प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!
अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.
इतक्या सा-या सुविधांमध्ये मानव खरंच समाधानी आहे का? जर असेल तर अजुनही सतत नवनवीन सुखसाधनांचा शोध घेतला जातो, तो कशासाठी? प्रत्येक व्यक्तीचं सुख निराळ्या गोष्टीत आहे, तर मग सुखी असणं म्हणजे नक्की काय आहे? केवळ हवं ते मिळणं म्हणजेही सुख नाही, कारण हवं त्याची यादी कधी संपतच नाही. सतत काही ना काही हवं असतंच. हवं ते नाही मिळालं की दुःख होतं, हवं ते संपलं की दुःख होतं, आज हवं असलेलं उद्या मिळालं तरी दुःख होतंच की!
वरवर पाहता प्रश्न सोपा आहे, परंतु वर्षानुवर्ष हा प्रश्न माणसापुढे उभाच आहे. सुख, दुःख म्हणजे नक्की काय? कायम सुखी आणि समाधानी केव्हा आणि कसं वाटेल?
बहुसंख्य वाचक गीतेचा (Instant Remedy) तयार उत्तराच्या अपेक्षेने अभ्यास करतात. त्यातील ज्ञान समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न करतातच असे नाही. खरी मेख येथे आहे. मानवजातीला पडलेले सर्वात प्राचीन कोडं म्हणजे वर्तमानपत्रातलं शब्दकोडं नव्हे, ज्याचं उत्तर दुस-या दिवशी छापून येईल! जसं प्रत्येकाचं सुख, दुःख वेगळं तसेच त्याचे प्रश्नही वेगळे आणि प्रश्न वेगळे म्हणून उत्तराचा मार्गही निराळा.
गीतेचे मोठेपण यातच दडलेले आहे. भिन्न स्वभाव, बुद्धी आणि परिस्थिती असणा-या मानवांच्या समस्येवर एकत्र उपाय देणारे ते पुस्तक आहे. ज्याची जशी कुवत आणि साधना त्याला तसे उत्तर गीतेत सापडत जाते, म्हणूनच पुरातन कालापासून ते आजपर्यंतच्या मानवाला गीता मार्गदर्शक ठरते. एक एक अध्यायाची पायरी रचत गीता अठरा अध्यायातून आपल्याला सार्थ जीवन जगण्याचे द्वारच उघडून देते.
प्रत्येक अध्यायाचा विषय हा त्याच्या नावावरून स्पष्ट होतो. ‘अर्जुनविषादयोग’ हा गीतेतील पहीला अध्याय आहे. एकूण श्लोकसंख्या ४७ आहे. या अध्यायाचे दोन भाग पडतात. पहील्या भागात युद्धभूमीवरील स्थितीचे वर्णन आहे. यात सुरुवातीला कौरव आणि पांडव पक्षातील शूरवीरांची नावे१, त्यांच्या शंखध्वनींचे वर्णन आणि अर्जुनाने केलेले सैन्याचे निरीक्षण आहे. २८ व्या श्लोकापासून पुढे अर्जुनाचा विषाद….
दोनहीकडचे अफाट सैन्य पाहून युद्धामुळे होणा-या भयानक संहाराची कल्पना अर्जुनाला येते. तेव्हा त्याला जे वाटते ते तो श्रीकृष्णाला सांगतो. तो सर्व अर्जुनविषाद आहे.
अर्जुन दोन्ही सैन्यांच्या मधोमध आपला रथ उभा करावयास श्रीकृष्णाला सांगतो.दोनही बाजूच्या सैन्याचे निरीक्षण करण्याची त्याची इच्छा असते. कौरवांच्या बाजूचे सैन्य पाहील्यावर भीष्म, शल्य यांसारखे जेष्ठ नातेवाईक, द्रोणचार्य, कृपांचार्यांसारखे गुरु, दुर्योधन विकर्णासारखी भावंडं आणि त्यांची मुले यांच्यासह लक्षावधी२ हत्ती, घोडे, रथ आणि सैनिक अर्जुनाला युद्धासाठी उभे असलेले दिसतात. दोन्ही बाजूच्या सैन्यात आपलेच लोक पाहून अर्जुनाच्या मनात विचारांचे काहूर माजते.
इतका संहार खरोखर अपरीहार्य आहे का? हे युद्ध खरोखर कशासाठी लढलं जातंय? राज्य मिळविण्यासाठी आपल्याच बांधवांना मारणे हा धर्म आहे का? जर असेल तर मग अधर्म म्हणजे काय? येथे हिंसा टाळणे हा धर्म की अधर्म? मी कोणता धर्म पाळायचा? हिंसा केल्याने राज्याचे सुखही मिळणार आणि बांधवांच्या संहाराचे दुःखही तर मग सुख आणि दुःखाची व्याख्या काय? संहार करण्यात पाप असेल तर हे धर्मयुद्ध कसे?
