गाडी बुला रही है... २

Posted
18 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आता कोळशाची इन्जिने त्या भागातून नाहीशी होऊन जमाना झाला, पण त्याची एक वेगळीच मजा होती. एकतर लहानपणापासून गाडीची पाहिलेली चित्रे सगळी त्या इन्जिनांच्या गाड्यांची होती. त्यामुळे आठवणीत पहिल्यांदा रेल्वेने जायला निघालो तेव्हा ते मोटारी सारखे दिसणारे व थोडे रागीट चेहर्‍याचे (विजेचे) इन्जीन कुठून आले असा प्रश्न पडला होता. मग एकदा कोल्हापूरला जाताना कोळशाच्या इन्जिनाच्या गाडीतून जायला मिळाले. त्याची ती भरदार शिट्टी, बाजूने पाणी सोडणे, ती लहान मोठी चाके आणि त्या पिस्टन मुळे होणारा तो आवाज हे अंधूक आठवते (आणि शोलेतील त्या सीन मुळे पुन्हा अनुभवायला मिळते). आता पुलंच्या 'काही अप काही डाऊन' मधे आणि इतर लोकांनीही याचे सुरेख वर्णन केलेले आहे, आणि आधीच्या पिढीतील लोक तशाच गाड्यांतून फिरल्यामुळे त्यांचे अनुभव नक्कीच आणखी वाचनीय असतील, पण मलाही ते कोळशाचे इन्जीन आवडायचे. त्यात कोल्हापूरला लाईन संपते आणि त्यामुळे त्या स्टेशन जवळच एक टर्न टेबल होते (त्याच्या ही बरोबरच समोर एक कुटुंब ओळखीचे निघाले. इच्छा तेथे (लोह)मार्ग! ), कारण कोळशाचे इन्जीन उलट्या बाजूने एवढे लांब चालवता येत नसावे. ते पहिल्यांदा पाहताना कोणालाही आश्चर्यच वाटेल, कारण फक्त २-४ माणसे त्यावर ते एव्हढे धूड सहज फिरवतात. आता ती टर्न टेबल्स भारतात आहेत की नाही माहीत नाही, पण इथे एका लहान मुलांच्या पार्क मधे एक छोटी गाडी आहे तिच्या इन्जिनासाठी जवळच तसे टर्न टेबल आहे ते बघितले. पूर्वी खडकी वगैरे भागात ज्या फॅक्टरीज आहेत त्यात माल वाहून नेणार्‍या गाड्यांनाही कोळशाची इन्जिने असत. तिथे मी ते इन्जीन थांम्बले की आजूबाजूच्या लोकांना त्यातून गरम पाणी भरून घेताना बघितले आहे. आणखी एक आठवण म्हणजे ते इन्जीन असले की पहिल्या काही डब्यांच्या खिडकीतून धूर व त्याबरोबर कोळशाचे कण हे आत येत व चेहर्‍यावर जमा होत. अजूनही बहुधा उत्तर भारतात कोठेतरी अशी इन्जिने व्यवस्थित ठेवलेली आहेत व वर्षातून एकदा ती सर्वांना दाखवायला काढतात असे ऐकले.

डिझेल च्या इन्जिनाला स्वत:चे काही व्यक्तिमत्त्व वाटत नाही व त्यातून लांब अंतरावरच्या गाड्यांतून बंगलोर, मद्रास वगैरे ठिकाणी जाण्याव्यतिरिक्त फारशी काही माहिती नाही. हे इन्जीनही मुंबई च्या बाजूला फारसे दिसत नसे, त्यामुळे ते पहिल्यांदा बघितल्याचे आठवते ते 'द बर्निंग ट्रेन' च्या पोस्टर वर. पण हे सर्वात लहान असले तरी असते एकदम दणकट आणि १८-२० डब्यांची गाडी दूरवर सहज नेते. याचाच एक लहान भाऊबंद आहे, 'शंटिंग' करणारा. गाड्या प्लॅट्फ़ॉर्म वर लावणे, मालाचे डबे एकडून तिकडून आणून जोडणे वगैरे हलकी कामे त्याच्या कडून करून घेतात. याला खरी गाडी कधी ओढताना पाहिले नाही, त्यामुळे चित्रपटांत कधे हे इन्जीन दिसले की तो शॉट कोठेतरी सायडिंग च्या लाईन वर ४-५ डबे जोडून घेतलेला आहे असे वाटते.

विजेच्या इन्जिनाचे बरेच प्रकार आहेत. त्यातही DC , AC आणि दोन्ही वर चालणारी अशा भानगडी आहेत. त्यातली मुंबई पुणे भागात (व पूर्वी कसारा भागात सुद्धा) वापरली जाणारी ती मोटारी सारखा तोंडवळा असलेली पिवळ्या रंगाची इन्जिने पहिल्यापासून जास्त लक्षात राहिली. आता सगळीकडे AC traction वापरात येत असल्याने ती हळुहळू कालबाह्य होत आहेत. तशीच एकदम लांब चौकोनी डब्यासारखी दिसणारी बहुधा BHEL ने बनवलेली इन्जिनेही असत. आता तर आणखी नवीन प्रकारची आली आहेत. त्यात ती इतरत्र सगळीकडे दिसणारी व १६० किमी पेक्षा वेगाने जाऊ शकणारी ती झाशी वगैरे शेडमधली इन्जिने DC मुळे अजून मुंबई जवळ दिसत नाहीत. आता सद्ध्या या मार्गावर ती दोन्ही traction वर चालणारी इन्जिने दिसतात.

अजून काही डबे येतायत...

प्रकार: 

>>>इच्छा तेथे (लोह)मार्ग!

हेहेहे! Happy आवडलेत दोनही भाग Happy आता पुढचे राहिलेले तीन वाचते Happy

Happy

"इन्जिनीअरींग जीन" बहुदा माझ्यात नसावा .. मला रेल्वे इंजेनांबद्दल एव्हढं आकर्षण आणि माहिती कधीच नव्हती ..

कोळशाचं इंजीन लावलेली गाडी लक्षात आहे ती उटी ची टॉय ट्रेन .. ईतरही ठिकाणी बसले असेन पण उटी अगदी लक्षात आहे .. वरचं गरम पाणी, कोळशाची धूळ ह्याबरोबरच किंवा त्याहीपेक्षा लक्षात राहिलंय तो एक त्या इंजीना मुळे येणारा विचित्र वास .. मला का कोण जाणे तो वास साबुदाणा खीर शिजत असलेल्या वासासारखा वाटतो .. Happy

दिल्लीत रेल म्युझीयम होतं .. आता आहे की नाही माहित नाही ..

इन्जिनीअरींग जीन>>> Happy

दिल्लीचे नॅशनल रेल्वे म्युझियम आहे अजूनही. माझे ते बघायचे राहिले आहे, पण येथील सॅक्रमेण्टो चे कॅलिफोर्निया रेलरोड म्युझियमही बघण्यासारखे आहे.

इंजिन व रेल्वेचे डबे यावर विविध "कोड्स" असतात. ते एकदा बघायची व समजून घ्यायची सवय लागली की जरा वेगळे इंजिन्/डबा दिसला की याचे कोड काय आहे हे पहिले आम्ही शोधायचो. मी व माझे काही मित्र यात बरेच उत्साही होतो.गूगल-पूर्वे दिवसांत स्वतः शोधणे हाच एक ती कोड्स जमा करायचा उपाय होता. आता नेटवर सहज उपलब्ध असतील.