विचित्र विश्व - रोचक माहिती, संकल्पना आणि घटना

Submitted by मामी on 17 April, 2020 - 01:40

जग अनेकानेक चित्रविचित्र गोष्टींनी आणि घटनांनी भरलेलं आहे. अनेकदा अशा काही अतर्क्य घटना घडतात की त्यांची उकल होत नाही अथवा त्यांमागे काहीतरी अनाकलनीय कार्यकारणभाव आढळून येतो. पूर्ण खात्रीलायक आणि नि:संग्दिध उत्तर मिळत नाही. अशा काही घटना माहीत असल्यास त्या इथे नोंदवता येतील.

शिवाय इतरही काही रोचक जे जे वाटेल त्याची इथे नोंद आणि चर्चा करावी. वेगळ्या संकल्पना, वेगळे अनुभव, वेगळा विचार .... असं काहीही असू शकतं. आपल्या नेहमीच्या रटाळ जीवनापेक्षा वेगळं आणि इंटरेस्टिंग असं काहीही.

तेवढाच विरंगुळा!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठराविक नावे असतात पहा: मोहन, राम, कृष्ण, प्रवीण, मुरली, शंकर, मनोहर, माधव, रवी इत्यादी. यात शक्यतो राम आणि कृष्णाची जास्त.

यातली कोणतीही दोन एकत्र नावे जोडा. म्हणजे जोडनावे तयार होतात. जसे कि: राम मोहन, मुरली माधव, माधव मोहन, प्रवीण मनोहर, मुरली शंकर वगैरे अनेक नावे बनू शकतील. असे एखादे जोडनाव घेतले कि झाले तयार यांचे नाव. अशी नावे धारण करून मग हे लोक ठराविक संघटनेचा अजेंडा रेटत बसलेले दिसतात. स्युडो सायन्स इत्यादी. ह्या धाग्यावर फॉरवर्ड केलेल्या बऱ्याच पोस्ट अशाच आहेत.

युसुफ शट्झ या १०० वर्षे वयाच्या 'नाझी' ला मागच्याच वर्षी जर्मनीमध्ये न्यायासनापाशी आणण्यात आले व त्याच्यावर खटला दाखल करण्यात आला.

https://www.youtube.com/watch?v=W-0bAGqQqAA

१९४२ ते १९४५ दरम्यान जर्मनीचा हुकुमशहा अडोल्फ हिटलरच्या एका कॉन्सनट्रेशन कॅम्प मध्ये ३५०० ज्यूंची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. युसुफ शट्झ हा तेंव्हा अवघा २१ वर्षाचा होता आणि तिथे गार्ड म्हणून काम करत होता. हिटलरच्या या कृष्णकृत्यात सहभागी झाल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर आजवर ज्या ज्या नाझींवर खटले दाखल करण्यात आले, त्यामध्ये युसुफ शट्झ हा आजवरचा सर्वात वयोवृद्ध नाझी आहे. त्याच्यावर इतक्या वर्षानंतर तेही या वयात खटला दाखल केल्याबद्दल अनेकांनी कॉमेंट्स मधून नाराजी व्यक्त केलेली दिसत आहे.

तथापि, त्याच्यावर खटला चालवला गेला. आरोपीने तिथे काय चालत होते याची तेंव्हा आपल्याला काहीही कल्पना नव्हती असा युक्तिवाद करून आपली बाजू मांडली. तरीही त्याच्यावरील आरोप सिद्ध झाला. आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस, त्याचे वय आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन, त्यास पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली:

https://nypost.com/2022/06/28/former-nazi-guard-josef-schutz-101-sentenc...

दरम्यान, त्याचे वय लक्षात घेता त्याची प्रत्यक्ष तुरुंगात रवानगी करण्याची शक्यता फार कमी आहे असे उल्लेख बातम्यांत आढळतात.

अतुल छान लिहिलत, बघते व्हिडिओ. आईकमनचाही व्हिडिओ, चित्रपट फार बघण्यासारखा आहे.
मध्यंतरी अशीच एक केस वाचली. नाझी गेस्टोपा चिफ Lischka ची.
फ्रान्स जिंकल्यावर तिथल्या 30,000 ज्यूंना मारणारा हा नराधम.

युद्ध संपल्यावर त्याला गुन्हेगार म्हणून जाहीर केले गेले. पण जर्मनीत असलेल्या लिस्काला कोणतीच शिक्षा देता येत नव्हती. कारण जर्मनी आणि फ्रान्स यांच्यात युद्ध गुन्हेगारांबद्दल काहीच नियम ठरले नव्हते.

याच 30,000 तल्या एका मारल्या गेलेल्या व्यक्तीच्या मुलाने - Serge Klarsfeld आणि त्याची बायको Beate Klasfeld
काही मित्रांच्या मदतीने लिस्काला पकडून, फ्रान्समधे आणण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.
अनेक पातळ्यांवर प्रयत्न करून, प्रत्यक्ष लिस्काच्या कार्यालयात मोर्चा नेऊन या दोघांनी प्रयत्न केले. परंतु जर्मन सरकार बधत नव्हते.
अखेर सेरगे ने एकदा रस्त्यावर लिस्काला पकडून त्याच्या कपाळावर पिस्तुल धरले. लिस्काला मरणाची भिती म्हणजे काय दाखवले. पण शूट न करता हसत तो परत फिरला. तो म्हणाला की आम्हाला नाझींचा सूड घ्यायचा नाही तर त्यांनी मारलेल्या हजारो ज्यूंना न्याय द्यायचा आहे.
या घटने नंतर दोघांनी अथक प्रयत्न करून , जर्मनीत राहून तेथील सरकारला आपला स्टँड बदलायला लावला. पुन्हा नव्याने लिस्काला अटक झाली, खटला चालवला गेला . आणि त्याला कारावास झाला.
त्याच बरोबर इतरही नाझी नराधमांवर खटले चालवले गेले.

हे सगळं मला फार ग्रेट वाटतं. सूड आणि न्याय यातली सीमा इतकी स्पष्ट समजणं, ती अंगीकारणं. त्यातून व्हिक्टिम ठरलेल्या व्यक्तीच्या मुलाने हे पार पाडणं. संधी मिळूनही सूडाच्या वाटेवर न जाता, न्यायाचाच मार्ग स्विकारून वेळ लागला तरी चालेल पण योग्य मार्गच स्विकारणं! ग्रेट.

वरची अतुलने लिहिलेल्या केस बद्दल वाचलं होतं. जनरली शिक्षा देताना वयाचा विचार व्हावा असं वाटतं, पण या केस मध्ये अजिबात होऊ नये असं प्रकर्षाने वाटलेलं.
लिस्काची केस न्याय-सूड सीमा बद्दल अगदीच भावली.

@अवल, आवडला किस्सा खरेच तारतम्य अन् सूड भावना ह्यांच्यात balance वाटला त्या क्षणी लिस्काला पॉइंट ब्लँक वर होल्ड केल्यावर त्या ज्युईश मनुष्याच्या मनात काय भावभावनांचा सागर उफाळला उसळला असेल ती कल्पनाही करवत नाही मला तरी.

इस्रायली/ ज्यूईश मतानुसार दहा हरवलेल्या जमाती पैकी एक असणारी बेने मेनाश ही जमात म्हणजे मणिपूर मिझोराम मध्ये राहणारी ज्युइश जमात होय, इस्राएल हे राजकीय अन् वकीलाती पातळीवर recognize पण करतो म्हणतात, हल्लीच इंडियन एक्स्प्रेस मध्ये ह्यांच्या (बेने मेनाश) इस्राएल स्थलांतर विषयावर उत्तम लेख आला होता

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/north-east-india/...

जुनागढचा शेवटचा नवाब होता महाबत रसूल खान. हा कुत्र्यांचा खूप शौकीन होता. त्याच्याजवळ विविध ब्रीडची जवळपास ८०० कुत्री होती. इतकेच नव्हे तर त्याने एकदा कोट्यवधी रुपये खर्च करून आपल्या सर्वात लाडक्या कुत्र्याचा निकाह केला होता. आणि त्या कार्यक्रमासाठी तेंव्हाचा ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड आयर्विन यालाही आमंत्रित केले होते.

स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन झाली तेंव्हा या नवाबाने जुनागढ संस्थान पाकिस्तानला जोडण्याचे खूप प्रयत्न केले. परंतु त्यात त्याला यश आले नाही. तो ऐकत नाही हे पाहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी जुनागढला लष्कर पाठवले. त्यामुळे नवाब पाकिस्तानला पळून गेला. जाताना फ्लाईटमधून तो आपली सर्व कुत्री घेऊन गेला. कुत्री नेण्याच्या गडबडीत त्याची एक बेगम आणि मुलगी मात्र वाड्यातच राहिली.

नवभारत टाइम्स ने दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा त्याला फ्लाईटमध्ये त्याची बेगम वाड्यातच राहिल्याचे लक्षात आणून दिले तेंव्हा तो म्हणाला म्हणे, "बेगम काय पाकिस्तानातसुद्धा मिळेल, पण कुत्री मिळणार नाहीत"

'बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए'... कुंदनलाल सहगल यांच्यापासून ते अनुप जलोटा, पं. भीमसेन जोशी, जगजित सिंह अशा अनेक दिग्गजांनी हि प्रसिद्ध ठुमरी गायिली आहे. ती लिहिली आहे नवाब वाजिद अली शाह यांनी. १८४७ ते १८५६ पर्यंत ते उत्तर प्रदेशात अवध प्रांताचे नवाब होते (अयोध्या राजधानी). अतिशय कलासक्त नवाब. विशेषतः ठुमरी, कथक तसेच इतर अनेक ललित कलांमधील त्यांच्या योगदानासाठी कला व संगीत प्रेमींच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदर होता व आहे. अनेक ठुमऱ्या त्यांनी लिहिल्या. प्रशासक म्हणूनही त्यांची कारकीर्द चांगली होती. आपल्या प्रांताविषयी त्यांना प्रचंड प्रेम होते. इंगज त्यांना अटक करून कलकत्यास घेऊन गेले तेंव्हा 'बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए' हि ठुमरी त्या विरहातूनच त्यांनी लिहिली.

पण दुसरी बाजू अशी कि ते प्रचंड आळशीपणासाठी सुद्धा प्रसिद्ध(!) होते. त्यांनी तब्बल तीनशे बायका केल्या आणि सत्तावीस जणींशी घटस्फोटही घेतले. आळशीपणा इतका होता कि या नवाबाला जेंव्हा ब्रिटीश सरकार मधील पोलीस पकडायला आले तेंव्हा केवळ पायात चपला चढवायला कोणी नोकर आला नाही म्हणून ते कुठेही पळून गेले नाहीत. जाग्यावरच बसून राहिले व निमूटपणे पोलिसांच्या अधीन झाले.

Lol

त्या सत्तावीस महाखट असाव्यात. कारण ३०० पैकी बाकी इतर अनेक बायकांना तो इग्नोर मारत असेल. पण या २७ ना नुसते इग्नोर करणे पुरेसे वाटलेले दिसत नाही Happy

>>> तब्बल तीनशे बायका केल्या आणि सत्तावीस जणींशी घटस्फोटही घेतले.
अशा माणसाला आळशी तरी कसं म्हणावं! Proud

Lol
तीनशे सत्तावीस बायका असतानाही त्यांना विरहाचं गीत सुचायचं. हे खरे रोमॅन्टिक आणि कलासक्त.. !

अतुल यांचा नवाबांचा खूप अभ्यास दिसतोय. Wink

https://mayagroupjaipur.wordpress.com/tag/story-behind-the-origin-of-sha...
या नवाबाला अति खाण्यामुळे वजन वाढून घोड्यावर बसता येत नसे व याचे सगळे दातही पडून गेले होते. तेव्हा या Toothless Nawab of Lucknow ने त्याच्या खानसाम्याला तलम व तोंडात विरघळणारं काही तरी कर म्हणून गळ घातली असता शमी कबाबांचा शोध लागला.ही गोष्ट एपिक वर बघितली होती.

