"खंत"

Submitted by mi manasi on 4 June, 2020 - 12:39

"खंत"
दिसत नाही मला माझं गांव
जगाच्या नकाशात
मला लाज वाटते त्याची
मी खंतावतो...

मी फिरतो जगभर
धुंडाळतो नवनवी शहरं
करतो वाहवाई
तिथल्या सुधारणांची
करतो घाई
माझं गांव 'तसं' बनवण्याची
आणि बघतो स्वप्नं
निवृत्तीनंतरच्या वास्तव्याची
येतो गांवात सारखे-सारखे
करु लागतो बदल 'तिथल्यासारखे'
बदलतं गांवाचं रूप
काय सांगू त्याचं अप्रुप?
पोस्ट करतो त्याच्या प्रकाशफिती
सांगतो त्याची माहिती
शहरातून लोक येतात
नवी 'संस्कृती' देवून जातात
जगाच्या नकाशात
आता माझंही गांव दिसू लागतं...

आता मी येतो कायमचा
मनांत जुन्या आठवणी
करतो त्याची उजळणी
बालपणीच्या, सवंगड्यांच्या
घराच्या, परिसराच्या..
ह्याच्या, त्याच्या..
मला जगायचं असतं ते सगळं
पुन्हा तसंच ... जगावेगळं
पण तसं होत नाही
जुनं काही मिळत नाही
सगळं सगळं बदललेलं असतं
मी खंतावतो..
म्हणतो...
"आता गांव पहिल्यासारखं राहिलं नाही"

✍ मी मानसी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users