खिडकी.........

Submitted by शब्दांश on 12 August, 2020 - 09:10

कळायला लागल्यानंतर जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे मला खिडकी कायम आवडते.खिडक्यांच हे माझ वेड खूप जून आहे.आमचं मुरूडच घर खूप जून आणि पारंपारिक कोकणी पद्धतीच आहे. त्या घराला कोनाडे,खुंट्या,अडसर आणि तश्याच जुन्या पद्धतीच्या ‘खिडक्या’ तर खिडक्यांच्या ह्या प्रवासातील पाहिलं ठिकाण म्हणजे त्या घरातील त्या खिडक्या. त्यातल्या एका खिडकीतून मी वाडीतल्या नारळ,सुपारीच्या बागा खूप पहिल्यात. मुळात दुपारी मी कधी झोपतच नाही आणि शाळेतल्या परीक्षाजवळ आल्या कि आई दुपारी अभ्यासाला बसवायची त्यावेळी मी असाच खिडकीवर बसून अभ्यास करत असे म्हणजे खिडकीतून बाहेर बघण्याचा अभ्यास चालू असे. अगदी साधे लाकडी गज असलेली ती खिडकी मला आजही आठवते,त्या खिडकीतून किती भिन्न प्रकारचं जग दिसायचं म्हणजे सकाळची तुपाळ उन्ह,अंगणातील तुळशी वृंदावन, अंगणात वाळायला म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर “सनबाथ” घेत बसलेली कोकम साल,सुपाऱ्या,खूप उंच जाऊन आकाशाला हात लावायला निघालेले ते माड,त्या खिडकीतून प्रकाशाचा एक झरोका आमच्या घरात यायचा शेणानी सारवलेली जमीन वळवायला. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात आई पापड,बटाट्याचा कीस,फेण्या हा सगळा पावसाळ्याचा stock उन्हात घालायची आणि अर्थातच घरातल्या सगळ्यांची राखण करण्याची duty लागायची, माझी हि duty मि मोठ्या आवडीने त्याच खिडकीत बसून करायचो,
नंतर काही वर्षांनी आम्ही चिपळूणला राहायला आलो, ह्या घरालासुद्धा खूप खिडक्या होत्या ह्या खिडक्यांना मी त्यांची काम वाटून दिली होती किंवा अजूनही त्या त्यांची काम न चुकता करत असतात. पाऊस पडायला लागला कि मी आजही आमच्या माळ्यावरच्या खिडकीपाशी जाऊन थांबतो तासनतास त्या खिडकीतून मी पाउस पाहिलाय,माझ्या खोलीची खिडकी म्हणजे माझ्या स्वर्गातल्या कल्पनेचा अविभाज्य भाग आहे स्वर्गाची कल्पना म्हणजे काय तर खिडकी सताड उघडी ठेवून तिच्या समोर एक खुर्ची मांडायची आपल्या दोन्ही तंगड्या खिडकीवर ठेवायच्या आणि खुर्चीत बसून पुस्तक वाचत बसायचं आणि अगदीच गरज पडली तर कॉफी,कधी अगदीच कंटाळा आला तर छान गाणी सुद्धा लावायची अश्या वातावरणात मला साहीर,गुलजार,सौमित्र,प्रभा अत्रे,निराली कार्तिक किती जवळून भेटतात म्हणून सांगू.
पुढे पुण्याला शिकायला गेलो आणि त्या रूमलासुद्धा एक छान खिडकी होती आणि खिडकीला लागून माझा बेड नाही माझी कॉट होती, तिथे राहायला सुरुवात केली पण माझ्या आधीच्या मुलाने त्या खिडकीला पडदे लावून घेतले होते मला मुळात खिडकीला पडदे लावलेले मुळीच आवडत नाहीत,पडदे असावेत पण ते कायम सताड उघडे असावेत खिडकीला पडदे लावणाऱ्या माणसावर खरच अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हायला हवा तो होणार नाहीच कारण आपल्या देशात बायकांना चेहऱ्यावर पडदे लावयला लावणाऱ्या माणसांना काही कुणी बोलत नाही तिथे खिडक्यांच काय? चांगल्या भाषेत त्याला नावं काहीही द्या पदर म्हणा,घुंगट म्हणा किंवा बुरखा म्हणा असो तर पुण्याची खिडकी, सगळ्यात आधी मी ते पडदे काढून टाकले आणि खरंच ती खिडकी माझ्या पुण्यातील आयुष्याची साथीदार होती खूप काही शिकवलं त्या खिडकीने त्या खिडकीतून समोरचा रस्ता दिसायचा त्या रस्तावरून संध्याकाळच्या वेळी फिरणारी अनेक जोडपी प्रेमीयुगल म्हणा हवतर ती पहिली आहेत,खूप चांगली मैत्रीसुद्धा