गहिरे गोकुळ 2
***बराच विलंब झाला ना?पहिला भाग लिहून. राधा कृष्ण यांच्याविषयी लिहिताना खूप शब्द येतात.त्यांना मांडताना फार गाळण उडते.
आता नाही उशीर करणार....***
**तर पुढे
**राधा: कान्हा , खूप निवांत गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. अर्जुनाला जे ज्ञान दिलंस म्हणजे तसं ऐकून आहे मी द ग्रेट भगवद्गीता...
कान्हा काय आहे रे ही भगवद्गीता? तुझं आणि अर्जुनाचं नातं हे किती सॉरटेड आहे. सखा म्हणतो तो तुला आणि तू मारलेली पार्थ ही हाक, साऊंडस सो रेस्पेक्टबल!!!
गम्मत आहे ना माधवा, आपलं नातं मात्र किती किती वेगवेगळ्या आयामातून पाहिलं गेलाय ,कान्हा.....समजत नाही....
द्रौपदी आणि तुझं नातं, किंवा बाकीच्या गोपी तितक्याच भावविभोर होत्या ना?मग तू आणि मी फक्त त्या आणि 'तसल्या ' गाठीत का बांधून पडलोय?
जो तू मला बापडीला समजलास तितकाच बाकीच्या गोपींना आणि यशोदामाई, रोहिणीमाता याना प्रिय होतास ना? का गोकुळात एकमेव राधा होती?
एकट्या राधापायी बाकीच्या गोपींची निरागस ममता, प्रेम, समर्पण कुठे गेले कान्हा? त्याही तेव्हढ्याच मलूल, शुष्क झाल्या होत्या.
(बासरीचे कर्णमधुर स्वर कानी येतात, राधा या अचानक स्वरांनी थोडी बावचळते.
तिला जणू पुन्हा गोकुळ अवतरलेलं दिसतं. तो गोकुलच्या वातावरणात भरून राहिलेला गोमय गंध, घराच्या लाकडी खांबांशी अंग झोंबत झोंबत पुन्हा मजबूत लाकडी रवीशी फुगडी घालत, चुळूक चुळूक आवाज करत ताक घुसळणाऱ्या मजबूत सुबक सुम्भाच्या दोऱ्या. त्यांचा घसस्स घसस्स आवाज. कान्हाची मुरली कानावर आली रे आली की सगळंच स्तब्ध व्हायचं! अंतरातले प्रश्न, रागरंग सगळंच त्या मुरलीच्या स्वाधीन व्हायचं.
राधा मुरलीच्या त्या स्वरांबरोबर गोकुळात हरवली आणि त्याबरोबर हेही विचार तिच्या मुग्ध तरीही टक्क उघड्या डोळ्यातून काठावर आले होते.
मुरलीचे स्वर केव्हाच थांबले पण राधाच्या मनात नव्हते. ती इतकी हरवली की तिच्या बाजूला गोविंद स्वतः उभा होता हे ही तिला कळलं नाही.
राधाचे विशाल काळेभोर डोळे हलक्या अशा आय लायनरमुळे अधिक खुलून दिसत होते.
यमुनेच्या काळाशार डोहाप्रमाणे. किती इतिहास किती घटना या यमुनेच्या डोहात सामावलेल्या. किती संवाद किती सत्य, किती रहस्य!तरीही मनाचा तळ दिसेल एव्हढी अजूनही स्वच्छ आहे हिच्या मनातली यमुना. हिच्या आवाजात अजूनही त्या निरागस गाईचं हंबरणं आहे.आर्त!! स्नेहभरलेलं...न जाणो कृष्ण किती वेळ त्या यमुनेत स्वतःचं बालपण बघत राहिला. राधाही बहुदा तेच पहात होती.
कृष्णा थांब त्या दुष्ट कंसाकडे जाऊ नकोस कृष्णा.....
राधाच्या डोळ्याचे काठ यमुनेने ओलांडले आणि गंगा दुथडी भरून वाहू लागली)
राधा: कृष्णा थांब, थांब गोविंदा जाऊ नको , तो दुष्ट ठार मारील, पहा पहा त्या यशोदा माईला भोवळ आली.....
