मृगजळ

Submitted by Theurbannomad on 8 March, 2020 - 01:14

अब्दुल झपझप पावलं टाकत वाळू तुडवत आपल्या गावाकडे चालला होता. गाव बरच लांब होतं. ज्या रस्त्याने आपण गावाकडे चाललोय, त्या रस्त्यावर गाव यायच्या आधी कब्रिस्तान आहे आणि त्या कब्रिस्तानाच्या बाजूने जाणाऱ्या कोणत्याही जिवंत माणसाला सूर्यास्तानंतर कब्रिस्तानातले सैतान पकडतात आणि आपली रक्ताची तहान भागवून कब्रिस्तानबाहेर फेकून देतात अशी त्याच्या गावात अनेक वर्षांपासून लोकांना ऐकिवात असलेली दंतकथा त्याच्या मनात रेंगाळत होती. गावापासून चाळीस मैलांवर असलेल्या बाजारात तो आपला माल विकायला पहाटेच गेला होता. घरच्या मेंढ्यांची तांबूस करडी लोकर आणि बायकोने तयार केलेल्या मासे साठवायचा टोपल्या दर आठवड्याला नित्यनेमाने एक दिवसाआड बाजारात न्यायच्या, विकायच्या आणि त्या पैशातून बाजारातूनच खायचं प्यायचं जिन्नस घेऊन घरी यायचं हे अगदी ठरल्याप्रमाणे व्हायचा आणि आजही झालं। फक्त बाजारातून निघायला उशीर झाल्यामुळे उन्हं कलली तरी तो गावाच्या वेशीपासून बराच लांब होता.

दूरवरून मशिदीची माघरीबच्या नमाजाची बांग त्याला ऐकू आली. सूर्यास्त होऊन आता आसमंतात मंद लालसर प्रकाश पसरलेला दिसत होतं आणि हळू हळू तोही कमी कमी होत काळा रंग आकाशाचा ताबा घेत होता. लुकलुकणार्या चांदण्या तेवढ्या त्याला दिसल्या आणि आज अमावास्या आहे हे त्याच्या ध्यानात आलं. अमावास्येला सैतान प्रबळ असतो असं त्याला त्याच्या आजोबांनी तो लहान असताना सांगितल्याचं त्याला आठवलं आणि त्याला दरदरून घाम फुटला. वळसा घालून दुसरीकडून जायची आता सोय नव्हती कारण तो रस्ता खूप लांबचा होता. शेवटी हातात जपमाळ घेऊन आणि मगरीबीचं नमाज न पढल्याबद्दल परवरदिगाराची माफी मागून तो जवळ जवळ धावतच पुढे निघाला.

काही वेळातच त्याला समोर खालच्या अंगाला गावातले दिवे लुकलुकताना दिसले. सगळ्या गावाभोवती मातीच्या विटांची तटबंदी होती. त्यामध्ये खोचलेल्या मशाली भेसूर दिसत होत्या. गावात शिरायची ती मातीची कमान आणि त्या कमानीला लागून तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला भिंतीला लटकवलेल्या दोन मोठ्या सैतानाच्या प्रतिमा आता त्याला स्पष्ट दिसायला लागल्या. त्या प्रतिमांमुळे सैतान गावात शिरू शकत नाही अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून परंपरागत चालत आलेली श्रद्धा अब्दुलला मात्र अस्वस्थ करत होती, कारण त्या श्रद्धेचा दुसरा अर्थ हा होता होतं, कि गावाच्या बाहेरच्या बाजूला रात्री खरोखर सैतानाचा वास असतो.

आता अब्दुल कब्रिस्तानाच्या अगदी जवळ आला होता। त्याच्या आणि गावाच्या मध्ये असलेल्या त्या दोन-तीन कोसाच्या अंतरात आता फक्त अर्ध्या कोसाचं ते कब्रिस्तान पार पाडणं महत्वाचं होतं. अब्दुलने आपल्या पखालीतलं पाणी घटाघटा प्यायलं. बरोबरच्या जिन्नसांच गाठोडं पाठीला घट्ट बांधलं। पायातल्या सपाता झटकून पुन्हा घातल्या. त्याचा असा विचार होतं, की आहे नाही तो सगळा दम एकवटून शक्य होईल तितक्या वेगात गावाकडे धाव घ्यायची. कोणीही हाक मारली, थांबायला सांगितलं तरी थांबायचं नाही हे त्याने मनोमन पक्क केलं.

