कोविड- अनुभव वगैरे..

Submitted by पाचपाटील on 9 April, 2021 - 01:22

माझा ताजा ताजा अनुभव शेअर करतो..

मी एका कोविड पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो होतो‌ त्यामुळे मला महानगरपालिकेकडून कंपलसरी टेस्ट करून घेण्याचा सल्ला मिळाला. मला काहीही लक्षणं नव्हती तरीही प्रीकॉशन म्हणून, २५ मार्चला मी महानगरपालिकेच्या कोविड टेस्टींग सेंटरला जाऊन पोचलो. तिथली गर्दी, आणि कशाचा कशाला संबंध नाही, अशी व्यवस्था बघून मला अजिबात धक्का बसला नाही. कारण 'अपेक्षा हे सगळ्या दु:खांचं कारण आहे', हे तत्व डोक्यात फिट्ट बसवूनच तिथं गेलो होतो.
फॉर्म भरुन लाईनमध्ये लागल्यानंतर बऱ्याच वेळाने माझा नंबर आला आणि आत गेल्यावर कुठलासा अज्ञात निकष लावून तिथल्या मनुष्याने ठरवले की माझ्यासाठी रॅपिड अॅंटीजेन टेस्ट योग्य राहील.

शिवाय लोकांची मोठी लाईन आणि हे स्वॅब घेणे म्हणजे त्या मनुष्यासाठी रोजचेच काम!! त्यामुळे 'फटाफट उरकण्याकडे कल' हेच उपयुक्त धोरण..!
त्यामुळे स्वॅब घेण्यासाठीची कांडी माझ्या नाकात घुसवून फिरवताना त्याच्या हालचालींमध्ये एवढी घाई, चपळाई होती की पुढची दहा पंधरा मिनिटे नाक हुळहुळत राहिले.. आता नसतो एखाद्याच्या हाताला नाजूकपणा, त्याला आपण तरी काय करणार बरं.!! आणि शिवाय नाकाच्या आत एक अद्भुत, अणकुचीदार आणि अनाकलनीय फिलींग
अनुभवण्याची संधी त्याने मला विनामूल्य उपलब्ध करून दिली, हे ही काही कमी मानता येणार नाही!!

मग नंतर मला असंच एका काल्पनिक दिशेकडे हातवारे करून 'तिकडं रिझल्टची वाट बघा', असं सांगितलं गेलं. मी तिकडं जाऊन बसलो. मग अर्ध्या तासाने एकजणाने काही नावं पुकारली, ज्यात माझंही नाव होतं, आणि मग आम्हाला एका घोळक्याकडे बोट दाखवून सांगितले की
'इथं बसा. तुम्ही सगळे पॉझिटिव्ह आहात'...!
म्हणजे एवढा वेळ पॉझिटिव्ह पेशंट्स आणि रिझल्टची वाट पाहत बसलेले भावी पेशंट्स, इकडं तिकडं लाईन शोधत
फिरणारे लोक, ह्यांच्यामध्ये फक्त एक काल्पनिक सीमारेषा होती.
त्यामुळे सर्वांना आपापसांत मिसळत फिरण्याचे, स्वतःस
कोविडची लागण करून घेण्याचे मुक्त स्वातंत्र्य बहाल केले गेले होते! असो.
तर मग नंतर त्यांनी मला आणि माझ्यासारख्या इतर पॉझिटिव्ह पेशंट्सना एकेकाला जवळ बोलावले आणि होम आयसोलेशन किंवा अॅडमिट होणे, असे दोन पर्याय दिले.

मी अर्थातच होम आयसोलेशनचा पर्याय निवडला.
ह्या पर्यायामध्ये छापील फॉरमॅटमधील एक प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागले की मी डॉक्टरांच्या सल्ल्याविरूद्ध माझ्या
जबाबदारीवर हा होम आयसोलेशनचा निर्णय घेतोय,
आणि जीवास धोका निर्माण झाल्यास मनपा
जबाबदार राहणार नाही वगैरे वगैरे
तंतोतंत शासकीय छापाची भाषा वाचूनच मी येड्यासारखं हसत बसलो होतो थोडावेळ, हे एक आठवतं... शिवाय फॅमिली डॉक्टरचे प्रीस्क्रिप्शनही सबमिट करावे लागले की अमुक पेशंटला मी कन्सल्ट करेन वगैरे.. ते मी व्हॉट्सॲपवर मागवून घेतले एका ओळखीच्या डॉक्टरकडून..

