थोडंसं पेंच आणि बरंचसं ताडोबा – भाग ५

Submitted by अरिष्टनेमि on 24 October, 2020 - 14:29

हा पंचधारेचा नाला ओलांडताना हळू. डावी उजवी पहा. इथं नाल्यात थंडाव्याला वाघ कधीही येईल बरं, काही भरवसा नाही. टी-५४ इथं असायचा. आजकाल हा टी-१०० पण दिसू लागलाय. आहे बाकी तसाच, धिप्पाड. नाहीच समजा दिसला, पण जर बारीक नजरेनं पाहिलंत तर घुबड दिसेल. त्याची एक पक्की फांदी आहे. ठिय्याच तिथं. बसून जागा साफसूफ झालीय. तिथं नसलं तर थोडं इकडं-तिकडं. आता घुबड म्हटलं की उंदीर आठवतो. पण हा गडी जरा भरकटला. याला मासे खायचा नाद. याचं नावच मासेखाऊ घुबड. आता रात्रीच्या अंधारात एखाद-दुसरा उंदीर किंवा साप त्यानं पोटात टाकलाच तर कोणाला माहित? हा असा आज संध्याकाळी पाचेक वाजताच पंचधारेच्या धारेवर आला. बहुतेक उपवास चंद्रोदयाच्या आधी सोडायची घाई असावी याला. निवांत बसला. याच्या मागं सातभाईचं अख्खं कुटुंब. तसंही ट्यां-ट्यां-ट्यां-ट्यां करण्याशिवाय यांना काही विशेष काम देवानं दिलं नाही. मग उगाच रिकामं ट्यां-ट्यां करण्यापेक्षा दिसतंय घुबड तर तिथंच वाजवू अशा काही विचारानं आठा-दहाचं ते कुटुंब अखंड रमलं होतं त्याच्या मागं. शेवटी घुबड वैतागलं. कंटाळलं. किती कंटाळलं म्हणताय? हे इतकं कंटाळलं.

Fish-Owl.jpg

मग उडून मागं उंच जांभळीवर गेलं.
सातभाईंचा आज ओव्हरटाईम होता. पिच्छा यांनी तिथंही सोडला नाही.

9E3A6487.jpg

अरेरे बिचारं. असू द्या म्हटलं, आपण तरी पिच्छा सोडू.

हा शिक्रा. जेवण-खावण करुन कुंभई झरणच्या रस्त्याला मस्त सावलीला बसला. भरल्यापोटी थंडगार सावलीत डोळे जड-जड झाले. मग एक पाय पोटाशी घेऊन वामकुक्षी (किंवा उभीकुक्षी म्हणा) सुरु झाली. मस्त गार-गार वारा. मी काही थांबलो नाही फार. पण त्यानं पक्की झोप काढली असणार.

Shikra.jpg

तिकडंच नवेगावच्या कुरणात मानमोड्याची जोडी दिसली. आणि हो; असा काही मी क्रमा-क्रमानं नाही चाललेलो बरं, नाही तर तुम्ही म्हणणार, “औ दादा, आता पंचधारेतून कुंभई झरणला कुठ्ठं? आणि लगेच परत नवेगाव?”

मी आपला जसे फोटो दिसत आहेत, जशा आठवणी येत आहेत तसा-तसा निघालोय. तर असा हा पोहोचलो नवेगावला. कुरणात. हा एक मस्त भाग आहे. रोहीचे कळप इथंच खाली माना घालून आपलं जे असेल ते कोरडं-सुकं चरतात. पाण्याला हे काय, इथं दोन्हीकडं आहेत की पाणवठे. घोड्यावर बसून गावात गस्त करावी आणि चोरा-चिलटावर नजर ठेवावी असा एखादा कोतवाल एखाद्या नीलाच्या पाठीवर स्वार होऊन किड्या-गोचीडाचा हिशोब करतो.

Blue-bull.jpg

कधी न पाहिलेला मानमोड्या मला इथं दिसतोच. मानमोड्या म्हणजे Eurasian Wryneck. रंग फारसे नाहीत, तरी देखणा. एकाच रंगात किती छटा असाव्यात ते याला पाहून कळतं. हा मानमोड्या मला दोन वर्षं याच भागात दिसतोय. दिसला म्हणजे काय? दिसला दिसला म्हणेस्तोवर बोरीत घुसून दडून बसला. फक्त एक डोळा दिसत होता. पण यावेळी पूर्ण दर्शन दिलं. पण कसं? दुरुनच. जवळ येऊ देईना बेटं. शेवटी जसा आहे तसा फोटो घेतला.
Wryneck.jpg

असाच मुंगशा (sirkeer malkoha) असतो. नुसता स्वच्छ तपकिरी पण वेड लावणारा. मला वाटतं, जे सहज मिळत नाही त्यामागं पळण्याचा जो मनुष्य स्वभाव आहे त्यातच या वेडाचं मूळ दडलेलं असावं.
मुंगशा मला मेळघाटात वाण नदीकाठच्या गवतात दिसला, पेंचच्या जन्नत पॉइंटवरुन येताना गवतात दिसला, ताडोबाला जोगामोगा रस्त्याला दिसला, जामुनझो-याजवळ दिसला, तेलियाच्या प्रदक्षिणेतही दिसला, पण??? फोटो नाऽऽऽही. दिसला म्हणजे दोन सेकंदांचं दर्शन आणि मग गायब. पेंचमध्ये तर सुरूसुरू मुंगूस घुसावं असा आठ फुटाच्या वाळा गवताच्या बुडात घुसत होता आणि तेंव्हा मला कळालं की हा पक्षी असून ‘मुंगशा’ का? फोटो नाही बुवा. सध्या तरी इच्छुकांनी जालावर शोधावेत.

