काय मिळवलं !!!

Submitted by SANDHYAJEET on 19 September, 2020 - 17:37

अरुंधतीचा रागाचा पारा आज फारच चढला होता. कोरोना, कोरोना म्हणत घरातला प्रत्येकजण नुसता बसून होता. मार्च पासून जून पर्यंत मुलांनी सुट्टी म्हणून आणि नवऱ्याने लॉकडाऊन म्हणून एका हातात मोबाइल धरून दिवस नुसता लोळून काढला होता. ऑनलाईन शाळा आणि वर्क फ्रॉम होम सुरु होऊनही त्यांच्या दिनक्रमात फारसा काही फरक नव्हता. मागच्या वर्षी पर्यंत १० वाजता एकदा मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेले की दिवसभर ती एकटीच्या राज्यात निवांत असायची. आता मात्र तसं नव्हतं. ऑनलाईन शाळा म्हणजे नुसतं थातुर मातुर होत. थोडा वेळ शाळा झाली की परत दिवसभर मुलांची नुसती कटकट सुरु व्हायची. एक तर दोघे नुसती एकमेकांबरोबर भांडायची, नाहीतर आपापल्या मोबाइल मधे गुंग असायची. कोरोना असला म्हणून नाश्ता, दुपारचं, रात्रीच जेवण, चहापाणी, मधल्या वेळेतलं खाणं, भांडी, कपडे, केरकचरा, लादी पुसणं,पसारा आवरण यात कशातही खंड नव्हता. कोरोनामुळं कामवाल्या मावशी पण बंद झाल्या होत्या. १२ आणि १४ वर्षांच्या मुलांना, नवऱ्याला आजपर्यंत सगळं हातात द्यायची सवय लावल्याने अरुंधतीचा जीव गेल्या ५-६ महिन्यात नकोसा झाला होता. आजपर्यंत तिला वाटायचं की मुलं शिक्षण आणि नवरा पैसे कमवून आपापलं कर्तव्य पार पडत आहेत. आपण त्यांचं सगळं हवं नको बघून आपलं कर्तव्य पार पाडायला पाहिजे. गेली ५-६ महिने मात्र घरातली तीन माणसं मोबाईल, टीव्ही बघत आळसात दिवस नुसतं लोळून वाया घालवत असलेली बघून तिला रोज राग यायचा. माझं कुटुंब म्हणून आजपर्यंत ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला त्यातल्या एकालाही तिला मदत करावी अशी वाटत नाही बघून तिला फार वाईट वाटायचं. दिवसभर एकटीनेच काम करून तिची नुसती आदळआपट व्हायची, फ्रुस्ट्रेशन यायचं.

अरुंधतीच्या घरासारखी स्थिती आज कितीतरी कुटुंबांची झाली असेल. कोणत्याही वयाच्या मुलांना त्या त्या वयानुसार घरातली काम करायला शिकवत नाही हा आपला प्रॉब्लेम आहे. शाळा कॉलेजला जातात म्हणजे घरातली काम करायची गरज नाही हे आपणच त्यांना शिकवलेल आहे. मग अचानक कोरोना आला तर ते घरातलं काम करायला कस काय शिकतील. ज्या जीवलगांसाठी क्वालिटी वेळ मिळत नाही म्हणून इतकी वर्ष आपण आटापिटा करत होतो, ते सगळे जिवलग आज कित्येक महिने एकत्र आहेत, आपण किती वेळा आणि कितीसा क्वालिटी वेळ त्यांच्याबरोबर घालवला आहे. कोणालाही फोन केला तर कोरोनाचा विषय हमखास निघतोच. जो तो काही करता येत नाही म्हणून रडगाणं गातो. दिवसभर काय करता म्हणून विचारलं तर एकाकडेही काही चांगलं करतो असं सांगण्यासारखं नसत. खायचं, प्यायचं, टीव्ही, मोबाईल बघायचा, झोपायचं याच्यापलीकडे काहीही नसत. अमेरिकेतल्या लोकांकडून फार फार तर नेटफ्लिक्स वर ही सिरीज बघत आहे असं ऐकायला मिळतं. घरातला प्रत्येकजण सारखा बारीक सारीक कारणांवरून एकमेकांशी भांडतो हेही रोजच्या दैनंदिनी मध्ये आलेलं आहे. जास्त सहवासाने जीवलगांमध्ये अजून प्रेम वाढायला पाहिजे होत तसं न होता नुसती धुसमुसच वाढत आहे त्यात घरातलं काम कोण करणार हा तर जीवनमरणाचा प्रश्न झाला आहे.

