मराठी भाषा दिवस २०२० - स्वयंपाकघरातील प्रयोगशाळा

Submitted by मभा दिन संयोजक on 17 February, 2020 - 13:17

स्वयंपाकघर म्हणजे आपल्या घराचा केंद्रबिंदूच जणू! घरात प्रत्येकाच्या स्वतंत्र खोल्या असल्या तरी सर्व कुटुंबाला एकत्र ठेवणारे हे स्वयंपाकघर, अनेक शास्त्रीय प्रयोग घडवणारी प्रयोगशाळा असते हे सांगितले तर कदाचित आश्चर्य वाटेल. पण इथे आपल्या सुगरणी आणि बल्लवाचार्य रोज वेगवेगळे शास्त्रीय प्रयोग हसतखेळत सहजतेने करत असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर स्वयंपाक करताना ज्या प्रक्रिया घडतात त्या प्रत्येकामागे एक ठोस शास्त्रीय आधार असतो. हे नक्की कसे? त्याबद्दल आज आपण येथे तुम्हा सर्वांच्या प्रतिसादांमधून जाणून घेऊ.

kitchen prayogshala.jpg

अगदी साधी उदाहरणे बघू ―

सफरचंद कापून उघड्यावर ठेवले की तांबूस होते आणि कांदा कापल्यावरच कसे डोळ्यात पाणी येते? हे नक्की का घडते? ते समजले की आपसूक आपल्याला ते टाळायचा उपायही सापड़तो. तसेच पॉपकॉर्न करताना नक्की असे काय घडते जेणेकरून इवलासा मक्याचा दाणा हा असा टम्म फुगतो ते रहस्य उलगडून पाहिले की आपले पॉपकॉर्न अधिक यम्मी बनणार हे नक्कीच !

अन्न शिजवण्याची क्रिया तर निव्वळ रसायनशास्त्रच आहे, ज्यात हीटिंग, फ्रिझिंग, मिक्सिंग आणि ब्लेंडिंग अश्या विविध क्रिया पार पाडल्या जातात. हे घडत असताना अनेक भौतिक आणि रासायनिक प्रक्रिया एकाच वेळी घडत राहतात. अगदी साधे साखरेचे उदाहरण आपण पाहिले तर ह्या साखरेची प्रथिनांमधील अमिनो आम्लांबरोबर होणारी मायलार्ड रिएक्शन आपल्या पदार्थाना खरपूस तपकिरी रंग देण्यास कारणीभूत ठरते. थोडीसी उष्णता अजून वाढवली तर ह्याच साखरेचे कॅरेमल बनते आणि प्रमाणापेक्षा फार तापवली तर अर्थातच जळल्याने आपल्या रेसीपीची चव खराब होते.

आता प्रत्येकाला आणि प्रत्येकीला आपली रेसिपी उत्कृष्ट बनावी असं नेहमीच वाटतं ना! मग ह्यासाठी क्रियेमागील तत्व लक्षात आले की सर्व गणित सोप्पे होऊन जाते. अश्या सोप्या गणितांचा एकत्रित संग्रह असावा म्हणून आपल्या किचनमधील घटनांमागील शास्त्रीय कारणे शोधून लिहा बरं इथे पटापट!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@नम्रता ताई
ज्वारीची उकड घ्यायची म्हणजे नीट कळले नाही , तांदुळाची उकड मिळते तशी ज्वारीची पण मिळते का ?

मोदकाच्या उकडीसारखी ज्वारीच्या पिठाची उकड. ज्या मापी
ज्वारीचं चाळलेलं पीठ त्याच मापी आधण पाणी , त्यात ते पीठ मिसळून गुठळ्या न होतील असं हलवून झाकण ठेवून दोन दणदणीत वाफा काढाव्यात. गॅस बंद करून वाफ मुरली की ती तयार उकड मळून मऊ, एकसारखी करावी. मग लाटून भाकरी-कम-फुलके करावेत. तव्यावर टाकल्यावर भाकरीसारखे पाणी फिरवून भाजावेत. पाणी नाही फिरवलं तर नेहमीच्या फुलक्यासारखेही भाजता येतात. आम्ही हे नाचणीच्या पिठाचे करतो.

कोणते पिठ वापरता त्यावर बरेच आहे. अमेरिकेत तुमच्याकडे सोहम चे ज्वारीचे पीठ मिळते का पहा, किंवा जलपुर. छान होतात त्याने भाकरी. उकड नाही काढावी लागत. मी नुसते गरम पाणी घालते आणि मूठभर गव्हाचे पिठ चिकटपणाकरता घालते. मस्त होतात भाकरी अगदी.

काल माझ्या स्वैपाकघरात घडलेल्या (खरं म्हणजे थोडक्यात निभावलेल्या) एका छोट्या अपघातामुळे या धाग्याची आठवण झाली.
मेदूवडे तळायला घेतले होते. पहिले दोन वडे व्यवस्थित तळले गेले. पुढचे दोन वडे तळणीत घातले होते. जवळजवळ तळून झालेच होते आणि अचानक मोठा आवाज होऊन वडा फुटला आणि गरम तेल जोरात सगळीकडे उडालं. माझ्या अंगावरही उडालं. मी लगेच गार पाणी तोंडावर आणि हातावर मारलं. नवऱ्याने लगेचच गॅस बंद केला. मी जरा शांत बसले आणि पाचसात मिनिटांंनंतर नवरा सहज कढईजवळ बघायला गेला आणि नेमकं तेव्हाच कढईतला दुसरा वडा फुटून उडाला आणि त्याच्या अंगावर पडला. त्यानेही लगेच गार पाणी वगैरे मारलं अंगावर. पण आम्ही एकदम हबकलो. जरा शांत डोक्याने विचार केला, तेव्हा असं का झालं असेल त्याचा अंदाज आला.

वडे तळत असताना आच आवश्यकतेपेक्षा जास्त ठेवली गेली असावी. त्यामुळे वड्याची बाहेरची बाजू लवकर तळली जाऊन कडक झाली. आतली प्रसरण पावणारी हवा आतच अडकून बसली. जेव्हा ती खूपच प्रसरण पावली, तेव्हा ती बाहेरचं कवच फोडून स्फोट झाल्यासारखी जोरात बाहेर आली आणि त्यामुळे तेल सगळीकडे उडालं.

नंतर जरी गॅस बंद केला असला तरी गरम तेलामुळे दुसऱ्या वड्यातली हवाही expand होतच राहिली आणि आत अडकून राहणं अशक्य झाल्यावर वडा फुटून उडाला.

सुदैवाने आम्हाला दोघांनाही काही इजा झाली नाही. डोळ्यात तेल गेलं नाही किंवा चेहऱ्यावर डाग पडण्याइतकं तेल उडालं नाही. तेल पुसण्याचा मात्र प्रचंड व्याप झाला. शेगडीला तेलाची आंघोळ झाली होती Sad जमिनीवर, भिंतीवर, आजूबाजूला चार फुटांपर्यंत तेलाचे भरपूर ओघळ आले होते.

आच कमी ठेवून मेदूवडे तळायला हवे होते. बाहेरचं आवरण कडक होण्यापूर्वीच वडे तळणीतून काढायला हवे होते.
इतरांना या अनुभवाचा उपयोग झाला तर होईल म्हणून इथे लिहिलं आहे. Happy

बाप रे।
बरे झाले ना दोघांना ही इजा नाही झाली..
साबुदाणा वडे/अनारसे तळतानाही असे होऊ शकते..मैत्रिणींंच्या बाबतीत झाले आहे.
फायनली वडे खायला मिळाले कि नाही Happy

बापरे. वाचलात
कधीकधी फॅट कंटेंट जास्त असला तर दूधाचं पण असंच होतं.
स्फोट होऊन इकडे तिकडे उडतं.
यावरुन आठवलं. पालक सूप करताना उकडलेला पालक नीट गार होऊ न देता मिक्सर मध्ये टाकला तर स्टिम प्रेशर ने भिंतीला पालकाची आंघोळ होते.
तो बराच गार होऊ देऊन मग बर्फाचा खडा टाकून मिक्सर ला फिरवता येतो.