इथंच लाल मुनिया पण दिसतात. इथंच म्हणजे कुठं तर कुरणात. याच मुनिया जुनोना गेटपाशी आणि जामनीला पण अफलातून पाहिल्यात. बराच वेळ. यांचं निवांत निरीक्षण करायची मजा पेंचमध्ये; नांदपूर कुटीशी. या ठिकाणी संध्याकाळी गवतावर त्या येणार म्हणजे येणार. त्यांची वाट पाहूस्तोवर मागं लोअर पेंचच्या पाणवठ्यात आलेली देशी-विदेशी पक्षीसंपदा पहावी. तलवार बदकं, चक्रवाक. कधी-कधी पलीकडं एकदम ढेमसी मगर पडून असते. दिसू शकेल. हरणांची, वाघाची पाण्याची वाट तिकडूनच.

इथली निसर्गशोभा म्हणजे देखणीच. किती? तर देखनीच पडेगी इतकी देखणी.
Nandpur.jpg

जितकी देखणी सकाळ, तितकी संध्याकाळसुद्धा. हिवाळ्यात गच्च धुकं विरघळताना वर आलेला सूर्य इथं पहावा. या रानात संध्याभ्रमण करावं. असं पहात फिरत वर जावं. तुमडीटेकच्या तिप्पटवरून घाटरस्त्यानं खाली उतरायला सुरुवात करावी. डाव्या हाताला पुढं खोल पेंच नदी. इथून रस्त्यावरून नाही दिसणार. अस्सं फिरत-फिरत खाली खाली आलं की दिवस मावळता व्हायच्या आधीच या कुटीला यावं. पाऊस पडून गेलेला असावा आणि निवळलं आभाळ असावं. अशा वेळी देवाच्या घरच्या निरांजनाची आभा आकाशात साकळते. अवघा रंग एक होतो. आभाळाचा, हवेचा, रानाचा, मनाचा. अनामिक आत्मिक आनंदाने मन भरून येतं. हळुवार वा-यानं या कोवळ्या लाटांच्या सुकुमार पायातले पैंजण छुम-छुम वाजू लागतात. समोरच्या अफाट शांत जलाशयात विहारणारी नाना त-हेची बदकं अधिक सुंदर भासू लागतात. चारा शोधत त्या तीरावर गेलेला जोडीदार परत यावा म्हणून केलेला पक्षिणीचा प्रेमालाप काळीज कातर करतो. पायाशी होणारा थंड पाण्याचा गोड स्पर्श जुन्या आठवांना जाग आणतो. पाणपाखराच्या जराशा हालचालीनं आपल्याच मनाच्या आनंदलहरी त्याच्या भवती पाण्यावर दाटून पसरतात. ही संध्या कधीच सरु नये. हे पाखरांचे प्रेमालाप असेच राहोत. हा आभाळाचा केशरीया दीप असाच तेवत राहो. हे सायंदान कधीच संपू नये. कोणीतरी पुन्हा पार्थिव जाणीवा जाग्या करीपर्यंत नादसमाधी अशी लागते.

सूर्य उतरू लागला की या मुनिया मंद सुगंधासारख्या चिवचिवत येतात. सीक-सीक-सीक करून गवतावर उतरतात. आया-बाया, पोरं-टोरं एकाजागी. दिवसभराची करमकहाणी सांगतात. आवाज जणू दुधावरची साय. या पक्ष्यांच्या दुनियेतल्या लाल प-या. खरं तर यातल्या प-या सावळ्याच असतात, साधारण लालसर. लाल माणिक असतो तो परा. देखणा दिवा. लालबुंद.

एक सुतनू माणिक-परी गवताच्या तु-याशी बसते. वेरूळच्या लेण्यांत जशी ती अभिसारिका नाजूक हाती त्याहून नाजूक कमलदल घेऊन तीन ठिकाणी डौलदार वळणानं उभी राहते, तशी ती लाजवंती चोचीत तुरा वाकवते. एक दाणा खाते. खाता-खाताच आपल्याकडं संशयानं बघते. तिच्या डौलाचं गारुड मोठं. आपली नजरबंदी होते. मग इकडं-तिकडं बघायचं भान रहात नाही. अलीकडच्या गवताच्या तु-यामागचा नर दिसतच नाही. तो दचकून उडतो. सीक-सीक-सीक करत लाल-लाल पंख उघडून भुरर्कन अजून पलीकडं जातो. त्याच्या चिमण्या अदर-पदर सावरत लगेचच उडतात आणि त्याची पाठराखण करतात. पण जागीच उभं राहिलं आणि हळुवार हालचाली केल्या की मग यांना छान बघता येतं.

