संगोपनहिताय..

Submitted by रैना on 13 May, 2009 - 17:27

१)
ती लहान असताना तिची नोकरी करणारी आई घरी दोन मुलींसाठी वेगवेगळ्या वेळचे खाऊचे डबे भरून जायची. ते सगळे सांभाळणारी खाऊन टाकायची ! मुलींना न देताच, आणि मुलींना तिने कुठल्यातरी पावरबाज मेरीची शपथ घातली होती ,की भेद केल्यास मेरी आईला हेलमध्ये नेईल म्हणून. हे असं २ वर्ष चाललं. जेव्हा एकदा धाकटीच्या भुकेने पावरबाज मेरीवरच्या विश्वासावर मात केली, तेव्हा तिनी आईला सांगीतले. हे जेव्हा त्या आईला कळले असेल तेव्हा तिच्या जीवाचा किती थरकाप उडाला असेल ?
मोठी झालेली ती मोठी मुलगी आता जवळजवळ विभक्त झाल्यासारखी राहते. नवरा एकीकडे, मुलगा आणि ती आईकडे. कुठल्याही परिस्थितीत डेकेअर किंवा बाई हा पर्याय तिला मान्य नाही.

२)
फार्मा कंपनीचे पाळणाघर. कुठलीही साथ नसताना, थंडीवारापाऊस नसताना फेनर्गानच्या वाढत्या मागणीबद्दल एका डोकं आणि आत्मा ताळ्यावर असणा-या कंपनीच्या वेठबिगारी डॉक्टरणीने केलेल्या वास्तुपुस्तीचा निष्कर्ष - बाळं झोपावीत म्हणून त्यांना दिवसाकाठी काही कारण नसताना दिले जाणारे फेनार्गान.
नेहमी पाळणाघरातून घेऊन जाताना आपलं बाळ मलूल, आळसावलेलं का दिसतं असं एका तरी आईच्या लक्षात आलं असेल ? मोबदल्याविना मिळणारी सोय सोडून पर्याय तरी काय असा विचार त्या आईच्या मनात आला असेल ?

३)
सांभाळायला ठेवलेल्या अडाणी बाईने सावळ्याश्या मोठीच्या मनात "कस्ली काळीबिद्री हाये. धाकली कस्ली गोरीपान- गुनाची ग माजी बाय" भरवलं. भरीस भर म्हणून धाकटीला साय आणि मोठीचा लाडु अशी परस्पर विभागणी सुरु केली. "तुला तयार करुन उपेग काय ?" असंही ऐकवण्यत येऊ लागलं.
त्या सावळ्याश्या मोठीच्या आत्मभानाच पुढे काय झालं असेल ? तिच्या आईला हे समजेपर्यंत जो काळ गेला त्याचे काय ?

४) कुठल्यातरी तालुक्याच्या गावात सरकारी इस्पितळातील कर्मचा-यांचे सरकारी निवासस्थानं. बायको इस्पितळात गेली कॉल अटेंड करायला, की नव-याने पोरं सांभाळणारीला आवाज दिलाच. वर पोरांच्या खोलीला कडी लावून बाई खाली.. आख्ख्या गावाला माहीत असणारी कथा बायकोला दिवसरात्रीच्या रुग्णसेवेच्या धबडग्यात कधी कळली ? कळल्यानंतर......... ? भर दिवसा, रात्री, अपरात्री, वेळी अवेळी येणा-या हाकेचा आणि दाराला बाहेरुन बसणा-या कडीचा पोरांवर काय परिणाम झाला असेल ?

५) घरी कटा़क्षाने दूरचित्रवाणी न पाहणारे आईबाप. पोरांच्या शब्दसंपदेत अचानक "देखो देखो गिरीजाघर " सारखी भाषांतरीत हिंदीतली अगम्य वाक्य का येताहेत यावर कधी विचार करतात ? मोठ्ठ्याला एकदम धाकट्याच्या डोक्यात हातोडी घालून टॉSSSSSय असे ओरडावेसे का वाटते , ह्याचा विचार कधी करतात ? विचार केल्यावर पुढे काय करतात/ करावे ?

६) धरी मुलगा आणि मुलीला समान वागणूक देणा-या आईबापांच्या पदरात एकदम -" आई तो बॉय आहे म्हणून त्याची प्लेट मी उचलली " हे वाक्य कसं पडतं ?

७) पाचेक वर्षाच्या दादाला , नवीन आलेल्या इवल्याश्या बाळाला कपाटात लपवून ठेवावसं का वाटंत ?

८) घरी छोटा मुलगा एकदम विचित्र खेळ खेळण्याचं मूळ सजग आईला, त्याची मैत्रीण पाळणाघरात भलतेच खेळ खेळण्यात असल्याच समजलं. तिनी रीतसर तक्रार केली. अवघड जागेचं दुखणं ! बाई आईला बोलवून घेतात. आई त्यावर महानगरातल्या जागेची टंचाई वगैरे ओशाळ्या गोष्टी सांगते.
सजग पण पर्याय नसलेल्या आईनी काय करावं ?

९) सरकारी आदेशानुसार मिळणा-या शाळेतील खिचडीनी मुलाचं भयंकर पोट दुखतं. त्यालाच न देणे, शाळेच्या नियमात बसत नाही.

१०) आज पोराला पाळणाघरात कोणी सोडायचं म्हणून रोज नवरा बायकोचं भांडण पोर येऊन पाळणाघरातील काकूंना सांगतो. त्याला एकदा का भाजीच्या जड पिशवीसारखं पाळणाघरात आदळलं की पालक घोड्यावर निघून जाणार. पोराला पाळणाघरातून नेताना पुन्हा तमाशे. "काकू मी आवडत नाही का ग त्यांना? आज मला घरी नको ना ग पाठवू"

आपल्याला काय वाटतं ?
आपल्या सर्वांच्या हाती काही हितावह आणि काही भयावह लागलं तर ते वाटून घेऊयात. विचारांना आणि कृतीला चालना मिळाल्याशी कारण.

_______
प्रेरणास्रोत- पूनमच्या रंगीबेरंगीपानावरील चर्चेनी आणि तिथे मांडल्या गेलेल्या अनुभवांनी विचारांना चालना दिली.
http://www.maayboli.com/node/7785

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर किस्से आहेत हे.
डे-केअर सेंटर मधे पूर्वसूचना न देता कधीही जाउन चेक करण्याचे अधिकार पालकांना असतात त्याचा वापर करायलाच हवा असे मला वाटते. १, २, ५, ८ सारख्या गोष्टी लौकर कळतील.

बापरे. वाचून अंगावर काटा आला. खरच अधुन मधुन पालकांनी पाळणाघरात चक्कर मारायला हवी. काही गोश्टी लवकर कळतील.

बापरे.
विचित्र खेळ खेळण्याचं मूळ >> बिलीव्ह इट ऑर नॉट असा खेळ एका मुलाचा मी पण पाहीला. तो देखील पाळनाघरात न जाणार्‍या. उडालोच होतो. फरक इतकाच की अंगावर कपडे होते. शेजारच्या काकुंना सांगीतल्यावर त्यांनी त्या सख्या बहिण भावांना धोपटले होते. त्याने काही झाले असेल असे तेंव्हा वाटले नाही.
पण हे पालकांच्या लक्षात कसे येत नाही? मान्य की अडचणी आहेत, पण लहान मुलं झोपल्यावरही काळजी ही घ्यायलाच हवी. (ही कॉमेंट टाकावी की नाही हा विचार केला पण जनहिताय वाटले म्हणून टाकलीच.) ह्या साध्या गोष्टीकडे दुर्लक्ष कसे होते लोकांचे?

एका चांगल्या विषयाला हात घातलास. अर्थात चर्चा करुन फायदा नाही म्हणनारे आहेतंच, पण येथे वाचन करनार्‍यांना निदान हे वरिल उदा.वरुन (खेळाचे) योग्य तो बोध घेता येईल.

खरंच भयानक आहेत एकुणएक प्रसंग!

निषाद ७-८ महीन्याचा झाल्यावर पुन्हा IIScला जाणं सुरु करावं ह्या उद्देशानं त्यातल्यात्यात घराजवळचं एक पाळणाघर बघायला गेले. बाहेरून घर अप्रतीम सुंदर. आत गेल्यावर मुलांकरता असलेल्या ३-४ खोल्या, अगदी उत्तम सजवलेल्या. सगळी खेळणी छान दिसली. ३-४ मुलींचा ताफा पोरं सांभाळायला होता. मग डायनिंग एरियात येऊन बघीतलं. सगळीकडे कमालीचा गलिच्छपणा, विचित्र वास. एक ते तीन वयोगतातली ५-६ मुलं जेवायला बसलेली. त्यातली दोन बिचारी भोकाड पसरून रडताहेत. सगळ्यांसाठी एकाच ताटलीत कालवेला दहीभात एक मुलगी हातानी सगळ्या मुलांना भरवत होती. Sad रडणार्‍या पोरांच्या तोंडातून घास खाली पडंत होते. आणि तरिही दटावून नवे घास कोंबल्या जात होते. हा सगळा प्रकार बघून तेच काय मला दुसरं कुठलही पाळणाघर बघण्याची हिम्मत झाली नाही.

च्च, शी...मृ, कुणाला वाटेल अश्या ठिकाणी मुलाला ठेवावं?
मुलांना बाहेर ठेवायला सुरु करणं म्हणजे आपल्यालाच टेन्शन असतं. मी हल्लीच मुलाला शाळेत पाठवायला लागलेय. जाताना तर एकदम खूष असतो. पण आणायला जायला ५ मिनिटं जरी उशीर झाला तरी त्याचा आनंदी मूड पालटतो. सगळी मुलं आपापल्या आयांबरोबर घरी जाताना बघतो. आणि मग टिचरला आई कधी येणार असं विचारुन भंडावून सोडतो.

रैना, भयानक उदाहरणं आहेत. असं कुणाच्या वाट्याला न येवो.

माझा लहानपणीचा(२ वर्षाची असताना गोष्ट) किस्सा असाच थरकाप उडवण्यासारखा होता/आहे. मला सांभाळणार्‍या बाईने कानातील छोट्या रिंगा ओढून काढताना कान फाटला होता. तीन टाके पडले होते. बाई चोरी करून त्याच दूपारी गायब जो पर्यन्त आई हॉस्पिटातून परत येइपर्यन्त. बांईचे गाव माहीत असून सुद्धा शोध काही लागला नाही. Sad मग आईने काही वर्षे घरात रहाण्याचा निर्णय घेतला(घ्यावा लागला प्रॅक्टीस सोडून) लगेच. Sad
ह्यानंतर भले बाई घरात सांभाळत असेल तरीही मग आईने आम्हाला साधी बांगडी ही घातली नाही जर ती आजू बाजूला नसेल तर. नंतरच्या आजी शोधून बरीच माहीती काढून ठेवल्या होत्या. आईने सुद्धा आम्हाला बरेच ट्रेंनिंग दिलेले होते कसे लक्ष ठेवायचे. कोण आले गेले दुपारी. त्या वेळात काही आवडले/आवडले नाही तर एका वहीत लिहायचे मग मम्मा बक्षिस देणार असे ती सांगायची. मी त्यात बहीणीने माझ्या वाटणीचे चॉकलेट खल्ले हे आधी लिहिले होते Happy असो.

पाळणाघरात ठेवत असाल मूल तर हातात कानात कुठलेही किमती काही घालू नये. घड्याळ सुद्धा नाही. भले खेळण्यातले असले तरी रिक्षा ड्रायवर (शाळेत सोडतना ठेवलेला रिक्षा चालक, सांभळणारी बाईचा नातेवाईक ह्यांची नजर) जावू शकते.

मला आजही आठवते मला शाळेत सोडणार्‍या बाईने धमकी देवून मला दिलेले पैसे काढून घेतले होते. बर्‍याच दिवसाने मी मग आईल सांगितले. तेव्हा कधी कधी भितीने मुले गप्प बसतात. तेव्हा शाळेत सोडण्यार्‍या बाई, सांभाळणारी बाई, पाळणाघर ह्यांची खबर घेणे चांगले असतेच. सांभळण्यार्‍या बाईला सांगून ठेवलेले बरे की तुझे कुठलेही नातेवाईक घरात आलेले चालणार नाही. मुलांना तशी समज द्यावी की घरी कोण कोण आले होते दुपारी वगैरे.

बापरे... वाचूनच थरकाप उडाला.
आपल्याकडे अजूनही घरून काम करण्याची सोय का नाही?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मला तर वाटतं की ज्या आई-वडिलांना परवडत असेल, त्यांनी मुलं अगदी लहान असताना एकाने तरी घरी राहावं. पण ज्या घरी दोघांनाही नोकरी करणं भाग आहे, त्यांच काय?