हे प्रीस्क्रिप्शनची प्रिंट,अॅड्रेस प्रूफची प्रिंट आणि प्रतिज्ञापत्र, फॉर्म वगैरे सबमिट केल्याशिवाय तिथून हलता येणार नाही, असे सांगण्यात आले.

मग हे डॉक्युमेंट्स त्यांना दिल्यानंतर माझ्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला गेला आणि मला तिथून थेट घरी जाण्यास सांगितले गेले. ह्या सगळ्या प्रक्रियेला जवळपास चार तास लागले.
मग मी बाईक वरून 'थेट घरी' पोहचलो. डॉक्टरने
सांगितलेल्या गोळ्या मागवून घेतल्या,
टिफीनची सोय एके ठिकाणी लावून दिली आणि प्रायव्हेट लॅबवाल्याला RT-PCR टेस्टसाठी बोलावून स्वॅबचे नमुने दिले. कारण कागदाच्या एका चतकोर तुकड्यावर लिहून
दिलेल्या त्या अॅंटीजेन टेस्टचं काही खऱ्याचं वाटत नव्हतं.
त्यामुळे विचार केला की कदाचित आपण पॉझिटिव्ह
नसायचो आणि मूर्खासारखे उगाचच १४ दिवस क्वारंटाईन होऊन शेवटी सगळ्यांच्याच नजरेत हास्यास्पद ठरायचो...!

पण तसं काही झालं नाही. RT-PCR चाही रिपोर्ट पॉझिटिव्हच होता,
जो मला दुसऱ्या दिवशी ई-मेलवर मिळाला,
तो मी ताबडतोब कामाच्या ठिकाणी ई-मेलवर पाठवून दिला.
इथून पुढे खाणे, झोपणे, सर्वकाळ लोळत लोळत आलटून पालटून वाचन आणि नेटफ्लिक्स, हा सिलसिला सुरू झाला. पुस्तकांचा स्टॉक आपल्याकडे कायमच असतो. फ्लॉबेरचं मादाम बोवारी आणि स्टाइनबेकचं द ग्रेप्स ऑफ रॉथ, ही दोन पुस्तकं बरेच दिवसांपासून पेंडींग होती, ती संपवून टाकली.

अजून एक सांगायचं म्हणजे, हल्ली सगळेच कोविड ह्या
विषयातले तज्ञ झाले आहेत, त्यामुळे प्रत्येकाकडं काही ना काही सल्ला हा असतोच..! त्यामुळे बातमी कळल्यानंतर अपेक्षेप्रमाणेच काही फोन यायला लागले.. त्यांचे वेगवेगळे सल्ले कम् अनुभव ऐकून डोकं बधिर
होण्याच्या आतच मी फोन उचलायचे बंद करून टाकले.

मग दोन दिवसांनी महानगरपालिकेचे लोक माझ्या अॅड्रेसवर चौकशीसाठी आले, त्यांनी काही सूचना दिल्या, ज्यांचा मतितार्थ असा होता की तुम्ही बाहेर पडू नका, चार भिंतींच्या आत तुम्हाला स्वतःचा जो काही खेळ खंडोबा करून घ्यायचा आहे किंवा नाही,
त्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी तुम्ही मुक्त आणि स्वतंत्र आहात आणि इथून पुढची जबाबदारी आम्ही आनंदाने तुमच्यावरच सोपवत आहोत..!
आणि शेवटी जाताना दरवाजाबाहेर नोटिस चिकटवून गेले की ह्या फ्लॅटमध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंट राहत असून अमुक डेटपर्यंत कुणीही आत प्रवेश करू नये, वगैरे वगैरे.

शिवाय 'फॉलोअप' ह्या व्याख्येत बसेल, अशा कामासाठी
नेमून दिलेल्या महानगरपालिकेच्या लोकांचा एकदा फोनही आला होता. (कदाचित मी कुठेतरी बाहेर बोंबलत फिरत तर बसलो नाहीये ना, किंवा नजीकच्या भविष्यात माझा तसा काही भयंकर इरादा तर नाहीये ना, हे चेक करून बघत असावेत !)

