मला बघताच झुडूपात बसलेला लालबुड्या बुलबुल अकारण अस्वस्थ झाला. फांदीवर बसून भयंकर टिवटीवीनं निषेध करू लागला. त्याचं घरटं की काय म्हणावं इथं? पण त्या तपासात मी पडलो नाही. घाबरतात पाखरं फार. लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं. आपल्या या विश्वासावरच तर चिवचिवती पिल्लं मोठी होतात. उडून जायचं बळ त्या धडपडत्या पंखात घरटंच तर भरतं. मग त्या पाखराच्या घरट्याशी त्याला घाबरवण्यात काय शहाणपण? ‘नाही रे बा. तुझ्याशी मी येत नाही. शांत रहा. पिलांना बळ दे. पंखावर आनंद घेऊन उडू दे त्यांना माझ्या रानात अन् घरट्याची ताकद या रानाला लाभू दे. रान फुलू दे, फळू दे, वाढू दे.’
नदीच्या काठाशी दोन मुंगसं काही शोधत होती. तीही गवतात पळाली. मी जागी उभा राहिलो. गवतात उभं राहून त्यांनी मला परत पाहिलं. त्यांना माझ्यासमोर बाहेर निघण्यात मोठा धोका वाटला. ती गवतातच वहिवाटीच्या वाटेनं दगडाच्या फटी, सुकून पडलेल्या झाडाची खोडं असं शोधत शोधत निघाली. नवख्या निरीक्षकाच्या आशेसारखं हळू हळू मग नुसतंच गवत हलत राहिलं.
काठाच्या वर सारे बोडके पळस आता फुलले होते. शेंदरी-लाल. आपल्याला सारे नुसते लालच पळस दिसतात. पण इथं मी चक्क पिवळा पळस पाहिला. अर्थात हा पळस म्हणजे क्वचित कुठंतरी.
सा-या रानात शेंदरी-लाल पळस फुललेला. पळसानं कधी जितकी पानं पांघरली नसतील इतकी फुलं तो आता ल्यायला होता, ठायी ठायी. फुलंसुद्धा कशी, तर अगदी पोपटाची चोच जणू. हे तुम्ही-आम्ही पाहून पुढं निघतो. पण हे पहावं बहिणाबाईंनी.
उन्हाच्या काहिलीनं विटून सा-या पानांचा त्याग केलेला हा पळस अन् त्याला ही पोपटाच्या चोचीसारखी फुलं. आम्हाला फक्त झडलेली पानं आणि फुललेली फुलंच दिसली. बहिणाबाई पाहू गेल्या, त्यांना दिसले पोपट, हिरवेकंच पोपट. पानासारखे हिरवेगार पंख आणि लालचूटूक चोची. एवढे सारे मिठ्ठू त्यांनी पाहिले पळसावर रातथा-याला उतरलेले. त्या सकाळी पाहू गेल्या तर नवलच! सारे पोपट उडून गेले, पण लाल-लाल चोची मात्र ते सारे त्या पळसावरच विसरले. मग बहिणाबाई म्हणतात,
पयसाचे लाल फुलं
हिरवे पानं गेले झडी
इसरले लाल चोची
मिठ्ठू गेले कुठं उडी?
या रसाळ गोड फुलांना नाना पाखरं झोंबली होती. फुलातून मकरंद ओरपायची नुसती झुंबड. छोट्या चष्मेवाल्यांचा एक गट फुलांशी मस्ती करत मधुप्राशनात गुंग होता.
पण मला पाहून मोठे पक्षी दुस-या पळसावर उडून गेले.
‘अरे, मला आपला म्हणा.’
एकंदरीत एकमेकांशी अदबशीर अगत्यानं वागणारी सारी मंडळी माणूस पाहून पळून जात होती. पण या वानरांच्या टोळीची पक्ष्यांना भीती नाही वाटली. माणसाच्याच जातकुळीचे माकड-वानर मात्र त्यांना चालत होते. काय अवस्था आहे! माकडापेक्षा खाली आणून बसवलंय यांनी माणसाला.