बापरे! किती भयानक किस्से! Sad

शक्य असल्यास मुलाला सांभाळायला बाई आणि देखरेख करायला आजी आजोबा हा ही एक चांगला पर्याय ठरू शकतो. म्हणजे आजी आजोबांना त्यांच्या वयाला न झेपणारी धावपळ करायला नको आणि परक्या बाईवर देखरेखही झाली.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

रैना,
खुप महत्वाच्या विषयाला हात घातल्या बद्दल धन्यवाद.

**************************
काढ सखे, गळ्यातील तुझे चांदण्याचे हात
क्षितीजाच्या पलिकडे उभे दिवसाचे दूत

खरच महत्वाचा विषय आहे. मुलाच्या जडणघडण होणार्‍या वयात हे सर्व प्रकार त्यांच्या मनात बिंबवले जातात.

आम्ही आधीच ठरवलेले की पाळणाघर वापरायचे नाही. देवाच्या कॄपेने आम्हाला मुलाना सांभाळायला चांगली मुलगी मिळाली त्यामुळे प्रश्न्न मिटला.

खरच चांगल्य विषयाला सुरुवात.

आम्हीही असे अनुभव घेतलेत मुलाच्या पाळणाघराच्या बाबतीत.

१. पहिल्या पाळणाघरात त्याला सोडायला जातांना तो किंचाळून रडायचा, सुरुवातीला वाटल, रुळेपर्यंत वेळ लागेल. तेव्हा तो नुकताच थोडा थोडा बोलायला लागला होता. घरी आल्यावर भाभी ( त्या बाईंना म्हणत ) अस म्हणून पाठीवर मारल्या सारख करायचा. त्यांना विचारल तर म्हणत, आम्ही नाही मारत. एकदा नवर्यानी मुलाला सोडल, नेहमी प्रमाणे तो रडत होता, म्हणून हा बाहेर थांबला, ५/१० मि. नंतर पण रडण्याचा आवाज थांबेना, तेव्हा नवर्यानी दार ढकलल ( नशी ब दार उघडच होत ), तेव्हा त्या बाईंच्या एका हातात काठी आणि दुसर्या हातात मुलाचा हात !!! नवर्याला धक्काच बसला.. त्याक्षणी तिथून मुलाला उचलल...

२. नंतरच पाळणाघर खूप चांगल होत, स्वच्छता, टापटीप , बाईपण प्रेमळ होत्या, पण अतिशय शिस्त.. त्यांचा नवरा झोपलेला असतांना, मुलीच्या ट्युशन्स चालू असताना मुलांनी एका कोपर्यात लाईन करुन बसून रहायच... काहीही न करता !!!!

३. नंतर घर बदलल, पाळणाघर पण बदलाव लागल.. तिथे वरण भात त्या भरवायच्या, एकदा काही कामानिमीत्त, दुपारी तिकडे गेले, तर मुलगा 'वाटीत' भात खात होता!!! अंगावर युनीफॉर्म ( शाळेत जायला १ तास होता ) त्यावर भात सांडलेला...
अतिशय अजागळ कारभार.. सकाळी व्यवस्थित भरलेली पिशवी संध्याकाळी आम्हीच तिकडे मुलांच्या वस्तू, कपडे शोधून भरुन घ्यायची..
बाई औषध कशी द्यायची हे त्या बाईंना समजवून सांगतांना मला नाकी नऊ आले.. भरीस भर म्हणून त्यांना वाचता पण येत नव्हत..!
आता त्या बाईंकडे म्हणे १६ मुल आहेत, त्यात ३ पाळण्यातली बाळ, आणि सांभाळायला ११ वर्षांची मुलगी!!!
तिथे वाहता रस्ता जवळच होता, एकदा माझा मुलगा खेळता खेळता मित्राच्या बरोबर रस्त्यावर निघून गेला, मग शेजारी राहणार्या बाईंनी रागावून त्यांना पाळणाघरात सोडल, बाईंना विचारल, तर वर म्हणाल्या, तुमचा मुलगा आता मोठा आहे, कळायला पहिजे त्याला रस्तावर जाऊ नये म्हणून....

नोकरीबरोबर पाळणाघर अध्याय पण संपला... नशिब ..........

रैना, खरंच ह्या विषयावर विचार सुरू केलास त्याबद्दल तुझे आणि पूनमने ह्या विषयाची सुरूवात केलीस म्हणून तिचेही आभार.

भारतात खरंच पाळणाघर ही एक बर्‍यापैकी मोठी समस्या आहे. कारण त्याबाबतीत कसलेच नियम नसल्यामुळे कोणीही उठावं आणि पाळणाघर सुरू करावं असा प्रकार आहे. अर्थात जसे याचे तोटे तसे फायदे सुद्धा आहेत. कधीकधी पाळणाघरातील बाई सुद्धा आईच्याच ममतेने मुलांचं करतात असं मी बघितलं आहे.
या बाबतीतला माझा अनुभव मी सांगते. माझ्याकडे आजी-आजोबा हा पर्यायच नसल्यामुळे मुलीला पाळणाघरातच ठेवायचं ही माझं पहिल्या दिवशीपासूनच ठरलं होतं. तेव्हा आधीपासूनच मी वेगवेगळ्या पाळणाघरांची माहिती गोळा केली होती. तेव्हा मी पाळणाघरं shorlist करताना माझा प्राधन्यक्रम ठरवला होता
१. पाळणाघरात स्वच्छता, व्यवस्थितपणा असलाच पाहिजे. तसंच माझ्या बाळाची तिथे मायेने काळजी घेतली पाहिजे. पाट्या टाकणे हा प्रकार नको.
२. पाळणाघर घरापासून फार लांब नको.
३. पाळणाघरात नेण्या-आणण्याच्या वेळेत थोडी तरी flexibility पाहिजे. कारण ट्रॅफिक जाम/ ऑफिसात ऐनवळी आलेलं अतिमहत्त्वाचं काम ह्या गोष्टी ना टाळण्यासारख्या आहेत.
४. याशिवाय जर पाळणाघरात पौष्टीक आहार देत असतील तर आवडेल ज्यामुळे मला सकाळी ७ च्या आधीपासून चार वेळचे डबे भरून द्यायला नकोत. पण ही बाब तितकी महत्त्वाची नाही. पाळणाघरात बाकी सगळी सोय चांगली असेल तर ही सोय नसली तरी चालेल.

