काही पदार्थ जसजसे जुने होत जातात जास्त मुरत जातात आणि चविष्ट होत जातात, काही वस्तु काळ जातो तसतशा जास्त शोभिवंत होत जातात. रफीसाहेबांच्या बाबतीत माझंही तसं होत आहे. सुरांच्या या शहेनशहाला जाऊन आज चाळीस वर्षे झाली आणि या वर्षात त्यांच्या बद्दल वाढलंय ते फक्त प्रेम, आदर, आपुलकी आणि विस्मय देखिल. आपले वय वाढत जाते तशी समजही काही प्रमाणास सुदैवाने वाढते. रफी या हिर्याचे आणखी पैलु वाढत्या वयाबरोबर दिसु लागले. त्याच्या गाण्यांचा आनंद जास्त घेता येऊ लागला, त्या स्वरातील मखमलीचा आस्वाद आणखी अवीट वाटु लागला. याचा अर्थ रफी संपूर्ण कवेत आला असं नाही. हे स्वर अथांग आहेत. त्यात जितके खोल आपण जाऊ तितकी आकर्षक, दुर्मिळ रत्ने आपल्याला मिळणार आहेत याची मला खात्री आहे. त्यामुळे रफीचे गाणे डोळे बंद करून ऐकताना तल्लीनतेबरोबरच आज काय मिळणार याची उत्सुकताही असते आणि आवडत्या पदार्थाने शीगोशीग भरलेले ताट समोर आल्यावर माणसाची जशी अवस्था होते तशीच माझीही अवस्था होते.
आज या शहेनशहाला विनम्र अभिवादन करताना मनात येतोय तो त्यांचा शायराना अंदाज. शायरी म्हणजे शब्द, काव्य, त्यातील तोफेच्या गोळ्याप्रमाणे थेट लक्ष गाठणारा सूत्रबद्ध विचार हे तर खरेच. पण जेव्हा ती सर्वांसमोर व्यक्त करायची असते तेव्हा मात्र "अंदाजे बयां" अतिशय महत्त्वाचे. अन्यथा अत्यंत प्रभावी शायरीही निष्प्रभ होण्याचा संभव अधिक. हिन्दी चित्रपटात जेव्हा जेव्हा हा शायराना अंदाज बयान करण्याचा "वक्त" आला तेव्हा सर्वांनी फक्त रफीकडेच पाहिले. कारण या क्षेत्राचा तो बेताज बादशहा होता. येथे मी गीतात गुंफलेल्या शायरीबद्दल बोलत नाहीये. तर वाद्यांची साथ नसताना मुशायर्यात जेव्हा शायर आपला शेर सादर करीत असतो तेव्हा अनेकानेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. तेव्हा चाल तर महत्त्वाची असतेच पण त्याबरोबरच शब्दांची फेक, योग्य शब्दांवर आघात, शराबी, धुंद उर्दु फारसीतील शब्दांचे उच्चार आणि अर्थातच या सर्वांना लपेटून राहिलेल्या भावना हे सारं त्या सादरीकरणात असतं. रफीच्या भात्यातील हे सारे तीर रसिकाला घायाळ करतातच पण हा भाता अक्षय आहे हे ही लक्षात घ्यावं लागेल. हे तीर संपणारे नाहीत. कारण प्रत्येक गाण्यात रफीसाहेबांचा अंदाज वेगळाच असतो. मुशायर्यात सादर करणारा समोर असल्याने भावभावना चेहर्यावर दाखण्याची सोय तरी आहे. हातवारेही करता येतात. रफीने मात्र हे सारे अत्यंत परिणामकाऱरित्या फक्त त्याच्या दैवी आवाजाने दाखवलं.
हा विचार करताना मला सर्वप्रथम आठवताहेत ती "लाल किला" चित्रपटातील दोन गाणी. "न किसी की आंख का नूर हूं" आणि दुसरं "लगता नही है दिल मेरा उजडे दयार में" मोगल साम्राज्याचा अत्यंत दुर्दैवी असा शेवटचा बादशहा बाहादूरशहा जफर शायरही होता. मात्र त्याला समकालिन गालिब त्याच्या दरबारातच असल्याने बहुधा त्याची शायरी फारशी लोकांना माहित नसावी. शेवटच्या काळात ब्रम्हदेशात रंगून येथे या बादशहाला इंग्रजांनी कैदेत ठेवले होते. लाल किल्ल्याला आपला "यार" समजणार्या जफरने आपली व्यथा अत्यंत परिणामकारकरित्या या दोन गीतांमध्ये मांडली आहे. आपल्याला दफन करायला "दो गज जमीनही" या आपल्या मित्राच्या कुशीत लाभली नाही हे या बादशहाचं दु:ख आहे. आणि त्याची ही वेदना तितक्याच गहराईने आपल्यापर्यंत पोहोचवली आहे रफीसाहेबांनी. "न किसी की आंख का नूर हूं" देखिल तसेच. अतीव नैराश्य आणि हताशा दर्शवणारे. "कोई आ के शम्मा जलाये क्यूं, मै वो बेकसी का मजार हूं" या शब्दांत सारे काही संपल्याची भावना दर्शविणारे. आणि हे ही दु:ख आपल्या आवाजात मूक वैफल्य आणून दाखवतात ते रफीसाहेबच. खरं तर रफीचा शायराना अंदाज दाखवायला ही दोनच गाणी पुरेशी आहेत. पण गुरुदत्तला आणल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही असे मला वाटते.