ही वानरांची टोळी वाघा-बिबटापासून सुरक्षित उंच झाडावर काल रात्री झोप काढून नदीत खाली उतरली होती. काठाच्या कोणकोणत्या झाडावर ती चरली आहे ते झाडाखाली फुला-पानांचा, फळांचा सडा बघूनच समजत होतं.
नदीपात्रातलं वावभर पाणी ओलांडायचं तर चार बोटं खोल पाण्यात पाय न टाकता ही वानरं हनुमानउड्या ठोकून पलीकडं जात होती. हा जन्मजात आंघोळीचा कंटाळा म्हणावा की काय? हे लक्षण मात्र पटलं बुवा. वानर खरंच आपले पूर्वज आहेत. माणसाच्या याही गुणाची ओळख पटली.
ही माकडं-वानरं फार आगाऊ. जे जंगलात कुठं नाही असे असे ते उद्योग यांना असतात. चारचाकी गाडी यांच्यापाशी उघड्या खिडकीची सोडा. यांच्यातला एखादा 'डायवर मेक्यानिक' खिडकीत बुड मांडून चाक फिरवून पाहतो, ‘जमतंय का आणि होतंय काय नेमकं?’ बरं डोळ्यात कॉन्फिडन्स असा की ‘हे जमलं तर SUVच घेणार आहे उद्या.’
बसल्या बसल्या पक्ष्याचं घरटं उगीचच उस्तरतील, चालता चालता रस्त्यावरचे बोर्ड लाथा मारुन वाजवतील, जंगलात पत्र्याचं छप्पर असलं तर शेजारच्या झाडावरुन त्याच्यावर उड्या मारून-मारून वाजवून वाकवून टाकतील, लपलेला-झोपलेला वाघ दिसत नसला तर उलटे-पालटे होऊन त्याला बघतील. तुम्ही कुठं काही ठेवा. यांच्या कामाची चीज असो की नसो, ते येणार, हळू आधी दुरुन निरीक्षण करणार, मग उचलून वरुन-खालून पाहणार, दातात धरुन चव पाहणार. शेवटी काहीच जमलं नाही की मग उठून दुसरा कामधंदा पाहणार. इतका भाकड वेळ घालवायला जंगलात लमडीच्या माकडाशिवाय रिकामं आहे कोण? माकडच ते, माणसाचे थोडे गुण त्यात असणारच.
एकदा तर पेंचमध्ये भली गंमत. एक हुप्प्या बसला रस्त्याकाठाला सावलीत. मस्त झाडाला पाठ, एक गुडघा वर उचलून ऐटीत त्याच्यावर हात टेकवून बसले बाबाजी. दोन माणसं मोटरसायकलवर आली. जशी ती याच्यासमोरुन गेली, तशी यानं धाव घेतली आणि हवेत उडून दोन लाथा मागल्याला हाणल्या. मोटरसायकलसह दोघंही खाली रस्त्यावर. बाबाजी पुन्हा झाडाखाली विराजमान; पुढच्या मोटरसायकलवर किक बॉक्सिंगच्या प्रयोगाला. असे तीन मोटरसायकलवाले त्यानं पाडेपर्यंत वनविभागापर्यंत प्रकरण पोहोचलं. ते धावले अन् त्या हुप्प्याला लांबवर हाकलला.
‘हाणून पाडणे’ काय असतं हे त्या दिवशी समजलं. त्यामुळं आता कुठंही ‘अमुक गोष्ट हाणून पाडली’ असं वाचलं की माझ्या डोळ्यासमोर ते ‘हाणून पाडणं’ दिसू लागतं.
बंदीपूरमध्ये एका पर्यटक स्त्रीची नकळत दुर्लक्षित पर्स एका लालतोंड्या माकडीणीनं उचकली. तिच्या मागं चार-सहा लोक धावले. त्यातून हाती लागलेली एक चकचकीत वस्तू उचलून माकडीणीनं थेट झाड गाठलं. पर्सच्या मालकिणीनं गबाळ भरलं अन् गेली. मी उत्सुकतेनं झाडाखाली उभं राहून पाहिलं. माकडाच्या हातात औषधांच्या गोळ्यांची पट्टी. बोलून चालून माकड अन् हातात अद्भुत वस्तू. माकडानं पद्धतशीर बेचक्यात बैठक मारली. एक एक गोळी काढून चावून-चावून खायला सुरुवात केली. मी खालून टोपीवाल्याचा सिद्धहस्त प्रयोग सुरु केला; माकडाला खडे मारुन. ते बधलं नाही. अखेरीस सा-या गोळ्या संपवल्या आणि रिकामं पाकीट माकडानं माझ्यावर फेकलं. त्यालाही त्याच्या आजोबानं चार गोष्टी सांगितल्याच असतील.
पाकीट मी उचलून पाहिलं. नोरीटीसच्या गोळ्या होत्या. भलत्या फॉरवर्ड विचाराची माकडीण निघाली ही. तिच्या पिचपिच्या डोळ्यांत भलतं आत्मिक समाधान सामावलं होतं. ‘बाई गं, तू काय खाल्लं आहेस तुला कळतंय का? अशीच वागलीस तर तुझ्या नशीबी या जन्मी तरी पुत्रयोग नाही.’ हिरव्या लुसलुशीत पानांचा उत्तम तोबरा गालफडाच्या पिशवीत कोंबत ती माझ्याकडं बघत होती.
(नोरीटीस मासिक पाळीच्या विकारांसाठी, मासिक पाळी तात्पुरती थांबवण्यासाठी वगैरे वापरलं जातं)
चालत-चालत मी बराच पुढं आलो होतो. लवत्या उन्हात रंगांचा एक उत्सव मला समोर दिसला. अद्भुत. मोजून रंगांचे कुशल फटकारे. निसर्ग हा मोठा जादूगार आहे. ज्याला त्यानं धरलं त्याला ते वेड त्याच्या अंतापर्यंत पुरतं.
नदीच्या या काळ्याभिन्न डोहावर करंज झुकला होता.
कपटी डोहात
पाण्याच्या मोहात
काठाचा करंज कोसळला
तिथं अजून एक जादू लखलखली. या झुकलेल्या करंजाच्या फांदीवर बसून माशावर टपलेला खंड्या मला पाहून हडबडून उडाला. याला मी बघितलंच नव्हतं. तो उडून किलकिलत गेला आणि खराट्या सागावर उतरला. हा परत येईल की नाही शंकाच होती. याला मासा मिळालाच पाहिजे असं काही नाही किंवा मासाच मिळाला पाहिजे असंही काही नाही. हा नावालाच धीवर. खरंतर हा कुठंही बोडक्या माळावरसुद्धा तारेवर टपलेला असतो.
मी एकदा बसून पाहिलं. हा इथं बिनपाण्यानं करतो काय? तो नाकतोडे, रातकिडे, सरडे, सापसुरळ्या असा समस्त स्त्रीवर्गाचा ‘ईऽऽऽऽऽ‘ वर्गीय शेलका माल त्याच्या लाल-गुलाबी चोचीत पकडून फस्त करत होता. इतक्यात सागावरच्या खंड्यानं खाली सूर मारला. काहीच न गवसल्यानं पुन्हा आला नदीच्या आश्रयाला.
एका दगडावर बसून थोडंफार मॉडेलिंग केलं आणि एकाएकी उडाला. किलकिलत उडाला. मग पार गेला, दिशेपार गेला. त्याची ठणठण आवाजातली किलकिल दाभणानं शिवलेल्या बारदानासारखी सकाळच्या उन्हावर टाके घालत गेली अन् सागा-ऐनाच्या माथ्यावर ते रात्रीच्या पावसाचं ओलं ऊन त्यानं पुन्हा पसरुन वाळत घातलं.
दुरुन मागून आवाज आला, “सायेऽऽब.” वळून पाहिलं तर विश्रामगृहाचा खानसामा काठाच्या टेकाडावर चढून हाक मारत होता. न्याहारीसाठी बोलावत होता. मी मागं फिरलो.
