निवडणूक
निवडणूक ही दसरा-दिवाळी
धुळवड शिमगा की होळी?
मुखी कुणा पडे शिरापुरी
कुणा मुखी मीठ भाकरी
पंचवार्षिक सण असे, निःसंशय निर्विवाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद
रंग पक्षांचे जरी वेगळे
अंग तयांचे एकच सगळे
कुणी काळे, कुणी गोरे
निवडून येता सगळे बगळे
जनसेवेचा बुरखा घेऊ, जगणे करू आबाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद
घर आपले सांभाळू आधी
देशसेवाही करू कधीकधी
सशक्त समृद्ध आपण होऊ
मिळून खाऊ भाऊ भाऊ
रोज दसरा रोज दिवाळी, गरिबी करू बाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद
जनता आपल्या सेवेसाठी
आमुचा असे अधिकार
पाच वर्षे बिनधास्त आता
आम्ही मतसिद्ध वतनदार
देश आमचा, राज्य आमचे, आमचा राष्ट्रवाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद
पुढची बेगमी करून ठेवू
खिसे आपले भरून घेऊ
उमेदवारी न मिळाली तर
पक्षोल्लंघन आम्ही करू
आम्ही मालक या देशाचे, नाही त्याचा वाद
समतावाद मुर्दाबाद, लोकशाही जिंदाबाद
- प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita