निघून आले होते.
मुखर्जीं अंकलना हे माहीत नव्हते. पण अनामिका मामी माझ्याकडे डोळे मोठे करून बघायला लागली.
मी तिला बाजूला घेतलं आणि विनंती केली.
मुखर्जीं अंकलनी त्याला त्याच्या वडीलांची माहिती विचारली. मूळ गाव, आजोबांचं नाव हे विचारलं.
" तू दीपेंदरबाबूंचा पणतू आहेस ?"
विश्वजीत अंकल एकदम आनंदाने ओरडले.
दीपेंदरबाबू हे संस्कृतचे महापंडीत होते. आचार्य होते ते.
भट्टाचार्य हे आडनाव पण त्यावरूनच आले.
त्यांचे वडील हे विश्वजीत अंकलच्या आजोबांचे गुरू होते.
दीपेंदरबाबू आणि मुखोपाध्याय हे सहाध्यायी म्हणजे गुरूबंधू होते.
एका क्षणात सगळंचित्रच्च बदललं.
ऋतूशी अशा चोरट्या भेटी योग्य नव्हत्या हे मन सारखं सांगत होतं.
त्याची ओळख करून देणं गरजेचं होतं.
उद्या चुकून आशी असताना त्याची भेट झाली आणि त्याने तिच्या केसबाबत काही प्रश्न विचारले तर ?
ती घरी सांगणारच होती.
आशी एक अत्यंत लहरी आणि संवेदनशील मुलगी होती.
अतिशय भावनाशील. हळवी तितकीच तापट.
स्वकेंद्रीत मुलगी होती.
जर तिने तक्रार केली तर हे सगळं माझ्यावर शेकणार आणि नंतर तो ऋतू होता हे समजलं तर काहीच्या काही वळण लागू शकत होतं.
आता मात्र ऋतू अंकलच्या गळ्यातला ताईत बनला होता.
मी अंकलना विचारलं, "ऋतूबरोबर आज शिमल्याचा परीसर पहायला जाऊ का ?"
त्यांनी अगदी सहज परवानगी देऊन टाकली.
---------------------------------------------------------
सकाळच थंड वारं मनाला उल्हसित करत होतं.
त्याच्या बुलटेवर त्याला घट्ट घरून बसण्याने थंडी वाजत नव्हती.
बसस्टँडला वळसा घालून त्याने गाडी कुफ्रीच्या दिशेने घेतली.
"कुठे जायचं ?"
"कुठेही "
माझ्या उत्तराने तो हसायला लागला.
बघावे तिकडे हिरवाई, उंचच्या उंच वृक्ष, दूरवर दिसणारी हिमशिखरे ..अगदी स्वप्नवत असा नजारा आणि आवडतं माणूस सोबत. हा प्रवास जगाच्या अंतापर्यंत सोबतीने चालू रहावा असं वाटून गेलं.
एका बाजूला डोंगराने वेढलेली हिरवीगार दरी , एका बाजूला पहाड.
वा-यावर उडणारे केस
ताज्या हवेचा गंध
शरीरातला रोम नि रोम उत्तेजित झाला होता,
रस्त्यात एका अतिशय सुंदर ठिकाणी एक नव्याने झालेलं मनोरंजन केंद्र होतं. साहसी खेळही होते.
त्याच्या बाजूला एक कॅफे होतं.
दरीवर बाल्कनीसारखं बांधकाम केलं होतं.
त्यावर टेबलं आणि छत्र्या मांडल्या होत्या. खूपच सुंदर होतं सगळंच.
अशा ठिकाणी, अशा हवेत कॉफी मिळाली तर किती छान होईल.
ऋतू म्हणाला , "काय घेणार ? बीअर ?"
मी चमकून पाहीलं. " तू कधीपासून घ्यायला लागलास ?"
ओशाळून हसत म्हणाला " गंमत केली "
मी त्याच्याकडे बघत राहीले.
तो विषय बदलत राहिला.
कॉफीची ऑर्डरही गेली.
मी पण मग जास्त खोदून विचारले नाही.
जरा चेष्टामस्करी झाली. पुढचे प्लान्स ठरवणे वगैरे झालं. त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.
संभाषणाची गाडी आपोआप आशीच्या केस कडे वळाली.
"बरं सांग आता आशीने काय काय सांगितले ते ?"
"आपण निवांत बसूयात का कुठे तरी ?"
" पुढे एक विश्रामगृह आहे सरकारी "
" पण आपण कसे जाणार ?"
" तिथे एक अशा गप्पा मारायला छान जागा आहे "
" पण आपल्याला कसे बसू देतील ?"
" त्याची काळजी तुला नको "
मी तरीही विचारत राहीले. तो हसून उडवत राहिला.
बुलेट रस्त्याला लावून वर पाय-या चढून गेलो.
आर्मीचे बंगले असावेत तसे छोटे छोटे बंगले होते.
एका बाजूला जपानी पद्धतीच्या उघड्या लाकडी झोपड्या होत्या.
त्यात लाकडी बाकडे होते.
ऋतू मॅनेजरला काही तरी सांगून आला.
दोन पोलिसांनी त्याला सॅल्युट ठोकलेला माझ्या नजरेतून सुटला नाही.
आता ही काय भानगड त्यानेच सांगावी असं मी ठरवून टाकलं.
" बरं तुला आधी सांगायचं होतं ते सांगतो. ते काश्मिरी होते ना ? ते पकडले गेले "
" कसे ? आणि तुझा काय संबंध ?"
" तू मला त्या पहाटे व्हायोलिन वाजवणा-या म्युझिक स्कूल बद्दल सांगितलेलंस ना , त्या वेळीच मला डाऊट आला होता. तिथे कुठेही आधीपासून संगीताचे क्लासेस चालत नाहीत. स्थानिक कुणीही अशा शाळेत मुलांना घालण्याइतके श्रीमंत नाहीत. टनेलच्या इथे कोण असे स्कूल उघडणार ? हिमाचल पोलिसांनी धाड मारली त्यात ते काश्मिरी सापडले "
"पण तुझा संबंध काय ?"
" मी आयबीत आहे , सॉरी ते पकडले जाईपर्यंत तुझ्यापासून हे लपवून ठेवणं गरजेचं होतं "
" का य ?"
" होय "
" पण आयबीत तर म्हातारे कोतारे असतात ना ?"
त्यावर तो खळाळून हसला.
" सलोनी, तू गेल्यानंतर मी सीबीआयमधे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदासाठी अर्ज केला होता. मी निवडला गेलो. माझा बॉस माझ्यावर बेहद्द खूष होता. बॉसला डेप्युटेशनवर आयबी मधे बोलावणं आल्यावर त्याने मला तिकडे बोलावून घेतलं. सिंपल "
’ ओह ! म्हणजे मी आता एका देशातल्या सीक्रेट सर्व्हिस मधल्या एका गुप्तहेराशी बोलतेय तर "
" कसलं काय घेऊन बसलीस. हे पण पोलीसांसारखंच काम आहे. बस खूप संयमाचं आहे "
" आय अॅम प्राऊड ऑफ यू "
" अजून एक, इंद्राणी देव यांच्याकडून आशीच्या केसची संपूर्ण फाईल मी मिळवलीय. अर्थात झेरॉक्स. या नोकरीचा हा एक फायदा. नाही तर हे लोक अजिबात पेशंटची माहिती देत नाहीत."
" हे खूपच छान झालं "
" महत्वाचं म्हणजे कुलूजवळ जिथे आशीच्या आईला, झरना आंटींना ठेवलंय ते पण इंद्रानी देव यांचंच आहे. भागीदारीतलं "
" ओह्ह ! म्हणजे मुखर्जी यांनी शिमल्यालाच येण्य़ामागे कारण आहे तर !"
" देअर यू आर .. आता बोल "
मी शब्दांची जुळवाजुळव करू लागले.
---------------------------------------------------------------------------------------
आशीची कहाणी
आशी लहान होती तेव्हां तिची आई तिला रमवण्यासाठी पाळण्याला टांगलेल्या खेळण्याला चावी देऊन जात. सुरूवातीला आशी हसायची. पण मा निघून गेल्यावर ते आकार वेगाने फिरताना तिला त्यात वेगवेगळे भास होत. दृश्यांचे अर्थ लावण्यास तिचा मेंदू अद्याप तयार झालेला नव्हता. त्या भयाने ती जोरजोरात रडू लागायची.
मग मा धावत यायची.
रडलं की मा धावत येते.
"काय झालं माझ्या छकुलीला ?
त्या विचारत. पण आशीला कुठे बोलता येत होतं.
ती घाबरली हे सुद्धा मा ला समजायचं नाही.
मग मा दूधाची बाटली तिच्या तोंडात देत.
"संपवायचं हं बेटा. आता रडायचं नाही. मम्माला सारखा सारखा त्रास द्यायचा नाही"
जाताना त्या चावी देऊन जात.
आशी दूध पिता पिता रडू लागे.
दूध आणलं की पक्षी प्राणी गोल फिरतात ..
दूध वाईट आहे.
दिवस जात राहीले
आशी आता थोडी मोठी झाली.
मा पलिकडच्या खोलीत बाबाशी भांडत असायची.
आशीची आठवण आली कि मा पळत यायची.
मा ने बशीत पौष्टीक चाटण ठेवलेलं असायचं
" खाऊ शंपा कि नाही बेटू ? अशं नाई कलायचं . शंपा ना ? "
" मा म्म्म काऊ कोन कोन ( मला खाऊ नको)"
" अश्शं नाही बोलायच्चं.. खाऊ खाल्ला की मोठं होता येतं ना ? मग बोलता येतं नीट "
" कोन कोन"
मा मग ठेवणीतला आवाज काढायची
"आशी ! खाऊ खायचा नाहीतर "
आशी रडता रडता थांबायची. धमकीचा स्वर तिला कळायचा..
आणि मग धमकी दिली म्हणून भोकाड पसरायची.
"आशी, नाही खाल्लं कि कोण येतं ?"
" कोन कोन मा. विच कोन "
"विच येते की नाही ? मग ? "
" मा.. "
" खा बरं मग "
आशीच्या हातात खाऊची वाटी, बशी चमचा देऊन मा पुन्हा बाहेर जायची.
ती अंदाज घ्यायची.
आशी अजून रडत असायची.
इतक्यात आशीला आवाज यायचा..
विच हसल्याचा
ही: ही: ही: ही ही:
आशी त्या आवाजाने घाबरून गप्प व्हायची.
मग खाऊ खायला लागायची.
दोन मिनिटांनी दरवाजा उघडायचा.
मा असायची..
मग मा कसं घबरवलं म्हणून आशीला जवळ घ्यायची.
खाऊ खाल्ला हे बघून तिचे लाड करायची.
हा पौष्टीक खाऊ तिच्या पोटात गेला. आजचं मोठ्ठं काम झालं हे समाधान मा ला असायचं.
आशीला मा एक बाहुली देऊन झोपवायची.
मा पुन्हा पलिकडच्या खोलीत असायची.
------------------------------------------------------
भांडणाचे आवाज संपले की मा येऊन झोपल्याची जाणीव व्हायची.
खोलीत अंधार होता.
मा येऊन झोपली असेल म्हणून आशीने पलिकडे हाताने चाचपडलं.
पण मा चा स्पर्श हाताला लागला नाही.
ती उठून बसली.
डोळे अंधाराला सरावले.
एक लालसर प्रकाश होता खोलीत.
झोपेचा अंमलही होता.
खोलीत धुक्यासारखं काही तरी भरून राहिलेलं होतं.
त्या धुक्याला आता आकार आला होता.
आशी डोळे विस्फारून बघत होती.
शंकाच नको. तिने पुस्तकातली चित्रं पाहिली होती.
तिच्यासमोर हवेत विच तरंगत होती.
केस सोडलेले. कपाळाला हे भलं मोठं कुंकू..
ती हसत होती.
खी: खी: खी: खी:
तिचे दोन्ही हात हवेत आळीपाळीने गोल फिरत होते. जणू काही ते आशीला धरणार आहेत.
आशीने डोळे मिटून घेतले. किंकाळी फोडायला तोंड उघडलं पण आवाजच निघत नव्हता.
विच आता तिच्या शेजारी बसली होती. मागे उभी होती.
क्षणात भिंतीवर होती.
क्षणात छतावर रांगत होती.
आशीने छताकडे पाहीलं. ती खदाखदा हसत होती.
तिने पुन्हा डोळे मिटले तर
गळ्याला विचचे हात लागले.
आशी घामाघूम झाली.
एव्हढासा का असेना , पण जीव होता तो.
जीव जन्माला येतानाच संरक्षणासाठी निर्सगाने त्याला काही देणग्या दिलेल्या असतात.
भयाचा कडेलोट झाला तशी आशीच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली.
या वेळी मा सोबत बाबाही होता.
मी इथे थांबले.
मला पुढे सांगवेना. खूप भावनाशील झाले होते.
ऋतूने मग मला धरून गाडीकडे आणले.
घट्ट धरून बसायला सांगितले.
गाडी उगीचच हळू हळू धावत होती.
---------------------------------------------------------------------------------
संध्याकाळ होत आली होती.
अंकलकडे थोडा वेळ घालवणे गरजेचे होते. जेवणं आटोपून मी पाय मोकळे करायच्या बहाण्याने बाहेर पडले.
सरळ खालच्या घरी आले.
तिथून आंटीला फोन केला.
"रियाज करतेय. उशीर झाला तर वाट बघू नकोस. इथेच झोपेन"
तिने काही बोलायच्या आत फोन ठेवून दिला.
ऋतू ची वाट बघत बसले.
त्यालाही चैन पडत नसणार .
नेहमीप्रमाणे तो उशिरा आला.
मग थोड्या गप्पा टप्पा, काही स्पर्श , काही चोरटे काही सहेतुक काही उगीचच..
पण कुठेतरी जाणिवही होती.
हे सगळं झटकून टाकत मी ऋतूला ही डोळ्यांनीच "काय विचार आहे ?" असं खुणावलं.
तो भानावर आला. मिस्कील हसला.
" तू ठीक आहेस ना आत्ता ?"
" हम्म"
" चल पुढचं ऐकव. आपल्याकडे आता जास्त वेळ नाही "
" का ?"
" अगं झरना आंटीकडे जायचे कि नाही ?"
खरंच की.
"सांग लवकर "
-------------------------------------------------------------------------------------
आशी दचकून उठायची.
मा तिला घेऊन काळजी करत बसायची
रात्री ठरल्याप्रमाणे विश्वजीत अंकल प्यायला बसायचे.
आंटीचा पारा नेहमीप्रमाणे चढायचा.
अंकल वैतागून बोलायचे
" मी माझ्या पैशांची पितो. तुझा काय संबंध ?"
" माझा संबंध ? माझा संबंध नाही ? तुमचे पैसे ?"
झरना आंटीच्या रागाचा पारा चढला की तिला मुद्देसूद भांडता येत नसे.
" मुलगी मोठी झाली. लाज वाटली पाहीजे प्यायला "
" मला माहिती नाही का तुला किती काळजी आहे ते ?"
" काय काळजी नाही हो ? तुम्ही महिन्यातून एकदा तिला भेटत असाल. रोज पिता. दूर ठेवावं लागतं तुमच्यापासून "
" बघ. तूच तिला येऊ देत नाहीस. तिला मेंटल केस करून ठेवलीस "
" मी ? मी तिला मेंटल केस बनवलीय ?"
" मला माहीती नाही का तू कशी भीती घालायचीस ते ??"
" ते मी बघून घेईन "
" मांत्रिकाला बोलावून ?अजिबात चालायचं नाही. मी डॉ. देव यांच्याकडे तिच्यासाठी वेळ घेतली आहे. जाऊन ये "
आंटी काळजीत पडल्या.
कारण डॉ. देव यांच्याकडे त्या आधीपासूनच आशीला दाखवत होत्या.
यांनी अपॉइण्टमेण्ट घेतलीय फक्त की डॉक्टरांना भेटलेत ?
पुन्हा न विचारता का गेलीस म्हणून ओरडतील.
दुस-या रात्री तसेच झाले.
अंकल आंटीवर ओरडत होते.
"तू डॉ. देव कडे गेली होतीस ? मला सांगितलं पण नाहीस ?"
" तुम्ही असता का शुद्धीत ?"
त्यावरून अंकल भडकले
" मला कळलंय सगळं. देव डॉक्टरांकडे जायच्या आधी तू आणखी एका कुडमुड्या डॉक्टरकडे जात होतीस. काय गरज होती ? आपल्याला बेस्ट डॉक्टर मिळू शकत नाही का ?"
" पण मी करतेय ना उपचार ?"
" कसल्या कसल्या गोळ्या खायला घातल्यात देव जाणे . माझ्या मुलीला जर काही मानसिक आजार निघाला तर तूच जबाबदार "
" हो मीच एकटी जबाबदार. त्या तुमच्या डॉ. देव पण म्हणाल्या की गोळ्या ठीक आहेत. अॅंक्जाईटी वर होत्या त्या "
दोघांची लढाई चालूच राहिली.
इंद्राणी देव झरना आंटीला खोदून खोदून विचारत होत्या.
" ती गोळ्या तर खातेय ना ?"
" हो खातेय "
" तुम्ही लक्ष ठेवलंत ?"
" मी कशी ठेवणार ना प्रत्येक वेळी ?"