लेक सहा महिन्यांची झाल्याशिवाय पाळणाघरात ठेवायचं नाही हे ही आधीच ठरवलं होतं. त्याप्रमाणे पगारी/ बिनपगारी रजाही घेतली होती. माझी लेक ५ महिन्यांची झाल्यावर मी एकेका पाळणाघरात जाऊन भेटून आले. त्यांचे नियम/ अटी सगळं समजून घेतलं. त्यांना माझ्या अपेक्षा काय आहेत ते सांगितलं. पाळणाघराचं साधारण बाह्यरूप तर एका नजरेत आपल्या लक्षात येतं. पण तिथे मुलांची काळजी कशी घेतात हे कळण्यासाठी आधीच ज्यांची मुलं त्या पाळणाघरात आहेत त्या पालकांशी बोलले.

मग ह्या सगळ्यावरून लेकीला कोणत्या पाळणाघरात ठेवायचं हे निश्चित केलं. आणि नशीबाने ते खूपच चांगलं मिळालं. की जिथे मुलांची नुसती काळजीच घेत नाहीत तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी पण मनापासून प्रयत्न करतात. शिवाय पूर्ण आठवड्याचा मेनू सोमवारीच बाहेर लिहिलेला असतो. त्याप्रमाणे आपल्या मुलाला एखादा पदार्थ चालत नसेल तर आपण त्यांना तशी सूचना देऊ शकतो आणि त्यावेळेचा डबा मुलांबरोबर देऊ शकतो.
अर्थात ते पाळणाघरही perfect आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. ह्या पाळणाघराला बँकेप्रमाणे सर्व सुट्ट्या असतात. आणि तशा कोणत्याच कंपनीला नसतात. शिवाय एखाद्या मुलाला जरा बरं नाहीसं झालं की लगेच घरी घेऊन जाण्यासाठी फोन येतो (हे आपल्या मुलांसाठीच आहे. एका मुलामुळे बाकीच्या मुलांना infection होऊ नये म्हणून). तेव्हा थोडी गैरसोय होते. त्यांचा दरही तसा जास्त आहे. पण ठीक आहे. निदान जेव्हा माझी लेक तिथे असते तेव्हा मला तिची अजिबात काळजी वाटत नाही.

मुलांसाठी चांगली सोय शोधणं आज आपल्यापैकी बर्‍याच जाणांची गरज आहे. मला वाटतं की प्रत्येकच जण आपल्या घरची परिस्थिती आणि उपलब्ध असणारे पर्याय यांचा विचार करून best possible solution निवडत असतील
========================================================
रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती मातीचे मम अधुरे जीवन

बापरे भयानक आहेत एकेक अनुभव.. Sad सरप्राईज भेट देऊन योग्य वाटल नाही तर पा.घर बदलावं हेच खरं. आजीआजोबा असतील तर घरी ठेवण्याइतकं सुख नाही.. एखादी मुलगी मदतीला ठेवावी वाटलं तर. आर्थिक दृष्ट्या शक्य असेल त्या आयांनी मुल निदान ६-८ म. होईपर्यंत रजा घ्यावी हाही पर्याय योग्यच. एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. ओळखीच्या एखाद्या बाईंकडे ठेवणे ह्याही पर्यायाचा विचार करावा. म्हणजे ज्यांचा पा.घर हा व्यवसाय नाही, पण कुटुंबाकडे आपलं खुप जाणंयेणं आहे. आम्ही दोघी बहिणी लहान असताना (मोठी ५ अन मी ३) आईबाबा बीएड करत होते तेव्हा ती आम्हाला ५-६ तास घरमालकिणबाईंकडे ठेवायची. Happy त्यांची मुले ३ - मोठी कॉलेजात, धाकटा ७ वीत अन धाकटी ४ अस काहीतरी होतं.. Happy त्या बाई इतक्या चांगल्या होत्या की बहिण तर शाळेत जायची तर आपल्या माहेरी मला घेऊन जायच्या. Happy असो . कुठच्या कुठं भरकटले.. तर सांगायचं तात्पर्य अशी काही सोय होतेय का ते पण पहावं, पा. घर नसेल तर.. अन शेजारी चांगले असतील तर ७-८ वर्षाचं मुल झालं की घरी ठेवता येत.. Happy

वर लिहिले गेलेले प्रश्ण आहेतच! पण पालक सजग असतील तर परिस्थितीत हळू हळू का होईना, बदल होत जातोच, कारण ग्राहक राजा आहे
वरील उदाहरणावेगळे एक उदाहरण
सासूशी पटत नाही, सासू आवडत नाही, घरात जाऊदेखिल असताना, त्यान्च्याशी फटकुन एकाच घरात वेगळी चूल मान्डून रहाणार्‍या एका "आईने" सासूजावेची "सावलीदेखिल" आपल्या पोरावर नको म्हणून आपले अडिच्/पावणेतीन महिन्यान्चे बाळ पाळणाघरात ठेऊन, त्यावेळात ब्युटीपार्लरचा कोर्स केल्याची सत्यघटना मला माहीत आहे! (विशेष म्हणजे, त्या पाळणाघराच्या बाई येवढे छोटे बाळ ठेऊन घ्यायला नकार देत होत्या, तर जवळपास जबरदस्तीने, वेळेस घरातील खोट्यानाट्या कागाळ्या सान्गुन, सहानुभुती निर्माण करुन ते बाळ त्यान्च्याकडे ठेवले गेले, वर आजुबाजुला जाहिरात की बघा, मला येवढेस्से बाळ पाळणाघरात ठेवावे लागतय! एकेक मनुष्यस्वभाव, दुसरे काय?)
या पोस्टच्या शेवटी एक मोजक्या शब्दातील वाक्य टाकणार होतो, पण महत्प्रयासाने तो मोह आवरलाय!

आपल्याकडे अजूनही घरून काम करण्याची सोय का नाही? >>>> भारतात नोकरी करताना मी बरेचदा बघितलय की कुणी बाळाला बरे नाहीये म्हणुन रजा मागितली, घरी लवकर जायचे म्हंटले की बॉस नाक मुरडतात. एक महाभाग असाही बघितलाय जो एका कलिगविषयी, "जमत नाही तर येतात कशाला नोकरी करायला ? "आमची" एक जागा अडवायला" इ इ बोलला होता. त्यामुळे अशा आयांच्या गरजा accommodate करुन घरुन काम करुन देण्याची सोय किती कंपन्या करतील ? त्यातल्या त्यात आय टी कंपन्यांमधे सोय असते असा माझा अनुभव.

