वटवाघुळ: मानवाचे मित्र

Submitted by Dr Raju Kasambe on 7 March, 2020 - 12:47
vatawaghul

वटवाघुळ: मानवाचे मित्र

सूर्य मावळतीकडे झुकला असताना लॉन वर लग्नाच्या रिसेप्शनची तयारी चालू होती. थोड्याच वेळात संपूर्ण लॉनवर मोठमोठे सोडियमचे लाइट्स चालू करण्यात आले. वधू-वरांचे आगमन झाले. नवरीचा भाऊ अस्वस्थ होता. कारण लाइट्सवर शेकडो किडे आकर्षित झाले आणि घिरट्या घालू लागले. त्यामुळे कार्यक्रमाचे चांगले शूटिंगही करता आले नसते. मी त्याला दिलासा दिला कारण हे किडे हाकलणे किंवा मारणे आपले काम नव्हते.
मी म्हणालो,

“पंधरा-वीस मिनिटांचे काम आहे, मी माझे मजूर सांगितले आहेत किडे पकडायला. चिंता करू नकोस. तुझ्या कडून पैसे घेणार नाही”.
अशा गंभीर प्रसंगी मी फालतू विनोद करीत असल्याचे बघून माझा मित्र विक्षिप्तपणे हसला.

पाचच मिनिटात वीस-पंचवीस छोटी-छोटी वटवाघळं लाईट भोवती अत्यंत शिताफीने घिरट्या घालू लागली. कधी पाहुण्यांच्या डोक्या जवळून तर कधी अगदी जमिनी जवळून घिरट्या घालू लागली. सूर मारू लागली. एकेका किड्याचा पाठलाग करून त्यांना फस्त करू लागली. मी बोललो ते शब्दशः खरे झाले. पंधरा-वीस मिनिटांनी तेथे एकही किडा शिल्लक नव्हता. लॉन वरचे आकाश स्वच्छ झाले होते. माझ्या मजुरांनी आपले काम चोख बजावले होते. तेही कुठलीही मजुरी न घेता!

Flying Fox DSCN0337 (9).JPG
(वाटवाघूळचा चेहरा कोल्हयासारखा दिसतो. छाया: लेखक)

एक अमेरिकन शेतकरी त्याच्या शेतातील एक अत्यंत खोल आणि अंधारी गुहा बुजवायला निघाला होता. शास्त्रज्ञांना कळले तेव्हा त्यांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तो शेतकरी खूप घाबरलेला होता. त्याचे कारणही तसेच होते. अंधार पडला की त्या गुहेच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हजारो-लाखो वटवाघुळांची फौज बाहेर पडत असे. त्या वटवाघुळांची त्याला भीती वाटत असे. शास्त्रज्ञांनी आत जाऊन गुहेचा अभ्यास केला असता त्यात अंदाजे 50 लाख वटवाघळं राहत होती असे आढळून आले. विशेष म्हणजे गुहेत जमिनीवर वटवाघुळांची विष्ठा आणि किड्यांच्या पंखांचा गुडघाभर खच पडला होता. शास्त्रज्ञांनी त्या शेतकऱ्याला गुहेत नेले.

“हे पंख कशाचे असतील?” शास्त्रज्ञांने विचारले.
“किड्यांचे” शेतकरी म्हणाला
“कुठले किडे?” शास्त्रज्ञांनी परत विचारले.
“माझ्या शेतातले!” शेतकरी उत्तरला.

हे उत्तर दिल्याबरोबर अंधाऱ्या गुहेत असूनही त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ही निष्पाप वटवाघुळं त्याच्या शेताचे टोळधाडी पासून संरक्षण करीत होती आणि हे महाशय त्या गुहेचे तोंड बुजवायला निघून लाखो वटवाघूळांच्या जीवावर उठले होते. आता मात्र त्याने त्या गुहेच्या तोंडावर स्टीलच्या गजांचे जाळे बसवून घेतले जेणेकरून वटवाघळांना बिनधोकपणे जाता येता येईल पण मनुष्याला मात्र नाही!!

अनेक प्रजातीचे पक्षी दिवसा किडे खातात आणि किड्यांची संख्या नियंत्रित करतात. वटवाघुळं मात्र हेच काम रात्री करतात. रात्रभर ती आपले उदरभरण करतात आणि दिवसभर अंधाऱ्या गुहेत किंवा एखाद्या दुर्लक्षित घरात (जुने वाडे) किंवा झाडावर उलटे लटकून विश्रांती करतात.
वटवाघुळ म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. दिसायला जरी वटवाघुळं सुंदर नसली तरीही कर्माने ती निश्चितच सुंदर आहेत. शहरात उंच वडा, पिंपळाच्या झाडावर लटकून दिसतात ती वटवाघुळं मात्र शाकाहारी असतात. त्यांना मोठी फळभक्षी वटवाघुळं (लार्ज फ्रुट-ईटिंग बॅट अथवा फ्लाइंग फॉक्स) असं म्हणतात.
Large Fruit Bat Flying Fox Nagpur DSC_6610 (66).JPG
(फळभक्षी वटवाघुळं (लार्ज फ्रुट-ईटिंग बॅट अथवा फ्लाइंग फॉक्स. छाया - लेखक).

अंधार पडला की ही उडून जाऊन पेरू, उंबर, वड, पिंपळ, पपई, केळी आदी झाडांवर जाऊन लटकतात आणि त्या झाडांची फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या झाडांच्या बिजांचा प्रसार होतो. (ता.क. गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ही वटवाघूळं द्राक्ष बागांना नुकसान करीत आहेत).

मांसाहारी वटवाघुळं अनेक प्रकारचे किडे कीटक खाऊन जगतात आणि परिसरातील किड्यांची, डासांची संख्या नियंत्रणात ठेवतात.
Nakte Watwaghul BAT by Dr. Raju Kasambe.JPG
(नकटे कीटकभक्षी वटवाघूळ. छाया - लेखक)

जिवंत रडार यंत्र
वटवाघुळं रात्री बाहेर पडत असल्याने त्यांना अंधारात दिसायला हवे. घुबडांना अंधारात दिसावे म्हणून त्यांचे डोळे मोठे आणि बटबटीत असतात. पण वटवाघळांचे डोळे अगदीच छोटे असतात. मग त्यांना अंधारात दिसते तरी कसे? शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांवरून असे निष्पन्न झाले की वटवाघुळं तोंडावाटे एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनिलहरी म्हणजे कंपने निर्माण करतात. अर्थात ही कंपने आपल्याला ऐकू येत नाहीत. ही कंपने अत्यंत जास्त वारंवारीतेची (अल्ट्रासोनिक वेव्हज) व श्रव्यातीत असतात.

ती कंपने समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आढळून परत येतात. वटवाघळांचे कान (बाह्यकर्ण) मोठे असतात आणि त्याद्वारा ही परावर्तित कंपने वटवाघुळं हेरतात आणि हवेत उडणाऱ्या किड्यांचा आकार, वेग, अंतर आणि उडण्याची दिशा जाणतात. निमिषार्धात स्वतःची दिशा बदलून किड्याचा निशाना साधतात. ह्या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत इको-लोकेशन म्हणतात. ह्याच तंत्राचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अंधारातही विमानांचा शोध घेणाऱ्या रडार यंत्राचा शोध लावला.

वटवाघुळं पक्षी नव्हेत

मुख्य म्हणजे वटवाघुळं उडू शकत असले तरी ते पक्षी नाहीत. तर ते सस्तन प्राणी आहेत. म्हणजे मनुष्य, माकड, हत्ती इत्यादि सस्तन प्राण्यांप्रमाणेच ते आपल्या पिल्लांना स्तनाद्वारे दूध पाजतात. त्यांचा एकंदरीत चेहेरा कोल्हा अथवा कुत्र्यासारखा दिसतो.
आपण ज्याला त्यांचे पंख समजतो ते त्यांच्या हाताच्या बोटांमधले पडदे असतात. त्यांचे पाय आखूड असून अशक्त असतात आणि त्याचा उपयोग झाडावर उलटे लटकण्यासाठी होतो. नाकाचा आणि चेहऱ्याचा आकार कुरूप असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील केवळ ‘पिशाच्च’ प्रकारातील ‘वॅम्पायर बॅट’ वटवाघुळं जखमी प्राण्यांचे रक्त पितात असे आढळून आले आहे. जगात इतर कोणतेही वटवाघुळ रक्तपिपासू नाही.