पहिली आहे,जवळ-जवळ अख्ख जग मी त्या खिडकीतून पाहिलंय आई-बाप महिन्याला खूप पैसे पाठवतात आणि ते खर्च कुठे करायचे हा प्रश्न पडून उत्तर सापडत नाही म्हणून किंवा Fashion म्हणून सिगरेट ओढणारी मुली,मुल पहिली आहेत एकदा असाच खूप पाउस पडत होता माझा रात्रीच्या जेवणाचा डबा आला आणि मी त्याच खिडकीत बसून जेवत होतो खिडकीतून छान मुसळधार पाऊस पडत होता समोरच्या रस्त्यावरच्या कचराकुंडीत एका बाईने कसलीतरी पिशवी फेकली आणि ती तिथून निघून गेली पाचएक मिनिटांनी तिथे त्या कचरा कुंडीजवळ एक भिकारी आला आणि काहीतरी शोधत होता बिचारा थंडीने तो कापत होता संपूर्ण भिजला होता त्याला ती पिशवी मिळाली आणि त्या पिशवीतून कचऱ्यात फेकलेला शिळा भात त्याला मिळाला आणि तो खाऊ लागला खूप वाईट वाटल माझ्या हातातला घास तसाच डब्यात ठेवून डबा बंद केला आणि हात धुतले त्या रात्री जेवणच गेलं नाही,अशी हि खिडकी मला कायम काहीतरी शिकवून गेली आयुष्यात कायम ज्या खिडक्या लक्षात राहतील त्यातलीच हि एक खिडकी आणि तिच्यातून पाहिलेल्या माणसांच्या आयुष्यातले छोटे,छोटे प्रवेश माझ्या आयुष्याच “नाटक” खुप मोठ करून गेले.
पुढे उनाडक्या सुरु झाल्या आणि खोलीतल्या खिडक्यांची जागा प्रवासातल्या खिडक्यांनी घेतली कुठल्याही प्रवासात मला कायम खिडकी हवीहवीशी वाटते कारण मला माझ बालपण तिथे सापडत ST चा प्रवास असेल तर मुद्दाम लवकर घुसून खिडकी मिळवायची आणि बाजूच्या माणसाला मनातल्या मनात टुक-टुक करायचं किती आनंद होतो हे शब्दात नाही सांगता येत. रेल्वेचा प्रवाससुद्धा आत AC नसला तरी चालतो पण खिडकी हवीच आणि आजकाल विमानाचा प्रवाससुद्धा खूप होतो मला आठवतंय लहानपणी अंगणातून विमान दिसलं कि मी उगाच हात उंचावून त्यांना टाटा करायचो आणि मग दोन्ही हात लांब करून संपूर्ण अंगणात धावत सुटायचो तेव्हा खरंच प्रश्न पडायचा विमानातल्या खिडकीत बसलेल्या माणसांना मी दिसत असेन का? पहिल्यांदा जेव्हा मी विमानात बसलो तेव्हा चेकइन करायच्या आधीच airport च्या guard ला window seat बद्दल विचारल होत आज विमानाची खिडकी खूप काही दाखवते.
बर्फाचा मेकअप करून घेणारा हिमालय दाखवते अथांग पसरलेला समुद्र दाखवते कधी कधी बाजूला येणारे ढग दिसतात आणि मग मनातल्या मनात माजात त्या ढगांना मी म्हणतो”बघा आता तुम्ही आणि मी एकाच उंचीवर आलोय,गाठली कि नाही तुमची उंची” आणि हसत बसतो आणि प्रवास चालू राहतो. खिडकीला पाहून अस म्हणावस वाटत कि तेरे मेरे बीच में कैसा है बंधन अंजाना मैने भी है जाना तुने भी है जाना....... खरंच पण ‘मला कायम वाटत “खिडकी” हि माणसाच्या मनातील कुतूहल जिवंत ठेवते खूप उथळ वाटणाऱ्या ह्या जगाच खर प्रतिबिंब हि दाखवते.’window_0.jpeg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलंय!
खिडकीत बसून बाहेर पहात कितीही वेळ घालवता येतो.

(दुसऱ्यांंच्या) खिडकीतून सहज आतल्या खोलीची जी झलक दिसते तीही रोचक असते Wink भिंतीवरचं एखादं पोस्टर, अभ्यासाचं टेबल वगैरे. ते घर आपल्या ओळखीचं नसेल तर मनात काही कल्पनाही निर्माण होतात. Happy

ते हिमालयाचं हिलामय झालंय तेवढं जरा दुरुस्त करा.

छान आहेत खिडक्या.

मी शिकायला बाहेर असताना कॉलेजला जाताना हमखास खिडकीशेजारची जागा पकडायचे. हॉस्टेलवर जाताना बर्याचदा जीवावर यायचे. मग खिडकीतून बाहेर बघत विरंगुळा व्हायचा.

आणि लॉकडाऊनमध्ये खिडकीतून बाहेर बघताना निवांत पहुडलेल्या रस्त्यावरचा बहरलेला बहावा दिसला.

असेच छान लेखन येऊ दे.