तशा या सर्वत्र दिसतात. पावसाचा पहिला धडाका ओसरतो. गवत उगवतं. हिरवं – पोपटी. चांगलं गुडघा-कंबर होतं. ऑगस्ट-सप्टेंबर येतो. पाऊस हलकासा होतो. यांना गवताच्या पात्याची घाई. आता घरटी बांधतील गोलमटोल. बघा ना. बांधून झाली असतील; घरच्या बागेत, बोरी-बाभळीच्या फासात, रानात कुरणातल्या गवताच्या गचपणात. गोल-गुंडी घरटी.
ही मुनिया दिसली होती ताडोबात जुनोना रस्त्याला.

Red-Muniya.jpg

ताडोबातच आगरझरीला ही जोडी दिसली. ते छोटे चंदन आहेत. कसली काय हेअरस्टाईल यांची! पण काही म्हणा, रुबाब असतो याचा. ऐटबाज चाल.
यानं कोळशात एकदा अस्सं फिरवलं म्हणताय. फुटकीबोडीत होता. या फुटकीबोडीत सांगतो, असावी तरी मागच्या उन्हाळ्याची गोष्ट. बच्चेवाली वाघीण फिरत होती. बच्चे कुठं लपणात-गवतात सोडून वाघीण बोडीशी आली. आली असेल पाण्या-फिण्याला किंवा जनावर धरायला. इकडं सोनकुत्रे मुजोरी करत होते. या कुत्र्यांचा काही ठिकाणा नाही. होल वावर इज अवर. कुठंही फिरतात आणि वेळ आल्यावर कोणाच्याही नादी लागतात. आता भुकेली वाघीण कुत्र्यावर धावली की कुत्रे वाघीणीवर धावले, इथं खोड कोणी काढली माहीत नाही, पण कुत्र्यांनी वाघीण धरली. आमोरा-समोर काय हिंमत हो? अशी मागून धरली, पायाशीच. चोहो बाजूंनी टोळी घेरून. वाघीणीचा गुरगुराट भयंकर. शेवटी बच्च्यांचं नशीब बलवत्तर म्हणून सलामत सुटली.

तर या बोडीत मी गेल्यावर बघितलं ना याला! अगदी लख्ख, हे अस्सा उभा समोर. कॅमेरा काढला तसा हा उडाला आणि थेट लांब वाळल्या झाडाच्या माथ्यावर उतरला. मग काय? काही नाही. दुर्बिणीतून पहात बसलो. परत पांगडी रस्त्यावर दिसला. खालीच गवतात फिरत होता झुडपांच्या आडोशानं. मी पुढं गेलो की तो मागं आणि मी मागं आलो की तो पुढं. नीट काही दिसायला तयार नाही. शेवटी गेला उडून थेट. असाच आगरझरीत दिसला जोडीनं. काळ्या पाण्याकडं ही जोडी होती. मग एवढी मोठीच्या मोठी चक्कर मारून मी काळ्या पाण्याकडं गेलो. तसे हे आगरझरीकडं आले. शेवटी जसा मिळाला तसा फोटो घेतला.

Adj.-Storks.jpg

खूप आधी यांची घरटी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर इकडं भरपूर दिसायची. पुढं चुकीचं व्यवस्थापन आणि शिकार या दोन कारणांनी हा फार दुर्मिळ झाला. याच्या डोक्यात म्हणे सर्पमणी असतो. त्यासाठी शिकार. पण अजून सर्पमणी कोणाला मिळाला नाही.

नुसता हाच नाही; कासवं, घुबडं, मांडूळ, खवले मांजर, गेंडा, अस्वल, वाघ असे किती तरी जीव मारले जातात अशाच काही गैरसमजूतीतून. शिवाय अनेक प्राण्यांच्या नशीबात पटकन मरणही नसतं.

काळ्या जादूसाठी घुबड आणून त्याचे डोळे काढले जातात. काही लोक दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घुबड आणून घरात कापतात. का तर म्हणे, घुबड लक्ष्मीचं वाहन. वाहनच नाही राहिलं म्हणजे लक्ष्मी आता कुठंच जाऊ शकणार नाही. याच घरात राहणार.

खवले मांजर पकडतात. हे बिचारं मुलखाचं गरीब. ना दात आहेत, ना नखं वापरतं. हे असं गरीब जनावर आणून मोठ्या भांड्यात उकळत्या पाण्यात बुडवायचं. त्याला ते चटके सहन होत नाहीत, त्याला ते मरण नको असतं. कोणालाच नको असतं. ते तडफड करतं. मग त्याला २-३ काठ्यांनी उकळत्या पाण्यात मरेपर्यंत दाबून ठेवायचं. हालहाल होऊन ते मरतं. मग बाहेर काढून कापायचं, सोलायचं. निर्जीव मुंडक्यातून हातभर जीभ लोंबत असते. हे असे काहीच्या काही प्रकार होतात. यातून तयार केलेली तथाकथित औषधं, मंतरलेल्या वस्तू आपण विकत घेतो. मागणी वाढते किंवा आहे ती मागणी मार्केट जिवंत ठेवते. ऑर्डर बुक होतात. टोळ्या सुटतात. जनावरं मारली जातात, आपल्या घरी काहीतरी रूपात पोहोचतात. आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही. चाक फिरतच राहतं. असो.

