लढाई आणि स्मारक

Submitted by ऋतुराज. on 29 March, 2021 - 05:56

लढाई आणि स्मारक

ही गोष्ट आहे जगातील एका मोठ्या जैविक आक्रमणाची व त्याच्या यशस्वी निर्मूलनासाठी लढल्या गेलेल्या लढाईची. ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड व न्यू साऊथ वेल्स या भागात घडलेली फड्या निवडुंगाच्या उपद्रवी जैविक आक्रमणाची व त्याच्या निर्मूलनाची ही यशोगाथा.

प्रिकली पेअर (Prickly Pear) म्हणजे आपल्या फड्या निवडुंगाच्या (Opuntia) प्रजातीतील काही जाती. हा निवडुंग दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतील स्थानिक वृक्ष आहे. याला काटे (Prickle)असल्याने प्रिकली आणि याचे फळ पेअर सारखे दिसत असल्याने "प्रिकली पेअर" असे नामकरण. या प्रजातीतील फड्या निवडुंगाला पाने नसतात, याच्या पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते याचे हिरवे मांसल खोड हेच पानांचे व खोडाचे कार्य करते. प्रतिकूल परिस्थितीत व पाण्याच्या दुर्भिक्षातदेखील तग धरून वाढणारी अशी वनस्पती असल्याने याचा प्रसार झपाट्याने झाला.

Prickly Pear.jpg

सुरवातीला कॉचिनिअल या रंगद्रव्यासाठी (Dye) याची लागवड केली गेली. कॉचिनिअल हे रंगद्रव्य या निवडुंगावरील एका किड्यापासून मिळते. हे रंगद्रव्य मुख्यत्वे ब्रिटिश सैनिकांच्या गणवेशाला रंगविण्यासाठी वापरण्यात येत असे. या रंगद्रव्याचा उद्योग उभारून त्याची एक बाजारपेठ उपलब्ध करण्याचा मानस होता. ज्यावेळी ही लागवड केली त्यावेळी याच्या आक्रमक प्रसाराबद्दल काहीच माहिती उपलब्ध नव्हती. पण पाहता पाहता शेताच्या बांधावर व कुंपणासाठी म्हणून लावलेला हा निवडुंग शेते, कुरणे, मोकळी माळराने यावर बेफाम वाढू लागला. याची फळे, बिया पक्षी खात असल्याने याचा वेगाने प्रसार होत गेला. तसेच याच्या मांसल खोडाद्वारे देखील याचे पुनरुत्पादन सहज होत असल्याने याचा अधिकाधिक प्रसार झाला. यातील काही निवडुंग तर तीस फुटांहून अधिक उंच वाढले होते. १९२० पर्यंत या निवडुंगाने अक्षरशः लाखो एकर जमीन व्यापून टाकली.

PP Invasion.jpg
.
PP invasion 2.png

तेथील स्थानिक पिके, वनस्पती जवळजवळ नाहीशी झाली. अनेक जमिनी नापीक, पडीक बनू लागल्या. याच्या अश्या आक्रमक प्रसारामुळे त्याच्या निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले परंतु त्यात काहीच यश आले नाही. हे निवडुंग मुळासकट उपटून जाळले, तोडून पुरले तरीही त्यांच्या प्रसारात काहीच फरक पडला नाही. नंतर आर्सेनिक पेंटॉक्साइड व यासारख्या घातक रासायनिक औषधांची फवारणी देखील करण्यात आली परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या निवडुंगाच्या निर्मूलनासाठी घसघशीत बक्षीस सुद्धा जाहीर केले. शासकीय पातळीवर या निर्मूलनासाठी एक समिती देखील नेमली. त्यातील तज्ज्ञांनी देशोदेशी जाऊन जिथे हा निवडुंग स्थानिक व वन्य आहे तिथे त्याचा सखोल अभ्यास केला. अनेक कीटक शास्त्रज्ञांनी दक्षिण अमेरिकेत या निवडुंगाच्या जैविक शत्रूंवर अभ्यास चालू केला. या निवडुंगावर अवलंबून असणाऱ्या अनेक कीटकांचा व त्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास चालू केला. या निवडुंगाच्या जैविक शत्रू असलेल्या जवळ जवळ १५० कीटकांच्या पुनरुत्पादनासाठी अनेक केंद्रे उभारली गेली. या केंद्रात निवडुंगाबरोबरच अनेक पिके, बागेतील वनस्पती व इतर अनेक वनस्पतीवर देखील या कीटकांचे प्रयोग करण्यात आले. निवडुंग सोडून बाकी कोणत्याही वनस्पतीवर याचा हानिकारक परिणाम होत नाही ना, हे पाहणे अतिमहत्त्वाचे होते. प्रयोगाअंती काही कीटकांच्या जाती निर्मूलनासाठी निश्चित केल्या गेल्या. या कीटकांवर ऑस्ट्रलियात आणल्यावरदेखील या सर्व प्रयोगांची पुनरावृत्ती करण्यात आली. काही कीटक हे स्थानिक वातावरणामुळे तर काही इतर अन्य कारणामुळे तग धरू शकले नाहीत.