( राधाला कृष्णाने बाटली दिली पाण्याची. राधा त्याच धुंदीत होती. तिचे आक्रोश करणे किती वेळ सुरू होते....कृष्ण तेव्हढा वेळ शांत उभा होता. हातातला पारिजातक त्याने हळूच राधेच्या जवळ नेला. आणि दुसऱ्या हाताने अलगद तिच्या मुलायम तलम केसांवरून हात फिरवला)
(राधा हळू हळू सावरली, आपले मुख इतका वेळ आपल्या लांबसडक बोटे असलेल्या हातात लपवून रडलेली भावविभोर राधा , तिने हळूच आपला एक डोळा उघडून पाहिलं कोण आहे..
तिच्या बाजूला एक सोनेरी चमचमती बासरी होती. एक सावळा तरुण उभा असलेला जाणवला. एक तुळशीचा दरवळ जाणवला.
राधाने दोन्ही हात बाजूला केले आणि नीट निरखून पाहिलं. मोरपिशी रंगाचा टी शर्ट आणि क्रीम कलरची थ्री फोर्थ...मुकुट मात्र नव्हता. मनगटात एक तांब्याचे ब्रेसलेट आणि त्यात छोटेसे मोरपीस...आणि त्या लालबुंद ओठातून एक दन्तपंक्ती खुलली, ओठ हलले आणि मंजुळ स्वर बाहेर पडला,जणू गोवर्धन पर्वतावरल्या नाजूकश्या झऱ्याचे खळाळून हसणे)
कृष्ण: राधा ए राधा....
(कृष्णाचा एक उच्छवास,राधेच्या कुरळ्या केसातून वाहिला)
(राधाने डोळे मिटले, तो आश्वासक स्वर, मधुर दिवेलागणीचं हास्य,राधा अंतरातून कमालीची शांत झाली. एक समाधीसम शांतता, तिच्या मनात निर्माण झाली. कालिया मर्दनानंतर जशी यमुना स्थिर आणि शांत झाली तसंच काही.)
(राधाने वर पाहिलं.कृष्णाकडे एकवार डोळे भरून पाहिलं...)
कृष्ण: राधा....
राधा: थांब कन्हया, मला तुझा प्रेझेंस फील करू दे. काही म्हणजे काही बोलू नको काही क्षण...तुझ्याबरोबरची ही शांतता बरंच काही विचारतेय...डोळे मीट आणि काही क्षण असाच बस...
(कान्हा तसाच थांबला...काही मिनिटे,त्याच आम्रवृक्षाखाली ते अमर तत्व काहीकाळ आपल्या सखीसाठी)
राधा: गोविंदा....काय रे हा अवतार तुझा?
(हातावर हात घासते, चेहऱ्याला ऊब देते, आता आकाशाचा निळा रंग केशरी रंगाने व्यापायला सुरुवात होते. यमुनेच्या डोहाला मोह आवरत नाही म्हणून त्याच्या निळसर काळ्या रंगात केशरी रंगाच्या अवकाश छटा आणि मध्येच डोकावणारा जांभळा असा गहिरा खेळ सुरू होता. आकार उकार वेगळे पण खेळ तोच रोजचा)
(कृष्ण जरा आळोखे पिळोखे देतो...)
कृष्ण: झेपत नाही तुला ,किती हळवी आहेस...अजूनही तिथेच अडकलेली, का कशाला?
राधा: कृष्णा आपलं पृथ्वीवर येताना काय ठरलं होतं? मी आधी यायचं...
(कृष्ण खळाळून हसला, राधा लटकी रुसली,स्लिंग बॅग आवळत रागाने कृष्णाकडे बघायला लागली)
राधा: हो मीच म्हणाले मी आधी जाईन म्हणून...
कृष्ण: मग?आता सांग एक एक करून
(कृष्ण आपल्या गालावरून उजवा हात फिरवत मिश्किल पणे डावा डोळा तिरका करत म्हणाला)
मुक्ता
26 ऑगस्ट 2020
क्रमशः
भाग 1 ची लिंकhttps://mabo
भाग 1 ची लिंक
https://mabo.page.link?utm_campaign=inApp-share&apn=com.maayboli.mbapp1&...
हे क्रमशः का आहे...?
हे क्रमशः का आहे...?
पुढचा भाग लवकरात लवकर येऊ दे...
हो मन्या क्रमशः आहे, आता
हो मन्या क्रमशः आहे, आता पटापट देईन पुढचे भाग