या काळ्या पाण्याशी सहज जाता जाताच; म्हणजे बरंच हे असंच आहे बरं माझं! जाता-जाता. खास मागं लागून कष्ट-मेहनतीनं फोटो घेणं हे आपलं काम नाही. जाता-जाता साधलं ते आपलं. तर असं जाता-जाता, काणूकाची (Cotton pygmy goose) जोडी दिसली. बदकं मोठी लबाड. नाहीच जवळ येऊ देत. कॅमेरा जोडून रोखला आणि काणूकबाबा फुर्र उडून गेला चक्क.

Cotton-pygmy-goose.jpg

कोळशातला हा हिरवा शाही कवडा, imperial pigeon. आहे कबुतरच, पण आपल्या कबुतराच्या दीड-दोनपट म्हणा. रायबाला पाणी प्यायला उतरत होता. फार संशयी. आधी आंब्यावर उतरला. किती वेळ बसला. मग हळू अर्ध्यावर आला. वाळलेला बांबू आडवा पडला होता. त्यावर बसला. अख्खी दुनिया पाणी पिऊन गेली. हळद्या गेला, भृंगराज गेला, नीलमणी गेले, मुनिया गेल्या, अजून काय न काय. हा तिथंच. मग बसल्या बसल्या जांभया दिल्या. हो चक्क. दुपारच्या वेळी खाणं-पिणं झालं की सावलीला-आडोशाला बसून हे पक्षी लोक पेंगतात, जांभया देतात. पाहिलंय? नक्की पहा आता. तिथंच बसला बाबा. पण पाण्यावर उतरायचं नाव घेईना. मी फोटो घेतले त्याचे बरेच. घेऊ दिले बरं. तोवर काही नाही.

Imp.-Green-Pigeon.jpg

पण नंतर माझी जरा झालेली हालचाल त्यानं टिपली अन् हा उडून २०-२५ मीटरवर नाल्यात पाण्याला गेला. तिथंही नुसता बसला. मग थोड्या वेळानं तिथूनही पाणी न पिताच गेला. कुठं गेला पाण्यावर देव जाणे? इथून जवळ बेलन चौकात आहे पाणी.

पण याला तुम्ही हरियल म्हणाल तर नाही जमणार बरं का! अहो हा कुठला हरियल? अशा हिरवट; म्हणजे “तशा हिरवट” नाही बरं का, तर अशा हिरवट होल्या-कबुतरांच्या जाती मिळून भारतात होतील तरी ८-१०.त्यातच हा शाही कवडा आला, पाचू कवडा आला आणि हरियल आले. हरियलची एक खूण सांगतो बघा. भले हिरवं असू द्या कोणतंही कबुतर, फक्त हरियलचे पाय पिवळे असतात. बाकी सारे एकछूट गुलाबी. तर तो हरियल, Yellow-footed green pigeon आपला राज्यपक्षी आहे. माहितीये ना?

पाचू कवडा हा असा समोरच आला एकदा. पेंचची गोष्ट. अचानक हा सालेघाट रस्त्यावर उतरला. कमालच म्हणायची. तोवर तिकडून एक गाडी आली. मी थांबा,थांबा असा हात केला. त्यांना काय वाटलं काय माहित? माझ्याशीच येऊन थांबले. एवढं सुंदर पाखरू उडवून लावलं. बुजरं पाखरू, कशाला येतंय आता? पण तरी थांबलो. अन काय नशीब बघा. आलं की. मला वाटलंच नव्हतं. मिळाला तसा फोटो घेतला. हा पाचू कवडा, emerald dove.
Emerald Dove.jpg

ही सांबर मायलेकाची जोडी. मस्त चरले. संध्याकाळ व्हायच्या आधी वसंत बंधा-याला पाण्याशी आले. या वसंत बंधा-याला १२ महिने सांबरं. वसंत बंधारा आणि कुंभी बोडी हा यांचा पट्टा. हे दोघं इथं तुडूंब पाणी प्यायले. आता अशी राजेशाही चाल की काय सांगावं? रस्ताच द्यायला तयार नाही. निवांत रमत गमत निघाले.
Sambar.jpg

बरं म्हटलं राजेहो, आलोय तुमच्या गावात तर तुम्ही म्हणाल तो कायदा. दोघाच मायलेकांनी किती वेळ रस्ता धरला. बाप सदासुखी. त्याचा एकट्याचा संसार. कशाची म्हणून जबाबदारी नाही. बायकोची किरकिर नाही, पोराचं रडणं नाही. हं, फक्त तेवढं वाघा-बिबट्याचं सांभाळून चालायचं, नाहीतर त्याच्या इतका सुखी फकीर दुसरा नाही.

जुनोन्याच्या पाणवठ्यावर ही भेडकी पाणी पिऊन निघाली.
Barking-deer.jpg

मादी सालस. चारचौघींसारखी. नर वांड. भलता गुंड्या. एकटाच राहणार. मारामा-या करणार. तुम्ही काहीही म्हणा, पण हे शुद्ध २४ कॅरेटचं हरीण नाहीच. तिकडं वर ब्रह्मदेवानं जनावराची भट्टी लावली. माल तयार केला. पृथ्वीवर ढीगानं माल पाठवला. भट्टी बंद करता करता लक्षात आलं की इकडं तिकडं गोळाभर माल राहिला की. वाया कशाला घालवायचा म्हणून मग उरला माल खरवडला, आजू बाजूला सांडलेला माल उचलला आणि एकत्र करुन गोळा टाकला भट्टीत. त्यात निर्माण झालेला हा शेवटच्या घाण्याचा माल असणार. दिसायला हरीण. बाकी माल कुत्र्याचा. गवत चरता चरता कधी कधी किडे, पाखरं, अंडी, उंदीर मिळाले तर हा सोडत नाही. याचे सुळे पहा. हाताशी शेवटचे राहिलेले कुत्र्याचे दोन सुळे पण देवानं या घाण्याला भट्टीत टाकले. हा ओरडताना ऐका. नव्या माणसाच्या कानी तर कुत्रंच भुंकतं. गल्लीत जसा एक दादा कुत्रा असतो. लहानखु-या कुत्र्यांनी त्याच्या समोर पुढचे पाय वाकवून अर्धवट बसून तोंडाला तोंड घासायचं आणि ‘सलाम दादा’ म्हणायचं. हेच ही भेकरं करतात. अगदी ‘सेम टू सेम.’ याला हरीणकुत्रा का नाही म्हणू?

कोसेकनार रस्त्यानं थोडा पुढं जामणीकडं गेलो तर कुरणात गवत हललं. काळी सावली मागोमाग हलली. हे अस्वल होय.
Bear.jpg

अशा आळशी आणि बेजबाबदार हालचाली दुसरं कोणी करत नाही. एखाद मिनीट थांबलो आणि हे काळंभोर थोराड अस्वल निघालं. त्याचं त्या गवतात काय हरवलं होतं देव जाणे. मन लावून बघत, शोधत होतं. मग एकदम कराकरा उकरून नाक लावून फासफूस करू लागलं. किती वेळ गवतात कुठं काय अन कुठं काय बघत फिरलं. शेवटी मी कंटाळून पुढं गेलो.

इकडून परतताना जामणीजवळ सूर्यास्तानंतर संधीप्रकाशात हा ससा दिसला. टपो-या उड्या मारत इतका जवळ आला की त्याचं डोकंच फक्त फोटोत आलं.

Hare.jpg

मग दुधाचा कप सांडून आईपुढं उभं राहिलेल्या पोरासारखा गुपचूप बसून राहीला. नुसतं नाक तेवढं पुटूपुटू हलत होतं. बाकी पुतळा. मी निघालो तेंव्हा पुन्हा चारी पायावर आला आणि सणासण उडत गेला. गवतात घुसला.

असाच कोळशात, आंबेडोबाडच्या पाणवठ्यावर सहज जाताजाता वळालो. थोडासा गेलो असेन आणि एक गवा आडवा पळाला. पळाला म्हणजे गाय-बैल पळतात तसा गवा पळतोय असं काही चित्र डोळ्यासमोर आलं का? काढून टाका आधी. गाय-बैल म्हणजे आखडल्या पायानं धावतात. गवा धावतो म्हणजे अक्षरश: रॉकेट सुटल्यासारखा सटकन उधळतो, क्षणात. मध्ये काय येईल, काही बघत नाही. धडाधड-कडाडकड मोडत-तोडत-ओढत जातो. म्हटलं याला वाघ धरु गेला की काय? तोवर मागून फुसांडत हा पहिलवान निघाला.
Gaur.jpg

बहुतेक म्होरक्या कोण हे ठरवता-ठरवता भांडणं विकोपाला गेली. खडाखडी होऊन शेवटी यानं दुस-या तरण्या नराला पळवलं. रात्रीच्या काळोखात यांची रेटारेटी आणि खडाखडी मी पाहिली; पाहिली म्हणण्यापेक्षा ऐकली होती एकदा. भयंकर. इथं हे धूड अनेक मिनिटं माझा रस्ता अडवून उभं होतं. प्राचीन मंदिराच्या कोरीव, ठाशीव शिल्पातून हे एक निखळून तर समोर उभं नाही ना?

कुवानी बोडीच्या रस्त्याला लिवली-लिवली चालणारी ही मूठभर लावरी. सहा पावलं तरंगत आणि मग एक आडवी उडी. तिचं तुरतुरणं पहाणं हा एक अद्भुत अनुभव होता. नजर तिच्याबरोबर तुरतुर तरंगली, सुळसुळ गवतात घुसली.