पुन्हा डोहाच्या वाटे. इथं अजून एक चॉकोलेट हिरो बसला होता. छोटा खंड्या. हा मात्र प्रामाणिक, खानदानी मासेमार आहे. याला कधी कुठं वीजेच्या तारेवर, काटेरी कुंपणावर, पाणी सोडून बसून किडे-बिडे खाताना मी नाही पाहिलं. तो आता छान निळा निळा दिसत होता. त्याचा बसायचा कोन बदलला की त्याच्या पिसांचा रंग बदलत होता. मान वरखाली हलवत त्यानं सूर मारला आणि डोहातून एक चिंगळी उचलून आणली. दोन-तीन वेळा चोचीनं ती फट्कन दगडावर आपटली. मग हवेत उडवून परत झेलली आणि गट्ट्म करुन टाकली.
मीही जाऊन न्याहारीसाठी बसलो. विदर्भाचे लोकप्रिय चना-पोहे होते न्याहारीला. दोन प्लेट पोहे खाऊन मी बाहेर व्हरांड्यातल्या खुर्चीवर बसलो. अजून ९ च वाजत होते. समोरच्या जंगलात पक्ष्यांची रेलचेल होती. पाहण्यासारखं भरपूर होतं.
समोरच्या झाडावर एकाएकी एक सुंदर निळं रत्न उतरलं आणि खोडाला चिकटलेली अळी ओढून काढली. मी पटकन कॅमेरा फोकस करीपर्यंत तो पक्षी उडून परत वर गेला. नशिबानं तो आता माझ्यासमोरच उतरला. २-३ सेकंद स्थिर बसून उडाला. या चपळ बदामी पोटाच्या शिलिंध्रीचा मला एक फोटो मिळाला होता.
आर्मचेअर बर्डींग असा एक वाक्प्रचार मी ऐकला होता. आज शब्दश: मी ते केलं. मस्त विश्रामगृहाच्या खुर्चीत बसून कुशनला रेलून काढलेला हा फोटो. हे दुस-या कोणाच्या नशीबात मी पाहिलं असतं तर बक्कळ बोटं मोडली असती.
तोवर रामलाल ‘काली चाय’ घेऊन आला. व्हरांड्याच्या खाली उभं राहूनच त्यानं टी-पॉयवर कप-बशी, बिस्किटांची डिश ठेवली आणि माझ्याकडं बघत म्हणाला, “सायेब, साप.”
क्रमशः
लहान काय अन् मोठी काय? घरटं
लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं. >> छान लिहिता तुम्ही.
अद्भुत सुंदर लिहिलंय. फोटो
अद्भुत सुंदर लिहिलंय. फोटो अप्रतिमच.
पुढील भागाची वाट पाहणं आलं आता.
क्या बात! निव्वळ सुंदर!
क्या बात! निव्वळ सुंदर!
ठणठण आवाजातली किलकिल दाभणानं शिवलेल्या बारदानासारखी सकाळच्या उन्हावर टाके घालत गेली
>> वॉव!
त्या रंगीत फोटोतले रंग कसले आहेत?
लहान खंड्या आणि शिलींध्रीचे फोटो म्हणजे 'आहाहा!' आहेत.
विनंती मान्य करून मोठा भाग
विनंती मान्य करून मोठा भाग टाकल्याबद्दल मनापासून धन्यवाद, अरिष्टनेमि:)
छान झालाय भाग. मध्येच लेखन मेळघाटच्या जंगलापासून जरा दूर भरकटल्यासारखा वाटलं तरी अवांतर विषयाला धरून असल्यामुळे खटकलं नाही.
ते नदीकाठचे खडक त्यावर रंग ओतल्यासारखे दिसतायत. विलोभनीय दृश्य!