माझे निरीक्षण असे आहे की दिवसा वटवाघुळं लटकली असताना खूप खेळकर असतात आणि दिवसभर भांडकुदळपणा करीत असतात. तसेच खूप आरडाओरडा सुद्धा करतात. एकमेकांना चावतात ओरबाडतात.

अशा वटवाघळांची वसाहत असते तेथे दुर्बिणीतून निरीक्षण करण्याची खूप गंमत असते.

वटवाघुळांबद्दलच्या अंधश्रद्धा
सर्वच वटवाघूळं रक्तपिपासू असतात असा गैरसमज आपल्याकडे आहे. तसेच वटवाघूळं जाणून-बुजून आपल्याला धडक मारतात असा गैरसमज सुद्धा आढळतो. काहीजण तर वटवाघूळं तोंडावाटे विष्ठा बाहेर टाकतात असा सुद्धा दावा करतात. वटवाघूळांना भूत-प्रेताचे, पिशाच्चाचे प्रतिनिधी मानले जाते. हिंदी तसेच इंग्रजी सिनेमा आणि पडक्या पुरातन हवेलीत खरोखरी वटवाघळांचे राहणे या कारणांमुळे अशा अंधश्रद्धा पसरल्या असाव्यात. शेतातील पिकांचे नुकसान करणारी टोळधाड दिवसा केवळ पक्षी आणि रात्री वटवाघूळं नियंत्रणात आणतात हे आपण विसरू नये!

डॉ. राजू कसंबे,

मुंबई

(पूर्व प्रसिद्धी: दैनिक मातृभूमी, 15 ऑगस्ट 2002).

Group content visibility: 
Use group defaults

छान माहिती

ती कंपने समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आढळून परत येतात. >> तेवढं आदळून करा.

फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख.

आम्ही सातार जवळच्या बामणोली गावात गेलो होतो तिथे झाडावर अक्षरशः हजारोनी वटवाघळ होती. झाड खूप उंच होत म्हणून लांबून पाहिलं तर काळ्या प्लॅस्टिक च्या पिशव्या च फांद्याना लटकल्या आहेत असं वाटत होतं.पण जवळ गेलो तेव्हा त्यांचा भर दिवसा ही ओरडण्याचा आवाज ऐकू आला. आणि आमच्यातल्या काही जणांना त्यांच्या मलमूत्राचा प्रसाद ही मिळाला. झाडाखाली ही सर्वत्र घाण झाली होती.
हा फोटो .
IMG_20200312_163418.jpg

बरीच लोकं ह्याला प्राणी न समजता पक्षी च समजतात.>> बरीच लोकं नव्हे, ते राजेश१८८ नावाचे एक थोर विचारवंत होते, ते समजायचे.

वटवाघूळ शेमिंग करू नको ओ सस्मित ☺️☺️☺️☺️
कदाचित वटवाघूळ कम्युनिटी च्या सौंदर्य व्याख्येत तो फोटोतला बाबा बेनेडिक्ट इतका हॅण्डसम असायचा.

राजेश १८८ हा थोर विचारवंत आणि तत्ववेत्ता ज्याचा आयक्यू दोनशे त्रेपन्न होता, अशी ही वल्ली मायबोली वर अनेक दिवस हजेरी लावून गेली आहे. या माणसाचे खूप उपकार आहेत वाचकांवर!

वटवाघुळे
छान लेख.

>> ही कंपने अत्यंत कमी वारंवारीतेची (अल्ट्रासोनिक वेव्हज) व श्रव्यातीत असतात.

वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी ना? मग कंपने अत्यंत जास्त वारंवारीतेची असतात असा बदल कराल का?