Quail.jpg

हीची गंमत सांगतो, म्हणजे पटत असेल तर ऐका बुवा, नाहीतर राहिलं. पुन्हा तुम्हीच म्हणाल नाहीतर, “गुंडाळायला लागलाय” म्हणून. झाला तरी महिना साधारण. कवडी अशी मस्त बसली होती संध्याकाळच्या उन्हात. मी म्हटलं फोटो घ्यावा. जसा थांबलो, तशीच ती उडून गेली. मी बघतच राहिलो. मग एकदम लक्षात आलं की गवतात काही हलतंय. बारीक पाहिलं तर काय? दोन्ही पाय वर करून मातीला पाठ लावून लावरी पडलेली. शेजारी दुसरी पाय ताठ करून कुशीवर पडलेली. अर्रर्र, म्हटलं, हे काय नीट लक्षण नाही. विष खाऊन मेली की काय म्हणावं ही पाखरं? देवा रे देवा! जरा पुढं झालो अजून, तशीच दोन्ही पाखरं पायावर झाली अन भरारून पुढं जाऊन गवतात उतरली. बघा आता. माझी आजी नेहमी सांगायची, “दक्षिणमोहरी पाय करून नाही झोपू. तिकडं यम असतो. झोपताना पाय कोणत्या दिशेला करावेत असं जुन्या लोकांनी शास्त्रात लिहून ठेवलंय. ही टिटवी असते ना, टिटवी. तिचं आक्रीत वागणं असतं. म्हणजे, रात्री आभाळ पाठीवर पडू नाही म्हणून ती आभाळाकडं पाय करते. आभाळाला पायाचा टेकू दिला म्हणजे आभाळ काय पडत नाही. मग ती झोपते.” कोणी अशी टिटवी झोपलेली पाहिली असेल का? टिटवी मी कशीच झोपलेली पाहिली नाही.

पण वैशाखात दुपारी पेंचला रणरण उन्हात अशा चटचटत्या तल्खलीत सावलीला झोपलेला नीलमणी मी पाहिलाय. काकडघाटला पाण्यावर आलेला हा निळाजर्द नीलमणी.

Monarch.jpg

जमिनीवर बसणार नाही. एखाद्या बारकुळ्या फांदीवर, गवताच्या काडीवर बसायचं. मग पटकन पाण्यावर सूर मारुन उडता-उडता पाणी प्यायचं आणि अंगही ओलं करुन घ्यायचं.

दुपारी असं पाण्यावर बसलं तर अफाट पक्षीसंपदा दिसते. हा कस्तुर असाच पाण्यावर आला होता.
Thrush.jpg

हे तीसा पक्षी इकडं भरपूर. सा-या रानांत दिसतील. एकदा असाच पाहता पाहता यानं सुर्र करुन सूर मारला आणि एक सापसुरळी धरली. आडोशाला बसून तोडून खाल्ली. एकदा टपोरा बेडूक. एका पावसाळी संध्याकाळी रायबाच्या पुढं निघालो, तर डाव्या हाताला लहानशा कुरणात वाळल्या झाडावर पाऊस झेलत हा तीसा बसला होता. त्याची नजर अशीच एखादी पावसात गवसेल अशा शिकारीच्या शोधात होती.

Teesa.jpg

आणि आपण सारे ज्याची आतुरतेनं वाट पहात आहात तो हा वाघ.
एकदा अवचित ही वाघीण आणि तिचे बच्चे बाजूला दिसले. आई आणि दोन बच्चे झाडीतून निरखत होते.

माणसासारखे यांचे स्वभाव. अनुभवी आई निव्वळ रस्त्याच्या कडेला आली. झाडीतून बाहेर निघाली नाही. थिजून एकटक पहात राहिली. हा अनुभवानं आलेला शहाणपणा.

Tiger1.jpg

आत लोळणारा एक बच्चा उठून आईच्या मागे उभा राहिला, कोण आलंय, काय आलंय पाहिलं. परत लोळायला गेला. हा लाजाळू, कामाशी काम ठेवणारा वाघ. हा पर्यटकांना फार दर्शन देणार नाही पुढं चालून.
दुसरा बच्चा आतच थांबला. बाहेर आलाच नाही. हा असली वाघ. दर्शन देणार नाही. भुतासारखा लपून राहणार.
तिसरा आतून येऊन आईपाशी उभा राहिला आणि जसा जसा मी पुढं निघालो, तसा तसा झाडीची लपण ठेवून आतून-आतून नजर ठेवून समांतर चालत निघाला. याचं वाघपण आतापावेतो जागलं होतं. स्वतः लपून नजर ठेवण्याचं कसब त्यानं आत्मसात केलं होतं.
आणि हा चौथा. बेदरकार. सरळ धाड-धाड चालत आला. माझ्या नजरेत नजर देऊन उभा राहीला. मग रस्त्याच्या बाजूला बाहेर आला आणि बसला. पुन्हा माझ्याकडं पाहिलं. ‘हं बोल, काय आहे?’

Tiger2.jpg

हा सळसळत्या रक्ताचा अ‍ॅन्ग्री यंग मॅन. जिम कॉर्बेटच्या पिपलपानीच्या तरुण आणि बलदंड वाघाची आठवण झाली. बेफिकीर एकदम. असे वाघ एकतर शिकारीला बळी पडतात किंवा वाचले तर सत्ता गाजवतात. पर्यटकांचे ‘आवडके’.