अल्लाहचे नाव घेऊन त्याने जीव घेऊन धूम ठोकली। त्याला आता फक्त त्या गावच्या प्रवेशद्वारापाशीच थांबायचं होतं। सात-आठ मिनिटं तो जोरात पळत होता। शेवटी धाप लागून तो थांबला आणि पुन्हा त्याने पखालीतलं पाणी प्यायलं। तोंडावर थोडं पाणी मारलं आणि पखाल कमरेला लटकावून त्याने समोर बघितलं। जे त्याला दिसत होतं, ते बघून त्याच्या मणक्यातून जबरदस्त शिरशिरी गेली।

पंधरा मिनिटांपूर्वी त्याला गाव ज्या अंतरावर दिसत होतं, तितकंच लांब ते त्याला अजूनही दिसत होतं. बाजूला बघितल्यावर आपण कब्रिस्तानाच्या बाजूलाच आहोत, हेही त्याच्या ध्यानात आलं. इतकं वेळ नक्की आपण कोणत्या दिशेने पळालो याचा त्याला उलगडा होत नव्हता. शेवटी जीव घेऊन त्याने पुन्हा पळायला सुरुवात केली. पुन्हा एकदा तो दहा मिनिटानंतर दमून एका जागी थबकला आणि कशीबशी पखाल उघडून त्याने उरलेलं सगळं पाणी घशाखाली ओतलं. आजूबाजूला बघितल्यावर त्याला जे दृश्य दिसलं, ते बघून तो जागीच कोसळला. तीच जागा, तेच कब्रिस्तान आणि तसाच लांब दिसणारा तो गावचा दरवाजा बघून तो जोरजोरात ओरडायला लागला.

' कोण रडतंय? काय झालं? 'त्याच्या कानावर एक पुरुषी आवाज आला. हा आवाज नक्की कुठून येतोय, हे त्याला कळत नव्हतं. रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात वर लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या अतिमंद प्रकाशात जितकं शक्य आहे तितकंच त्याला दिसू शकत होतं. धडपडत त्याने आजूबाजूला त्या आवाजाचा उगम शोधायचा प्रयत्न केला. त्याला रस्त्याच्या मागच्या टोकावर एक आकृती चालत येताना दिसली. ती आकृती नक्की कोणाची आहे, याचा त्याला उलगडा झाला नाही आणि त्याने घाबरून धडपडत तिथून पळायचा अयशस्वी प्रयत्न केला. पाय सटकून तो वाळूत पडला आणि अखेरीस त्या दमलेल्या अवस्थेत तो तसाच पडून राहिला. आपला अंत जवळ आला आहे अशी त्याची खात्री पटली आणि अल्लाहचे नाव घेत त्याने डोळे मिटून घेतले.

तोंडावर थंड पाण्याचा हबका पडल्यामुळे तो भानावर आला. समोर हातात पलिता घेऊन उभा असलेला एक माणूस त्याला उठवायचा प्रयत्न करत होता. अब्दुल उठून बसला आणि त्याने त्या माणसाने त्याला दिलेलं पाणी प्यायलं , दोन खजुराच्या बिया तोंडात घातल्या आणि जराशी हुशारी आल्यावर त्याला विचारलं,

'आपण कोण आहेत? इथे कसे?'

' मी सुद्धा तुमच्यासारखाच वाटसरू आहे. हलाबि गावाकडे निघालो होतो, पण रस्ता चुकलो. शेवटी जवळ जे गाव दिसतंय तिथे जावं आणि उद्या सकाळी आपल्या गावाकडे प्रयाण करावं असा विचार करून या रस्त्यावर आलो, तेव्हा तुमचं ओरडणं कानावर आलं. इथे पोचलो तर तुम्ही बेशुद्ध पडलेले दिसला.....काय झाला आपल्याला?'

' ते समोर दिसतंय ते माझं गाव, त्याचं नाव आहे मसाफ. बाजूला हे जे कब्रिस्तान आहे ना, त्यात सैतान आहेत. ते गावात शिरू नये म्हणून गावाच्या भिंतीबाहेर ते दोन मुखवटे लटकावलेत बघा.....तिथपर्यंत पोचलो की आपण सुरक्षित असू. या कब्रिस्तानात सैतान आहेत आणि त्यांनी आपल्याला पकडलं तर ते आपलं रक्त पिऊन आपल्याला कब्रिस्तानाच्या वेशीबाहेर फेकून देतील....कृपा करून आपण लवकर इथून निघू....आपला नाव काय? आपण चालता चालता बोलूया का....' अब्दुलने भरभर एका दमात सगळं सांगितलं आणि तो निघाला.

' माझं नाव हमीद। तुम्ही म्हणताय तर खरंच आपण निघूया....पंधरा-वीस मिनिटात पोचू आपण.....'

दोघेही झपझप पाय उचलत त्या गावाकडे जायला लागले. जवळ जवळ अर्धा तास चालूनही त्या गावापासून आपण लांबच आहोत, असं त्यांना कळलं. हताश होऊन त्यांनी एकमेकांकडे बघितलं। आपल्याबरोबर नक्की काय घडतंय हे त्यांना दोघांनाही कळत नव्हतं. बाजूचं कब्रिस्तान आहे तसंच दिसत होतं आणि गावसुद्धा तितकंच दूर दिसत होतं. आता दोघांनाही काहीही कळेनासं झालं आणि डोकं धरून ते मटकन खाली बसले.दोन-तीन मिनिटं शांततेत गेली आणि अचानक अब्दुलने हमीदला विचारलं,

' हमीद, तू नक्की त्याचा रस्त्याने आलास ज्या रस्त्याने मी आलो? तू तुझा रस्ता कसा चुकलास?'

