बाबा
निद्रादेवीची आराधना
रोजच मी करत असतो
कारण झोपलो तरच पडतात स्वप्नं
आणि स्वप्नात आपण दोघे भेटतो...
तुम्ही घेऊनच गेलात माझी
रात्रीची झोप सारी
त्याची मला खंत नाही पण,
जागेपणी तुम्ही भेटत नाही...
विचारायचे असतात अनेक सल्ले,
मारायच्या असतात खूप गप्पा,
सांगा बरे कसा घालवू
आयुष्याचा हा टप्पा...?
इकडे तिकडे शोधू लागतो
मिळतो का तो आधार तुमचा,
निराशाच पदरी पडते
सारेच संपल्याची उरे भावना...
यापुढले जीवन सारे
अनाथासम हे प्राक्तन सारे,
कशी शक्ती मी आणू शरीरी
मनच सारे रिते जाहले...
जगताे म्हणून जगत रहावे
डोळे पहाती म्हणून पाहत रहावे,
का, कशाला याचे उत्तर
नियतीला त्या सतत पुसावे...
एक मात्र जाणवतं आहे,
आहात तुम्ही जवळ कुठेसे
येता समस्या आज कुठलीही
सहजची अगदी ती सुटतसे
कोण कुठे कसा येतो,
मदतीस माझ्या माध्यम होतो,
तुम्हीच ना तेव्हा करता
ही सारी जादू त्या समया...
समस्या सुटते, ताण जातो,
क्षणिक तो आनंद वाटतो,
पण प्रत्यक्ष तुमच्या सहवासाचा
सदैव मी हा याचक राहतो...
*