`सरप्राईज`

Submitted by पराग र. लोणकर on 24 August, 2020 - 01:33

`सरप्राईज`

सीमा, माझी पत्नी, तिच्या ऑफिसच्या एका dinner मिटींगला गेलेली होती. मी राजेशशी फोनवर बोलत होतो. राजेश माझा धाकटा भाऊ. अमेरिकेतल्याच एका मुलीशी लग्न करून तेथेच सेटल झालेला. तो म्हणत होता,

``सुझानच्या वडिलांचा एक मित्र इथे मोठा डॉक्टर आहे. तुझे सगळे रिपोर्ट्स मी त्याला मेल केले. एका सर्जरीनं तुझी दृष्टी परत येऊ शकेल असे त्याचे म्हणणे आहे. अर्थात, ही सर्जरी ब्रेन रिलेटेड असल्याने तशी रिस्की आहे. फिफ्टी-फिफ्टी चान्स आहे असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. पण महत्वाचं म्हणजे ५०% तुझी दृष्टी परत येईल असं असलं तरी उरलेले ५०% थेट तुझ्या जीवितालाच धोका आहे. आणि त्यामुळेच निर्णय घेणे अवघड आहे.``

मी विचारात पडलो. काही क्षण शांततेत गेले. मग मी त्याला उत्तर दिलं,

``हरकत नाही. आपण ही रिस्क घेऊया. पण हे बघ. यातलं सीमाला काहीही कळता कामा नये. कारण या रिस्कबद्दल कळल्यावर ती मला सर्जरीच करून देणार नाही. तू `बदल` म्हणून मला अमेरिकेला बोलव आणि आपण गुपचूप हा सगळा कार्यक्रम करूयात.``

लवकरच राजेशनं माझी सर्व व्यवस्था केली आणि काही महिन्यांसाठी मी अमेरिकेला रवाना झालो. साधारण तीन वर्षांपूर्वी एका मोठ्या अपघातात मी अगदी सुदैवाने वाचलो होतो. मात्र डोक्याला मार लागल्यानं माझी दृष्टी गेली होती. विविध उपाय करून झाले, पण अजून यश आलं नव्हतं.

ठरल्याप्रमाणे मी अमेरिकेत गेलो. सर्जरी झाली आणि सुदैवाने ती यशस्वीही झाली. माझी दृष्टी परत आली. सीमाला या सर्जरीबद्दल आम्ही काहीच कळवलं नव्हतं. त्यामुळे माझी दृष्टी परत आल्याचंही तिला आम्ही कळवलं नाही. थेट पुण्याला आल्यावर तिला `सरप्राईज` द्यायचं मी ठरवलं.

मी पुणे एअरपोर्टवर उतरलो. सीमा मला घ्यायला आली होती. नेहमीप्रमाणे माझ्या डोळ्यावर गॉगल चढवलेला होता. आमच्याच सोसायटीत राहणारा हेमंत मला थोड्या अंतरावरच दिसला. मी अजूनही दृष्टिहीन असल्याचे नाटक करत असल्यामुळे तो दिसल्याचे मला सहाजिकच दाखवता आले नाही. आम्ही एअरपोर्टमधून बाहेर पडलो, तसा काही अंतरावर तोही बाहेर पडताना मला दिसला. आम्ही गाडीतून घराकडे निघालो. काही अंतरावरून त्याचीही गाडी आमच्या मागे येताना मला दिसली.