' ' मला नाही समजत कसा ते.....पण चुकलो.मला अजूनही समजत नाहीये कि मी नक्की कुठे माझी वाट भरकटलो! '

' तू भरकटलास की....तूच या कब्रिस्तानातला वेष बदलून माझ्यासमोर आलेला इफरीत आहेस?'

' मी आणि इफरीत? काहीही काय बोलतोस? मला वाटतं तूच इफरीत असशील....तुला भेटल्यापासूनच मी भरकटतोय.....'

दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची सुरु झाली. शेवटी दोघांनीही एकमेकांवर हात उगारून तावातावाने भांडायला सुरुवात केली. भांडण चांगलंच विकोपाला गेलं। दोघांनी एकमेकांना मिळेल त्या वस्तूने मारायला सुरुवात केली. दोघेही त्या झटापटीत कब्रस्तानाच्या तुटक्या भिंतीतून दोघेही तोल जाऊन आत पडले आणि एका कबरीवर अंथरलेल्या चादरीवर दोघेही आडवे झाले. झटापटीत चादर फाटून तुकडे इथेतिथे उडाले. दोघांच्या नाकातून, तोंडातून आणि कुठून कुठून रक्त येत होतं. अचानक त्या कबरीच्या मागून अंधारातून दोन आकृत्या पुढे आल्या आणि त्या दोघांचीही शरीर त्या काळ्या अंधाऱ्या आकृतीमध्ये हळूहळू नाहीशी झाली.

रात्रभर नवरा घरी न आल्यामुळे सकाळी अब्दुलच्या बायकोने आकांडतांडव केलं. गावातल्या सगळ्या लोकांना बोलावून मदतीची याचना केली. शेवटी गावातल्या ८-१० तरुण मंडळींनी अब्दुल्लाला शोधायला वेशीबाहेर पडून बाजारच्या रस्त्यावर कूच केली.

कब्रस्तानाच्या बाजूला रस्त्यावर त्यांना एक मृतदेह सापडला।त्या शरीरात रक्ताचा थेंब शिल्लक नव्हता. खोल गेलेले डोळे, चिपाड झालेलं शरीर आणि पांढरीफट्ट पडलेली त्वचा हे सगळं बघून गावकरी समजायचं ते समजले. ते जजिथे उभे होते, तिथून दुसऱ्या बाजूला जाणारा एक रस्ता सरळ कुठेतरी जात होतं. त्या रस्त्यावर दूर त्यांना काही लोक दिसले. कुतूहल म्हणून काही लोकांनी त्या गर्दीकडे बघून हात दाखवला. तिथून काही लोकांनी प्रतिसाद दिल्यावर सगळे जण जवळ यायला लागले.

त्या गर्दीच्या मध्यभागी एक खेचर होतं। त्या खेचरावर एक प्रेत लादलेलं होतं. ते प्रेत अगदी अब्दुलच्या प्रेतासारखं चिपाड पांढरफटक होतं. ते दृश्य बघून अब्दुलच्या गावचे लोक हादरले. चौकशी केल्यावर हाती आलेली माहिती अतिशय विचित्र होती. कब्रिस्तानाच्या एका कोपऱ्यापासून दोन रस्ते फुटत होते. एक सरळ अब्दुलच्या गावी - मसाफकडे आणि दुसरा तसाच सरळ हमीदच्या हलाबि गावाकडे जात होता. गावकऱ्यांनी त्या रस्त्यावर उमटलेले पायाचे ठसे बघितले. दोन्ही रस्त्यावर गावाच्या दिशेला जाणारे सरळ पायाचे असंख्य ठसे होते आणि.....त्याचा ठशांच्या बाजूला उलट्या पायाचे अगदी समांतर जाणारे ठसे सुद्धा होते. लोकांनी घाबरत घाबरत कब्रिस्तानाच्या आत नजर टाकली....

तिथे दोन कबरींच्या जागी नुसते खड्डे होते. खड्ड्यात काहीही नव्हतं. खड्ड्यांच्या बाजूला एक चादर अस्ताव्यस्त पडली होती. रस्त्यावर सोनेरी रंगाचे कापडाचे तुकडे पडले होते. लोकांनी ते कपडे उचलूंन जुळवल्यावर समजला, कि ते तुकडे 'अल्लाह' या अक्षरांचे होते जे त्या चादरीतून फाटून कब्रिस्तानाच्या बाहेर उडाले होते!!!

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या सगळ्या गोष्टी common index मधे का दिसत नाहीत?
भारी आहेत. .. अरेबियन नाईट्सची आठवण झाली.