तीनशे सत्तावीस बायका असतानाही त्यांना विरहाचं गीत सुचायचं. हे खरे रोमॅन्टिक आणि कलासक्त.. ! >>>
अशा माणसाला आळशी तरी कसं म्हणावं! >>> Lol

नबाबाने कबाबांचा नुसता शोधच लावला नाही, तर पुढेमागे कविता, गजल्स मधे "नबाब" बरोबर यमकाची सोय म्हणून नावही तसे ठेवलेले दिसते.

अस्मिता आणि इतर प्रतिसाद Lol Lol Toothless Nawab of Lucknow आणि शमी कबाब किस्सा भारी आहे की

मुघलांच्या कथा ऐकल्या तर नवाब बरा म्हणायची वेळ येते. मुघलांनी मर्यादा पार केल्या होत्या. अकबरच्या जनानखान्यात तब्बल पाच हजार स्त्रिया होत्या असे उल्लेख आहेत. त्यातल्या काही शे त्याच्या बायका होत्या. त्यातही वेगवेगळ्या ग्रेड होत्या. पहिल्या सहा स्पेशल, मग छत्तीस उप-स्पेशल आणि उरलेल्या शेकडो. ज्या त्या दर्जानुसार आतमध्ये महालापासून ते साध्या खोलीपर्यंत त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली असे. एकदा जनानखान्यात दाखल झालेल्या स्त्रीचा उर्वरित आयुष्यासाठी बाहेरच्या जगाचा रस्ता बंद होत असे. फारच करुण कहाण्या होत्या.

नवाबांच्या रोचक गोष्टींनंतर आता मुघलांकडे वळूया Happy खरंतर या विषयावर मी वेगळा धागा काढत आहे. पण इथे त्यातले काही निवडक किस्से संक्षेपात देतो.

छत्रपती शिवरायांनी बलाढ्य मुघल साम्राज्याला टक्कर दिली आणि त्यानंतर, म्हणजे इ.स. 1707 साली औरंगजेबाच्या मृत्युनंतर, या साम्राज्याचे ऱ्हासपर्व सुरु झाले. कारण त्यानंतर हि सत्ता ढासळतच गेली. आणि नंतरचे अनेक मुघल बादशहा हे केवळ नावालाच बादशाह होऊन गेले. त्यातलेच हे काही किस्से:

१. स्त्रीलंपट मुर्ख बादशहा:
जहांदार शाह(1712-1713) हा इतका स्त्री लंपट होता कि याचा उल्लेख इतिहासात "स्त्रीलंपट मुर्ख बादशहा" म्हणून केला जातो. लाल कुंवर नावाच्या रखेल स्त्री च्या तो पूर्णपणे आहारी गेला होता. आणि तिच्या सांगण्यावरून तो काहीही म्हणजे काहीही करत असे. एकदा तर तो कपडे न घालताच दरबारात आला होता असेही उल्लेख आढळतात.

२. आजारावर उपचार काय केले, इंग्रजांना अधिकार मिळाले:
अनेक मुघल प्रशासक त्यांच्या क्रौर्यासाठी प्रसिद्ध आहेत. फर्रूखसियर (1713-1719) हा त्यातलाच एक. हा अतिशय क्रूर होता. पण हा तितकाच मूर्खसुद्धा होता. हा एकदा आजारी पडला तेंव्हा एका ब्रिटीश डॉक्टरने याच्यावर उपचार केले. त्यामुळे खुश होऊन याने इंग्रजांना भारतात कुठेही टैक्स-फ्री व्यापार करण्याचा परवाना दिला!

3. पेटीकोट घालून दरबारात येणारा बादशहा:
मुघल बादशहांची विलासी आणि रंगेल वृत्ती इतिहासाला काही नवीन नाही. पण मुहम्मद शाह (1719-1748) याबाबत सर्वाना पुरून उरेल असा होता. त्याला स्त्रियांची वस्त्रे परिधान करायला प्रचंड आवडत असे. तो अनेकदा पेटीकोट घालून दरबारात येत असे. त्यामुळे "मुहम्मद रंगीला" असेच त्याचे नामकरण झाले होते.