आमचं घर, म्हणजे आमचा बंगला आला. सीमाच्या आधाराने मी गाडीतून उतरलो आणि घरात पाऊल टाकलं. सीमानं हलकेच मला समोरच्या सोफ्यावर आणून बसवलं. सीमा मला पाणी आणून देण्यासाठी स्वयंपाकघरात शिरली. तिनं मुख्य दरवाजा लावला नसल्यानं माझं लक्ष दरवाजाकडे होतं. अचानक दरवाजातून हेमंतही आत येताना मला दिसला. तो अगदी हलकेच आत शिरला आणि माझ्या मागील भागात जाऊन काहीतरी करू लागला. मला मागे वळून पाहणं शक्यच नव्हतं. सीमा माझ्यासाठी पाणी घेऊन आली. तिचं लक्ष माझ्या मागे उभ्या असलेल्या हेमंतकडे गेलं. त्याला तिथे पाहून ती दचकेल अशी माझी अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. त्यामुळे उलट मीच चकित झालो. आता माझं अंध असल्याचं नाटक मला पुढे चालू ठेवणं भाग होतं. माझ्या सोफ्याच्या अगदी समोर आमची showcase आहे. त्याच्या brown काचेमध्ये मला हेमंतच्या हालचाली अंधुक पण बऱ्यापैकी दिसत होत्या. अचानक त्यानं हातात पिस्तूल धरल्याचं माझ्या लक्षात आलं आणि एका क्षणात मला सगळ्या गोष्टींचा साक्षात्कार झाला. माझी ही गम्मत माझ्या भलतीच अंगाशी आली होती. आल्या आल्या माझा काटा काढायचा असं या दोघांनी ठरवलेलं सरळ सरळ दिसत होतं. का? कशाला? वगैरे विचार करायला मला अजिबात वेळ नव्हता. मला खूपच पश्चात्ताप झाला. मी असा सरप्राईज वगैरेचा plan केला नसता, मला दृष्टी परत मिळाल्याची बातमी कळवून मी आलो असतो तर असं इतकं सहज आणि आल्या आल्या लगेच मला मारण्याचा त्यांचा plan तरी ठरला नसता.

`आपण आता तातडीने काय करायला हवं?` याबाबतच्या विचारांचा माझ्या मनात गोंधळ उडाला. मला काहीतरी करून मागच्या बंदुकीतून गोळी सुटणं थांबवायचं होतं. `काय करावं?` हे सुचावं म्हणून मी अगदी सावकाश घोट घोट पाणी पिऊ लागलो. मी माझं पाणी पिणं संपवेपर्यंत तरी निदान हेमंत पिस्तुल चालवणार नाही अशी मला आशा होती.

हेमंत अतिशय धडधाकट प्रकृतीचा होता. मी वाचण्यासाठी त्याच्याशी दोन हात करून काहीच उपयोग नव्हता. शिवाय त्याच्या हातात बंदूक होतीच.

माझा पडलेला चेहरा पाहून सीमानं विचारलं,

``परेश, काय झालं? असा गप्प का?``

``सीमा, खरं सांगू, मी आता जे काही करणार आहे न, ते मी तुला न सांगता करणार होतो. पण, नाही, मला वाटतं ते मी तुला सांगूनच करावं. शिवाय मला त्यासाठी तुझीच थोडी मदत हवी आहे.``

``काय झालं, काय करायचं आहे तुला?`` सीमानं मला विचारलं.

``मी आत्महत्या करणार आहे.`` मी म्हणालो आणि हळूच समोरच्या काचेत पाहिलं. हेमंतचा हात खाली आलेला मी पाहिला.

``काहीतरीच काय बोलतोस परेश?``

``नाही सीमा. मी खरंच खूप कंटाळलो आहे. मला आता जगणं नकोसं झालं आहे. त्यासाठीचं औषधही मी अमेरिकेतून मोठ्या हुशारीनं मिळवलं आहे. खरं तर ते मी तिथेच घेणार होतो, पण उगाच राजेश अडचणीत यायला नको म्हणून थांबलो. इथे, तुही अडचणीत यायला मला नको आहेस. एक काम करशील? कागद-पेन घेशील. मला थरथरत्या हातानं काही लिहिणं शक्य नाही. तू मी म्हणतो तसं लिही. म्हणजे माझ्या मृत्युनंतर तुझ्यावर काहीही बालंट येणार नाही.``

सीमानं मला समजावण्याचा; म्हणजे तसं नाटक करण्याचा खूप प्रयत्न केला. पण मी ठाम राहिलो. मग तिनं मी सांगितल्याप्रमाणे एका कागदावर लिहिलं-

`मी जीवनास कंटाळल्यामुळे आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येसाठी कुणासही जबाबदार धरू नये.`

``आण तो कागद इकडे. करतो मी सही.``

सीमानं माझ्या समोरच्या center tableवर तो कागद ठेवला. माझा हात त्या कागदावरील सहीच्या ठिकाणी नेला. मी सही करण्यास सुरुवात करताना हळूच सीमाकडे पाहिलं. तिची सस्मित नजर हेमंतवरच खिळली होती.