तर मुद्द्याचं सांगायचं झालं तर मला सुरुवातीला अजिबात लक्षणं नव्हती पण टेस्ट केल्यानंतरच्या पाचव्या आणि
सहाव्या दिवशी जबरदस्त वीकनेस आणि
अंगदुखी जाणवली. त्रास म्हणाल तर हा एवढाच आणि तोही फक्त दोनच दिवस.! बाकी आठवडाभर तोंडाची चव जाणे आणि कसलाही वास न येणे, हे होतेच. पण त्याचा त्रास असा काही वाटला नाही.
सर्दी, खोकला, ताप वगैरे असलं काही नव्हतं..
दोन दिवसांचा वीकनेस अचानकच संपला आणि एकदम नॉर्मल झालो. पण तोंडाची चव गेलेली असल्यामुळे टिफीन बंद करून स्विगी, झोमॅटोवरून चमचमीत ऑर्डर्स करण्यावर विशेष भर दिला... मला सोडून गेलेल्या चव आणि वास या दोन्ही संवेदना ४-५ एप्रिलच्या आसपास पुन्हा व्यवस्थित
जाग्यावर आल्या. सात एप्रिलला दुसऱ्यांदा टेस्ट केली असता निगेटिव्ह आली.. सध्या मी एकदम ठणठणीत !

'कोविड' साठी मला आलेला खर्च-
दोन टेस्टचे मिळून १८५० रूपये
आणि इतर ६०० रूपये.
असे टोटल- २४५० रुपये.

(माझ्याकडे टेंपरेचर गन वगैरे नव्हती.. गळ्यावरती उलटी चार बोटं ठेवून ताप कधी येतोय ते बघत होतो पण तो काही
फिरकला नाही. . आणि दिवसातून दहा वेळा ऑक्सिजन लेवल कधी ड्रॉप होतेय, हे चेक करत बसायचं हे मी मूळातच
वेळकाढू प्रवृत्तीचा असल्यामुळे काही जमेल असं वाटलं नाही, त्यामुळे ऑक्सीमीटरही मागवला नाही. हे अर्थातच फार कॅज्युअल वागणं असू शकतं, पण मी काही फारसा विचार केला नाही त्यावर.)

अर्थात, माझे चालू वय ३२ वर्षे आणि मेडिकल हिस्ट्री काहीही नाही. त्यामुळे मला विशेष काही त्रास झाला नसेल. आणि हा माझा अनुभव आहे. प्रत्येकाला हे लागू होईल, असा काही विषय नाही.

पण तरीही प्रायव्हेट हॉस्पिटलवाले दीड-दोन लाखांचे चंदन लावल्याशिवाय सोडतच नाहीत, असं जेव्हा वाचतोय,
ऐकतोय वर्षभरापासून.. तेव्हा मला त्यांच्या तावडीत स्वतःला
सोपवण्याची वेळ सुदैवानं आली नाही, ह्याचं फार म्हणजे फारच बरं वाटतंय.
लोकांच्या मनातली भीती ओळखून, त्या भीतीचा एक मोठ्ठा बाजार उभा करून, प्रत्येक टप्प्यावर पेशंटला लुटून,
आयुष्यभराची चांदी करण्याचा सुवर्णकाळ रोज रोज थोडीच येतो!! चालू द्या.!!

पण तरीही शेवटी सगळ्यांना जे माहिती आहे तेच सांगून
थांबतो की कोविड हा प्रकार लाईटली घेण्यासारखा नाहीये.. थोडा बहुत त्रास ह्याच्यामध्ये होतोच.. आणि सध्या ज्या वेगाने हे सगळं वाढतंय ते पाहता, प्रीकॉशन घेणं, लक्षणं दिसत असतील किंवा पॉझिटिव्ह पेशंटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला असाल, तर ताबडतोब टेस्ट करून घेणं, स्वतःला आयसोलेट करणं, प्रोटोकॉलचे पालन करणं आणि डॉक्टरांच्या
सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं, हे सगळ्यांच्याच भल्याचे आहे..!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम हलक्या फुलक्या भाषेत मांडलेला अनुभव.तुम्हाला फार त्रास झाला नाही हे बरे झाले. काळजी आणि विश्रांती घ्या.
(स्विगी, बीग बास्केट, सुपरडेली,अमेझॉन पॅन्ट्री यांचे जनरल वागणे काय आहे?असे दारावर पाटी असेल तर ते सेवा देतात की देत नाहीत?की काही जास्त पैसे मागतात?)

असे दारावर पाटी असेल तर ते सेवा देतात की देत नाहीत?की काही जास्त पैसे मागतात?)>> सेवा देतात. काही जास्त पैसे वगैरे नाही. Contact less delivery चा ऑप्शन निवडायचा. दरवाजा बाहेर ठेवतात आणि फोन करतात की ठेवलंय म्हणून.. Happy

छान अनुभव कथन. काही विशेष त्रास न होता, खर्च न होता बरे झाल्याबद्दल अभिनंदन.

एकदम हलक्या फुलक्या भाषेत मांडलेला अनुभव आवडला.
तुम्हाला फार त्रास झाला नाही हे बरे झाले.
काळजी आणि विश्रांती घ्या.

छान अनुभव कथन. काही विशेष त्रास न होता, खर्च न होता बरे झाल्याबद्दल अभिनंदन.>>>> +१.

बाकी बीएमसीचा चांगले अनुभव आले आहेत.डेंटिस्टने, नोव्हेंबर २०२० मधे स्वॅब टेस्ट करायला सांगितले त्यावेळी त्याच्या समोरच बीएम्सीचे ऑफिस होते.पटकन काम झाले.२ दिवसांनी रिपोर्ट घेतला.
वॅक्सिनेशनच्यावेळीही चांगला अनुभव आला. कमी जागा प्रचंड प्रमाणात लोक,तरीही स्टाफ डोके शांत ठेऊन काम करताना आढळले.

छान अनुभव कथन. काही विशेष त्रास न होता, खर्च न होता बरे झाल्याबद्दल अभिनंदन. >>>+११११

जर बिल्डिंग/ विंग सील केली असेल तर स्विगी वाले फोन करून खाली बोलावून घेतात. वर येऊन देत नाहीत असा स्वानुभव आहे

रिकव्हरी बद्दल शुभेच्चा. सगळे एक ट्याने निभाव्लेत. आता ही फार नाचानाच करू नका चार आठ दिवस. लहान वय आहे. काळजी घ्या.

रिकव्हरी बद्दल शुभेच्चा. सगळे एक ट्याने निभाव्लेत. आता ही फार नाचानाच करू नका चार आठ दिवस. लहान वय आहे. काळजी घ्या. >> @ अमा: धन्यवाद Lol ... अगदीच नाचानाच असं नाही, पण काल सकाळी रिपोर्ट निगेटिव्ह आल्या आल्या, बाईकला दणदणीत किक मारून जेएम रोड, टिळक रोड करत करत डेक्कनला वळसा घालून एफसी रोडवरून उगाचच उंडारून आलो.. चार भिंतीत कोंडल्यामुळे सादळलेली सगळी इंद्रीयं जरा लख्ख, ताजीतवानी करून घेतली.. Happy
तुम्हालाही लवकरात लवकर रिकव्हरीसाठी शुभेच्छा..

बाईकला दणदणीत किक मारून जेएम रोड, टिळक रोड करत करत डेक्कनला वळसा घालून एफसी रोडवरून उगाचच उंडारून आलो.. चार भिंतीत कोंडल्यामुळे सादळलेली सगळी इंद्रीयं जरा लख्ख, ताजीतवानी करून घेतली..>> मला वाटलंच मी ही हेच केलं अस्तं खोटे का बोला.

द अंग्रेज मधली सलीम फेकूची मल्लिका ला घेउन केलेली लांग ड्राइव आठवली. किरीश्ना ओबे राय सी नीचे उतर्के सीधा टँकबंड फिर घूमके मशहूर आइसक्रीम तक गये पाच पाच कप आइसक्रीम खाये. पांच कप!!! इत्ते इत्ते तो कपांथे यारो....

चांगला मांडला आहे अनुभव! फार त्रास झाला नाही हे वाचून बरं वाटलं.
पुणे महानगरपालिकेने अतिशय चांगला फॉलोअप ठेवला की! कौतुकास्पद आहे हे!