झकास... सायेब, साप?? पुढचं
झकास... सायेब, साप?? पुढचं लिहा लवकर
अद्भुत सुंदर लिहिलंय. फोटो
अद्भुत सुंदर लिहिलंय. फोटो अप्रतिमच.>>>>>>>+११११११११११११११११११११११११११११११११११११
>>>>नवख्या निरीक्षकाच्या
>>>>नवख्या निरीक्षकाच्या आशेसारखं हळू हळू मग नुसतंच गवत हलत राहिलं.>>>>> वाह!
>>>>>>>>बरं डोळ्यात कॉन्फिडन्स असा की ‘हे जमलं तर SUVच घेणार आहे उद्या.’>>>> हाहाहा
>>>>>>>>>त्याची ठणठण आवाजातली किलकिल दाभणानं शिवलेल्या बारदानासारखी सकाळच्या उन्हावर टाके घालत गेली अन् सागा-ऐनाच्या माथ्यावर ते रात्रीच्या पावसाचं ओलं ऊन त्यानं पुन्हा पसरुन वाळत घातलं.>>>>>>>>>> _/\_ काय अफाट लिहीता तुम्ही.
.
लवकर आणि खूप लिहा.
मस्तच हाही भाग
मस्तच हाही भाग
>>बरं डोळ्यात कॉन्फिडन्स असा की ‘हे जमलं तर SUVच घेणार आहे उद्या.
आ हा हा..
आ हा हा..
पुन्हा एकदा तुमच्या अद्भूत शब्दांमधूनच जिवंत जंगल अनुभवलं....
केवळ सुंदर.....
लिहित रहा गड्या...
अप्रतिम
अप्रतिम
छान लिहिलंय
छान लिहिलंय
छान लेख आणि फोटो ! तुम्ही
छान लेख आणि फोटो ! तुम्ही कुठला camera वापरता. सहज उत्सुकता !! तुमच्या ट्रीपची काही पुर्वतयारी करता का?
धन्यवाद
@ आदिश्री
@ आदिश्री
धन्यवाद प्रतिसादाबद्दल.
कॅमेरा - या लेखातले फोटो घेण्यासाठी मी Canon 70 D या कॅमेरा बॉडीसोबत Tamron 150-600 MM ही लेन्स वापरली. फुलपाखरांसाठी मी Canon 18-135 MM ही लेन्स वापरतो. अगदीच छोटे किडे असतील तर कधी Canon 18-135 या लेन्ससोबत Kenko Extension Tubes वापरतो.
पूर्वतयारी – काय लिहावं असा प्रश्न पडला आहे. इथं अगदीच लिहावं अशी काही तयारी नाही. कधी खूप लांब जायचं असेल तर मग अगदी पूर्वतयारी करावी लागते. मी यादी करतो, रोज सकाळी डोळे उघडल्यापासून झोपेपर्यंत मी काय-काय करणार, त्यासाठी आवश्यक वस्तूंची यादी मी करत जातो. मग लहान-सहान वस्तूसुद्धा सुटत नाहीत. महत्वाचं म्हणजे फोटोग्राफीसाठी आवश्यक वस्तू. Memory cards, extra camera battery आवश्यक. एक कॅमेरा बॅग आणि इतर सामानासाठी एक सॅक यापुढं सामान मी नेत नाही.
लहान खंड्या आणि शिलींध्रीचे
लहान खंड्या आणि शिलींध्रीचे फोटो म्हणजे 'आहाहा!' आहेत. >>>>+१
कडकड आवाज आला का
दृष्ट काढल्याचा आहे.
नशीबवान आहात
लहान काय अन् मोठी काय? घरटं
लहान काय अन् मोठी काय? घरटं प्रत्येकाला जपायचं असतं.
>> मला पण असेच वाटते. प्रचंड ओढ असल्याशिवाय उगिचच प्राण्यंच्या विश्वात ढवळाढव्ळ करु नये. हल्ली
सर्वत्र वने एवढ्या पर्यटकानी भरलेली असतात की वाटते अरे प्राण्यांनापण काही प्रायव्हसी द्याल की नाही.
आजकाल आम्ही स्वतःच असे जाणे कमी केले आहे. आपल्यासार्ख्या अभ्यासकांचे वाचुनच तहान भागते.
वाह!
वाह!