कोरोना कधी जाणार, लाईफ पूर्ववत होणार की नाही, झालं तर कधी होणार या प्रश्नाच उत्तर आजतरी कोणालाच माहीत नाही. आहे या परिस्थितीतच स्वतःच, कुटुंबाचं ” New नॉर्मल ” स्थापित करायला पाहिजे नाहीतर कोरोना सोडून जगभरात येऊ घातलेले इतर ” Domestic Violence ” ” Mental Illness ” लठ्ठपणा यासारखे पँडेमिक आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यावर्षातले सहा महिने तर काही न मिळवता वाया घालवले, पण राहिलेलं वर्ष आणि कोरोना जाईपर्यंत असलेला अनिश्चित वेळ वाया जाऊ नये म्हणून आपण संपूर्ण कुटुंबाने एक रुटीन ठरवलं पाहिजे. घरातल्या एकाच माणसाला, आईला, डोक्यावरून पाणी जाईपर्यंत राबायला न लावता ऑनलाईन शाळा, ऑफिसचं काम सांभाळून प्रत्येकाने कामं वाटून घ्यायला पाहिजेत. मुलांना वयानुसार घरातली काम शिकवायला सुरुवात करायला पाहिजे. अगदी लहान मुलं पण त्यांची स्वतःची रूम आवरणे, कपडे घडी करणे, जेवायला ताट वाट्या पाणी घेणे अशी कितीतरी छोटी छोटी काम करू शकतात. आपण किचन मध्ये काम करत असताना गप्पा मारत मारत त्यांना बरोबर ठेवणे,जेणे करून आपला सुसंवाद पण चालू राहील आणि मुलं त्यांच्या प्रचंड निरीक्षणक्षमतेच्या आधारे बऱ्याच गोष्टी आत्मसात करतील ज्या त्यांना भविष्यात उपयोगी पडतील. मोठी मुलं भांडी आवरणं, घासणं, कपडे मशीनला लावणं, जेवणं बनवायला शिकणं अशी कितीतरी काम करू शकतात. कुटुंबाच्या रुटीन मध्ये झोपायची, उठायची, नाश्ता, दुपारच्या रात्रीच्या जेवणाची वेळ, रोज सकाळचा घरातल्या घरात व्यायाम अंतर्भूत करू शकतो. व्यायामासाठी घराबाहेर जायची अजिबात गरज नाही. यु ट्यूब वर walk at home, workouts at home चे शेकडो व्हिडिओज आले आहेत ते वापरू शकतो. घरात नुसत्या दोरी उड्या १०० चे सेट करून मारल्या तर त्या सारखा चांगला कार्डिओ नाही. दोरी उडी विकत घ्यायला दुकान उघडी नाहीत म्हणून रडगाणं गायची गरज नाही दोरीशिवाय नुसत्या उड्याही मारू शकतो.

आपल्या प्रत्येकामध्ये एक काहीतरी खास टॅलेंट देऊन आपल्याला जन्माला घातलेलं आहे. इतकी वर्ष धकाधकीच्या दैनंदिनी मध्ये आपल्याला त्याबद्दल काही करायला जमल नसेल. यावर्षी कोरोनाने दिलेल्या संधीचा फायदा घेऊन ते टॅलेंट जगता येतंय का ते बघायचा प्रयत्न करु शकतो. आपल्याला अश्या कितीतरी गोष्टी येत असतील की ज्या आपल्या मुलांनाही यायला पाहिजेत असं वाटलं असेल पण शिकवायला वेळ मिळाला नसेल, त्या मुलांना शिकवायचा प्रयत्न करू शकतो.

