फार फार वर्षांपूर्वी आकाशात दहा सूर्य राहायचे. बापरे! ही कल्पनाच किती भयानक आहे. बिचाऱ्या पृथ्वीची जमीन म्हणजे नुसता तापलेला तवा असायची त्याकाळी. त्याकाळातली लोकं नेहमी उन्हाच्या तापाने कावलेली असायची. कधी म्हणून थंडी नाही, जरा म्हणून रात्र नाही, आकाशात गुलाबी रंगाची जराही निशाणी नाही. अगदी तप्त आयुष्य.
त्यावेळच्या लोकांच्या असंख्य देवांपैकी, काही देवांना ह्या लोकांच्या त्रासाची काही कल्पनाच नव्हती. का? त्यांचं घर उंच आकाशात, ह्या सगळ्या सूर्यांच्या पलीकडे होतं ना, त्यांना माणसांच्या दुःखाची गंधवार्ताही नव्हती. पण माणसांवर कृपादृष्टी धरणाऱ्या देवांना मात्र बिचाऱ्या जनतेची कणव वाटे. ह्या सगळ्या सूर्यांना आकाशातून हटवून पृथ्वीचा आणि माणसांचा ताप कसा कमी करायचा ह्यावर त्यांनी बराच विचार केला, पण उपाय सापडेना. शेवटी त्यांतला एक छोटूला देव म्हणाला, "आपण माणसाला विचार करण्याची अक्कल दिली आहे, मग त्यांनाच विचार करायला लावू, आणि जो माणूस छानदार उपाय करेल त्याला एक गंम्माडी जंम्माडी सिद्धी बक्षीस म्हणून देऊ. नाहीतरी माणसांना स्पर्धा आवडतेच!" सगळ्या देवांना ही कल्पना आवडली.
मग काय विचारता? खाली पृथ्वीवर सगळ्या शहाण्या सुरत्या माणसांनी त्यांची टकली डोकी खाजवली, बोचऱ्या दाढ्या कुरवाळल्या आणि आपल्या भारी भारी मेंदूना झिणझिण्या येईपर्यंत विचार केले, चर्चा केली...पण अंहं! उपाय मिळेल तर शपथ.
काही शूर योद्धे उठले, थेट सुर्यांबरोबर युद्ध पुकारण्यासाठी त्यांनी शंख फुंकले. पण सगळ्या सुर्यांनी त्यांच्या शंखनादाकडे थेट दुर्लक्ष केलं आणि आपले आकाशात तळपत राहिले.
ह्या सगळ्यांमध्ये हौ यी नावाचा एक भला शहाणा आणि महाशूर असा सरदार होता. त्याची अक्कल आणि बाण इतके भारी काम करायचे की सगळे त्याला तळपत्या सुर्याचीच उपमा द्यायचे. तर आपले हौ यी साहेब, त्यांनी शक्कल लढवली. दहापैकी नऊ सुर्यांना अचूक नेम धरून बाणाने लांब हाकून द्यायची योजना बनविली.
आता सुर्यांना हकलायचं, म्हणजे भले मोठ्ठे धनुष्य आणि अगदी टोकदार बाण हवेत. असलं आयुध बनवण्यासाठी अगदी भारीतले बांबू आणि लवचिक वेत हवेत. सरदार हौ यी अश्या बांबूच्या अन वेताच्या शोधात अख्ख्या चीनभर हिंडले. मग मनासारखा कच्चा माल घेऊन धनुष्यबाण बनविले. ते धनुष्य इतकं मोठं होतं की ते फक्त उचलायला दोनशे माणसं लागायची आणि ते बाण वाहण्याकरिता अजून दोनशे माणसं. आता सुर्यांवर नेम धरण्यासाठी सगळ्यात उंच पर्वतशिखरावर सरदारसाहेब आपल्या हजार लोकांच्या ताफ्यासह निघाले. ताफ्यातील लोकांनी धनुष्य आणि बाण वर उचलून आणले. त्या धनुष्याची प्रत्यंचा शंभर लोकांनी मिळून बांधली. मग पन्नास लोकांनी बाण चढवला. हौ यी ने नीट नेम धरून पहिल्या सुर्यावर बाण सोडला... आणि व्हूस्स! बाणाने सूर्याला खूप लांब ढकलून दिलं. इतकं लांब की आता तो पृथ्वीच्या सर्वात उंच पर्वतावरून दिसतही नव्हता.