" झरना, ही गोष्ट गांभीर्याने घ्यायची आहे. "
" डॉक्टर पण गोळ्या मी वाटीत काढून ठेवते. रात्री चेक केलं तर वाटी रिकामी असते. म्हणजे ती घेते गोळ्या "
डॉक्टर आशीला हाच प्रश्न विचारत राहिल्या.
ती शून्यात बघत होती.
आंटीने तिला हळूच चापट मारून डॉक्टर काय विचारतात म्हणून दटावलं.
डॉक्टरांच्या नजरेतून ते सुटलं नाही.
आशी अगदी हट्टी मुलीप्रमाणे जिवावर आल्यासारखं "घेते" एव्हढंच म्हणाली.
" सॉरी डॉक्टर, खूप हट्टी झालीय ती "
" झरना, ती जर गोळ्या घेत असेल तर अस व्हायला नाही पाहीजे. माझ्या इतक्या वर्षांच्या प्रॅक्टीस मधे अशी केस नाही पाहिली. भीती, नैराश्य, अस्वस्थता , चिंता या सगळ्यावर मी औषधं देतेय. ती आतापर्यंत ठीक व्हायला हवी होती "
" डॉक्टर घेते ती गोळ्या "
" तुम्ही लक्ष ठेवा. आणि जायच्या आधी दोन मिनिटं बोलायचंय मला तुमच्याशी "
आशीला रिसेप्शनवर सोडून आंटी आत आल्या.
" तिला पुन्हा असं मारू नका. दटावू नका. ती आनंदी कशी राहील हे बघा. तिला प्रसन्न ठेवा. तुम्हाला हे कुणी शिकवलं नाही का ? "
आंटी गो-यामो-या होऊन खाली बघत राहिल्या.
त्या एका कट्टर घरातून आलेल्या. काय सांगणार ?
"पुढच्या वेळी येताना मला फरक दिसायला पाहीजे "
--------------------------------------------------------------------------------------------
झरना आंटी झोपल्या होत्या.
रात्री त्यांना जाग आली.
हसण्याचा आवाज होता तो.
स्त्री च्या हसण्याचा आवाज.
पण वेगळाच.
पुन्हा एकदा.
शंकाच नको.
खाटेखालून काहीतरू गडगडत गेल्याचा आवाज झाला.
झरना आंटी प्रचंड घाबरल्या होत्या.
पुन्हा तोच आवाज झाला.
त्या आशीला बघायला गेल्या.
ती डोक्याखाली एक आणि डोक्यावर एक उशी घेऊन झोपली होती.
आता पैंजणाचा आवाज आला.
उजव्या कोप-यात पैंजण वाजत होतं’
आशी डाराडूर झोपली होती.
ती खरंच सांगत होती.
आंटी आशीला प्रोटेक्ट करणार इतक्यात ती घाबरून किंचाळत उठली.
खिडकीखाली पैंजणाचा मोठा आवाज झाला.
आंटी खिडकीजवळ गेल्या. खिडकी वा-याने आपटत होती.
त्यांनी दिवा लावला.
खिडकी बंद केली आणि खाली वाकून पाहीलं..
एक पैंजण तिथे पडलेलं होतं
त्या भीतीने ओरडल्या...
मग पुन्हा पुन्हा असे अनुभव येत राहीले.
आता आंटीला अनुभव येत होते.
त्या अंकलना सांगत होत्या. अंकलना हे पटत नव्हतं.
---------------------------------------------------------
डॉ. इंद्राणी देव सुन्न होऊन बसल्या होत्या.
"झरना मुखर्जी , डोकं ठिकाणावर आहे का ? तिच्या गोळ्या घेतल्या का विचारलं तर हे काय खूळ काढलंय ?"
" डॉक्टर माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच तिथे चेटकीण येते. ती हडळ आहे "
" वेड्यासारखी बोलू नकोस झरना . असं काहीच नसतं "
" आशी गोळ्या घेतेस ना तू ?"
’ हम्म"
" झरना या गोळ्या तुझ्यासाठी. तू ही वेळेवर घे आणि आशीला पण दे "
" पण डॉक्टर "
" मी विश्वजीत मुखर्जींना फोन करून विचारणार आहे गोळ्या घेतल्या कि नाही ते पहायला "
आता मुखर्जी गोळ्या घेतल्या कि नाही यावरून आंटीला बोलायचे.
गोळ्या घेतल्या तरी अनुभव यायचे थांबले नाहीत.