दोनेक वर्षांपूर्वी तर एकदा रस्त्यावरुन उठून एक बच्चा बांबूत पळाला. रांझीत दडला. तिथं जाऊन पाहिलं तर सरळ आला आणि गाडीजवळ येऊन बसला. त्याचं पाहून त्याचा भाऊपण येऊन बसला.
Tiger 1.jpg

आई दिसत नव्हती पण नक्की सांगतो, ते लाल-पिवळे डोळे बांबूच्या दाटीतून एकदा माझा, एकदा बच्चांचा वेध घेत होते.

कोपनकुहीकडून येताना पाणवठ्यावरुन एक गरुड उडाला. काय आहे पहावं म्हणून थांबलो. तोवर काही सेकंदात ही वाघीण बांबूच्या रांझीतून निघाली. पाण्यात बसून आराम केला.

Tiger3.jpg

मग जराशानं उठून पुढं निघाली. मग रुबाब करत रस्त्या-रस्त्यानं जात राहिली.

9E3A8327a.jpg

हिल टॉपवरुन उतरत होतो. शिंगळा शोधत. इतक्यात पंचधाराकडून ही आली. सरळच चालत आली. मग पहात उभी राहिली. हळूच वाट वाकडी वाकडी करत गवतात गायब झाली.

T-12_0.jpg

ही कोण? अहो ९० टक्के पर्यटक वेडे केलेत हिनं. हीच ती सुप्रसिद्ध ताडोबाची राणी टी-१२.

विदर्भाच्या रानात अजून खूप काही आहे पाहण्यासारखं. वाघ दिसेल का? माहीत नाही. कदाचित नाही दिसणार. अथांग राना-वनात वाघाचा शोध लागणं मोठं कठीण काम. पण एक सांगतो. कुठल्याही रानात जा, निसंग एकाग्रतेनं रान अनुभवा; स्वत:चा शोध नक्की लागेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुरेख !!!
दिवसाची सुरुवात एकदम झकास झाली फोटो आणि वर्णन वाचून . खरेच भाग्यवान आहात ! असे वाटते की तुम्ही फोटो काढताय हे बघून प्राणी- पक्षी मुद्दाम पोज द्यायला थांबतात . उत्सुकता म्हणून विचारतेय , असे फोटो मिळवण्यासाठी किती वेळ थांबता तुम्ही ?

आज एकदम ५ वा भाग दिसला. मागे जाऊन पहिला भाग वाचते आता. (स्वगत: लोक ५-५ भाग लिहायला वेळ काढतात. तुला नुसते वाचायला जमेनात?! श्या !! ऑफिसचं काम वेळेत निपटायला कधी शिकणार मी?)

तुमचे लेख म्हणजे पर्वणीच! या सुंदर फोटोंमधून आणि तुमच्या चित्रदर्शी वर्णनातून जंगल अनुभवायला मिळतं!
घुबडाचा वैताग परफेक्ट पकडला आहे फोटोत! शेवटच्या फोटोंमधले जंगलाच्या राजाचे दर्शन अप्रतिम!
लिहीत रहा!

वा वा वा!
एकेका वाक्याला आपोआप दाद जाते तुमच्या!
ससा कसा?
दुधाचा कप सांडून आईपुढं उभं राहिलेल्या पोरासारखा Lol perfect!!
लिहीत रहा.
तो रुबाबदार वाघाचा फोटो बघून मलापण जिम कॉर्बेट आठवले. पण माझ्या डोक्यात Bachelor of Powalgarh आला.

किती सुंदर फोटो आणि स्टोरी.जांभई देणारं घुबड बरं पकडता आलं
वनदेवी ची कृपा आहे तुमच्यावर.सगळे छान पोझ देतायत

धन्यवाद उमा_, अश्विनी११, चंद्रा, जिज्ञासा, वावे, हर्पेन, अस्मिता, mi_anu, सामो.

@अश्विनी११ - खरं तर मी असा एखाद्या फोटोसाठी/पोझसाठी खूप थांबून रहात नाही. कधी कधी मिळून जातात छान. पण एखादा पक्षी/प्राणी वगैरे जवळ येऊ देत नाही. अशा वेळी मग त्याच्या मनातली भीती जाण्यासाठी, त्याला सवय होण्यासाठी कधी-कधी थांबावं लागतं.

@वावे - पिपलपानीचा वाघ मला एवढ्यासाठी आठवला की काही काळजी न घेता तो असाच धाड-धाड चालत शिकारीवर आला होता. त्याला धडा शिकवण्यासाठी मग जिम कॉर्बेटनं त्याच्या नाकासमोर एक इंचावर गोळी मारली होती.

अप्रतिम !!
फोटो, भाषा सग्ळंच मस्त Happy

आज सकाळ पासून 7 8 वेळा हा लेख उघडल्या गेला पण पूर्ण वाचताच येत नव्हता. कधी फोन ऑफ व्हायचा तर कधी कुणीतरी काहीतरी काम सांगायचं म्हणून उठाव लागायचं. थोडा थोडा करत आता पूर्ण वाचून झाला..एकदम मस्त लीहता तुम्ही आणि फोटो तर एकसे एक भारी..माहिती पण मिळत जाते नवीन..लिहीत राहा..!