२८ पासून सुमारे २० श्लोकातून युद्धाचे भयानक परीणामांचे वर्णन अर्जुन करतो.
निमित्तानि च पश्यामि विपरीतानी केशव ।न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ।।१-३१।।
निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन । पापमेवाश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ।।१-३६।।
उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन । नरकेऽनियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ।।१-४४।।
स्वजनांची हिंसा करण्याने केवळ अमंगल असे पाप वाट्याला येईल. कुळ नष्ट होईल, कुलधर्म लोप पावेलआणि आम्हाला नरक प्राप्त होईल.
एका पाठोपाठ एक या युद्धातून होणा-या विपरीत परीणामांची जंत्रीच अर्जुन कृष्णासमोर मांडतो. अठरा अक्षौहीणी सैन्य पणाला लावून आपल्याच कुळाचा नाश करायचा. अशा महायुद्धातून खरोखर सुख मिळणार होते का? त्यापेक्षा युद्ध न करणे योग्य नाही का?
अशा अनेक प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेला अर्जुन धनुष्य खाली ठेवतो. आपण इतके गोंधळून गेलो आहोत की शस्त्र चालवणे आपल्याला अशक्य झालं आहे असं तो कृष्णाला सांगतो आणि पहीला अध्याय संपतो.
अर्जुनविषाद… भगवद्गीतेचा हा प्रथम अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे. कोणालाही सहाजिकच असे वाटेल की तत्त्वज्ञानाच्या संदर्भातून पाहील्यास या अध्यायात काहीच विशेष दिसत नाही. सैन्यगणना आणि अर्जुनाचे शोक किंवा भयाने ग्रासलेले प्रश्न इतकंच काय ते या अध्यायात पहायला मिळतं. मग केवळ गीतेतला पहीला अध्याय म्हणून महत्त्वाचा समजायचा का? तर तसं नक्कीच नाही.
काय आहे अर्जुनविषादयोगाचे महत्त्व………. पुढील भागात……..
टिपः-
१) पहील्या अध्यायात खालील शुरवीरांची नावे येतात…
युयुधानः- हा सात्यकीचा भाउ, युद्धाचे सर्व १८ दिवस हा उपस्थित असतो.
धृष्टकेतूः- चेदीनरेश
चेकीतानः- वृष्णिवंशीय क्षत्रिय राजा, भारतीययुद्धात दुर्योधन कडून मारला जातो
युधामन्यु आणि उत्तमौजाः- पांचालातील वीर बंधु
द्रौपदेयः- यात द्रौपदीचे सर्व पुत्र प्रतिविंध्य. श्रुतसोम, श्रुतकर्मा, शतानिक, श्रुतसेन
विकर्णः- १०० कौरव भावंडातील सह्रदयी
सौमदत्तिः- सोमदत्ताचा पूत्र – भूरिश्रवा
याशिवाय अर्थातच द्रोणाचार्य, भीष्म, विराट, द्रुपद, भीम, अर्जुन, काशीनरेश, पुरुजित, कुन्तिभोज, शिबी राजाचा पुत्र शैब्य, अभिमन्यु, कर्ण, अश्वत्थामा या प्रसिद्ध योद्ध्यांचाही उल्लेख होतो.
२) महाभारतीय युद्धातील एकुण सैन्यसंख्या १८ अक्षौहीणी होती. कौरवांची सैन्यसंख्या ११ तर पांडवांची ७ अक्षौहीणी होती. सैन्यसंख्या मोजण्याची परीमाणे – पत्ती, सेनामुख, गुल्म, गण, वाहीनी, पृतना, चमू, अनीकिनी आणि अक्षौहिणी अशी होती. एक अक्षौहीणी म्हणजे साधारण २,१८,७०० सैन्यसंख्या तर एकूण १८ अक्षौहीणी म्हणजे ३९,३६,६००
मूळ लेख येथे वाचता येईल - https://sheetaluwach.com/gitaquest2m/
AWsome!! Looking forward for
AWsome!! Looking forward for काय आहे अर्जुनविषादयोगाचे महत्त्व………. पुढील भागात? hey tumhi lihitahat ka?
@ashutoshjo होय मीच लिहीले
@ashutoshjo होय मीच लिहीले आहे
वाट बघत आहे पुढच्या भागाची!
वाट बघत आहे पुढच्या भागाची!
EKdam mast Surekh lihit ahat
EKdam mast Surekh lihit ahat apan , ani nuktach mi dekhil geeta rahasya vachnyas suru kelili ahe, tar apan lihileli bhasha ajun simple vatat ahe!! keep it posting!!
@ashutoshjo गीता
@ashutoshjo गीता तत्त्वज्ञानावरचा ग्रंथ आहे. त्यामुळे भाषा काही प्रमाणात दुर्गम होत जाणारच. सोप्या भाषेत लिहायचे तर शब्दसंख्या वाढत जाते.
छान लेखमाला.
छान लेखमाला.