या सर्वात सरस ठरला तो म्हणजे कॅक्टोब्लास्टस नावाचा पतंग (Cactoblastis cactorum). खास अर्जेंटीनाहून आणलेला हा पतंग या निवडुंगावर खरंच रामबाण उपाय ठरला. या पतंगाची मादी, मिलनानंतर या निवडुंगावर त्याच्या काट्याशेजारी अंडी घालते. ही अंडी एकावर एक अशी चिकटून घातल्यामुळे त्याची एक काडी / दांडी सारखी रचना तयार होते. लांबून ते निवडुंगाचे काटेच वाटतात. एकदा का या अंड्यांतून अळ्या बाहेर आल्या की मग त्या निवडुंगाचा पार फडशा पाडतात. कालांतराने याच्या पुढची अवस्था, म्हणजे त्यांचे कोष तयार होतात. त्यातून पतंग बाहेर पडतात व पुन्हा हे जीवनचक्र चालू राहते. सुरवातीला काही केंद्रावर अशी पंतंगांची पैदास करून ही अंडी गोळा केली जात असत. ती एका सुरळीसारख्या वेष्टनात घालून मग ज्या व्यक्तींच्या जमिनी मोठ्या प्रमाणात या निवडुंगाच्या आक्रमणामुळे प्रभावित झाल्या आहेत अश्या जणांना वाटली जात. ह्या अंड्यांच्या सुरळ्या एकदा का निवडुंगाच्या काट्यांना खोचल्या की मग त्यापुढील काम त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या लीलया करत. प्रभावित क्षेत्रामध्ये निवडुंग मुबलक असल्याने खूप वेगाने या पतंगाचे संक्रमण घडून येई, व निवडुंगाचे समूळ उच्चाटन होई. लवकरच या आक्रमक निवडुंगाची संख्या कमी होऊ लागली आणि हळूहळू ती काही ठिकाणाहून ती पूर्णतः नाहीशी झाली. या जमिनीवर आता स्थानिक गवते उगवू लागली, जमीन उपलब्ध झाल्याने त्यात आता बटाटा, मका, गहू अशी पिके घेतली जाऊ लागली. स्थानिक झाड झाडोरा व त्याच्याशी निगडित जैवविविधता पुन्हा प्रस्थापित होऊ लागली. काही वर्षातच या आक्रमक निवडुंगाचे पूर्णतः उच्चाटन झाले.

CC Moth.jpg
-
CC Eggs.jpg
-
CC Larvae on Opuntia.jpg
-

बरीच वर्षे स्थानिकांची अक्षरशः डोकेदुखी ठरलेला हा निवडुंग नाहीसा झाला हे पाहून येथील लोकांनी क्वीन्सलँडमधील डाल्बी भागात या कॅक्टोब्लास्टस पतंगाचे एक छोटेखानी स्मारक बांधले. तसेच बुनार्गा येथे "कॅक्टोब्लास्टस स्मारक सभागृह" बांधले. त्या इवल्याश्या किड्याप्रीत्यर्थ आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे त्यांचे हे कार्य खरंच कौतुकास्पद आहे. येथील स्थानिक सरकारने या आक्रमक तणाच्या निर्मूलनाची यशोगाथा एका माहितीपटात चित्रित केली आहे.

Monument.jpg
-
CactoblastisHall.jpg
-
तर अशी ही एक अनोखी लढाई आणि अनोखे स्मारक.

सध्या अनेक ठिकाणी वनीकरणासाठी किंवा वृक्षारोपणासाठी बेसुमार विदेशी किंवा अस्थानिक वृक्ष लावले जातात. बरेचदा यांचा इतका प्रसार होतो की नंतर त्यांची संख्या आटोक्यात आणणे अशक्य बनते. उंदीरमारी / गिरीपुष्प, सुबाभूळ हे वनीकरणासाठी वापरलेले काही वृक्ष. गुलमोहर, सोनमोहर, टॅबेबुईया, पर्जन्य वृक्ष आणि अनेक विदेशी/ अस्थानिक वृक्ष रस्त्याशेजारी लावले गेले. गाजरगवत, जलपर्णी व सोनकुसुम (Cosmos) यासारखी अनेक तणे ही आपल्या येथील स्थानिक वनस्पतींना व जैवविविधतेला धोकादायक ठरली तर आहेतच तसेच शेतकऱ्यांसाठीसुद्धा डोकेदुखीची ठरली आहेत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवड करण्यासाठी किंवा वनीकरणासाठी आजूबाजूच्या जैवविविधतेचा योग्य अभ्यास करून शक्यतो देशी किंवा स्थानिक झाडेच लावावीत.

माहितीचे स्रोत:
आंतरजाल
The prickly pear story
माहितीपटाचा दुवा :
https://www.bing.com/videos/search?q=the+conquest+of+prickly+pear&docid=...

सर्व फोटो आंतरजालावरून घेतले आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहितीपूर्ण रोचक लेख.

BLACKCAT ने दिलेली लिंक खुप छान आहे. धन्यवाद.
ऋतुराज ने दिलेला जीवितनदीचा जलपर्णी वरील फिल्म जबरदस्तच आहे. धन्यू

Pages