४. बादशहाची संपत्ती. लुटली एकाने. वाचवली दुसऱ्याने. घेऊन गेला भलताच.
मुघल साम्राज्याच्या अध:पतनाचा निचोतम काळ शाह आलम द्वितीय(1760-1806) या बादशहाने पाहिला. इतका कि एका अफगाणी हल्लेखोराने हल्ला करून याच्या राजघराण्यातील कुटुंबियांना याच्याच दरबारात निर्वस्त्र करून नाचवले! याची सर्व संपत्ती लुटली. मग याच्या मुलाने मदतीकरिता महादजी शिंदे यांना बोलवले. त्यांच्या सैन्याने हल्लेखोरास पकडले. पण शाह अलामची संपत्ती ना त्याला परत मिळाली, ना ती महादजी शिंदेंच्या हाती लागली, आणि ना ती हल्लेखोराला लाभली. मग ती संपत्ती कुणाला मिळाली? तर महादजी शिंदेंच्या सैन्यात एक फ्रेंच अधिकारी होता. हि लुटलेली त्याच्या संपत्ती हाती लागली. ते घबाड हाती पडताच या फ्रेंच अधिकाऱ्यानेच सैन्य सोडले. युद्ध सोडले. आणि इंग्लडला पोबारा केला Lol हपापाचा माल गपापा म्हणतात ते हेच.

५. अखेरचा मुघल बादशाह:
बहादुरशाह जफर (1837-1857) हा अखेरचा मुघल बादशाह. याच्या दोन मुलांची त्याच्या समोरच इंग्रजांनी हत्या केली आणि त्याला पदच्युत करून रंगून येथे पाठवले. तेंव्हा बादशहा ८२ वर्षाचा होता. पुढे रंगून येथेच वयाच्या ८७ व्या वर्षी त्याचे निधन झाले.

६. दिल्लीच्या रस्त्यावर भिक मागणारा बादशहा:
मिर्झा जवान बख्त हा बहादुरशाह जफरचा मुलगा. इंग्रजांनी मुघल साम्राज्य उलथून टाकून जफरला कैदेत ठेवले. त्यामुळे मिर्झा जवान बख्त रूढार्थाने बादशहा नसला तरी लोकांच्या दृष्टीने बहादुरशाह जफरचा मुलगा म्हणून त्यास बादशहाचाच आदर होता. बादशाही गेल्याने उत्पन्नाचे सारे स्त्रोत बंद झाले होते. याच्यावर अक्षरशः भिक मागायची वेळ आली होती. रात्र पडली कि चेहरा झाकून हा बाहेर पडत असे आणि दिल्लीच्या रस्त्यावर उभा राहून भिक मागत असे. त्याच्या एकंदर देहबोलीकडे पाहून अनेक नागरिक तरीही त्याला ओळखत असंत, आणि भिक दिल्यानंतर त्याला सलाम करून पुढे जात असंत!

हैदराबाद संस्थांचा शेवटचा निझाम ओस्मान अली हा जगातील आजवरच्या सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक समजला जातो. त्याच्या मालकीच्या हिऱ्याच्या खाणी होत्या. त्याची संपत्ती अक्षरशः अगणित होती असे म्हटले तरी वावगे ठरू नये (कारण त्याच्या संपत्तीचे अनेकविध आकडे आजवर प्रसिद्ध झाले आहेत. जे शेकडो बिलियन डॉलर मध्ये आहेत). थोडक्यात, तो अरबोपती होता. एका रिपोर्ट नुसार आज सुद्धा इंग्लंडच्या एका बँकेत त्याच्या नावावर ३ अरब हून अधिक रुपये जमा आहेत. जेकब नावाच्या जगप्रसिद्ध हिऱ्याचा (साधारणपणे लिंबूच्या आकाराचा हिरा) वापर तो पेपरवेट सारखा करत असे.

इतके असूनही व्यक्तिगत आयुष्यात मात्र तो अतिशय कंजूष होता. त्याच्या कंजूषपणाच्या काही कथा:
१. तो अतिशय साधे असे कपडे घालत असे. कधीकधी तर ते कपडे मळकटसुद्धा असायचे.
२. आपल्या बेडरूमची साफसफाई तो वर्षातून एकदाच करून घेत असे
३. कुणीही पाहुणे भेटीला आले कि त्यांना फक्त एक कप चहा आणि प्रत्येकी एक बिस्कीट दिले जायचे
४. अनेकदा परदेशी पाहुणे (अमेरिकन, ब्रिटीश किंवा तुर्की इत्यादी) त्याला सिगारेट ऑफर करत असंत, तेंव्हा त्यांच्या पाकिटातून तो एक ऐवजी चार पाच सिगारेट घेऊन आपल्या पाकिटात ठेवत असे
५. स्वत: विकत घेताना मात्र तो त्याकाळातली अत्यंत स्वस्तातली अशी चारमिनार सिगारेट विकत घ्यायचा (त्या पाकिटाची किंमत तेंव्हा १२ पैसे वगैरे होती)

पण दुसरीकडे, संपत्ती दान करणे आणि विविध सामाजिक प्रकल्पांवर ती खर्च करणे यासाठी सुद्धा तो प्रसिद्ध होता
१. इंग्लंडची राणी एलिझाबेथ (द्वितीय) हिच्या लग्नात त्याने तिला तीनशे हिरे असलेला नेकलेस भेट दिला होता
२. सार्वजनिक बांधकामे, धरणे इत्यादी गोष्टींवर सुद्धा तो बराच पैसा खर्च करत असे
३. सन १९६५ च्या भारत-चीन युद्धात मदत म्हणून त्याने पाचशे किलो सोने राष्ट्रीय सुरक्षा निधीला दान केले होते

सन १९६५ च्या भारत-चीन युद्धात मदत म्हणून त्याने पाचशे किलो सोने राष्ट्रीय सुरक्षा निधीला दान केले होते

>>>> हे भारी केले

जगप्रसिद्ध लोकांच्या काही विचित्र सवयी:

१. चीनचा हुकुमशहा माओत्से तुंग याने आपल्या ब्याऐंशी वर्षांच्या आयुष्यात कधीच दात घासले नाहीत. कारण विचारले असता तो म्हणायचा "मी वाघ आहे आणि वाघ कधीच दात घासत नसतो". मुखदुर्गंधी जाण्यासाठी चहापत्तीच्या पाण्याचे तो चुळा मात्र भरत असे. वयाच्या अखेरच्या टप्प्यात त्याचे बहुतांश दात पडले होते.

२. प्रख्यात संशोधक अल्बर्ट आईन्स्टाईन नेहमीच मोजे न घालता शूज वापरत असंत. कारण विचारले असता ते म्हणायचे "मोजे घालून काही उपयोग नाही. कारण नखांमुळे मोजे तसेही लवकरच फाटून शुजमध्ये पाय त्यांच्या बाहेर येतोच" यामागचे अजब तर्कशास्त्र कधीच कुणाला कळले नाही.

३. विख्यात चित्रकार पाब्लो पिकासो आपल्या प्रत्येक पेंटिंगला सुरवात करण्याआधी हवेत गोळी झाडत असे. "त्यामुळे आपल्याला चित्र काढण्यासाठी उर्जा व प्रोत्साहन मिळते" असे अजब कारण तो सांगत असे

४. प्रख्यात वैज्ञानिक निकोल टेसला याला अवैज्ञानिक गोष्टींत प्रचंड रस आणि विश्वास होता. जसे कि पुनर्जन्म, टेलीपथी, आध्यात्मिक प्रयोग इत्यादी. त्याचे हे उद्गार प्रसिद्ध आहेत: The day science begins to study non-physical phenomena, it will make more progress in one decade than in all the previous centuries of its existence. - Nikola Tesla

>>>>>प्रख्यात वैज्ञानिक निकोल टेसला याला अवैज्ञानिक गोष्टींत प्रचंड रस आणि विश्वास होता. जसे कि पुनर्जन्म, टेलीपथी, आध्यात्मिक प्रयोग इत्यादी.
टेस्ला माबोवर असता तर प्रतिवादच करत बसला असता व शोध मागे पडले असते. होलीअर दॅन दाऊ Wink वृत्ती.

<<<टेस्ला माबोवर असता तर प्रतिवादच करत बसला असता व शोध मागे पडले असते. >>> एकदम चपखल

Pages