वरील सर्व अनुभव भयानक आहेत. कुणावर अशी वेळ न येवो.

लिंबुदा, प्रत्येक घटनेत प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक बाजू असते. त्या आईला पण असेलच तिची अशी बाजू. तसे बघायला गेले तर अडीच महिने काय आणि सहा नी आठ महिने काय, मुलांना ८-१० तासांहुन अधिक काळ आईपासून अलग ठेवण्याचे वय नाहीच मुळी. पण माझ्यासहीत अनेक आया ठेवतातच ना.

रैना, हितावह आणि भयावह - दोन्ही हाती लागलं. भयावह फारच. आपल्या कल्पनेतही येणार नाहीत अशा गोष्टी चालतात जगात. विषय पाळणाघरांवरून निघाला आहे, पण आपलं मूल घराबाहेर कुठेही (आणि कोणत्याही वयाचं असलं तरी) जाताना त्याच्या वाटेत काय येईल आणि काय नाही याची काळजी आईबापांना वाटत असतेच. वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे आपण शक्य त्या प्रकारे देखरेख ठेवणं, मुलांकडून मिळणार्‍या 'सिग्नल्स'ची नोंद घेणं आणि मुळात आपल्या अपेक्षांबाबत आपण क्लीअर असणं - इतकंच सुचतं मला.

अपर्णाची निर्णय घेण्याची पद्धत आवडली.

सगळ्यांनीच आपले अनुभव/प्रतिक्रिया मांडल्याबद्दल धन्यवाद. पुढच्यास निदान वेगळी ठेच तरी लागावी..
स्वाती- अगदी. अगदी. There is no option to eternal vigilance when it comes to your own or anyone else's children for that matter. Also, there are some things that just can't be outsourced no matter how good the caregiving person/institutions are.
पूर्वी मला वाटायच काय उगीच लोकं कीस पाडतात. मग विश्वास तरी कोणावर ठेवायचा? सगळेच काही इतके वाईट नसतात वगैरे. पण आता हे सगळं अगदी अवतीभवतीच्यांनी सांगीतल्यावर असं वाटतं की कोणाच्याही चांगुलपणावर भाबडेपणानी विश्वास ठेवायचा नाही,आणि मुख्य म्हणजे स्वतःवर, मिळणा-या Signals वर विश्वास ठेवायचा. (वर्ल्ड व्हियू गेला खडड्यात.)

-काल सीमाने एक खूप मुद्देसूद यादी टाकली होती- पाघं शॉर्टलिस्ट करायला. सीमा- प्लीज इथे टाकशील का?
- मला मनुच्या आईच्या ट्रिक मधून, आणि अपर्णा, सुरभि, मृ, मनू च्या अनुभवातून खूप शिकायला मिळाले. लिंबू म्हणतायेत तशाही केसेस आहेतच. आणि मीराला आलेला अनुभव तर चांगलाच आहे.
-केदार मीही ते लिहीताना ७० वेळा तरी वाचले. शेवटी विषयाला धरून म्हणून ठेवले.
- नीधप, सायो, फारेंड, चेतन, मनू, आयटे, भाग्या, फुलपाखरू अजूनही ३ तरी असे ऐकीव अनुभव आहेत, की जे मला अक्षरशः लिहीवत नाहीत. पुढील चर्चेचा टोन पाहून ठरवेन टाकायचे की नाही ते.
- सिंडी- खरंय. ही मुक्ताफळं ब-याचदा ऐकलीत. पण बायकाही कधी कधी भारतात अती सवलती मागतात असं वाटतं.

मला आख्खा बाफच शिकण्याचा आहे. जर आणि जेव्हा वेळ येईल तेव्हासाठी.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

>>>अजूनही ३ तरी असे ऐकीव अनुभव आहेत, की जे मला अक्षरशः लिहीवत नाहीत.

बापरे, म्हणजे अजून भयानक अनुभवांची पोतडी पूर्ण उघडलीच नाहीये तर.

आपल्याला नुस्तं वाचून काटा येतो अंगावर. तर त्यातून प्रत्यक्ष गेलेल्या मुलांचं नी आईवडिलांचं काय होतं/झालं असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. चांगुलपणावर सहजासहजी विश्वास बसेल त्यांचा?

मुलं कदाचित कालांतराने विसरून जात असतीलही पण पालकांचा उडालेला विश्वास पुन्हा लवकर बसणं कठीण. कुणावर विश्वास ठेवायचे दिवस राहिले नाहित हेच खरं.

माझा मुलगा १.५ वर्शाचा आहे. तो सहा महिन्याचा असताना आम्ही ३ महिन्यांसाठी भारतात गेलो होतो.परत तोक्यो ला जाऊन नोकरी सुरु करायचा विचार होता त्याच्या आधी त्याला थोडी सवय व्हावी म्हणून तिथल्या एखाद्या पाळणाघरात १-२ तासांसाठी घालावे असे ठरवले.घराजवळ ची काही पहात असताना असेच काही अनुभव आले. सगळ्यात आधी त्या घरातली स्वच्छता बघूनच अंगावर काटा यायचा.मुले घरात असतील तर पसारा थोडी घाण होनार हे कितीही मान्य केले तरी तिथला प्रकार वाईट होता.एका घरात(घर कसले छोटा फ्लॅट होता) तर मोठे कुत्रे होते.मुले त्याच्या अंगाला हात लावत लावत हातातले बिस्किट खात होती.आणि चालवणार्‍या बाई आत स्वयपाक करत होत्या. एका ठिकाणी कामवाल्या म्हातार्‍या बाईवर मुले सोपवली होती आणि त्या बाई स्वतः टिव्ही पहात जेवत होत्या. कामवाल्या म्हातार्‍या बाई मुलांवर यथेच्छ ओरडत होत्या.ते पण अरे मेल्या पळू नको टकुरं फुटेल वगैरे.....शेवटी विचार रद्द केला आणि आमच्या स्वयपाकाच्या बाईंच्या मुलीला (वय १६) जरा वेळ बघ असे सांगितले.पण ती अखंड त्याला कडेवर घेऊन फिरायची जोडीला करमणूक म्हणून हिंदी सिनेमातील गाणी. वाटले भारतात खरच जर वेळ आली तर अवघड आहे.जपान मधे मुलगा आत ज्या डे केअर मधे जातो तिथे कमालीची स्वच्छता आहे आणि काळजी पण खूप घेतात. तिथे सोडून जाताना त्याची कळजी वाटत नाही. आणि मुलगा पण खूष असतो.पण खरच चांगली पाळणाघरे ही गरज आहे. बर्‍याचदा घरची बाई पैशासाठी ते चालवत असते आणि मग मुलांकडे प्रेमाने पहाण्याऐवजी दुर्लक्श केले जाते.

