गाडी बुला रही है... ३
पुण्याहून निघणार्या गाड्यांपैकी, कर्जत व कल्याणला जायचे असल्याने आम्हाला सिंहगड सर्वात सोयीची, पण आकर्षण मात्र कायमच डेक्कन क्वीन चे राहिले. त्यात कल्याणला दोन्ही वेळेस व एकेकदा कर्जत आणि दादर ला न थांबणारी गाडी म्हणजे काहीतरी वेगळाच दिमाख होता ("व्हीटी वरून सुटली की एकदम कर्जत" हे म्हणजे काहीतरी मोठा पराक्रम असल्यासारखे लोक सांगतात!). आम्ही तेव्हा कल्याणला गेलो की संध्याकाळी स्टेशन वर वेगाने जाणारी डेक्कन बघायला जायचो. तसेच ही गाडी बहुधा सर्वात वेगात शीव आणि मळवली तून जात असावी. आजकाल कल्याणच्या पुढे मुंबई कडे स्टेशनमधून जात असताना सर्वच गाड्या अतिशय हळू जातात, पण पूर्वी एकदम वेगात जाताना मी बघितले आहे. आणि अशी जाणारी गाडी जेव्हा स्टेशन च्या जवळ येत तेव्हा जो हॉर्न वाजवत आत शिरते ते नुसत्या त्या हॉर्नच्या आवाजावरूनच कळायचे. इतर कोणत्याही गाडीपेक्षा डेक्कन मधली आणखी मजा म्हणजे तिची डायनिंग कार. इतर गाड्यांना पॅंट्री कार असतात, पण डेक्कन ला त्या डब्यात बसून खाता येते. खंडाळ्याच्या घाटातून जाताना तिथे बसून खात किंवा चहा पीत आजूबाजूची दृश्ये बघण्याची मजा अगदी एसी फर्स्ट क्लास मधेही कधी येणार नाही. या गाडीला पूर्वी २X२ अशी सीट्स असलेले पहिल्या वर्गाचे सुंदर डबे होते. आणि बहुधा त्यातील काम करणारे रेल्वेचे लोकही वर्षानुवर्षे त्याच गाडीत असतात असे ऐकले आहे. आम्ही अधुनमधुनच जात असल्याने जास्त माहिती नाही.
आता गेली बरीच वर्षे पुणे मुंबई अप डाऊन करणारे लोक या गाडीने जात असल्याने तिला मुंबईच्या त्या लोकलच्या जंजाळातही सर्वात प्राधान्य दिले जाते. सकाळचे किंवा संध्याकाळचे वेळापत्रक बघितले तर कोणत्याही स्टेशनवर डेक्कन जाण्याच्या वेळेच्या आसपास २० मिनिटे फास्ट लाईन वरून लोकल्स नसतात. संध्याकाळी ५ नंतर पहिली डेक्कन जाते आणि मग 'डबल फास्ट' वगैरे लोकल चालू होतात (ही '९९ ची आठवण आहे, पण अजूनही तसेच आहे बहुतेक). मुंबईचा आणखी एक किस्सा म्हणजे पूर्वी कल्याण व कर्जत जवळ काम करणारे पण पुण्याला राहणारे अशा लोकांना डेक्कन पकडता यावी म्हणून एक 'इन्जीन लोकल' सुटत असे, ती मधली स्टेशने घेत घेत कर्जत ला डेक्कन च्या आधी पोहोचत असे. मी स्वत: हे अनुभवलेले नाही, पण ऐकलेले आहे. नंतर तिथे आत्तासारखी लोकल आल्यावर सुद्धा तिला म्हणे इन्जीन लोकलच म्हणत आणि अजुनही एक कर्जत लोकल बरोबर डेक्कन च्या १५ ते २० मिनिटे आधी कर्जत ला पोहोचेल अशी आहे. या गाडीचा आणखी एक ऐकलेला किस्सा म्हणजे निवृत्त होणार्या इन्जीन चालकाला कामाच्या शेवटच्या दिवशी डेक्कन वर पाठवतात व प्रत्येक क्रॉस होणार्या गाडीचे चालक हॉर्न वाजवून त्याला निरोप देतात. खरे खोटे माहीत नाही.
मी पूर्वी पिंपरीत कामाला असताना सकाळी आम्हाला दापोडीच्या पुलावर 'प्रगती' भेटत असे व संध्याकाळी बर्याच वेळा 'इन्द्रायणी'. गुरूवारी (आम्हाला गुरूवारी सुट्टी असे) जर कधी जावे लागले तर अर्धा तास आधी कम्पनीची बस निघत असे, त्यामुळे गुरूवारी डेक्कन क्रॉस व्ह्यायची. ते पाण्यात बुचकळून काढण्याचे उदाहरण यासाठी की २-३ दिवस रेल्वेने भरपूर फिरून आल्यावर जेव्हा ऑफिस ला जाताना दापोडीच्या पुलाजवळ आलो की तरीही अर्धे लक्ष गाडी दिसते का याचकडे असायचे.
अजून काही गाड्या येत आहेत...
डेक्कन क्वीन
कोणत्याही स्टेशनवर डेक्कन जाण्याच्या वेळेच्या आसपास २० मिनिटे फास्ट लाईन वरून लोकल्स नसतात>>
माझा मित्र व्ही. जे. टी. आय. ला होता. तो ठाण्याला राहायचा. कॉलेजमधून लौकर बाहेर पडला तर माटुंग्याहून लोकल न पकडता तो दादर ला जायचा. कारण, डेक्कन क्वीन च्या आधी एक फास्ट लोकल होती कि जी दादर ते ठाणे असा प्रवास फास्ट करून मग स्लो व्हायची. मागे डेक्कन क्वीन असल्यामुळे हि लोकल कायम वेळेत आणि वेगात जायची. त्या लोकलने प्रवास करणे ही त्याची ऐश होती. असो.
अजुनही डेक्कन क्वीनला इतर गाड्यांपेक्षा प्राधान्य दिले जाते.
अनिकेत वैद्य
डेक्कन क्वीन च्या आधी एक
डेक्कन क्वीन च्या आधी एक फास्ट लोकल होती >> ५:१३ ला दादरला येणारी अंबरनाथ लोकल. बरीच वर्ष तिची वेळ काही बदलली नव्हती. बहुतेक सगळ्या सेमीफास्ट (ठाण्याच्या पुढे स्लो होणार्या) लोकल्स ठाण्यानंतर स्लो ट्रॅकवर येतात. ही लोकल मात्र मुलुंड नंतर स्लो ट्रॅकवर यायची आणि ठाण्याला पोहचेपर्यंत डेक्कन तिला ओवरटेक करत फास्ट ट्रॅकवरून सुसाट वेगात जायची. आपल्या लोकलला ओवरटेक करणारी गाडी बघताना काळजात थोडी तरी कळ येतेच पण सुसाट वेगाने जाणारी डेक्कन बघताना फक्त कौतुकमिश्रीत आदरच असायचा
भाग २ कुठे आहे?
भाग २ कुठे आहे?
डेक्कन क्वीन चा तोरा खरंच खास
डेक्कन क्वीन चा तोरा खरंच खास .. पण इंद्रायणी आल्यानंतर खरंतर फक्त शो च राहिला असं वाटतं ..