वटवाघुळ: मानवाचे मित्र

Submitted by Dr Raju Kasambe on 7 March, 2020 - 12:47
vatawaghul

वटवाघुळ: मानवाचे मित्र

सूर्य मावळतीकडे झुकला असताना लॉन वर लग्नाच्या रिसेप्शनची तयारी चालू होती. थोड्याच वेळात संपूर्ण लॉनवर मोठमोठे सोडियमचे लाइट्स चालू करण्यात आले. वधू-वरांचे आगमन झाले. नवरीचा भाऊ अस्वस्थ होता. कारण लाइट्सवर शेकडो किडे आकर्षित झाले आणि घिरट्या घालू लागले. त्यामुळे कार्यक्रमाचे चांगले शूटिंगही करता आले नसते. मी त्याला दिलासा दिला कारण हे किडे हाकलणे किंवा मारणे आपले काम नव्हते.
मी म्हणालो,

“पंधरा-वीस मिनिटांचे काम आहे, मी माझे मजूर सांगितले आहेत किडे पकडायला. चिंता करू नकोस. तुझ्या कडून पैसे घेणार नाही”.
अशा गंभीर प्रसंगी मी फालतू विनोद करीत असल्याचे बघून माझा मित्र विक्षिप्तपणे हसला.

पाचच मिनिटात वीस-पंचवीस छोटी-छोटी वटवाघळं लाईट भोवती अत्यंत शिताफीने घिरट्या घालू लागली. कधी पाहुण्यांच्या डोक्या जवळून तर कधी अगदी जमिनी जवळून घिरट्या घालू लागली. सूर मारू लागली. एकेका किड्याचा पाठलाग करून त्यांना फस्त करू लागली. मी बोललो ते शब्दशः खरे झाले. पंधरा-वीस मिनिटांनी तेथे एकही किडा शिल्लक नव्हता. लॉन वरचे आकाश स्वच्छ झाले होते. माझ्या मजुरांनी आपले काम चोख बजावले होते. तेही कुठलीही मजुरी न घेता!

Flying Fox DSCN0337 (9).JPG
(वाटवाघूळचा चेहरा कोल्हयासारखा दिसतो. छाया: लेखक)

एक अमेरिकन शेतकरी त्याच्या शेतातील एक अत्यंत खोल आणि अंधारी गुहा बुजवायला निघाला होता. शास्त्रज्ञांना कळले तेव्हा त्यांनी त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण तो शेतकरी खूप घाबरलेला होता. त्याचे कारणही तसेच होते. अंधार पडला की त्या गुहेच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या हजारो-लाखो वटवाघुळांची फौज बाहेर पडत असे. त्या वटवाघुळांची त्याला भीती वाटत असे. शास्त्रज्ञांनी आत जाऊन गुहेचा अभ्यास केला असता त्यात अंदाजे 50 लाख वटवाघळं राहत होती असे आढळून आले. विशेष म्हणजे गुहेत जमिनीवर वटवाघुळांची विष्ठा आणि किड्यांच्या पंखांचा गुडघाभर खच पडला होता. शास्त्रज्ञांनी त्या शेतकऱ्याला गुहेत नेले.

“हे पंख कशाचे असतील?” शास्त्रज्ञांने विचारले.
“किड्यांचे” शेतकरी म्हणाला
“कुठले किडे?” शास्त्रज्ञांनी परत विचारले.
“माझ्या शेतातले!” शेतकरी उत्तरला.

हे उत्तर दिल्याबरोबर अंधाऱ्या गुहेत असूनही त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ही निष्पाप वटवाघुळं त्याच्या शेताचे टोळधाडी पासून संरक्षण करीत होती आणि हे महाशय त्या गुहेचे तोंड बुजवायला निघून लाखो वटवाघूळांच्या जीवावर उठले होते. आता मात्र त्याने त्या गुहेच्या तोंडावर स्टीलच्या गजांचे जाळे बसवून घेतले जेणेकरून वटवाघळांना बिनधोकपणे जाता येता येईल पण मनुष्याला मात्र नाही!!

अनेक प्रजातीचे पक्षी दिवसा किडे खातात आणि किड्यांची संख्या नियंत्रित करतात. वटवाघुळं मात्र हेच काम रात्री करतात. रात्रभर ती आपले उदरभरण करतात आणि दिवसभर अंधाऱ्या गुहेत किंवा एखाद्या दुर्लक्षित घरात (जुने वाडे) किंवा झाडावर उलटे लटकून विश्रांती करतात.
वटवाघुळ म्हटलं की बऱ्याच जणांच्या अंगावर काटा येतो. दिसायला जरी वटवाघुळं सुंदर नसली तरीही कर्माने ती निश्चितच सुंदर आहेत. शहरात उंच वडा, पिंपळाच्या झाडावर लटकून दिसतात ती वटवाघुळं मात्र शाकाहारी असतात. त्यांना मोठी फळभक्षी वटवाघुळं (लार्ज फ्रुट-ईटिंग बॅट अथवा फ्लाइंग फॉक्स) असं म्हणतात.
Large Fruit Bat Flying Fox Nagpur DSC_6610 (66).JPG
(फळभक्षी वटवाघुळं (लार्ज फ्रुट-ईटिंग बॅट अथवा फ्लाइंग फॉक्स. छाया - लेखक).

अंधार पडला की ही उडून जाऊन पेरू, उंबर, वड, पिंपळ, पपई, केळी आदी झाडांवर जाऊन लटकतात आणि त्या झाडांची फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या झाडांच्या बिजांचा प्रसार होतो. (ता.क. गेल्या काही वर्षात नाशिक जिल्ह्यात काही ठिकाणी ही वटवाघूळं द्राक्ष बागांना नुकसान करीत आहेत).

मांसाहारी वटवाघुळं अनेक प्रकारचे किडे कीटक खाऊन जगतात आणि परिसरातील किड्यांची, डासांची संख्या नियंत्रणात ठेवतात.
Nakte Watwaghul BAT by Dr. Raju Kasambe.JPG
(नकटे कीटकभक्षी वटवाघूळ. छाया - लेखक)

जिवंत रडार यंत्र
वटवाघुळं रात्री बाहेर पडत असल्याने त्यांना अंधारात दिसायला हवे. घुबडांना अंधारात दिसावे म्हणून त्यांचे डोळे मोठे आणि बटबटीत असतात. पण वटवाघळांचे डोळे अगदीच छोटे असतात. मग त्यांना अंधारात दिसते तरी कसे? शास्त्रज्ञांनी केलेल्या प्रयोगांवरून असे निष्पन्न झाले की वटवाघुळं तोंडावाटे एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनिलहरी म्हणजे कंपने निर्माण करतात. अर्थात ही कंपने आपल्याला ऐकू येत नाहीत. ही कंपने अत्यंत जास्त वारंवारीतेची (अल्ट्रासोनिक वेव्हज) व श्रव्यातीत असतात.

ती कंपने समोर येणाऱ्या प्रत्येक वस्तूवर आढळून परत येतात. वटवाघळांचे कान (बाह्यकर्ण) मोठे असतात आणि त्याद्वारा ही परावर्तित कंपने वटवाघुळं हेरतात आणि हवेत उडणाऱ्या किड्यांचा आकार, वेग, अंतर आणि उडण्याची दिशा जाणतात. निमिषार्धात स्वतःची दिशा बदलून किड्याचा निशाना साधतात. ह्या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत इको-लोकेशन म्हणतात. ह्याच तंत्राचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी अंधारातही विमानांचा शोध घेणाऱ्या रडार यंत्राचा शोध लावला.

वटवाघुळं पक्षी नव्हेत

मुख्य म्हणजे वटवाघुळं उडू शकत असले तरी ते पक्षी नाहीत. तर ते सस्तन प्राणी आहेत. म्हणजे मनुष्य, माकड, हत्ती इत्यादि सस्तन प्राण्यांप्रमाणेच ते आपल्या पिल्लांना स्तनाद्वारे दूध पाजतात. त्यांचा एकंदरीत चेहेरा कोल्हा अथवा कुत्र्यासारखा दिसतो.
आपण ज्याला त्यांचे पंख समजतो ते त्यांच्या हाताच्या बोटांमधले पडदे असतात. त्यांचे पाय आखूड असून अशक्त असतात आणि त्याचा उपयोग झाडावर उलटे लटकण्यासाठी होतो. नाकाचा आणि चेहऱ्याचा आकार कुरूप असल्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. अमेरिकेतील केवळ ‘पिशाच्च’ प्रकारातील ‘वॅम्पायर बॅट’ वटवाघुळं जखमी प्राण्यांचे रक्त पितात असे आढळून आले आहे. जगात इतर कोणतेही वटवाघुळ रक्तपिपासू नाही.

माझे निरीक्षण असे आहे की दिवसा वटवाघुळं लटकली असताना खूप खेळकर असतात आणि दिवसभर भांडकुदळपणा करीत असतात. तसेच खूप आरडाओरडा सुद्धा करतात. एकमेकांना चावतात ओरबाडतात.

अशा वटवाघळांची वसाहत असते तेथे दुर्बिणीतून निरीक्षण करण्याची खूप गंमत असते.

वटवाघुळांबद्दलच्या अंधश्रद्धा
सर्वच वटवाघूळं रक्तपिपासू असतात असा गैरसमज आपल्याकडे आहे. तसेच वटवाघूळं जाणून-बुजून आपल्याला धडक मारतात असा गैरसमज सुद्धा आढळतो. काहीजण तर वटवाघूळं तोंडावाटे विष्ठा बाहेर टाकतात असा सुद्धा दावा करतात. वटवाघूळांना भूत-प्रेताचे, पिशाच्चाचे प्रतिनिधी मानले जाते. हिंदी तसेच इंग्रजी सिनेमा आणि पडक्या पुरातन हवेलीत खरोखरी वटवाघळांचे राहणे या कारणांमुळे अशा अंधश्रद्धा पसरल्या असाव्यात. शेतातील पिकांचे नुकसान करणारी टोळधाड दिवसा केवळ पक्षी आणि रात्री वटवाघूळं नियंत्रणात आणतात हे आपण विसरू नये!

डॉ. राजू कसंबे,

मुंबई

(पूर्व प्रसिद्धी: दैनिक मातृभूमी, 15 ऑगस्ट 2002).

Group content visibility: 
Use group defaults

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात कुठे टोळधाड आल्ती हे सांगाल का. मी अज्ञानी आहे.

नथ्थुराम,
मला पण माहिती नाही. पण सध्या राजस्थानात आलेली आहे. लाखो locust आले आहेत.
गूगल सर्च करा. लिंक आमच्याशी शेअर करा. धन्यवाद.

तुमचे लेख/अनुभव फारच वाचनीय असतात. तुम्ही "चकवाचांदणं" वाचलं आहे का? तुमची अनुभव कथनाची शैली बरीच त्या ढंगाची वाटते.

मस्त माहिती. सोसायटीतल्या उंबराच्या झाडावर काळोख पडू लागला की कैक वटवाघळे यायची आणि कर्कश्य आवाजात भांडायची (?) त्याची आठवण झाली.
किडे खाणारी वटवाघळे असतात हे माहित नव्हते.

चकवाचांदणं अप्रतिम पुस्तक आहे.
या वटवाघूळांचे प्रायव्हेट पार्ट ईतके माणसांसारखे असतात की कसेतरीच वाटते त्यांना पहायला.

मिरजेच्या जवळ एक कळंबी नावाचे गाव आहे. त्या गावात व आसपसच्या भागात काही वर्षांपूर्वी किडीचा प्रादुर्भाव पिकावर फार मोठ्या प्रमाणात आढळून येत होता. बऱ्याच शक्याशक्यता, तपास केल्यावर शेती अधिकारी/तज्ज्ञाना आढळून आले की गावातल्या काही मुलांनी एक दोन वर्षांपूर्वी गम्मत म्हणून अनेक वाघुळांना मारले होते छऱ्याच्या बंदुकानी. गावात हमरस्त्यालगत मोठी झाडे होती ज्यावर या वाटवाघुलांची वस्ती होती. मग पुन्हा त्यांची संख्या वाढवली व कीड आटोक्यात आली

चकवाचांदणं अप्रतिम पुस्तक आहे.
या वटवाघूळांचे प्रायव्हेट पार्ट ईतके माणसांसारखे असतात की कसेतरीच वाटते त्यांना पहायला.
नवीन Submitted by नथ्थुराम on 7 March, 2020 - 13:43>> धूवायचं सोडून लोंबतंय काय हे पाहण्याची खोड आहे तूला नथ्थू. आजवर कुणीही असे बोलले नव्हते.

त्या मोठ्या वटवाघळांचा फोटो काढणे जमले नाही कारण अंधिर पडतानाच येतात.
ज्या झाडाला अशोक ( खोटा अशोक किंवा सोसायटी अशोक) म्हणतात त्यावर जांभळाच्या चवीची आणि तेवढीच लहान ,एक डेख असलेली काळी फळं येतात. ती खायला ही छोटी वटवाघळं येतात. त्याचा गर खाऊन स्वच्छ बिया खाली टाकतात.
एकदा संध्याकाळी एक वटवाघूळ हातगाडीवर फेऱ्या मारत होते. जवळ जाऊन पाहिले तर त्यावर सिताफळे होती आणि त्यातली खूप पिकलेली होती.

छान लेख व माहिती. धन्यवाद. वटवाघळे दिवसाही खूप आवाज करतात हे राणीबागेत पाहिलंय. तिथे 1-2 प्रचंड उंचीची झाडे आहेत त्याला हजारो वाघळे लटकत असतात दिवसा.

अशोक chya झाडाची फळं खूप खायची वटवाघळे म्हणून प्रयोग म्हणून त्याची चव घेण्यासाठी ते फळ मी खाल्ल होते .

खूप खूप तिखट

बदामाची फळे, अशोकाची फळे, उंबरं, खाताना बघितले आहे. फक्त कडू बदामाची फळे खाताना नाही बघितली.
सर्वांनी माहितीत खूप भर घातली. धन्यवाद!!

छान लेख.

>> ही कंपने अत्यंत कमी वारंवारीतेची (अल्ट्रासोनिक वेव्हज) व श्रव्यातीत असतात.

वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी ना? मग कंपने अत्यंत जास्त वारंवारीतेची असतात असा बदल कराल का?

छान लेख!
आमच्या राज्यातील सर्व वटवाघळे ही किटकभक्षक आहेत. इथल्या कडक हिवाळ्यात गुहांतून आश्रय घेतात, हिबरनेट (मराठी शब्द आठवत नाही) करतात. पानगळीचा मोसम हा यांचा मेटिंग सिझन. मात्र मादी हे स्पर्म हिबरनेशनच्या काळत जतन करते आणि वसंतऋतूत गर्भधारणा होते. 'व्हाईट नोज सिंड्रोम' या आजाराची बाधा झाल्याने ही वटवाघळे आमच्या स्टेटमधे ' एनडेंजर स्पेसीज' मधे येतात.

माहितीपूर्ण लेख आणि भयंकर फोटो
पिक्चर आणि कादंबऱ्या परिमाण असा आहे की वटवाघूळ जवळून उडताना दिसलं की पहिले गळा झाकावा वाटतो.ते एच एफ वेव्ह ने उडतं, आपटणार नाही माहीत असून पण.

अगदी चावून ड्रॅकुला वगैरे बनायची भीती वाटत नाही पण चावलं तर इन्फेक्शन/निपा वगैरे व्हायची जास्त भीती वाटते.
बाय द वे फोटो चांगले आहेत सर्व या लेखातले

व्यत्यय
वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी ना? मग कंपने अत्यंत जास्त वारंवारीतेची असतात असा बदल कराल का?

बरोबर आहे. दुरूस्ती केली. धन्यवाद.

सुंदर लेख आणि फोटो. पहिल्या फोटोत अगदी कुत्र्यासारखा चेहरा दिसतोय. (कोल्ह्याला जवळून पाहिलेलं नाही त्यामुळे)

मध्यंतरी पेपरमधे माणसाला वटवाघुळ चावल्याची बातमी वाचलेली आठवतीये. पहिल्यांदाच असा प्रसंग ओढावल्यामुळे नेमकी कोणती लस द्यावी? असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता.

उत्तम माहिती !!! मागे फेसबुकवर एक फोटो बघितला होता. वटवाघुळे माकडांसारखी आपल्या पिल्लाला पोटापाशी घेऊन उडतात.

छान माहिती!
ती जी फळं खाणारी वटवाघुळे आहेत ती मुंबईत मंचरजी जोशी पांच उद्यान (फाईव्ह गार्डन) मध्ये भरपुर आहेत.

हवेत उडू शकणार एकमेव सस्तन प्राणी असणार वटवाघूळ.
बरीच लोकं ह्याला प्राणी न समजता पक्षी च समजतात.
वटवाघूळ घरटे बांधत नाहीत मग ते पिल्लांची काळजी कशी घेतात.

Pages