सुदैवाने मला आलेला पाळणाघराचा अनुभव चांगलाच आहे. माझी मुलगी ५ महिन्याची झाल्यावर आम्ही तिच्यासाठी पाळणाघर शोधायला लागलो. घरी सासू-सासरे आहेत, पण वयोमानानुसार एवढ्या तान्ह्या बाळाचं दिवसभर सगळं करायचं त्यांना शक्य नव्हतं. घराजवळच पाळणाघर हवं म्हणजे ते दोघे तिला कधीही सोडू शकतील आणि घेऊन येऊ शकतील अशी योजना होती. आणि पाळणाघराच्या काकू शक्यतो 'ब्राम्हण' असल्या तर बर्‍या अशीही सासूबाईंची इच्छा होती. त्यानुसार आमच्या बिल्डिंगच्या समोरच एक बाई होत्या. त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी अगदी मोकळेपणी आम्हाला सांगितले की माझ्याकडे एक ११ महिन्याचा मुलगा आहे, त्यामुळे एवढं लहान बाळ मला झेपेल असं वाटत नाही. त्यांच्या नवर्‍याचा त्यांच्या संसाराला काडीचाही हातभार नव्हता, त्या काकूंच्या कमाईवरच त्यांचं सगळं घर चालत होतं, तरीही त्यांनी आपल्या हातून बाळाचं नीट करून होणार नाही हे ओळखून आम्हाला 'नाही' म्हणून सांगितले. त्या बाई आजही रस्त्यात भेटल्या तरी ओळख दाखवतात, मुलीची चौकशी करतात.
आम्ही त्या जागेत नविनच रहायला गेलो होतो. आम्हाला असं कळलं होतं की आमच्याच बिल्डींगमध्ये एक काकू मुलं सांभाळतात,पण त्या 'ब्राम्हण' नव्हत्या म्हणून सुरुवातीला आम्ही त्यांच्याकडे विचारायला गेलो नव्हतो. पण ह्या काकूंनी 'नाही' सांगितल्यावर त्यांना विचारलं आणि त्या 'हो' म्हणाल्या. त्यांनीही मला स्पष्टपणे सांगितलं की माझ्याकडे सगळी शाळेत जाणारी मुलंच आहेत. एवढं लहान बाळ मी अजुन कधी सांभाळलं नाहीये. मी माझी तीन मुलं मोठी केली तरीही आता बर्‍याच गोष्टी मला विसरायला झाल्या आहेत. जर का काही चुकतंय, किंवा विसरलं जातंय असं तुला वाटलं तर अगदी मोकळेपणी मला सांग. पण तसं काही सांगायची मला कधी वेळ आलीच नाही. त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा माझ्या मुलीला एवढा लळा लागला की रविवारी सुद्धा ती वर जाऊन खेळून यायची. ती घरात आमचं काही ऐकत नाहीये, जेवत नाहीये, माझा आवाज चढला आहे Happy हे त्यांना ऐकू गेलं तर त्या लगेच येऊन घेऊन जायच्या. तिला कडेवर घेऊन देवपूजा करायच्या. इतर मुलांबरोबर मुद्दाम वाटीतून खायला द्यायच्या कारण ती लवकर स्वतःच्या हाताने खायला शिकावी म्हणून... आता मुलगी मोठी झाली. आम्ही घर बदललं. ती आता आजी-आजोबांजवळच असते, तिला बघायला एक मुलगी मला मिळाली आहे. पण अजुनही तिला त्या काकूंची खुपच आठवण येते. मग ती फोन करायला लावते आणि त्यांची मुलं येऊन घेऊन जातात आणि घरी आणूनही सोडतात. जरी हे पाळणाघर घरगुती स्वरुपाचं असलं तरी मला अतिशय चांगला अनुभव आहे.

अपर्णा अगदी मी देखील सानिकाला पाळणाघरात ठेवण्यापुर्वी घरात चर्चा करुन एकमताने प्रेफरंस लिस्ट बनवली. त्यानुसार चौकशी करुन स्वतः भेट देऊन मग पाळणाघर निवडले. अर्थात सगळ्या अपेक्षा पुर्ण होत नाहीत तरी प्राधान्य क्रमात वरच्या स्तरावर असलेल्या अपेक्षा पुर्ण होतील हे बघितले.

निधप, घरात आजी आजोबा असतील तर एखादी बाई देखरेखीला ठेवावी हे उत्तमच पण ते प्रत्येक घरात प्रॅक्टीकली इफेक्टीव्ह होतच अस नाही. सानिका दिड ते ४ व. होई पर्यंत पाळणाघरात जात होती. सध्या आजी आजोबांच्या बरोबर घरीच असते. त्यांना पुर्ण वेळ तिच करुन दमणुक नको म्हणुन एक बाई बघत होतो, सुरुवातीला एक थोडी मोठी मुलगी बघीतली तर सानुबरोबर तिच पण त्यांना बघाव लागायच, मग एक थोड्या मोठ्या वयाच्या बाई पुर्ण वेळ्/अर्धा दिवस बघायच ठरत होत पण आजी आजोबांना पण खुप अवघडलेपण वाटत होत, त्यांना केर लादी करणारी बाई घरात असताना पण चहा-ब्रेकफास्ट जात नाही (तिला ब्रेकफास्ट देऊन सुद्धा) चोरट्या सारख होत त्यांना. म्हणजे आपल्याला बाई मदतीला ठेवण्याचा पर्याय सोयीचा वाटला तरी ज्यांच्या बरोबर ती बाई दिवसभर रहाणार त्यांना पण ते सोयिस्कर वाटायला हव. आता तिची शाळा सुरु असताना अर्धा वेळ शाळेत जातो, दुपारी जेवुन झोप होते मग २-३ तासांसाठी काय असा प्रश्न पडतो, सध्या एक अ‍ॅक्टीव्हीटी क्लास लावलाय (सुरुवातीला मला अशा क्लास मधे अडकवुन टाकायला नको वाटत होत पण मग मी माझा दॄष्टीकोन बदलला. शिकायला पाठवायचच नाही/ खुप काही शिकुन याव ही अपेक्षाच नाही फक्त समवयस्क मित्र मैत्रिणींबरोबर धम्माल करुन यायच) तिथे नियम असे खुप नाही आहेत, मनात आल तर एखादा चित्र काढतो, मनात आल तर हस्तकला शिकतो, गृपचे खेळ, गाणी होतात, दर शुक्रवारी एक अ‍ॅनिमेशन फिल्म किंवा प्राण्यांवरचा चित्रपट दाखवतात.
ज्या पालकांना फक्त २-३ तासासाठी मुलांना ठेवाव लागत असेल (घरात आजी आजोबा असतील आणि घरी देखरेखी साठी बाई ठेवण सोयोस्कर नसेल त्यांना दृष्टीने तर असा एखादा क्लास, संस्कार वर्ग अशा पर्यायाचा विचार करायला हरकत नाही)