फायनली वडे खायला मिळाले कि नाही >> पहिले दोन मिळाले तेवढेच Wink

नशीब दोघांनाही इजा झाली नाही. >> हो ना!

कधीकधी फॅट कंटेंट जास्त असला तर दूधाचं पण असंच होतं.
स्फोट होऊन इकडे तिकडे उडतं. >> हो का? हेही कधी अनुभवलं नाहीये. दूध नासायला लागलं तर आवाज येतो तो ऐकलाय Happy

असले प्रकार सेफ्टी गॉगल घालून करायला पाहिजेत.>>+१
मी साबुदाना वडा करताना असे झाले होते. मग पुढचे वडे तळताना वड्यांची जाडी आणि आकार कमी केला.

कधीकधी फॅट कंटेंट जास्त असला तर दूधाचं पण असंच होतं.
स्फोट होऊन इकडे तिकडे उडतं.
----
अनुभवते आहे, इकडे गावाला घरच्या म्हशीचं दूध येतं
त्यामुळे मला real दूध कसं असतं ते समजलं

बापरे!
मेदूवड्याला भोक पाडून सरफेस एरिआ वाढवत असतील का? की जेणे करुन वाफ बाहेर पडायला जास्त ठिकाणाहून वाव मिळेल? तसंच पीठ किंचित आंबवत असतील का? की त्याने पोरस होऊन बाहेरील आवरण ही किंचित पोरस बनून वाफ बाहेर पडेल?
>>आम्हाला दोघांनाही काही इजा झाली नाही. डोळ्यात तेल गेलं नाही >> 'डोळ्यात तेल घालून वडे बघितले' असा हाईंडसाईट जोक कर. (तेल गेलं नाहिये तर एक जोरदार जोक तर झालाच पाहिजे. Proud )

बापरे!
>>कधीकधी फॅट कंटेंट जास्त असला तर दूधाचं पण असंच होतं.
स्फोट होऊन इकडे तिकडे उडतं. >>
माझे असे दुधाच्या बाबतीत पनीर करताना झाले होते. एक गॅलन दुधाचे पनीर करत होते. व्हे आणि पनीर वेगळे झाले आणि तेवढ्यात कुणाचा तरी फोन आला म्हणून तो घ्यायला मी फॅमिलीरुममधे गेले. १० मिनीटे बोलणे होईपर्यंत इकडे वरचा पनीरचा थर आणि खाली गरम व्हे यामधे वाफ कोंडत गेली आणि मी फोन ठेवायला आणि मोठा स्फोट व्हायला एकच गाठ! आधी वाटले की बॉयलरच फुटला पण ते कपाट सुस्थितीत होते. मग नजर स्वयंपाकघराकडे गेली तर अगदी सिलिंगपर्यंत सगळीकडे पनीर आणि व्हे उडाले होते.

नजर स्वयंपाकघराकडे गेली तर अगदी सिलिंगपर्यंत सगळीकडे पनीर आणि व्हे उडाले होते.>>>बापरे! पुढे किती साफसफाई करावी लागली असेल!

सिलिंगपर्यंत सगळीकडे पनीर आणि व्हे उडाले होते.>> हरे राम!!
मेदुवडे तळताना झारा उलटा ठेवते त्यावर.>> ओह! श्रवु, म्हणजे वडा फुटला तरी उडणार नाही. चांगली आयडिया आहे.

सुदैवाने तुम्हाला इजा झाली नाही. माझ्या मैत्रिणीचा अल्मोस्ट अर्धा चेहरा आणि बराचसा हात असा मेदुवडा तेलात फुटुन जळाला आहे. डाग पण राहिलेत आता अंगावर.
काळजी घ्या सगळ्यांनीच मेदुवडे तळताना.

बापरे अनुश्री Sad
अमित, मेदूवड्याला भोक पाडून सरफेस एरिआ वाढवत असतील का? की जेणे करुन वाफ बाहेर पडायला जास्त ठिकाणाहून वाव मिळेल? >> हो, कदाचित तसंच कारण असेल. भोक पाडलं होतं मीही. Actually पहिल्यांदा घातलेलाही एक वडा थोडा आवाज करून थोडा उकलला होता.
मेदूवडे किंवा दहीवडे करताना उलट पीठ आंबवत नाहीत. वाटून झालं की लगेच वडे तळतात. नाही तर वडे खूप तेल पितात (म्हणे).
'डोळ्यात तेल घालून वडे बघितले' >> Proud
हो, नंतर 'आपला वडा झाला' वगैरे जोक्स सुचायला लागलेच!

