कन्फेशन

Submitted by राधानिशा on 17 August, 2020 - 05:09

माझ्या आधीच्या - माझ्यामध्ये मॅच्युरिटी कशी आणू , या धाग्यात नात्यातील भावाने न विचारता पुस्तकं नेल्याने माझा कसा संताप झाला आहे , हे लिहिलं होतं . पुस्तकं आता परत मिळणार नाहीत अशी खात्रीही व्यक्त केली होती .

आता त्यातली अर्धी पुस्तकं परत मिळाली आहेत . उरलेलीही आणून देतो म्हणून सांगितलं आहे . त्यावेळच्या प्रतिक्रियेची लाज वाटून ऍडमिनना तो धागा हटवण्याची विनंती करावी का असा विचार मनात घोळत होता पण समोरासमोर झालेल्या चुकीची माफी मागायची हिंमत नाही , त्याची नाही .. यापूर्वीही काही लोकांना दुखावलं गेलं आहे , त्यांची समोरासमोर माफी मागायला अतिशय लाज वाटते , निदान इकडे तरी बोलून चूक मान्य करण्याइतपत हिंमत दाखवूया असं वाटलं .

याआधीही क्षुल्लक कारणांवरून ज्यांचा अतिशय राग राग केला त्या व्यक्तींनी अशी एकच , वरवर साधी वाटणारी कृती केली की माझ्या वागण्याची मला फार लाज वाटलेली आहे ...

काही लोकांबद्दल मी मनात फार वाईट विचार केला आहे , क्षुल्लक गोष्टींवरून डोकं फिरवून घेऊन .. हा स्वभाव मी कुठून घेऊन आले समजत नाही .. कारण आईवडील , आजी आजोबा , आते , काका , मावशा कोणाचाही असला तामसी आत्मकेंद्रित आणि स्वार्थी स्वभाव नाही .. पूर्वजन्मांचे संस्कार असावेत अशी एक शक्यता वाटते ... किंवा डिप्रेशन आणि इतर मानसिक त्रासांनी स्वभाव हळूहळू बदलत गेला असंही झालं असेल ... नात्यातली बहीण रागावून बोलली म्हणून तिचा 2 -3 वर्षं राग राग केला , मनातच .. आता हळूहळू ते विसरण्याचा प्रयत्न केला पण अढी जाता जात नाही .. आता काही वेळापूर्वी तिने आमच्या घराचं अंगण निसरडं झालं आहे म्हणून खराटा घेऊन , ब्लिचिंग पावडर घालून ते साफ केलं .. कारण काय तर माझ्या वडलांना , तिच्या मामाला आता झेपत नाही त्याचं काम थोडं हलकं करावं .. मी नको नको म्हणत असतानाही माझं ऐकलं नाही .. कोण 40 - 45 हजार पगार घेणारी 35 - 40 वर्षे वयाची बाई अशी दुसऱ्याच्या घरचं , मामा झाला तरी .. असलं काम करेल ... माझ्या मनाच्या क्षुद्रपणाची अतोनात शरम वाटून , मेल्याहून मेल्यासारखं झालं आहे .

भांगेत तुळस असा वाक्प्रचार आहे ... इथे तुळशीत मी एकटीच भांग उगवले आहे ... ह्या लोकांच्या चांगुलपणाची परतफेड होणं अशक्य आहे .. कधीतरी भविष्यात मला अंशतः परतफेड करण्याची संधी मिळावी आणि तुळशीत राहून माझंही आज ना उद्या तुळशीत रूपांतर व्हावं , हे स्वार्थी - क्षुद्र संस्कार जिथूनही कुठून माझ्यात आले असतील .. ते जळून राख व्हावेत आणि मी निदान मरण्यापूर्वी तरी शुद्ध व्हावे अशी कळकळीची इच्छा आहे ..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठिक आहे, होतं असं. कधी कधी आपण कसं वागु ह्याचाच अंदाज नसतो.
आणि, सॉरी म्हणणं बर्‍याच जणांना जडच जातं.
परीस्थीतीने स्वभाव बदलला असेल किंवा शारीरीक बदलाने( आजारपण, वगैरे) तरी असे होते असं पाहण्यात आहे.
कधी कधी, जीवन्सत्वाच्या कमी असण्याने, चिडचिड होते, न बोलता कुढणे होते. ( हे सर्व सर्वांनाच लागु असेल असे दावे नाहित पण, अनुभवावरून सांगते.

——-
बाकी, भाउ मायबोलीवर आहे का? सहज कुतुहल..

Pages