रफीचं प्यासा मधलं "तंग आ चुके है कशमकशे जिंदगीसे हम" हे विसरता येईल का? समोर पुर्वाश्रमीची प्रेयसी बसली आहे. तिने रोखठोकपणे व्यवहार निवडला आहे. दोन वेळची भ्रांत असणार्या कवीला सोडून ती आता श्रीमंताची झाली आहे. अशावेळी भग्न हृदयी कवी रसिकांसमोर "ठुकरा ना दे जहां को कहीं बेदिली से हम" असं च म्हणणार. पण समोर बसलेल्या रसिकांना हे रुचत नाही. एक उंट माणूस म्हणतो "अरे इस खुशी के माहौल में ये क्या बेदिली का राग छेड रख्खा है..." तेव्हा तोफेच्या गोळ्याप्रमाणेच शब्द येतात "देंगे वोही जो पायेंगे इस जिंदगी से हम" हा प्रसंग अविस्मरणीय झाला आहे तो गुरुदत्तच्या मुद्राभिनयाने हे तर खरंच पण त्याला तितकीच समर्थ जोड लाभली आहे ती रफीसाहेबांची. परिस्थितीच्या थपडा खाल्लेला, हताश कवी नुसत्या आवाजातून सादर केला आहे त्यांनी. हे सारं सांगतानाच त्यात संगीतकार आणि शायर यांचा वाटा नाकारता येणार नाहीच. पण आज पुजा रफीसाहेबांची मांडली आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलावंसं वाटतंय. यानंतर शायरी म्हणजे त्यात इश्क मोहोब्बत की बातें तर असायलाच हवी. तशीही दोन गाणी मला चटकन आठवतात.
पहिलं मेरे हुजूर मधलं " रुख से जरा नकाब उठा दो मेरे हुजूर". ट्रेनमध्ये कोवळा जितेंद्रचे, बुरखा घातलेल्या माला सिन्हाला उद्देशून प्रियाराधन सुरु आहे. गाण्याची सुरुवात देण्याचा मोह आवरत नाहीये. रफीसाहेब प्रेमभरल्या मखमली आवाजात सुरुवात करतात " अपने रुखपर निगाह करने दो, खुबसूरत गुनाह करने दो, रुखसे परदा हटाओ जा ने हया, आज दिल को तबाह करने दो.." इतके आर्जव मधाळ स्वरात केल्यावर कुठली हसीना विरघळणार नाही? यानंतर दुसरे गीत आहे "कन्यादान" मधील "मेरी जिंदगीमें आते तो कुछ और बात होती". शशीकपूर सुरुवात करतो " उनकी जुल्फे उनके चेहरे से हटा सकता नही, दिलकी बेताबी किसी सूरत छुपा सकता नही, कितनी दिलकश है मोहोब्बत की जवां मजबूरीयां, सामने मंजिल है और पाओं बढा सकता नही" या शब्दांनी. यावेळी "मजबूरीयां" ज्या तर्हेने रफीसाहेब म्हणतात ते खास ऐकण्याजोगं. अशावेळी त्या शेरवान्या, ते उर्दु, फारसी शब्द, ते हंड्या झुंबरं असलेलं लखनवी वातावरण तर असायला हवंच. पण त्याबरोबरच असायला हवा तो रफीसाहेबांच्या आवाजाचा परिसस्पर्श.
आज चाळीस वर्षानंतर लक्षात आलंय की रफीसाहेबांच्या व्यसनात मी पार बुडून गेलो आहे. लौकीकार्थाने व्यसनमुक्तीसाठी काम करणारा मी...पण या व्यसनातून मात्र बाहेर यावंसं वाटत नाही. हिन्दी चित्रपटसृष्टीत जेव्हा केव्हा शायराना अंदाजाची चर्चा होईल तेव्हा रफीचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. आणि रफी येण्याआधी पुकारा होईल बा अदब बा मुलाहिजा होशियार...आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांच्या या छोट्या चाहत्याची त्यांना दिलेली ही मानवंदना.
अतुल ठाकुर
क्या बात अतुल! या व्यसनातून
क्या बात अतुल! या व्यसनातून मुक्ती नकोच आहे!
Pages