संपूर्ण कुटुंबाने ठरवून जर वेळेचा उपयोग आपल्यातलं टॅलेंट जगायला, एकमेकांची काळजी घ्यायला, कुटुंबातल्या प्रत्येकाबरोबर क्वालिटी वेळ घालवायला केला. यावर्षी काहीतरी असं केलं की जे कोरोना नसता तर करायला जमलं नसतं तर पुढची अनेक वर्ष कुटुंबाला वेळ दिला नसल्याची वर्षानुवर्षांची खंत संपून यावर्षी खूप काही मौल्यवान मिळवलं, कुटुंब म्हणून घरातला प्रत्येक माणूस मनाने आपलासा झाल्याचं समाधानाने खुशीने सांगता येईल. २०२० च्या उरलेल्या तीन महिन्यात मनाने कुटुंब म्हणून एकत्र झालो तर हे वर्ष वाया घालवल्याचा पश्चाताप करायला न लागता आनंदाने पुढच्या येणाऱ्या अनेक वर्षांची चांगली पायाभरणी झाल्याची पावती स्वतःला देता येईल.

डॉ संध्याजीत
अमेरिका

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगले लिहिले आहे.
पण सुरवातीला मी कथा म्हणून वाचायला घेतले तर थोडं गोंधळायला झाले.

नमस्कार !!!

हा माझा मायबोलीवरचा पहिलाच लेख होता. हे सगळे माझे रोजच्या जीवनातले आजूबाजूचे, माझ्या पेशंटचे जीवन अनुभव आहेत
प्रत्येक लेखात एक गोष्ट आणि मग थोडासं त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण चांगलं काय करू शकतो असं मला लिहायचं आहे.
नक्की कोणत्या वर्गाखाली मी माझं लिखाण पोस्ट करावं याबाबत मार्गदर्शन करावं ही विनंती.

पहिल्या लिखाणाला भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद !!!

डॉ संध्याजीत

छान लिहिले आहे.
मायबोलीवर स्वागत आणि पुलेशु (पुढील लेखनास शुभेच्छा)
ललितलेखनच यासाठी योग्य असावे

धन्यवाद !
ललितलेखनात पोस्ट करेन. पुलेशु समजावून दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. गेल्या अनेक दिवसापासून उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज फळाला आला.

शाळा कॉलेजला जातात म्हणजे घरातली काम करायची गरज नाही हे आपणच त्यांना शिकवलेल आहे. >> अगदी.
आवडला व पटलाही लेख. कोणत्याही व्यक्ति'वादा' चा आग्रह न धरता लिहिले आहे. शिवाय शक्य ते प्रयत्न व पर्याय सांगितले आहेत.

घर सगळ्यांचं असल्यामुळे घरकामही सगळ्यांनीच वाटून घ्यायला पाहिजे त्यात नवरा, मुले, सासू, सासरे सगळेच आले.
पण तसं होताना दिसत नाही सगळी कामं ह्या ना त्या कारणानी बाईच्याच गळ्यात येऊन पडतात.
ती जॉब करणारी असो अथवा नसो..
हे माझ्या आजूबाजूच्या आणि ओळखीच्या कुटुंबातून नोंदवलेलं निरीक्षण आहे.

छान आणि परखड लिहिले आहे. आपल्या मुलांना बिघडवण्यासाठी आई-वडील च जबाबदार असतात हे आपण आजुबाजुच्या उदाहरणांवरुन सहज पाहु शकतो. आपल्या घरात देखील लाडावलेले बोके असतील तर त्या घरावर ते कसला ना कसला वरवंटा नक्कीच फिरवतील याची खात्री बाळागुन या बोक्यांना वेळीच कामाची सवय लावली पाहिजे हे या निमित्ताने सर्वांसमोर आणले हे फार बरे झाले. प्रत्येक आई-वडिलांसाठी आत्मपरिक्षण करण्यासारखी परिस्थिती आहे.