सरदारसाहेबांचे ताफ्यातील लोक इतके दमले की त्यांना आराम करायला एक आठवडा लागला. आठवड्याभराने पुन्हा हौ यी साहेबानी नेम धरला. दुसऱ्या सुर्यालाही पृथ्वीच्या कक्षेतून हाकलून लावलं. मग परत आराम, परत नेम असं करत नऊ आठवड्यांत नऊ सुर्यांना कधीही न परतण्याच्या दौऱ्यावर धाडून दिलं.
सरतेशेवटी जेव्हा एकच सूर्य राहिला आणि पृथ्वीवर थंडावा आला, तेव्हा सारी पृथ्वी जल्लोष करू लागली. फक्त माणसं नव्हे, सगळे प्राणी, पक्षी किडे सगळेच! नद्या वाहू लागल्या; रात्र,पहाट, संध्याकाळ ,थंडी, पिकं, जंगलं, बागा अशी सगळी नवलाईची सुखं पृथ्वीवर नांदू लागली. सगळे देव हौ यी वर खुष झाले. देवांनी त्याला बक्षीस म्हणून एका सुरेख सुरईत एक जंम्माडी गंम्माडी पेय भरून दिलं. हे पेय जवळ जवळ अमृतासारखंच होतं म्हणे!
छोटुल्या देवाने हौयीला सांगितलं," या पेयचा एकच थेंब दरवर्षी केवळ एकदाच प्यायचा. हा थेंब तुझं आयुष्य दहा वर्षांनी वाढविल. पण हां! हाव करायची नाही. जास्त प्यायलास तर काहीतरी वाईट, अगदी अगदी वाईट होईल." आता नक्की काय वाईट होणार ते मात्र त्यांनी आपल्या सरदाराला सांगितलं नाही.
सरदार साहेब ही सुराई घेऊन मोठ्या खुशीत घरी आले. त्यांनी आपल्या बायकोला, चँग एर, सगळी हकीकत ऐकवली. छोटुल्या देवाचा अतिहाव न करण्याचा धोक्याचा इशाराही पुनःपुन्हा समजावून सांगितला. मग दोघांनीही त्या पेयचा एक एक थेंब प्यायला. पुढच्या वर्षी पिण्याकरिता म्हणून होऊ यीने ती सुराई जपून आपल्या तिजोरीत ठेवली, कडी कोयांड्याने तिजोरी बंद केली आणि किल्ली आपल्या कामरपट्ट्यात जपून ठेवली.
इकडे चँग एरला उत्सुकता गप्प बसू देईना. तिला वाटले, 'काय होईल जास्त पेय प्यायलं तर? त्याची चव इतकी अनोखी आहे की बस्स. अश्या चवीचं पेय काही वाईट करू शकत नाही, काही करून थोडं जास्त पिऊन बघावंच म्हणजे झालं.'
तिनं शक्कल लढवली. सरदारसाहेबांना म्हणाली, "देवांनी तुम्हाला एवढं मोठं यश दिलं, इतकं छान बक्षीस दिलं, तर आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. तुमच्यामुळे रात्र आणि चंद्र तयार झाला त्या प्रित्यर्थ मी चांधीरडी म्हणजे चंद्रासारखी दिसणारी धिरडी बनवणार आहे आणि ती देवांना अर्पण करणार आहे. पण त्याकरता मला काही दुर्मिळ पदार्थ लागतिल. तुम्ही द्याल का आणून?" बाहेर अगदी हुश्शार असलेला हौ यी, ह्या बोलण्याला चटकन फसला. तो कपडे बदलत असताना, चँग एरने त्याच्या पट्ट्यातील किल्ली चोरली. हौ यी लगेच बायकोकडून यादी घेतली आणि समान आणायला निघाला आपला ताफा घेऊन.
त्याची पाठ वळताक्षणी, चँग एर तिजोरीकडे धावली, कुलूप उघडलं आणि सुराई काढली.
एक मोठ्ठा घोट घेतला...आहा!! मस्त चव. तिने समोरच्याच आरश्यात पाहिलं. ती इतकी तरुण दिसत होती, तिची त्वचा इतकी चमकदार झाली होती, तिला इतकं हलकं वाटत होतं की बस्स. 'छे, ह्या पेयाने काही वाईट होऊच शकत नाही. देवांनी आपल्या भाबड्या नवऱ्याला फसवलंच. हौ त्यांच्याइतका शक्तिशाली होऊ नये म्हणूनच त्यांनी ही बनावट गोष्ट रचली असावी. अजून थोडं प्यावं झालं.' मग तिनं अजून एक घोट घेतला. 'हलकं अगदी हलकं वाटतंय. मस्त नाचावं वाटतंय. ला ला ला' गाणं गुणगुणत तिने आपली नाचरी पावलं हलवली. इतकं छान तिला जन्मात नाचता आलं नव्हतं. 'हौनं मला पाहिलं ना, परत प्रेमात पडेल माझ्या' अजून अजून करत ती बरंच पेय प्यायली. ओहोहो... ती इतकी हलकी झाली की ती आता तरंगत होती, तिला वजन असं नव्हतंच. हो, ती वाऱ्यावर स्वर होऊन उडू शकत होती.