बाकी भयानक अनुभवांबाबत येव्हढच वाटत, आपणच जास्तीत जास्त सजग व्हायला हव. ह्याचा अर्थ प्रत्येका कडे संशयानेच बघायला हव अस नाही तर आपल्या मुलांना सोप्या शब्दात काही गोष्टींची जाणिव द्यायला हवी. मुळात वर सगळ्यांनी म्हंटल्या प्रमाणे "सिग्नल्स" ओळखता यायला हवेत. मुलांना आपली भिती वाटत नसेल, आपला त्यांच्याशी चांगला संवाद असेल तर मुलं आपल्याशी मोकळे पणाने बोलतात ज्यातुनच हे "सिग्नल्स" मिळु शकतात.

माझी मुलीलाही वयाच्या तिस-या वर्षापासुन पाळणाघरात ठेवावे लागले.. पेपरमधल्या एकेक बातम्या वाचुन माझ्या मनात असंख्य भिती.. वरच्या विचित्र खेळाच्या प्रकारासारखा पण वेगळा प्रकार माझ्या एका मैत्रीणीच्या मुलीबाबतीत घडल्याने तीही भिती. मग त्यातल्यात्यात लहान मुलेच असलेले आणि घरात दिवसभर बायकाच असलेले पाळणाघर मी निवडले. तिथे दुपारी मुले जेवली नाही तर त्यांना बाथरुममध्ये तासभर बंद करुन ठेवत... हे मला मुलीने कधीच सांगितले नाही. दुस-या मुलाच्या आईने सांगितले. त्यात मुलीचा स्वभाव गरीब. दुसरी एक मुलगी स्वतःचे जेवण जेऊन मग हिच्या ताटात हात घालायची तर ही सरळ आपले ताटच तिला देऊन टाकायची आणि स्वतः उपाशी राहायची.

जागा बदलल्यावर जवळच्याच एका ओळखीच्या काकूंकडे ठेवायला लागले. तिथेही मुलीला आवडत नव्हते. माझ्या सुट्टीच्या दिवशी ती सहज म्हणुन त्यांना भेटून यायची, पण क्रेश म्हणुन जायला तयार नसायची. रोज सकाळी रडारड. ऑफिसातल्या २२ दिवसांच्या महिन्यात माझे १५ तरी लेटमार्क असायचे. माझ्या बॉसने आणि एमडीने खुप संभाळुन घेतले मला तेव्हा. पण या सगळ्याचा मला खुप मानसिक त्रास व्हायचा. आई २४ तास जवळ असावी हा तिचा हक्क आहे आणि तिचा हा हक्क आपण हिरावतोय या जाणीवेने मला रात्र रात्र झोप यायची नाही. (मी दुस-या मुलाचाही विचार यासाठी सोडुन दिला, पहिल्या मुलालाच द्यायला पुरेसा वेळ नाही आणि वरती त्या वेळेत अजुन एक भागीदार आणायचा आणि दोघांनाही दु:खी करायचे Sad )

चौथीत गेल्या गेल्या तिने 'मी पाचवीपासुन घरीच राहणार, क्रेश बिश काही चालणार नाही आता' असे फर्मान काढले. परत काळजी. आता वाढत्या वयातल्या मुलीला घरी एकटेच ठेवायचे, ती एकटी शाळेत जाणार-येणार, कॉलनी दिवसभर सुनसान.. वर्दळ कमी. घराची रचना अशी की शेजारचे घर जरा दुरच. हाक मारली तर चटकन ऐकु येणार नाही असे. आता काय करावे. प्रश्न कसा सोडवावा हा विचार करुन करुन डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली.

अशा वेळी तिच्या शाळेच्या संस्थेच्या मुलींसाठीच्या निवासी सैनिकी शाळेची माहिती मिळाली. आणि एक आशेचा किरण दिसतोय असे वाटायला लागले. सगळी माहिती काढली. शाळेची कंसेप्ट आवडली. कुठल्यातरी हॉस्टेलला टाकुन परत काळजी करत बसण्यापेक्षा हा मार्ग चांगला वाटला. तिचे मन हळुहळू तयार केले. हॉस्टेलला टाकणे म्हणजे शिक्षा असे आपल्याकडे मुलांना सांगितले जाते. मी कधीही ह्या गोष्टीचा उच्चार केला नाही. तिला तिथल्या चांगल्या गोष्टी सांगत राहिले. अर्थात या उपायाने ती माझ्यापासुन दुर राहायला लागली पण तिचा पुर्ण दिवस नीट जायला लागला. घरी एकटेपणा होता, तिथे समवयस्क मुलींबरोबर राहायला लागली. दिवसाला निट शिस्त लागली. खाणेपिणे वेळच्या वेळी, खेळ, अभ्यास सगळे नियमीत झाले. मी दिवसातले १२-१३ तास तिच्यापासुन लांब असताना मलाही घोर लागलेला असायचा आणि तीही आई कधी येतेय ह्या चिंतेत असायची. तो प्रश्न मिटला. तरीही मनातल्या भिती काही संपल्या नव्हत्या. दुर ठेवलेय ह्याबद्दल तिचे काय मत आहे? आपल्याला असे दुर टाकुन आईबाबा आता मजा करताहेत असे तर तिला वाटत नाही ना? असे प्रश्न पडायचे. मुले हॉस्टेलला गेली की आपल्याला दुरावतात असे खुप जणांनी सांगितले होते.