नेहमीप्रमाणे खूप मस्त. फोटो तर काय. जबरदस्त. मानमोड्या हे नाव खूप दिवसांनी आले आणि या पक्ष्याचा फोटो खूप दिवसांनी बघितला. मला तरी पक्ष्यातले फारसे कळत नाही. तुम्ही पक्ष्यांच्या किती विविध छटा फोटोतून टिपल्या. ती खवल्या मांजराची गोष्ट भयंकर होती.
विदर्भाच्या रानात अजून खूप काही आहे पाहण्यासारखं.
>> हे खर आहे. गेल्या काही वर्षात तर बरेच प्राणी झालेत. वाघसुद्धा भरपूर आहेत. नवेगाव, ताडोबा, बोर सर्वत्र वाघ आहेत. या सोबत त्रास सुद्धा सुरु झालेत. रानडुकरांचा त्रास होताच गेल्या तीनचार वर्षात रोहीच्या कळपांनी पण नुकसान केले.

आज मायबोली उघडलं तर समोर तुमचा लेख !! अधाशासारखा वाचला अक्षरश:
घरबसल्या जंगलात फिरण्याची भूक भागवलीत आजसुद्धा !! लालबुंद परा , गवा नीलमणी ,पावसात भिजणार तिसा (आणि वाघांचे अर्थातच ) हे फोटोस तर विशेष आवडले
आणि सगळ्यात भारी म्हणजे जांभई देणारं घुबड !! काय टायमिंग साधलाय राव तुम्ही जबरदस्त ! कसले डोळे आलेत त्याचे .. जबरी
तुम्ही दिलेल्या प्रत्येक फोटोतून आणि ओळीतून तुमचा दांडगा संयम दिसतोच दिसतो ..
अप्रतिम !! पुढील लेखाची आतुरतेने वाट पाहते !!

धन्यवाद विनिता.झक्कास, अजिंक्यराव पाटील, निलुदा, पुरंदरे शशांक, मंजूताई, अमृताक्षर, तैमूर, mabopremiyogesh, सुमुक्ता, जेम्स बॉन्ड, एडी, मित्रहो, anjali_kool
आपल्या प्रेरणादायी प्रतिसादांसाठी खूप धन्यवाद.

@तैमूर - वॉटरमार्क शक्यतो पुसटसा असावा असा मी प्रयत्न करतो, पण कधी कधी जरा चुकतोच अंदाज. खरं आहे.

@मित्रहो - बरोबर आहे. वन्य प्राण्यांची संख्या वाढते आहे. पाळीव जनावरांच्या चराईसाठीची गायरानं लोकांनी संपवली. त्यामुळं ती जनावरं जंगलात चरतात. जंगलात खायला पुरेसं नाही मिळालं की जंगली जनावरं बाहेर येतात. शिवाय जंगली गवतापेक्षा लुसलुशीत पीकाचा मोह त्यांना होतोच. खरं तर हा गहन विषय आहे.

गेले काही दिवस भयंकरच व्यस्त होतो म्हणून वाचायला उशीर झाला. तुमचे लेख माझ्या browser च्या एका टॅब मध्ये ठेऊन दिले होते. आज सगळे एकदम वाचले...
वाह... खूप छान!!!

अतिशय सुरेख आणि ताडोबाच्या अप्रतिम सौंदर्याचे यथार्थ वर्णन करणारी लेखमाला. याआधीही वाचली होती. आम्ही नुकतेच ताडोबा सफारी करून आलो त्यामुळे आता अजूनच जास्त आवडली.

आज पाचही भाग वाचून काढले. जेवढे सुंदर फोटोज आहेत त्याहीपेक्षा सुंदर शैली आहे तुमची लिहीण्याची. वाचताना रमायला होतं. घरबसल्या सफर घडल्यासारखं वाटलं. शिवाय केवढीतरी माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आयुष्यात एकदातरी ताडोबाला जायलाच हवं असं वाटायला लागलं आहे. फारच अप्रतिम लेखमाला!

सुरूवातीचे भाग वाचले होते. हे काही राहून गेले होते. आता वरती आला तर लगेच वाचून काढला. मग परत वरती जाऊन सगळे फोटो पाहिले. म्हणजे आता परत एकदा फोटो पाहून घेणार. किती सुंदर पक्षी आहेत आणि किती सुंदर टिपलेत तुम्ही!! बराच पेशन्स लागतो. आणि मग ते वाघांचे फोटो म्हणजे अगदी चेरी! असेच अजून लिहीत रहा.

कोणी तरी म्हटल्याप्रमाणे योग आल्यास तुमच्याबरोबर नक्कीच एखाद्या सफरीवर जायला आवडेल. वाघ आहेतच पण इतके पक्षी माहिती असण्यांबद्दल खुपच आदर _/\_

मायबोलीवर परतल्यावर पहिल्यांदा हा धागा उघडला.
दिवस सत्कारणी लागला.
फोटो पाहून शालींच्या फोटोग्राफी ची आठवण झाली. झक्कास फोटो आहेत.

तुम्ही वर्णन केलेले शब्द नी शब्द तर अप्रतिमच. बेडकी हरिणाचे वर्णन अगदीच भाव खाऊन जाते.