किरीश्ना ओबे राय सी नीचे उतर्के सीधा टँकबंड फिर घूमके मशहूर आइसक्रीम तक गये पाच पाच कप आइसक्रीम खाये. पांच कप!!! इत्ते इत्ते तो कपांथे यारो.... >>
Lol ... पाहिलाय मी.. हैद्राबादी नवाब सुद्धा.. Proud

खूप खूप धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. खरेच सकारात्मक लिहिले आहे. आताच एका Team member चा रिपोर्ट positive आला. लगेच त्याला ही लिंक दिली. खूप आधार वाटला असे त्याचे उत्तर आले.

चांगला मांडला आहे अनुभव! फार त्रास झाला नाही हे वाचून बरं वाटलं.
पुणे महानगरपालिकेने अतिशय चांगला फॉलोअप ठेवला की! कौतुकास्पद आहे हे!>>>> +1
बरा झालास तरी काळजी घे रे बाबा!

<<खूप खूप धन्यवाद इथे लिहिल्याबद्दल. खरेच सकारात्मक लिहिले आहे. आताच एका Team member चा रिपोर्ट positive आला. लगेच त्याला ही लिंक दिली. खूप आधार वाटला असे त्याचे उत्तर आले.>>>
@ धनवन्ती, आवर्जून सांगितल्याबद्दल धन्यवाद Happy
आणि तुमचे टीम मेंबरही ह्यातून सहजपणे, विशेष त्रास न होता बाहेर पडतील असा विश्वास वाटतो..

छान अनुभव
मी सुद्धा अश्या अनुभवाची वाट बघतोय

<<मी सुद्धा अश्या अनुभवाची वाट बघतोय>>
डोक्याला हात लावलेली बाहुली. ..
घरात दोन लहान मुले असताना असली वाट कोणी बघते का ????

माझ्या आजीच्या भाषेत - .....चे डोहाळे.

खुसखुशीत लिहिलंय. त्रास न होता बरे झालात हे छान झालं.
<<मी सुद्धा अश्या अनुभवाची वाट बघतोय>>
डोक्याला हात लावलेली बाहुली. ..
घरात दोन लहान मुले असताना असली वाट कोणी बघते का ???>>> हेच मनात आलं , कुणाचं काय तर कुणाचं काय

अशा अनुभवाची मी मनाची तयारी केली होती गेल्या वर्षीच. कुठल्या खोलीत विलग व्हायचं, तिथे टीव्ही भिंतीवर बसवायला फिक्स्चर बसवलं, बाकी लॅपटॉप, वाफारा यंत्र, टी केटल लावायची, बेड जवळ औषधे, मोबाईल चार्ज करत ठेवण्याची वगैरे सोय आहेच. एक डिस्पोजेबळ मास्कचा आणि ग्लोव्ह्जचा डबा, थर्मोमिटर तिथेच ठेवलेले. त्या बाथरूम मध्ये कपडे धुवायची सोय -साबण, स्टूल , कपडे वाळत टाकायला दोरी वगैरे करून ठेवले, दोन कचरा पेट्या, चार दिवस एक वापरली की ती गॅलरीत ठेवायची, मग गॅलरीतून ती चार दिवसांनी रिकामी करून परत येईल, मग दुसरी गॅलरीत. (गॅलरीत दुसऱ्या खोलीतूनही जाता येते).
त्या खोलीत इतर असं कुठलंही सामान ठेवलं नाही ज्याची घरात एरव्ही गरज पडेल.

कुणावर राज्य आलं की हॉल मधला स्मार्ट टीव्ही तिथे नेऊन अडकवायचा आणि ज्याच्यावर राज्य आलं त्याने आपले कपडे घेऊन तिथे जायचं एवढंच बाकी होतं.

पण ही वेळ येऊ नये असेच वाटत होते, होप फॉर द बेस्ट, प्रिपेर फॉर द वर्स्ट धोरण.

कित्येक महिने हे मेन्टेन्ड होते. मग डिसेंम्बर जानेवारीत मात्र करोना गेल्यातच जमा समजून तिथे हळुहळू परत पसारा झालाय, आणि राखीव म्हणुन तिथे ठेवलेले इकडे तिकडे वापरल्या गेले.
आता इकडे अजून कमी आहे करोना त्यामुळे अजून परत मनावर घेतलेले नाहीय.