मी सही केली आणि तो कागद घडी करून माझ्या खिशात ठेऊन दिला.

``हे बघ, आता मला आपल्या बेडरूममध्ये पोहोचतं कर. ती माझी bagपण घे सोबत. त्यात ते औषध आहे. मी आत जाऊन आतून कडीही लाऊन घेतो. उद्या सकाळी तू पोलिसांना बोलाव. पोलीस थेट दार तोडूनच आत शिरतील. माझ्या खिशात ही चिठठीही त्यांना मिळेल. म्हणजे तुझ्यावर त्यांचा काडीचाही संशय राहणार नाही. ``

सीमानं परत रडण्याचं नाटक केलं पण मी तिला बधलो नाही. शेवटी तिनं मला माझ्या रूममध्ये पोहोचवलं.

मी आतून कडी लावून घेतली आणि सुटकेचा नि:श्वास टाकला.

माझं अगदी काही क्षणावर आलेलं मरण मी पुढे ढकललं होतं. आता माझ्या अपेक्षेप्रमाणे घडलं तर ते येणारच नाही यासाठी मला काही करायला वेळ आणि संधी मिळणार होती.

आणि माझ्या अपेक्षेप्रमाणेच घडलं. मीच आत्महत्या करतो आहे म्हटल्यावर, माझा खून करायचा आणि त्यानंतरचे सगळे लपवालपवीचे सोपस्कार करायचे, या साऱ्याचं आता काहीच कारण उरलेलं नसल्याचं पाहून काही मिनिटानंतर हेमंत माझ्या बंगल्याबाहेर पडल्याचं मला खिडकीच्या बारीक फटीतून दिसलं.

आता घरात सीमा एकटीच होती.

मी खिशातून आत्महत्या करत असल्याचं ते पत्र बाहेर काढलं. मी खरंतर मगाशी त्यावर सही केल्याचं फक्त नाटकच केलं होतं. प्रत्यक्ष सही केलीच नव्हती. आता मात्र मी ती सही केली. फक्त फरक एवढाच केला. मी त्यावर सीमाची सही केली. दृष्टी असतानाची अनेक वर्षे मी अनेक लहान-सहान कागदपत्रांवर तिच्या अनुपस्थितीत तिच्या सह्या केलेल्या होत्या. तिला अनेकदा कामासाठी भारतभर जावे लागत होते. अश्या वेळी मला आवश्यकतेनुसार तश्या सह्या कराव्या लागल्या होत्या, आणि ते तिलाही माहीत होतं. यात मी तिची फसवणूक करत नव्हतो. आज मात्र, दहा वर्षांच्या आमच्या संसारात मी तिची अशी फसवणूक पहिल्यांदाच करत होतो.

तर, मी अगदी शांतपणे सीमाची सही त्या पत्राच्या खाली केली.

मग माझ्या bagमधलं ते बागेतील झाडांची कीड मारण्यासाठी मी आणलेलं, जहाल विष असलेलं औषध बाहेर काढलं.

आता हे औषध सीमाला कसं पाजावं, एवढ्या एकाच समस्येवर मला मार्ग काढायचा होता...

***

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच !

मधेच सीमाला सगळ माहीत आहे आणि ती आणी हेमंत मुद्दाम सरप्राईज देण्यासाठी नाटक करताहेत अस वाटलेलं Happy

सहीच।
सीमाला न सांगता तो ओपरेशनसाठी अमेरिकेला गेला, इथे सीमाचे विबासं अपेक्षित होते.
शेवटचा ट्विस्ट भारी आवडला. जशास तसे।

सर्वांना मनापासून धन्यवाद!

mrunali.samad विबासं चा अर्थ समजला नाही. कदाचित मायबोलीवरील नेहमीच्या सांकेतिक शब्दांबद्दल माझे अज्ञान असल्याने.

मस्त ..
शेवटचा ट्विस्ट भारी आवडला >> +१

छान!
अंधाधुन बघताना जसं घुसमटल्यासारखं होतं तसं झालं मधला प्रसंग वाचताना.

अंधाधुन बघताना जसं घुसमटल्यासारखं होतं तसं झालं मधला प्रसंग वाचताना. +१२३

अंधाधुन बघताना जसं घुसमटल्यासारखं होतं तसं झालं मधला प्रसंग वाचताना.>>>>>++11111 छान कथा

कडक