Submitted by व्यत्यय on 8 March, 2020 - 08:02>>.>>>>>

" Echolocation calls are usually ultrasonic--ranging in frequency from 20 to 200 kilohertz (kHz), whereas human hearing normally tops out at around 20 kHz. Even so, we can hear echolocation clicks from some bats, such as the Spotted bat (Euderma maculatum). These noises resemble the sounds made by hitting two round pebbles together. "
from Scientific America
माझ्या मते वर दिलेल्या वारंवारीतेला अति कमी वारंवारीता हाच शब्द योग्य आहे.

वटवाघूळ शेमिंग करू नको ओ सस्मित>>> Lol
बाबा बेनेडिक्ट>>>>>>असेल असेल.
माणुस बाबा बेनेडिक्ट साठी डोब. ववा बाबा बेनेडिक्ट साठी इयूऊउ Lol

आज एक फार रोचक लेख वाचण्यात आला- https://www.scientificamerican.com/article/blood-sisters-what-vampire-ba...

कार्टर हे वटवाघळांचा अभ्यास करत आहेत. त्यांनी नीरीक्षण केले की - 'रक्तपिपासू वटवाघळे' माद्या या ८-१० अशा कोंडाळ्यात रहातात तर नर हा एकएकटा असतो व आपल्या आपल्या मालकीच्या भागाचे रक्षण करतो. आता या माद्या काय करतात तर आपल्या अन्य नातेवाईक व मैत्रिणी, त्यांची पिल्ले यांना स्वतः रक्त पिउन, उरलेले रक्त देतात. म्हणजे त्यांना हवं तेवढं रक्त मिळाल्यानंतर उरलेले रक्त परत तोंडातून बाहेर काढून अन्य भुकेल्या त्यांच्या गटातील वाघळांना देतात. उत्क्रांतीच्या दॄष्टीने आपण एकवेळ समजू शकतो की स्वतःची गुणसूत्रे पुढे नेण्याकरता त्या आपापल्या नातेवाईकांना जगवत असतील पण मग त्या नातेवाईकांखेरीज अन्य वाघळांनाही हे रक्त का पाजतात तर - मैत्री = Risk pooling, म्हणजे स्वतःकरता त्या Safety net बनवितात, ज्यायोगे त्यांचे अस्तित्व अधिक बळकट होइल. hungry bats often rely on their food donors.
“Friendship is complicated in that we don’t understand it scientifically,”
वाघळांचा मेंदू शरीराच्या मानाने मोठा असतो विशेषतः neocortex. याचे मुख्य काम असते क्लिष्ट, गुंतागुंतीची असे सामाजिक नाती जोपासणे व तत्सम.
perhaps friendship serves as a safety net for a variety of animals.
मैत्रीचा सेफ्टी नेट म्हणुन उपयोग आपण करुन घेतो पण त्याचा अर्थ १००% फुकटेपण आपण सहन करतो असेही नाही. कुठेतरी परताव्याची अपेक्षा असतेच.
सर्व मुद्दे समजून घेण्याकरता वरती दिलेल्या दुव्यावरती लेख वाचावा.

डेरेदार आणि उंच वृक्ष त्यांना जास्त पसंत आहेत,खुजी झाडे जास्त पसंत नाहीत.
माझ्या गावी त्यांना मी उंच आणि डेरेदार अशा पिंपळाच्या
आणि वडा च्या झाडावर च जास्त प्रमाणात त्यानं बघितलं आहे.
बाभळ ,कडू निंब, आंबा शेवगा,सीताफळ,पेरू,ह्या झाडावर कधी नाही बघितलं

लेख आवडला. फोटोपण छान आहेत. इतक्या लांबून काढलेले फोटो अगदी सुस्पष्ट आहेत, तुमच्या कष्टांचे आणि चिकित्सक वृत्तीचे कौतुक वाटते नेहमी.

वटवाघूळ प्रत्यक्षात असा दिसतोय तर इलेक्शन कार्डवर किती भयानक दिसत असेल.
Submitted by बोकलत on 12 March, 2020 - 20:10>>> सहज वर बघितलं तर माझीच जुनी कमेंट दिसली मला. जुने दिवस आठवले.

Pages