गुरुपौर्णिमेनिमित्त चराचरातील सर्व गुरूंना विनम्र अभिवादन !
गुरू
बाह्य जगी जरी असे वेगळा
अंतर्यामी मनु मातीचा गोळा
निसर्ग असे गुरूंची शाळा
घट घडविण्या गुणी आगळा
वृक्षाचे उदार दातृत्व घ्यावे
नदीचे पोषक नेतृत्व घ्यावे
ताऱ्यांचे घ्यावे चमचमणे
वाऱ्याचे जगी असून नसणे
आईची घ्यावी निःस्वार्थ माया
पत्नीची शीतल चंदन छाया
बाळाचे घ्यावे निष्पाप हसणे
बाबांचे जीवनी कष्ट उपसणे
गुरूशिष्यांचे अद्वैत असावे
लहानमोठे कुणी नसावे
सद्गुणांचा कुणी न पुतळा
दुर्गुणांची तीट सकळा
गुरू होऊन विद्याधन द्यावे
शिष्य होऊन झोळी घ्यावे
गुरूशिष्य नाते असे पवित्र
धरती अंबरी हे वसे सर्वत्र
चराचरात गुरू दिसतो
घराघरात गुरू असतो
गुरू करी जग झगमगते
गुरुविना ना जग उलगडते
मायबाप नि शिक्षक मोठे
गुरू असे मिळती कोठे
विनम्रपणे वंदन करतो
प्रातःकाळी त्यांना स्मरतो
- प्रा.अरुण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita