वाचू शकला नाही...........

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 10 January, 2021 - 01:00

वाचू शकला नाही...........

तोच मोडला ऐन क्षणी जो वाकू शकला नाही
वादळामधे माड बिचारा वाचू शकला नाही

पडला, रडला, धडपडला तो धावत गेला पुढती
मायेमध्ये गुरफटला तो चालू शकला नाही

बस पहिल्या ओळीने डोळे इतके ओले झाले
ओळ एकही त्यानंतर तो वाचू शकला नाही

दोष उन्हाला देण्याआधी इतके ध्यानी ठेवा
सावलीत जो जो जगला तो वाढू शकला नाही

पतंगास तो माझ्या आता थिल्लर म्हणतो आहे
जो मांज्याने माझा मांजा कापू शकला नाही

एक भिकारी ऐकत बसला माझी कर्मकहाणी
जे मागाया आला होता...मागू शकला नाही

कुडी जळाल्यानंतर मागे शिल्लक उरला आत्मा
मारू शकला नाही कोणी.....जाळू शकला नाही

©® - महेश मोरे (स्वच्छंदी)
9579081342

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users