Submitted by मंगेश विर्धे on 24 May, 2020 - 12:32
असूनही ना दिसणे कधी, दुर्दैवी दुसरा भोग नाही
जुळून येतील सरळ धागे, नशिबी आमुच्या योग नाही
गुंतलेल्या यातनेची तक्रारही करत नाही कधी
सहजच मिळणाऱ्या सुखाचा, आम्हांस कसला लोभ नाही
आनंदी आहोत असेच आम्ही कुठल्याही ऐटीविना
इमान आहे शाबूत अजून, आम्हांस बेइमानीचा रोग नाही
थोडेसे खटकते या जनमानसांशी कधीतरी, कुठेतरी
जाणून आडवे जातो, यातला काही भाग नाही!
खांद्यास खांदा, कदमाला कदम, साधे सोपे समीकरण आहे
द्वेष वगैरे तडीपारंच आहेत, अम्हांत इर्षेची आग नाही
दुतोंडी वागणाऱ्यांचा तेवढा आम्हांस तिटकारा
आहोत पक्के स्वामिनिष्ठ, फितुरीचा आमच्यावर डाग नाही
– मंगेश विर्धे
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा