प्रयत्नांती परमेश्वर
जुई शाळेतून घरी आली. तिने आल्याआल्या सोफ्यावरती दप्तर टाकलं. पायातले बूट मोजे काढत म्हणाली," आजी, उद्या या लेझीमला मी दांडीच मारणार आहे. केवढ्या अवघड अवघड स्टेप्स करायला लावतात. पाय दुखून येतात नुसते"
आजीने तिचे दप्तर नीट कपाटात ठेवले आणि ती आत गेली. मागुन जुई ओरडली .. "ए आजी, खायला दे ना पटकन. किती भूक लागलीय"
"अगं होss , त्यासाठीच तर मी आत आलेय. तू आधी हातपाय धुऊन घे. तुझ्या आवडीचे गरम गरम पोहे केलेत, ते खा आणि मग सांग नक्की काय झालं शाळेत ते" - आजी
जुई हात-पाय धुवून आली. बशीतल्या पोह्यांचा बकाणा भरत म्हणाली," अगं आजी, आता आमची लेझीमची स्पर्धा पंधरा दिवसांवर आलीय आणि अजून आमच्या सरांचं formation बसवणंच चालू आहे. आज तर इतक्या अवघड स्टेप्स करायला लावल्या होत्या. आम्हाला नीट जमतच नव्हत्या. सारखं काय formation बदलतात. वैताग नुसता.."
"अगं, "वाळूचे कण रगडिता तेलही गळे". प्रयत्न तर करुन पहा"
"अॕss ..काय म्हणालीस? काहीही काय सांगतेस! वाळूपासून कधी तेल मिळतं का..!!" आजीला वेड्यात काढत जुई म्हणाली.
"अगं वेडाबाई, हा सुविचार आहे. सुविचाराचा अर्थ काही शब्दशः घ्यायचा नसतो. तो त्यातून व्यक्त होणाऱ्या विचारांमध्ये दडलेला असतो."
" हो काss, मग काय आहे याचा अर्थ ?"
"या ओळींचा अर्थ असा, की तुम्हाला अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा प्रयत्नांची जोड दिली, त्यावर खूप मेहनत घेतली, तर नक्की साध्य होऊ शकतात."
" म्हणजे? मला काsही कळलं नाही." आता जुईच्या खाण्याचा वेग मंदावला होता.
आजी म्हणाली " थांब, मी तुला एक उदाहरण देते. म्हणजे तुला नीट कळेल. आपला हा भारत देश आधी पारतंत्र्यात होता, तेव्हा स्वातंत्र्य मिळवणं ही गोष्ट सुद्धा वाळूतून तेल काढण्याएवढीच अशक्य वाटणारी होती. पण अनेक देशबांधवांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी अगदी सामान्य लोकांनी सुद्धा अनेक वर्ष प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अनेकांनी त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि मग "प्रयत्नांती परमेश्वर" या उक्तीप्रमाणे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून तर आज आपण मोठ्या अभिमानाने स्वतंत्र भारतात राहत आहोत".
"हंss आत्ता या सुविचाराचा अर्थ लक्षात आला माझ्या ..पण तू आत्ता दुसरं काय म्हणालीस.. प्रयत्नांती का काय ते! हासुद्धा एक सुविचारच आहे का ?"
"हो हो. तो ही एक सुविचारच आहे. त्याचा तरी अर्थ कळला की नाही तुला ?" आजीने तिची पोह्याची बशी उचलून नेताना विचारले.
पाणी पिता पिता ती म्हणाली," हो .त्याचा अर्थ मला माहिती आहे. प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे खूप प्रयत्न केले तर आपल्यालाही परमेश्वर भेटेल. त्या धृवबाळासारखा" पोट भरल्यामुळे तिला आता अगदी उत्साह आला होता. ती पुढे म्हणाली, "तूच मला नव्हती का त्यांची गोष्ट सांगितली. त्यात तो अढळपद मिळवण्यासाठी, लहान असूनसुद्धा जंगलात जातो. तिथे खूप दिवस तप करतो. देवाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न करतो आणि मग एक दिवस देव प्रसन्न होऊन त्याच्यापुढे उभा राहतो आणि त्याला अढळपदाचा वर देतो. होss ना!"
तिच्याकडे कौतुकाने पाहत आजी म्हणाली,"अगदी बरोबर, पण या ही सुविचाराचा अर्थ तू शब्दशः लावतीयस जुई. त्यातील परमेश्वर म्हणजे तुमचे ध्येय. यश. ते गाठण्यासाठी तुम्ही जेव्हा मनापासून खूप प्रयत्न करता, तेव्हा ते तुम्हाला नक्की मिळेल. असा आहे याचा खरा अर्थ. मग सांग बरं, तुझं ध्येय कोणते आहे?"
"माझे ध्येय ! अंss, परीक्षेत चांगले मार्क मिळवणं"
"मग त्यासाठी तुला काय करावे लागेल ?"
"अभ्यास ..खूप अभ्यास" जुईने पटकन सांगितले.
" बरोबर . अभ्यास तर केलाच पाहिजे. पण जीवनात पुढे यशस्वी होण्यासाठी अभ्यास एके अभ्यास करूनही चालत नाही. त्याच्या जोडीला चांगल्या सवयी, चांगले छंद लावून घ्यावेत"
" मग मलाही आहे की चित्र काढायचा, डान्स करायचा छंद. शिवाय मला लेझिम खेळायला पण खूप आवडतं."
"काय ? तुला लेझीम खेळायला आवडतं ? पण मघाशी तर तू मला म्हणालीस, की उद्या लेझीमला मी दांडी मारणार आहे म्हणून. आणि परवाही तू आईपाशी भूणभूण लावली होतीस. एवढ्या सकाळी सकाळी खेळायला लावतात. थंडीमध्ये लेझीम खेळताना पडलं की फार दुखतं. खरचटतं.. वगैरे वगैरे"
हो मग.. दुखतच मुळी.तुला बोलायला काय जातंय. तू तिथे येऊन बघ म्हणजे तुला कळेल एवढी प्रॅक्टिस करून घेतात ते. कोणाला लागलं तरी थोड्या वेळाने परत खेळायला लावतात".
"अगं , काहीतरी चांगली गोष्ट साध्य करण्यासाठी थोडेफार कष्ट, थोडा त्रास सोसायलाच हवा.. त्याशिवाय का तुला तुझा परमेश्वर भेटेल ,सांग पाहू?
मगाचपासून मी तुला हेच तर सांगतेय.. ये बाळा .. इकडे ये. पाय दुखतायत नं तुझे. मी दाबून देते हो. चांगलं तेलाने मालिश करून देते"
"काही नको पाय दाबायला. तेवढा त्रास सोसेन मी. आम्हाला लेझीमच्या स्पर्धेत जिंकायचेय ना. आमचा परमेश्वर आम्हाला मिळवायचाय ना!" लटक्या रागाने ती म्हणाली .
तरीही तिच्या या जिद्दीवर खूष होत आजीने तिला जवळ घेतलं आणि प्रेमानं पाय दाबू लागली.
कविता क्षीरसागर