तरंगत तरंगत ती खिडकीतून बाहेर उडाली, वाड्यावरून, उंच झाडांवरून अगदी उंच उडणाऱ्या घारींच्याही वरून ती तरंगत चालली होती. खाली बघितला, तो सगळ्यात उंच पर्वत...कित्ती छोटा दिसत होता. माणसं तर मुंगीसारखी वाटत होती. 'मज्जा आली. चला आता परतुन घरी जाऊ.' तिनं पाय हलवले, हात हलवले, माना वेळावल्या, अगदी लाथा झाडल्या गाढवसारख्या; पण रामा शिवा गोविंदा...खाली जाताच येईना! ती आपली वर वर वरच चालली होती.
इकडे सरदार हौ यी सगळं समान घेऊन चविष्ट चांधीरडी खाण्याचे बेत आखत घरी आले. पण घरी त्यांची चँग नव्हतीच मुळी. गेली कुठे? घरभर पाहिलं आणि उघडी तिजोरी आणि अर्धी रिकामी सुराई दिसल्यावर त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला. बिचारे रडूच लागले चँग एरचं काय झालं असावं अश्या विचारातून.
चँग एर बाई आपल्या उडतच होत्या... उंच, अजून उंच. 'देवा हे थाम्बणार तरी कधी? आणि कुठे?'
धाड!#*% चँग एर चंद्रावर जोरदार धडकल्या. उठायला जाता धडपडल्या. तेवढ्यात तिकडे छोटूला देव आला. चँग एरनं त्याची माफी मागितली, पण तिला परत नेणं त्याच्या हातात नव्हतंच. तेव्हापासून चँग एर चंद्रावरच राहते. देवांकरिता चांधीरडी बनवते आणि देवही तिच्याकडं मधून मधून जाऊन पुख्खा झोडून येतात.
मस्त बाल कथा
मस्त बाल कथा
मस्त.
मस्त.
मस्त ! ( याच थीम शी साधर्म्य
मस्त ! ( याच थीम शी साधर्म्य असलेली `अनुसुयेचे अनुपान' नावाची कथा ऐसी अक्षरे च्या एका अंकात वाचली होती ती आठवली . )
छानच आहे बालकथा
छानच आहे बालकथा
किती क्यूट
किती क्यूट
छान!
छान!
https://youtu.be/oXczHYZcRvo
https://youtu.be/oXczHYZcRvo
छान!
छान!
अरे वा! मस्तच आहे ही कथा.
अरे वा! मस्तच आहे ही कथा.
छानेय गोष्ट
छानेय गोष्ट
आवडली गोष्ट
आवडली गोष्ट
छान
छान
छान आहे.
छान आहे.
धन्यवाद सगळ्यांना!
धन्यवाद सगळ्यांना!
छान!
छान!
मस्त चिनी लोककथा आहे. याचे
मस्त चिनी लोककथा आहे. याचे दुसरे version ही वाचले होते. त्यात हौ यी चा दुश्मन ते पेय चोरण्यासाठी त्याच्या घरी येतो पण त्याला ते मिळू नये म्हणून हौ यी ची बायको ते स्वतःच पिऊन टाकते आणि मग हलकी होऊन चंद्रावर जाते. चंद्रावर तिला एकटं वाटायला नको म्हणून देव तिला कंपनी म्हणून एक ससा पाठवतात. तोच तो चंद्रावरचा ससा!
चीनमधे तिला Lady of the Moon म्हणतात आणि Moon Festival साजरा केला जातो. तेव्हा Moon Cakes (चांधिरडी) बनवतात आणि प्रसाद म्हणून अर्पण करतात.
चीकू, हे version पण मस्त आहे.
चीकू, हे version पण मस्त आहे. माझ्या वाचण्यात आलं नव्हतं.
सुंद र कथा
सुंद र कथा
छान गोष्ट.
छान गोष्ट.
मुन केक आणि मुन ससा डोरेमॉनमधे पाहिले होते.
पुख्खा झोडून येतात.>>>>>म्हणजे काय???
पुक्खा झोडणे म्हणजे ताव मारणे
पुक्खा झोडणे म्हणजे ताव मारणे, हादडून येणे.