अनु, पालकाचा अनुभव नाही, पण टॉमेटोचा घेतलाय एकदा. पावभाजी करण्यासाठी शिजवलेले टॉमेटो जरा गरम असतानाच मिक्सरमध्ये घातले आणि फाटकन सगळीकडे टॉमेटोसिंचन झालं. Sad

वडा नाही पण मिरचीची भजी करतांना त्यातली मिर्ची (जी मातोश्रींनी मधून कापलीच नव्हती) फुटून तेल डोळ्याच्या वर उडालेले. चेहर्‍यावर किती दिवस डाग होते. डोळा थोडक्यात वाचला

काळजी घ्या सर्वांनी !!

<<<आता हे वाचून मेदुवडा करायची भिती वाटू लागली. >>> +१११

कदाचित म्हणुन मम्मा असे तळताना काट्याने हलकेसे भोक करते मेदुवडे, साबुवडे, मिरची भजी, अगदी डाळवड्याला सुद्धा अर्धवट शिजतात तेव्हा, त्याने वडा फुटत नाही अन आतुन कच्चा किंवा पिठासारखा लागत नाही.

पण मेदुवडे तेल खुप खातात कमी तेलाचे हवे असतील तर त्यात तांदळाचे पिठ घालावे लागते म्हणुन हल्ली आप्पेपात्रात बनविते ती.

माझे असे साबुदाणा वड्याचे होते बऱ्याचदा . वडा फुटून फुलासारखा आकार येतो . घरी इतरांना वडे खूप आवडतात , पण करायची भीतीच वाटते . असे होऊ नये म्हणून साबुदाण्यात दाण्याच्या कुटाबरोबर अजून काही मिसळावे का ?

<<<साबुदाण्यात दाण्याच्या कुटाबरोबर अजून काही मिसळावे का ?>>> उकडून कुस्करलेला बटाटा, अन वडा शक्यतो थोडा पातळ/चपटा करायचा

वावे, हो, तसेही करू शकता तेल जास्त असेल तर, आम्ही कढईत तेल जास्त घेत नाही मग सरळ टोचतो, तेल कमी असल्याने काही त्रास होत नाही

थालीपीठ ला छिद्र पाडन्या मागे....ते फुगु नये हे नव्हे .....तर ते लव्कर शिजावे आणि खुस्स्खुशित व्हावे,..हे कारण असावे

रविवारी माझ्यासाठी 1 अंडे उकडले.ते आत जरा कच्चे असल्याने आळसाने microwave madhe ठेवले. अगदी जरासेच दुर्लक्ष झाले.एकदम धोपकन आवाज आला.म्हटले चला गेला मावे.20-२५सेकंद उशीर झाल्यामुळे अंडे मावेत फुटून सर्वभर कीस पडला होता.सगळे नीट पुसून घेईपर्यंत अर्धा तास झाला.

अंडे मायक्रोवेव्ह मध्ये जरा रिस्की प्रकार आहे.एकदम मोजत मोजत अंदाज घेत उकडावे लागते.ज्याने मायक्रोव्हेव चा शोध लावला त्याच्याकडून पण अंड्याचा असाच स्फोट झाला होता(म्हणजे शास्त्रज्ञ बनायला स्कोप आहे Happy )

मावे Egg cooker मिळते त्यातच उकडावे , उकडलेले अंडे पुन्हा मावेत गरम करणे म्हणजे साफसफाई ठरलेली आहे. शिवाय भयंकर वास.... मीपण आळशीपणाने काम वाढवले आहे बरेचदा Wink म्हणून टिप ग्राह्य समजावी.
वरील वडास्फोटातून वाचलेल्यांचे अभिनंदन. फार गच्च दाबून करू नयेत हलक्या हाताने चपटे /पातळ करावेत ही टिप मी ही वापरते.

Pages