" मी ठीक आहे. माझ्यावर विश्वास ठेवा"
" ते काही नाही. गोळ्या घ्यायलाच पाहीजेत "
" हे गोळ्यांनी बरं होणारं प्रकरण नाही "
" हे तू मला शिकवू नकोस . आपल्याला तसले काही उद्योग नाहीत करायचे "
मग एक दिवस अंकलच्या नकळत एक तांत्रिक येऊन गेला.
त्याने घर बाधीत असल्याचं सांगितलं.
लवकरात लवकर घर सोडा नाहीतर मुलीचं काहीतरी बरं वाईट होईल असा इशारा दिला.
मग झरना आंटी ठामपणे घर सोडायचं म्हणाल्या.
विश्वजीत अंकल डॉक्टरांना भेटून आले. त्यांचा विश्वास तर नव्हता. पण हवालापटाने फरक पडला तर छान होईल. बघूयात काय होतं ते असं त्या म्हणाल्या.
त्यांचं एक मनोचिकित्सालय कुलू जवळ होतं. अंकलची शिमल्यात प्रॉपर्टी होती हे त्यांना ठाऊक होतं.
काही गरज लागली तर मदत करायला सोपं पडलं असतं...
आणि मुखर्जी परिवाराने घर सोडलं तेव्हां आशी आठ नऊ वर्षांची होती.
---------------------------------------------------------------
खूप उशीर झाला होता.
ऋतू जायला निघाला. पण बाहेर स्नो फॉल चालू होता,
त्याने प्रश्नार्थक नजरेने पाहीलं.
मी त्याला फायरप्लेस पेटवायला सांगितली.
फायरप्लेस मधे आग भडकली.
रात्रं चढत चालली होती.
आम्ही दोघेच त्या हवेलीत होतो.
ज्वाळांचा उजेड हलत होता. आग भडकत चालली होती.
दिवे गेले होते...
त्या दिवशी जगाची पर्वा न करता एकमेकांच्या कधी स्वाधीन झालो हे समजलंच नाही.
सकाळी जाग आली तेव्हां मी एकटीच होते.
रात्रीचं स्वप्नं होतं की खरंच ?
प्रीती चहा घेऊन आली.
"ऋतू बाबू आत्ता गेले थोड्या वेळापूर्वी. त्यांना चहा विचारला तर नको म्हणाले. ते इथे राहीले का ?"
मी तिच्या प्रश्नाला उत्तर देण्या ऐवजी हसले.
(क्रमश:)
(यातल्या काही घटना सत्य आहेत. स्थानिक वर्तमानपत्रामधे या केसवर बरीच चर्चा झालेली आहे. तिचा आधार घेतला आहे. अर्थात त्यातून वेगळे काही सांगण्याचा प्रयत्न असेल).
***************************************************
पुढच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारावी ही विनंती
https://www.maayboli.com/node/78840
खेळण्याला चावू देऊन जात. >>>>
खेळण्याला चावू देऊन जात. >>>>>इथे चावी असायला हवं ना?
बाकी छान लिहितीएस..उत्सुकता वाढतीए.
पुढील लेखनास शुभेच्छा.
Reading
Reading
छान..
छान..
इंटरेस्टिंग!
इंटरेस्टिंग!
भारी झालांय हा भाग..
भारी झालांय हा भाग..
भीती वाटली .. रात्री वाचतेयं म्हणून..!
सर्वांचे आभार
सर्वांचे आभार
मृ, >> लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. दुरूस्त करता आलं
हाही भाग छान.
हाही भाग छान.
रात्री वाचतेयं म्हणून..! >>>
रात्री वाचतेयं म्हणून..! >>> रूपाली आभार. मलाही दिवसभर काहीही सुचत नाही. नुसती बसून असते स्क्रीनसमोर. रात्र झाली कि सुचतं.
अस्मिता - आभार
सर्वांचेच आभार.
शेवट लवकरच पोस्ट करणार आहे.
खूप इंटरेस्टिंग आहे हा भाग.
खूप इंटरेस्टिंग आहे हा भाग.
बंगाली वातावरण अगदी हुबेहूब
बंगाली वातावरण अगदी हुबेहूब !
हे कसे काय केले.?
मामी, सातत्याने प्रोत्साहन
मामी, सातत्याने प्रोत्साहन दिल्याबद्दल मनापासून आभार.
खरंच गरज होती याची.
प्रभुदेसाई सर - निरीक्षण आनि अनुभव