पण सुदैवाने माझी मुलगी मला दुरावली नाही. पहिले वर्ष त्रासाचे गेले पण हळुहळू तिला आपण इथे आलो त्याचा आपल्याला फायदा झाला हे जाणवु लागले. ह्या वर्षी तर ती म्हणाली की इथे आले ते चांगलेच झाले. शारिरीक फिटनेस तर आहेच पण सोबत दिवसभर सगळ्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा होत राहते, नविन विषय कळतात. पुढे काय करायचे याची चर्चा होत राहते. इतरांचे प्रोब्लेम्स कळतात, त्यावर काय उपाय करावे त्याचीही चर्चा होते. त्यामुळे सतत शिकायला मिळते.

मीही घरची परिस्थिती आणि उपलब्ध असणारे पर्याय यांचा विचार करून best possible solution निवडले आणि सुदैवाने ते यशस्वी झाले. मला आठवतेय, मी हा निर्णय माझ्या बॉसना सांगितलेला तेव्हा त्यांनी मला विरोध केला होता, म्हणाले तु मुलीपासुन दुर राहणे शक्यच नाही. एवढ्या लहान मुलीला तु दुर ठेऊ नकोस. आज तेही म्हणतात, तुझा निर्णय योग्य होता. तुला त्रास झाला असेल पण तिला फायदा झाला.

साधना

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

बाप रे..!! काय एकेक अनुभव?

आम्ही तिघी बहिणी घरातच मुलगी संभाळायला ठेवून मोठ्या झालो. आई, बाबा दोघेही कामाला जात. घरकामाच्या ह्या मुलींचे २० वर्षात बरे वाईट सगळे अनुभव आहेत. एक मुलगी होती ती मला आणि बहिणीला शिळे अन्न द्यायची मुद्दाम, " तुम्हाला मिळतय तर किम्मत नाहीये. सगळ्यांनी खायला हवे शिळे वै." बोलून, आम्हा मुलांसाठी आईने नविन जेवण केलेले असूनसुद्धा! आम्ही पण हट्टी, खात नसू. मग मारणे, कोंडून घालणे असे सगळे ती करत असे. संध्याकाळी आईला सांगत असे की नीट जेवले सगळे. उरलेले अन्न खिडकीतून खाली! खालच्या आत्तेने (खाली रहाणार्‍या स्नेही) आईला सांगितले की जेवण पडत तुमच्याकडून. तेंव्हा मग आईला कळले.
दुसरी एक होती, ती काम आवरले की खिडकीतून शेजारच्या सोसायटीतल्या मुलांना बघत राही. त्यातून एक मोठ्ठे झेन्गट झाले. पण बिल्डींगमधली आत्ते, सर ह्यांनी नीट लक्ष ठेवून ते निस्तरले.

असे सगळे झाल्यामुळे आमची खरी आत्ते येत असे अमच्या घरी अधून मधून. तिची शाळा आमच्या घराजवळ होती. आत्ते येऊन डब्बा खात असे आमच्याकडे, कधी चहाला येत असे. त्यामुळे ह्या कामवाल्यांना देखिल सरप्राईज चेक रहात असे. मी तर बरेच दिवस माझ्या ह्या आत्तेकडेच रहात असे.

आमच्या इथे जवळ शहाणे काकू, फाटक काकू होत्या ज्या मुलांना नीट संभाळायच्या त्यामुळे माझ्या लहानपणी तरी पाळणाघर वाईट असते असे मला तरी वाटले नव्हते. पण हे वरचे अनुभव वाचल्यावर मात्र शंका यायला लागली :(.

ह्या स्वानुभवामुळे लेकीला एकटीला कामवालीकडे द्यायचे नाही आणि शक्यतोवर पाळणाघरात ठेवायचे नाही असे सध्या ठरवलेय.

माझ्या लेकीसाठी सध्या तरी माझी आईच पहातेय, कामवालीच्या मदतीने. मी परत गेले की काय आणि कसे करायचे ते पहायचे आहे. ह्या धाग्याने विचारांना दिशा दिली आहे हे नक्की.

जाई जुई, अग सगळी पाळणाघर वाईट मुळीच नसतात. मला अनुभव चांगलाच आहे. फक्त निवडताना आपल्याला काय हवय हे क्लिअर हव तसच आपले क्रम सुद्धा निश्चित हवेत. येव्हढ सगळ बघुनही वाईट अनुभव येत नाहीत अस नाही पण घाबरुन दुसर टोक नको ग गाठुस त्यापेक्षा ह्यातुन आपण जास्त सजग व्हायच, संवाद वाढवायचा.
विषयांतर होईल किंवा कोणी वेगळा अर्थ काढेल म्हणुन मी आधी लिहील नव्हत ते आता लिहीते, ह्यात रैनाने जो " वेगळा खेळ" चा अनुभव शेअर केलाय ना तसा एक प्रकार आमच्या लहान पणी म्हणजे मी साधारण ७ वीत असतानाचा मला आठवतोय. त्यातले ते दोघे सख्खे बहीण भाऊ होते आणि त्यांची आई नोकरीही करत नव्हती. म्हणजे तू बाहेर ठेवलस मुलीला तरच असा अनुभव येतो अस नाही फक्त जास्त सजग रहाव लागत कारण मुल आपल्या पासुन ७-८ तास दृष्टीआड रहात. शेवटी सावध, सजग रहाण आणि संवाद वाढवण ह्याला कुठेच पर्याय नाही.

बाकी
ह्या स्वानुभवामुळे लेकीला एकटीला कामवालीकडे द्यायचे नाही आणि शक्यतोवर पाळणाघरात ठेवायचे नाही असे सध्या ठरवलेय.>> हे उत्तम (माझ्या मते) एकटीला कामवाली कडे ठेवण्याच्या पर्याया पेक्षा निट निवडलेल पाळणाघर चांगल.

रैना, संताप आणणार्‍या घटना. काही तर सुन्न करणार्‍या.
(अजून प्रतिक्रिया वाचायच्या आहेत.)

---------------------------------------------------
Peace is so hard to find because it lies under your nose.

Pages